भाष्य : कॅनडातील आंदोलनाचे अपहरण

साथीच्या रोगाचा मुकाबला करताना काही घटकांकडून विरोध होत असतो. १९१९ मध्ये टोरांटोत देवीवरील लसीच्या सक्तीला विरोध झाला होता.
भाष्य : कॅनडातील आंदोलनाचे अपहरण
Updated on
Summary

साथीच्या रोगाचा मुकाबला करताना काही घटकांकडून विरोध होत असतो. १९१९ मध्ये टोरांटोत देवीवरील लसीच्या सक्तीला विरोध झाला होता.

साथीच्या रोगाचा मुकाबला करताना काही घटकांकडून विरोध होत असतो. १९१९ मध्ये टोरांटोत देवीवरील लसीच्या सक्तीला विरोध झाला होता. सध्याही लसीच्या सक्तीविरोधात आंदोलन सुरू आहे. पंतप्रधान ट्रुडो यांनी, ‘निर्बंध कायमस्वरूपी नाहीत, आपण सर्व कोरोनाशी लढून थकलो आहोत, तेव्हा एकमेकांशी लढण्यात अर्थ नाही,’ असे म्हटले आहे.

‘पंतप्रधानांनी विसरता कामा नये, की ते आमचे सेवक आहेत. ते राजा नव्हेत. ट्रक चालकांच्या आंदोलनाविषयी ते जे काही बोलत आहेत, ते सर्व खोटे आहे. प्रेम, सन्मान व आदर हाच आमचा भाव आहे. जो कोणी द्वेष पसरवू पाहील तो आमचा नाही. आम्ही चिथावण्यांना बळी पडणार नाही. प्रसारमाध्यमे जे काही सांगतात, त्यापेक्षा वास्तव वेगळे आहे. पंतप्रधान, तुम्हाला सत्तेचा अहंकार आहे. आम्ही तुम्हाला मनातून केव्हाच हद्दपार केले आहे. तुम्ही सक्ती करू शकत नाही. तुम्ही पदावर आहात ते आमच्या सेवेसाठी. आम्ही तुमचे नोकर नाही. तुम्ही आमचा उपमर्द करू शकत नाही. आमचे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत अविरत चालू राहील.’

कॅनडातील एका ट्रकचालकाचे हे निवेदन. ते प्रातिनिधिक आहे. अनेक देशांमधील विद्यमान परिस्थितीचे ते निदर्शक आहे. कोविडच्या आघातापूर्वी दिल्लीत शाहीनबाग हे मुस्लिम महिलांचे एन.आर.सी.च्या मुद्द्यावर झालेले आंदोलन आपण पाहिले. त्यानंतर तीन वादग्रस्त कृषी कायद्यांच्या विरोधातील शेतकऱ्यांचे आंदोलन झाले. या दोन्ही आंदोलनात अशाच प्रकारची भावना व्यक्त झाली होती. कोविडच्या प्रसारामुळे लागू झालेल्या लॉकडाउनमुळे शाहीनबाग आंदोलन थांबले. शेतकऱ्यांनी मात्र थंडी, ऊन, पाऊस या नैसर्गिक संकटांना न जुमानता नेटाने आंदोलन पुढे नेले.

कॅनडात ट्रकचालकांचे गेल्या महिन्यात सुरू झालेले आंदोलनही त्याच मार्गाने चाललेले दिसते. अमेरिकेत ६ जानेवारी २०२१ रोजी बायडेन यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होण्याच्या वेळी ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल हिलमध्ये घुसून अध्यक्षीय निवडणुकीची प्रक्रिया उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता. कॅनडात ट्रक चालकांनी हजारो ट्रक ओटावातील कॅपिटल हिलवरील संसदेभोवती आणून उभे केले आहेत. अमेरिका आणि कॅनडातील वाहतूकदारांच्या या आंदोलनाने सक्तीच्या लसीकरणाच्या विरोधातील पवित्रा व्यापक करीत थेट पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या सत्तेलाच आव्हान दिले आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पंतप्रधान व त्यांच्या कुटुंबीयांना अज्ञात ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे. कॅनडात गोठवणाऱ्या थंडीत हजारो ट्रकचालक आंदोलनात सहभागी झाले असून त्यांना पाठिंबा मिळत आहे. कोविडचा मुकाबला करताना बहुतेक देशांमधील सरकारांनी चुका केल्या. प्रगत, मागास कोणताही देश अपवाद नव्हता. लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढूनही कोरोनाच्या एकामागून एक डेल्टा, ओमिक्रॉनसारख्या आवृत्त्या येत गेल्या. जगातील तीस कोटी लोकांना बाधा झाली तर मृतांची संख्या ६० लाखांवर गेली. लसीच्या परिणामकारकतेबाबतच्या शंका वाढत गेल्या. लसनिर्माते व राजकारणी संबंधांविषयी संशय निर्माण झाला. लॉकडाउन व त्याचे परिणाम, उपचारांमधील त्रुटी यामुळे जगभरच क्षोभ दिसला. कॅनडातील ट्रकचालकांपैकी ९० टक्‍क्‍यांहून अधिकांचे लसीकरण झाले आहे. अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील व्यापारात ट्रक वाहतूकदारांची प्रमुख भूमिका आहे. कॅनडाची अमेरिकेला ७४ टक्के निर्यात व ६४ टक्के आयात होते. अमेरिकेतून येणाऱ्या ट्रक चालकांना दोन आठवड्यांच्या विलगीकरणाच्या सक्तीने या आंदोलनाची सुरुवात झाली.

