कामगार संघटनांचा ‘हिरा’ निखळला

R G karnik
R G karnik
Updated on

शांत, संयमी आणि समाजाप्रती बांधिलकी जपणारे र. ग. कर्णिक यांचे जाणे कामगार क्षेत्रासाठीच नाही तर महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रातील कार्यकर्त्यासाठी धक्कादायक आहे. दहा दिवसांपूर्वीच (२७ जानेवारीला) वयाची ९१ वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने त्यांनी केलेले भाषण, आकलन हे अत्यंत प्रसंगोचित होते. त्यांना वाहिलेली ही श्रद्धांजली.

रचनात्मक समाजबांधणीवर कर्णिक यांचा भर असे. लोकांसाठी मागे राहणे आणि दुसऱ्यांना पुढे जाऊ देणे ही त्यांची खासियत. सर्व राजकीय विचारांना सामावून घेणारा नेता, अजातशत्रू असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.

सुमारे ४०-४५ वर्ष तरी निमंत्रक पदावरून कामगार चळवळीला मार्गदर्शन करणारे हे प्रभावी नेतृत्व होते. २०१४ पर्यंत कर्णिक यांनी महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटना संस्थापक म्हणून काम केले. गेली सहा वर्षे सल्लागार म्हणून काम पाहत होते. शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांची संख्या एकूण १९ लाख आहे. शासकीय कर्मचारीच १० लाख आहेत. संयुक्त कृति समितीच्या माध्यमातून कर्णिक यानी समाजप्रबोधन चळवळीद्वारे महाराष्ट्र राज्यांतील शेकडो नेते व कार्यकर्त्यांच्या जडणघडणीला हातभार लावला आहे. आयटक, इंटक, सीटू, हिंद मजदूर सभा यांच्याशी त्यांच्यासह बँका, विमा व शिक्षक चळवळींशी ते चांगले संबंध ठेवून होते. सर्व संघटित तसेच असंघटित क्षेत्रातील संघटनांच्या प्रातिनिधिक शिखर संघटनेचे ते निमंत्रक होते. र. ग. कर्णिकांचे योगदान या देशांतील सरकारी कर्मचारी व कामगार वर्गाच्या प्रत्येक घटकांवर आहे. त्यांच्या निधनाने कामगार संघटनांचा कोहिनूर हिरा निखळला. एकजुटीची शिकवण देणारा असा नेता होणे नाही.  

संघटनांचा महासंघ
मे १९६२ साली वयाच्या ३० व्या वर्षी मंत्रालयातील सहाय्यक पदावर काम करत असताना मंत्रालय कर्मचारी संघटनेची स्थापना करून ते जनरल सेक्रेटरी झाले. त्यानंतर ते मंत्रालय कर्मचाऱ्यांचे नेते झाले. यशवंतराव चव्हाण त्यावेळेस मुख्यमंत्री होते. संप हा शब्द त्यावेळेस जर एखाद्या कर्मचाऱ्याने उच्चारला तरी त्याची नोकरी जाईल की काय, अशी भीती होती. अशा पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यातील सर्व खात्यातील लोकांची संघटना बांधून तसेच इतर संघटनांना बरोबर घेऊन एक प्रकारचा महासंघ तयार केला.वयाच्या १५व्या वर्षांपासून स्वातंत्र्य चळवळीत वावरणाऱ्या कर्णिकांनी त्यांचे मामा भाई कोतवाल, साथी शांतीभाई पटेल, साथी डॉ. जी. जी. पारीख अशा अनेक समाजवादी व कामगार चळवळीतील नेत्यांचा सहवास लाभला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचा सहभाग हा साथी एस. एम. जोशी, मधु दंडवते, मृणालताई गोरे, एफ. एम. पिंटो यांच्याबरोबर होता.

कर्णिक यांनी तब्बल ५० वर्षे सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे सरचिटणीस म्हणून काम पाहिले. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आजपर्यंतच्या सर्वच मुख्यमंत्र्यांची राजवट त्यांनी जवळून पाहिली होती. कामगारांचा आवाज बनून त्यांनी अनेक मुख्यमंत्र्यांशी वाटाघाटी केल्या होत्या. कामगारांच्या रास्त प्रश्नासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करायचा पण तुटेपर्यंत ताणायचे नाही, अशी त्यांची कामाची पद्धत. त्यामुळेच, त्यांच्या काळात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागले. १९७० च्या दशकांतील प्रदीर्घ काळ चाललेले लढे त्यांनी गाजविले. सत्तेत असलेल्या सर्वच राजकीय पक्षांबरोबर संवाद व संघर्ष करत ५ दशके र. ग. कर्णिक यांनी अनेक आदर्श निर्माण केले आहेत.

केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन तसेच महागाईसकट अन्य भत्ते मिळण्याचा मार्गही कर्णिक यांनी सुकर करून दिला. १९७० नंतर ५४ दिवसांचा संप शिवाजी पार्कवर करण्यात आला होता. त्यावेळेस त्यांच्या भाषण करण्याच्या शैलीमुळे सरकारी कर्मचारी त्यांनी दिलेला शब्द एकजुटीने पाळत असत. एक गाव, एक पाणवठा, जाती अंतांची लढाईसारख्या चळवळीत कर्णिकांनी झोकून दिले. अनेक सामाजिक चळवळींमध्ये स्वत: कर्णिक उतरले होते. चळवळ अहिंसक पद्धतीने लढवणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. मात्र, त्यांच्या विचारांनी लोक पेटून उठत असत. त्यांचा सामाजिक व राजकीय दृष्टिकोन महत्त्वाचा होता. शिक्षणांचा प्रसार, आरोग्यावर त्यांनी लक्ष दिले. सातत्याने प्रश्नाचा पाठपुरावा, संयम आणि संवाद कसा करावा, मांडणी योग्य पद्धतीने कशी मांडावी यासाठी त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण वर्गही घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.