मुलांच्या कल्पनेला पंख देणारे बालसाहित्य हवे

आपल्या बालसाहित्यातून दुर्देवाने अद्‍भुत रस हद्दपार झाला आहे. एकेकाळी बालसाहित्यात या रसाला प्रतिष्ठा होती. माझ्या पिढीने ‘चांदोबा’सारखी मासिके वाचली आहेत.
literature
literature Sakal
Updated on

- भारत सासणे

साहित्य अकादमीचा बालसाहित्यासाठीचा पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना जाहीर झाला आहे. यानिमित्त बालसाहित्याचे महत्त्व, मराठी बालसाहित्यातील प्रवाह आदींबाबत सासणे यांच्याशी ‘सकाळ’च्या प्रतिनिधी महिमा ठोंबरे यांनी संवाद साधला. त्या संवादाचा हा गोषवारा.

पुरस्काराचा आनंद

साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर स्वाभाविकपणे अतिशय आनंद झाला. साहित्य अकादमीच्या पुरस्काराला एक वेगळी प्रतिष्ठा आहे. त्यातही बालसाहित्यासाठी पुरस्कार जाहीर झाल्याने विशेष आनंद झाला.

अद्‍भुत रस हद्दपार

आपल्या बालसाहित्यातून दुर्देवाने अद्‍भुत रस हद्दपार झाला आहे. एकेकाळी बालसाहित्यात या रसाला प्रतिष्ठा होती. माझ्या पिढीने ‘चांदोबा’सारखी मासिके वाचली आहेत. त्यातील गोष्टींमध्ये अद्‍भुत रस मांडण्याबद्दल कोणताही संकोच बाळगला जात नसे.

अलीकडे मात्र मुलांसाठी प्रकाशित होणारी सगळी मासिके शुष्क झाली असल्याचे जाणवते. त्यात संगणक, गणित, अवकाश विज्ञान, देशप्रेम, सामाजिक कथा अशा साऱ्या विषयांचा समावेश असतो, पण अद्‍भुत रस मात्र अभावानेच असतो. ज्या मुलांनी अद्‍भुत रसाचे सेवन केलेले नाही किंवा बालसाहित्य वाचलेले नाही, ती मुले पुढे जाऊन शुष्क, पोटार्थी आणि अविकसित व्यक्तिमत्वाचे होतात, असे मानसशास्त्र सांगते.

आव्हानातून वळलो बालसाहित्याकडे

काही काळापूर्वी एका परिसंवादात मी हा अद्‍भुत रसाचा‍ मुद्दा मांडत टीका केली होती. त्यावर एका व्यक्तीने मला ‘तुम्ही लेखक आहात, तर तुम्हीच मुलांसाठी लिहा’, असे म्हटले होते. हे मी आव्हान म्हणून स्वीकारले. अद्‍भुत रस इतरांनी आणण्याची वाट पाहण्यापेक्षा आपणच तसे साहित्य लिहावे, या विचारातून मी बालसाहित्याकडे वळलो.

यात कुठेही जुन्या काळातील नाही, तर आत्ताच्या काळातील गोष्ट सांगितली. आधुनिक काळातील मुलांची भाषा लक्षात घेऊन त्यानुसार लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यातून मग ‘समशेर कुलुपघरे’सारखे पात्र निर्माण केले.

‘फास्टर फेणे’नंतर कुमारवयाच्या साहित्यात मोठी पोकळी निर्माण झाली होती. त्यानंतर आजच्या मुलांना आपलेसे वाटेल, असे पात्र निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला. या पात्राच्या गोष्टी वाचल्यानंतर ग्रामीण भागातील मुलांची मला पत्र येतात आणि ‘ही गोष्टी वाचून माझ्यात धीटपणा निर्माण झाला’, अशा प्रतिक्रिया मिळतात, त्या वेळी आपल्या लेखनाची पावती मिळाल्याचे मला वाटते. १६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठीही मी लिहिण्याचा प्रयत्न केला. ‘राम आणि श्याम’ या दोन पात्रांच्या साहसकथा लिहिल्या.

‘फँटसी’ म्हणजे अंधश्रद्धा नव्हे!

‘फँटसी’ म्हणजे अंधश्रद्धा नव्हे किंवा भूतप्रेत, जादू वगैरे देखील नाही. ‘फँटसी’ असलेल्या गोष्टीतील उडता घोडा वगैरे कुठे असतो का, असा प्रश्न विचारला जातो. पण यात घोडा उडतो की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न नाही.