मागण्या विस्तारल्या

दोन आठवड्यात आंदोलनाच्या मागण्या विस्तारल्या आहेत. पंतप्रधान ट्रुडो यांच्या राजीनाम्याची मागणी हा कळस. कोविडचा प्रसार रोखण्यासाठी जगभरच सरकारांनी अनेक नियम लादले. जनतेवर पाळत ठेवण्यासाठी सेलफोनचा उपयोग झाला. सोशल मीडियावर सेन्सॉरशिप आली. रुग्णालयातील त्रुटी, चुका दडपण्याचा प्रयत्न झाला. कोट्यवधी लोकांचा रोजगार गेला. आपल्या भावना व्यक्त केल्यास "कॉन्स्पिरसी थिअरी''चा शिक्का बसण्याचे भय निर्माण झाले. सक्तीचे लसीकरण हा आपल्या व्यक्तिस्वातंत्र्यावरचा घाला, अशी भावना निर्माण झाली. कॅनडाच्या पावणेचार कोटी लोकसंख्येपैकी ६२ टक्के लोकांचा या आंदोलनाला पाठिंबा नसल्याचे पाहण्यात दिसले आहे. पंतप्रधान ट्रुडो यांनीही हे मूठभर लोकांचे आंदोलन असल्याचे म्हटल्याने आंदोलकांनी ते प्रदीर्घ काळ चालविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

राजधानी ओटावात शनिवारी रात्री हजारो आंदोलक गोठविणाऱ्या थंडीत रस्त्यावर होते. परिस्थिती चिघळू नये म्हणून ओटावात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. आंदोलकांना मदत, इंधन, अन्न व आश्रय देऊ नये, तसे करणारास अटक करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ट्रक वाहतूकदारांच्या दोन प्रमुख संस्था आंदोलनात नाहीत. तरीही लाख - दीड लाख ट्रकचे काम थांबल्याने कॅनडात जीवनावश्‍यक वस्तूंची टंचाई वाढत जाणार आहे. हे आंदोलन हिंसक होण्याआधी संपविण्याची गरज असली तरी त्यासाठी बळाचा वापर करण्यास ट्रुडो सरकार धजावलेले नाही. कॅनडाच्या लष्करानेही ट्रक चालकांना राजधानीतून हटविण्यास नकार दिला आहे. या आंदोलनामागे कोणाचा हात आहे याबाबत पुरेशी माहिती पुढे आलेली नाही. मात्र ‘स्वस्तिक’ची चिन्हे फॅसिस्टांकडे निर्देश करतात. कॅनडाच्या कम्युनिस्ट पक्षाने तसा स्पष्ट आरोप केला आहे. जगातील अनेक देशात कोविड-१९ मुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीचा लाभ उठविण्यासाठी उजव्या प्रवृत्ती सक्रिय झाल्या आहेत. धनदांडगे व उजव्या गटांनी उदारमतवाद व आधुनिकता संपविण्यासाठी उचल खाल्ली आहे, असे ओटावातील एका राजकीय निरीक्षकाने म्हटले आहे.

लोकशाही व स्वातंत्र्याच्या नावाखाली फॅसिस्ट वृत्तीचे लोक कॅनडापाठोपाठ अमेरिका, फिनलंड, नेदरलॅंड, चेकोस्लोव्हाकिया, बेल्जियम, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया या देशांमध्येही "फ्रीडम कॉन्व्हॉय''च्या धर्तीचे आंदोलन करण्याच्या प्रयत्नात आहेत. कॅनडातील आंदोलनाचे प्रायोजक म्हणविणाऱ्या काही लोकांनी थेट समोर न येता पडद्यामागून आपली दिशा सूचित केली आहे. आंदोलनाची तीव्रता वाढवीत पंतप्रधान ट्रुडो यांचा राजीनामा व संसद विसर्जित करण्याची मागणी केली जाईल. शरण आले नाहीत तर ट्रुडो यांचा साल्वादोर अलिंदे होईल, असे ते सूचित करतात. (अलिंदे या चिलीच्या नेत्याची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तेथे हुकूमशाही आली.)

कॅनडाचे ट्रुडो, फ्रान्सचे इमॅन्युअल मॅक्रॉन हे समजूतदार, जागतिक प्रश्‍नांची समज असलेले नेते आहेत. ब्रिटनचे बोरिस जॉन्सन खोटारडेपणा व फसलेल्या ब्रेक्‍झिटमुळे बदनाम आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी ट्रुडो व मॅक्रॉन यांचे सख्य नव्हते. कॅनडात २०१५पूर्वी दहा वर्षे कॉन्झव्हेटिव्ह पक्षाची सत्ता असताना देशाची पीछेहाट झाली होती. ट्रुडो यांनी ती कोंडी फोडली. कॅनडाच्या बहुवांशिक, बहुसांस्कृतिक वैशिष्ट्यांचा त्यांना अभिमान आहे. ट्रुडो यांनी आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय क्षेत्रात उदार धोरणे राबविण्याचा प्रयत्न केला. स्थलांतरितांविषयीही त्यांनी जाचक धोरणे ठेवलेली नाहीत. फॅसिस्ट शक्तींना ते नकोसे वाटण्यास ही कारणे निमित्त ठरतात. त्यांचे सरकार उलथवणे हाच आंदोलनामागील खरा हेतू दिसतो. ‘ट्रुडो सरकार बडतर्फ करा’, अशी गव्हर्नरांकडे झालेली मागणी तेच सूचित करते. संसदेचे सिनेट सभागृह, गव्हर्नर जनरल व आंदोलनाच्या संघटनेने निवडलेल्या प्रतिनिधींद्वारे देश चालवावा, ही मागणी अधिक जोराने पुढे येईल. हा लोकशाहीविरोधी पवित्रा कॅनडाच्या जनतेस मान्य होईल?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.