- डॉ. अजित कानिटकर
व्यावसायिक उच्च शिक्षणातील चार-पाच वर्षांचा अवघड अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरही हातात चांगली नोकरी नाही, असे चित्र दिसते आहे. यामागे अनेक कारणे आहेत. आवडीनिवडीचा विचार न करता प्रवाहपतीत न होता आपल्या इच्छा-आकांक्षा, आपला कल व अभ्यासक्षेत्र यांची सांगड घातली पाहिजे.
मुंबईतील एका प्रसिद्ध संस्थेबद्दलची एक सनसनाटी बातमी माध्यमांवर झळकली. भारतात आणि जगामध्येही अत्यंत प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील तंत्रज्ञान संस्थेच्या शेवटच्या वर्षातील जवळपास एक तृतीयांश तुकडीला रिकाम्या हातानेच बसावे लागेल की काय, असा पेच निर्माण झाला आहे. एरवी अभ्यास संपण्यापूर्वीच ‘कॅम्पस प्लेसमेंट’ होते.
आता चार-पाच वर्षांचा अवघड अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरही आणि त्यापूर्वी राजस्थानात कोटा शहरातील ‘कारखान्यात’ स्वतःला भरडून घेऊनही हातात नोकरी नाही, अशी स्थिती आहे. नोकरीच्या पहिल्या पगाराच्या आकड्यांमधली गृहीत धरलेली अनेक शून्यं गायब झालेली. बँकेचे कर्ज, पालकांची अपेक्षा, ‘याचिसाठी केला होता सारा अट्टाहास’, हा सर्व बोजा, त्याचे करायचे काय? सर्वच बिनसले की काय?
एकीकडे काही जणांवर बेकार राहण्याची शक्यता, तर दुसरीकडे त्याच संस्थेतील मोजक्या विद्यार्थ्यांना कोटीच्या कोटी उड्डाणे करणारी पॅकेजेस मिळाली, अशाही बातम्या धडकल्या. त्यामुळे ‘कभी खुशी कभी गम’सारखे ज्यांना कोट्यवधींचा पहिला पगार मिळणार त्यांचे कौतुक करावे की, ज्यांना साधी नोकरीही मिळाली नाही, त्यांची काळजी करावी, असा पेच त्या संस्थाचालकांसमोर असणार. ‘ही आकडेवारी फसवी आहे, काळजीचे कारण नाही.
सर्वांनाच उत्तम नोकऱ्या मिळत आहेत’, असा खुलासा संस्थाचालकांनी केला. सरासरीच्या नियमाप्रमाणे सर्वांना जरी कोटीच्या कोटी नाही तरी लक्ष-लक्षसुद्धा रकमा पहिल्याच कामाच्या जागी मिळण्याची शक्यताही आहे, असेही त्यांचे प्रतिपादन होते. पण प्रश्न कोणाचा दावा खरा हा नाहीच. तर उच्चशिक्षण घेणाऱ्या सध्याच्या पिढीला हे पॅकेजचे वेड कधीपासून लागले आणि त्याचे परिणाम काय, हा आहे.
इतिश्री आणि सार्थकता
सत्तर-ऐंशीच्या दशकात पुणे-मुंबई आणि अन्य महानगरातल्या घरांवरील पाटीवर अपरिहार्यपणे काही नावे ठळक दिसत. ‘श्रमसाफल्य’ किंवा ‘सार्थक’. आयुष्याचा सरधोपट प्रवास. पदवी मिळवून किंवा त्यापूर्वीही नोकरीत चिकटणे. तीस-पस्तीस वर्षे इमाने इतबारे एकाच ठिकाणी सरळ मार्गाने काम करणे; पै-पै वाचवत बँकेत बचत करणे, निवृत्त होताना गावाबाहेर कुठेतरी छोट्याशा भूखंडावर दोन-तीन खोल्यांचे टुमदार घर बांधणे असे चित्र होते.
त्यावेळी घराला ‘श्रमसाफल्य’ किंवा तत्सम नावे दर्शनी भिंतीवर लावणे , हीच अनेक मध्यमवर्गीयांची सुख-समाधानाची अंतिम पायरी होती. नव्वदच्या दशकामध्ये हे चित्र वेगाने बदलले. पगार या साध्या शब्दाची जागा ‘पॅकेज’ने घेतली. त्यात केवळ पगार आणि प्रॉव्हिडंट फंड इतके सोपे शब्द राहिले नाहीत. ‘कॉस्ट टू कंपनी’ (सीटीसी) हे त्याचे अलीकडचे नवे भावंड.
ही भुरळ इतकी खोलवर गेली आहे की, दहावीच्या एका मुलीने मला सल्ला विचारला की, अमुक पदवी मी जर घेतली तर मला किती पगार मिळेल? दुसऱ्या एका मित्राचा मुलगा ४५ लाख रुपयांचे कर्ज काढून उच्च शिक्षणासाठी भारताबाहेर जाऊ इच्छितो, त्याची बहीण वर्षापूर्वी सत्तर लाखांचे कर्ज काढून शिकते आहेच. या कर्जासाठी तारण त्याच्या आई-वडिलांचा ‘श्रमसाफल्य’ हा टुमदार बंगला.
एकीकडे असे मृगजळ तर दुसरीकडे पॅकेजसाठी जी तयारी करावी लागेल याचीही एक पूर्ण बाजारपेठेची यंत्रणा आहे. त्यामुळे गुरुजींच्या शिकवणी वर्गांचे चकचकीत कोचिंग क्लासमध्ये रूपांतर झाले. याच कोचिंग क्लासच्या जाहिराती आणि त्यांचे काही पॅटर्नही आले. जणू समांतर व्यवस्थाच. अमुक ठिकाणी, अमुक शिक्षकांचे, मार्गदर्शन घेतले की शंभर टक्के बाण लागणारच!
