हवामान अवधान : भ्रांत ‘उद्या’ची, बेपर्वाई ‘परवा’ची

हवामानाचा आरोग्यमानावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम होत असतो.
weather
weathersakal
Updated on

हवामानाचा आरोग्यमानावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. ध्रुवीय, समशीतोष्ण वा उष्ण काटिबंधातील प्रदेश असोत, माणसाला मानवेल अशा तापमानाचा एक छोटासा पट्टा आहे. नेमके जेवढे हवे तेवढे असे हे ‘गोल्डीलॉक्स झोन’. त्यांच्या अल्याडपल्याड अन्न, पाणी, परिसंस्था अशा साऱ्यावर ताण येतो आणि पुढे हे सारेच कोलमडून पडते.

मानव बुद्धी आणि संसाधनांच्या बळावर सुरवातीला या पडझडीला तोंड देईलही पण ज्या जैव साखळीवर, जैव जाळ्यावर आपण तगून आहोत त्याला हा ताण सोसणार नाही, हे नक्की. यातून उद्भवणाऱ्या पूर, दुष्काळ वगैरेंमुळे अनेक कुटुंबे विस्थापित होतात. उदाहरणार्थ धरा-ज्वराच्या परिणामी ध्रुवीय बर्फ वितळेल, हे सारे पाणी जाईल कुठे? अर्थात समुद्रात. याने पाणीपातळी वाढली की, किनारपट्टीचे प्रदेश, बंदरे समुद्रमुखी पडतील.

किरीबाटी किंवा मालदीवसारखी सखल बेटं जलमय होतील. हे देशच्या देश देशोधडीला लागतील. ही माणसं जातील कुठे? करतील काय? खातील काय? राहतील कुठे? या निर्वासितांना कुपोषण, साथीचे रोग, व्यसने, गुन्हेगारी, मानसिक आजार असे दैन्य-मित्र गाठणारच.

ज्या देशांत ती जातील तिथेही समुद्र पातळी वाढल्याने किनाऱ्यावरून वरती, ‘देशाकडे’, सरकलेली प्रजा असेलच. त्यात ही भर. घरचंच थोडं झालेलं असताना हे जावयानं धाडलेलं घोडं कोण आणि कसं सांभाळणार?

कितीही काळजी घेतली, कितीही काटेरी कुंपणे घातली, कितीही चौक्या पहारे बसवले तरी आभाळ फाटल्यावर ठिगळ कसं लावणार? आजही हवामानाची एखादी लहर सुसज्ज व्यवस्थेचाही फज्जा उडवू शकते. ऑगस्ट २००३ची युरोपातली उष्णतेची लाट आठवा! त्या दिवसांत तिथे मृतांची संख्या नेहमीपेक्षा पन्नास हजाराने वाढली.

मुळातच लोकांचे सरासरी वय वाढलेले, त्यामुळे घरोघरी ज्येष्ठ नागरिक, बहुतेक घरी एकेकटे वृद्ध, ज्या घरी आधार देणारी पिढी होती त्यातील अनेकजण लांब सहलीला गेलेले, बहुतेक डॉक्टरही सुट्टीवर; अशात ही लाट आली आणि अनेकांचा काळ ठरली. अगदी प्रगत आणि पुढारलेल्या फ्रान्समध्येही लक्षणीय मृत्यू घडले. कारण गरमी वाढली की घुसमट वाढते.

सिमेंट, काँक्रिट आणि डांबराच्या जगात उष्मा अडकून राहतो. ही तप्त भू रात्रीही निवणे अवघड होते. साऱ्या शहराचीच काहिली होते. शरीराचे तापमान ३७ अंश सेल्सियस राखायला घाम येणे आणि तो उडून जाणे आवश्यक असते. गरम आणि पर्यायाने दमट जगात हे अवघड. त्यामुळे हृदयावर प्रचंड ताण येतो.

अशा वातावरणात दमे-खोकले, हृदयविकार, रक्तदाब, अर्धांगवायूची जणू साथ येते. बेघर, वयस्क, गलितगात्र, रोगजर्जर अशी माणसे एरवीही जवळजवळ पैलतीराशी पोहोचलेलीच असतात. ती आधी पैलतीर गाठतात. सुविद्य, समृद्ध, सुव्यवस्थित युरोपातील ही स्थिती तर गरीब देशात काय हाहाःकार उडेल, विचार करा!

या साऱ्या प्रश्नातील नैतिक दुविधा इथेच आहे. तिसऱ्या जगाचे शोषण करून पहिले जग गबर झाले आहे आणि आता त्यांच्या गाड्यांच्या, कारखान्यांच्या धुरामुळे येणाऱ्या अरिष्टांचा सगळ्यात जबरदस्त फटका पुन्हा तिसऱ्या जगानेच सहन करायचा आहे. हाहाःकार उडाला तरी ‘महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती’ अशीही शक्यता आहे.

शहरे, महानगरे आणि पुढारलेल्या देशातील बऱ्याच व्यवस्था वीज, इंटरनेट, उपग्रह वगैरेंशिवाय चालूच शकणार नाहीत. निसर्ग तांडवात यांची वाताहत होताच हे समाज त्याचे सहज बळी ठरतील. त्या मानाने मुळातच अभावात आणि आसपासच्या परिसराबरहुकूम जगणारी, भटकी, जंगलवासी माणसं लव्हाळ्यासारखी तगून जातील.

माणसाचा तल्लख मेंदू या साऱ्यावर उपाय शोधेल, अशी आशा आहे. मात्र काही गृहितके त्यागावी लागतील. आर्थिक समृद्धीचे विद्यमान प्रतिमान अचल नाही, हे स्वीकारावे लागेल. आजची सामाजिक आणि सांस्कृतिक रचनाही निर्दोष नाही, हे स्वीकारावे लागेल. धरा ज्वर हा भावी धोका नसून आजच आपण त्यात होरपळत आहोत हे लोकांना त्यांच्या भाषेत आणि त्यांच्या जगण्यातील उदाहरणासह समजावावे लागेल.

जागतिक ध्येये, उद्दिष्टे, आकडेवारी, आलेख आणि तक्त्यांशी सामान्यांना देणेघेणे नसते. त्यांना पोरांची, पिकाची, शुद्ध पाण्याची काळजी असते. उद्याची भ्रांत असलेला माणूस परवाचा विचार करत नाही. हे सारे लक्षात घेऊन उपाय योजावे लागतील. कोणते आणि कसे ते पुढील आणि अखेरच्या लेखांकात पाहू.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com