मुलांच्या कल्पनेला आपण पंख लावू शकतो की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्या उडत्या घोड्याबरोबर मुलेही आकाशात उडावीत, हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण तळघरात कोंडून ठेवलेले राक्षस, चेटकिणी, घोडे, जादूच्या तलवारी यांना बाहेर काढले पाहिजे आणि बालसाहित्यात मुक्तपणे वावरू द्यायला हवे, असा माझा आग्रह आहे.

कुमार वयोगटासाठी साहित्याचा अभाव

बालसाहित्य या साहित्य प्रकाराकडे आपण गंभीरपणे पाहायला हवे. बालसाहित्यात प्रामुख्याने बाल, कुमार आणि किशोर असे गट पडतात. पण सध्या कुमार आणि किशोर गटासाठी विशेषत्वाने साहित्यनिर्मिती होत असल्याचे दिसत नाही.

आठ ते दहा वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी भरपूर कविता प्रकाशित होताना दिसतात. कुमार गटासाठीच्या साहित्यात मात्र पोकळी निर्माण झाली आहे. कुमार वयोगटातच वीर रसाची अनुभूती येण्यास सुरुवात झालेली असते. रोमहर्षकता, अद्‍भुत रस, फँटसी याबद्दल कुतूहल निर्माण होऊ लागते. त्यामुळे या वयोगटाला डोळ्यासमोर ठेवून लिखाण व्हायला हवे.

literature
Pune Airport OLS Survey : पुणे विमानतळाची धावपट्टी वाढविण्यासाठी ‘ओएलएस’ सर्व्हेला हिरवा कंदील

मुलांना दीर्घ काहीतरी वाचण्यास दिले तर ते वाचतील का, अशी शंका उपस्थित केली जाते. पण ही शंका ‘हॅरी पॉटर’च्या खंडांनी खोडून काढलीच आहे. त्यामुळे मुलांना छोटेच काहीतरी वाचायला दिले पाहिजे, त्यातील अक्षरे मोठीच हवीत, वाक्ये कमी शब्दांची हवीत, यातील काहीही खरे नाही. अर्थात बालसाहित्य वाचनीय असले पाहिजे आणि मुलांना त्यात खिळवून ठेवता यायला हवे, ही बाब निश्चितच आवश्यक आहे.

मुलांना सकस साहित्य वाचायला द्या!

शहरी भागातील मुलांच्या पालकांना किंवा शिक्षकांनाही मुलांना काय वाचायला दिले पाहिजे, याबाबत कल्पना नाही. पूर्वीच्या पिढीसाठी दर्जेदार अनुवादित बालसाहित्य उपलब्ध होते. पण आज मात्र काय वाचायला द्यायचे, असा त्यांच्यापुढे प्रश्न असतो.

माझ्या मते मुलांना भाषेचे कोणतेही बंधन नसावे. त्यांनी मातृभाषेसह उत्तम इंग्रजी बालसाहित्यही वाचावे. सकस, संस्कार करणारे, मनोरंजन करणारे असे लिखाण मुलांना वाचायला द्यावे, असा माझा सल्ला आहे. कारण वाचनातूनच मुलांची बुद्धी, बहुसंस्कारितता, बहुल संदर्भ प्राप्त करण्याची क्षमता वाढणार आहे.

literature
Pune L3 Pub Case : ‘एल ३’ बारमध्ये अमली पदार्थांचे सेवन; तिघांचे रक्तनमुने, इतरांची होणार चौकशी

मराठीत ‘कॉमिक्स’चा प्रयोग व्हावा

मराठीतील बालसाहित्यात कॉमिक्सचा प्रयोग व्हायला हवा. मुलांना कॉमिक्स हवी असतात, त्या वेळी पालक त्यांना इंग्रजी भाषेतील कॉमिक्स देतात. कॉमिक्स खर्चिक असतात, त्यामुळे बहुधा मराठीत अद्याप कोणत्याही प्रकाशनाने असा प्रयोग केलेला नाही.

काही वर्षांपूर्वी ‘सकाळ’ने हा प्रयोग केला होता. माझी एक कथा चित्रकथेच्या रूपाने सदराच्या स्वरूपात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर असा प्रयोग इतर कोणीही केलेला नाही. पण अशा प्रकारचे कथाचित्रमालेचे प्रयोग व्हायला हवेत. मराठी बालसाहित्यात कविता पुष्कळ आहेत, पण मुलांसाठी कादंबरी, लघुकादंबरी देखील सातत्याने लिहिली जावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com