अमुक क्लासचे मार्गदर्शन म्हणजे मुंबईतील प्रथितयश संस्थांमध्ये प्रवेशाची गॅरंटी. पुढची पायरी म्हणजे राजस्थानात कोटा आणि महाराष्ट्रात ‘लातूर पॅटर्न’ तयार झाला आहे. तिकडे ओढा असलेले हजारो विद्यार्थी व पालकही आहेत. हे भाष्य करताना या प्रवेश संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींबद्दल आक्षेप नाही. कृपया, गैरसमज नको. अशा संस्थांत प्रवेश मिळवणे सोपे नाही.
फक्त या पॅकेजच्या प्रवाहपतीत होण्याबद्दल विचार करावासा वाटतो. आजूबाजूला अनेक अतिशय कर्तृत्वसंपन्न मुले-मुली प्रवाहपतीत होताना दिसतात. त्यांना मी आपाततः झालेले इंजिनियर म्हणतो, default engineers! दहावी-बारावी मग पुढील शिक्षण इंजिनियरिंगचे असे करत वयाच्या २२-२४ वयापर्यंत स्वतःचा विचारच सुरू झालेला नसतो.
जीवनदायी का जेवणदायी?
मला स्वतःला काय हवे, काय आवडते. माझ्यात कोणते कौशल्य आहे. कोणत्या क्षेत्रात काम केल्यावर कर्तृत्व बहरेल. त्यातून आनंद व जगण्यासाठी आवश्यक पैसे व इतर सुखसोयी मिळतील- याबद्दलचा कोणताही विचार न करता, केवळ झुंडीच्या मानसशास्त्राप्रमाणे शेकडो हुशार विद्यार्थी या प्रवेश परीक्षेत अडकत आहेत.
गेल्या दोन वर्षांत निदान दहा तरी असे अभियांत्रिकीला जाऊन पुढे काय करायचे, हा प्रश्न असलेले विद्यार्थी भेटले आहेत. नेहमीचा प्रश्न असतो- मी उत्तम महाविद्यालयातून इंजिनियर झालो आहे. आता पुढे काय करू? थोड्याशा चौकशीनंतर लक्षात येते की, ते अपघाताने इंजिनियर झाले आहेत. त्याचा प्रवास त्यांनी, खरंतर त्यांच्या पालकांनी व समाजातील एका दबावामुळे सातवी-आठवीपासूनच सुरू केला.
या प्रवासाबाबत कोणतेही भान न राहता त्या प्रवाहाच्या भोवऱ्यामध्ये ते अडकले आणि वाहवत राहिले. विचारल्यानंतर हळूहळू ते सांगतात की, मला चित्रपटनिर्माता व्हायचे होते. गायनातच पुढे जायचे होते. आर्किटेक्चर करायचे होते, पण इंजिनियर चुकीने झालो!
यापूर्वी का असे केले नाहीस, तर असा स्वतःच्या आयुष्याचा, स्वतःला काय आवडते, याचा विचार करायचा असतो, याचे शिक्षणच विद्यार्थी आणि पालकांचे झालेले नाही. सरधोपट मार्ग आणि मुक्काम पोस्ट लठ्ठ पॅकेज ही एकमेव पठडी.
या चक्रातून गेलेल्यांना ४५-५० वयानंतर आपण नेमके काय मिळवले, असे वैफल्य येऊ शकते. ‘श्रमसाफल्या’साठी पॅकेजेसपेक्षा अन्यही बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत, याबद्दल आपल्या समाजामध्ये अनास्था आहे. वेगळा मार्ग निवडावा, काही धोका पत्करावा, अशी बहुतांश समाजाची मानसिकता दिसत नाही. स्वधर्म कोणता, मी शिक्षण घेतो ते ‘जेवणदायी ’ की, ‘जीवनदायी’?
त्यामुळे भौतिक गरजांबरोबर आणखी काही महत्त्वाचे मिळवायचे आहे का? अलीकडे इकिगाई हा जपानी विचार आपल्याकडे रुजतो आहे. स्वधर्म याचे हे जपानी विश्लेषण. उच्चशिक्षणाबद्दल असा विचार अनेक कर्तृत्वसंपन्न युवक-युवती करतील आणि त्यासाठी ‘हटके’ रस्ते निवडणाऱ्या पिढीला ज्येष्ठ प्रोत्साहन देतील, तर खूप बरे होईल. असे झाले तर पॅकेजपलीकडील शिखरे व आव्हाने नव्या पिढीला खुणावत राहतील.
एकूणच अर्थव्यवस्थेत चढ-उतार जसे होतात तसे विविध क्षेत्रातील वेतनमानही बदलत असते. कोणत्या क्षेत्रात काम करता, त्यावर वेतनाचे स्तर ठरतात. आज एकट्या पुण्यामध्ये एमबीए पदवी देणाऱ्या पन्नासहून जास्त शिक्षणसंस्था आहेत. बाजारात एवढ्या मोठ्या संख्येने दरवर्षी पुरवठा होत असेल तर मध्यम किंवा कमी दर्जाच्या शिक्षण संस्थेतून एमबीए करणाऱ्याला दहा-बारा हजार रुपयांची विक्रेता म्हणूनच नोकरी मिळते.
त्याची तुलना अहमदाबाद किंवा बंगळूरमधील संस्थेतील विद्यार्थ्याच्या वेतनमानाशी करणे चूक होईल.जपॅकेजांमागे न लागता मला काय जमते, काय आवडते, कशातून योग्य वेतनमान मिळेल, याची सांगड बसणे म्हणजे ‘पॅकेजे’सच्या मोहजालातून बाहेर पडणे होय.
(लेखक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून विकासविषयक प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.