शिक्षणदिशा : इंग्रजी माध्यमाचे काय करायचे?

भारतात इंग्रजी शिक्षण सुरू होऊन जवळपास २०० वर्षे झाली, तेव्हापासून आतापर्यंत शालेय शिक्षणाचे माध्यम काय असावे, ही चर्चा अव्याहत चालू आहे.
Education
Educationsakal
Updated on

भारतात इंग्रजी शिक्षण सुरू होऊन जवळपास २०० वर्षे झाली, तेव्हापासून आतापर्यंत शालेय शिक्षणाचे माध्यम काय असावे, ही चर्चा अव्याहत चालू आहे. ब्रिटिश अमदानीत इंग्रजी की स्थानिक भाषा हे द्वंद्व साहजिक होते; पण आज स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होऊन गेली तरी नवीन ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा’त पुन्हा तीच गरज अधोरेखित करावी लागत आहे, याचे कारण इंग्रजी माध्यमाला पुन्हा मिळू लागलेली लोकप्रियता.

आपल्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे, ही लोकप्रियता म्हणजे मराठी आणि इतर स्थानिक भाषांवरील संकट आहे, परक्या संस्कृतीचे आक्रमण आहे, अशी एक धारणा आहे. भारतात इंग्रजी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या मेकॉले यांना ‘भारतीय रक्ताचा आणि रंगाचा; पण अभिरुची, मते, नीती आणि बुद्धीने मात्र ‘इंग्रज’ असणारा वर्ग तयार करायचा होता.

पण तेव्हाही ‘इंग्रजी’ शिक्षणाचे बाळकडू मिळूनदेखील भारताशी अजोड निष्ठा बाळगणारे स्वातंत्र्य चळवळीचे अनेक नेते, अनेक समाजसुधारक निर्माण झाले. केवळ शिक्षण घेण्याची भाषा बदलली म्हणून निष्ठा, संस्कृती नष्ट झाल्या नाहीत.

उलट पाश्चात्त्य विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, तत्त्वज्ञान अशा विविध क्षेत्रांतील आधुनिक आशय भाषांतरित, रूपांतरित करून स्थानिक भाषांचा ज्ञानभाषा, शिक्षणाच्या माध्यमभाषा म्हणून विकास करण्याचे कार्य या इंग्रजीतून माध्यमिक आणि उच्चशिक्षण घेतलेल्या वर्गाने केले. त्यामुळे विसाव्या शतकाच्या सत्तर-ऐंशीच्या दशकापर्यंत शालेय शिक्षणाचे माध्यम म्हणून पालकांचीही पसंती प्राधान्याने स्थानिक भाषांना मिळत राहिली.

गेल्या काही दशकांमधे मात्र असे दिसत आहे, की मातृभाषा किंवा स्थानिक भाषामाध्यमाला शासनाचा तत्त्वतः पूर्ण पाठिंबा असला, तरी लोक मात्र अनुदानित आणि शासकीय शाळांकडे मोठ्या प्रमाणावर पाठ फिरवून, पदरमोड करून मुलांना इंग्रजी माध्यमात पाठवत आहेत.

याचे एक कारण म्हणजे इंग्रजीत आज ज्या वेगाने विज्ञान-तंत्रज्ञान-माहिती तंत्रज्ञान, वित्त, व्यापार, विविध व्यवसाय, आंतरराष्ट्रीय संपर्क पुढे जाताना दिसतात, तो वेग या मुलांना आणि त्यांच्या पालकांना हवा आहे. त्यांचे विश्व आता त्यांच्या परिसरापुरते मर्यादित नाही. इतर गावांत, शहरांत, राज्यांत, देशांत जिथे ज्या मिळतील त्या संधी त्यांना हव्या आहेत, आणि त्यासाठी इंग्रजी हे इतिहासाने आपल्या हातात आणून दिलेले, समोर दिसणारे साधन त्यांना प्रभावी वाटते.

इंग्रजी माध्यम कोणालाही हाताळता येईल, असा विश्वास त्यांच्या मनात आता निर्माण झाला आहे. त्या माध्यमासाठी मुलांना शालेय शिक्षणात अधिक कष्ट पडले, आपला पैसा खर्च झाला, तरी त्यांची तयारी आहे. या त्यांच्या आकांक्षांची दखल घेणे भाग आहे.

या आकांक्षा मराठी माध्यमात जाऊनही पूर्ण होतील, याची तातडीने तजवीज करणे, तसा विश्वास पालकांच्या मनात निर्माण करणे ही तर प्राथमिकताच असली पाहिजे, पण त्याचबरोबर पालकांच्या या मानसिकतेचा फायदा घेऊन इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळा आज केवळ व्यावसायिक फायद्यासाठी चालवल्या जात आहेत, त्यांच्याकडेही दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. तिथे आपलीच मुले शिक्षण घेत आहेत.

अशा अनेक शाळांत सक्षम शिक्षक नाहीत. याचे एक कारण म्हणजे इंग्रजीवर खरोखर प्रभुत्व असलेल्या आणि विविध विषय इंग्रजीतून चांगल्या प्रकारे शिकवू शकणाऱ्या प्रशिक्षित शिक्षकांवर खर्च करण्याची संबंधितांची तयारी नाही. मग मुलांच्या शिक्षणाचा परीघ शिक्षकांच्या तयारीएवढाच सीमित होतो. तेथे मुलांच्या कुतूहलाला, प्रश्न विचारण्याला, चिकित्सक विचाराला, अभिव्यक्तीला,

सर्जनशीलतेला पूर्ण वाव देणाऱ्या अध्यापनपद्धती वापरल्या जात नाहीत. त्यांचा भाषिक विकास सहज आणि समृद्ध होईल, अशी द्वैभाषिक, बहुभाषिक तंत्रेही वापरली जात नाहीत. निरर्थक सराव, घोकंपट्टीवर भर दिला जातो. दर्जेदार ऑफलाइन आणि ऑनलाइन साहित्याऐवजी बाजारू शैक्षणिक साहित्यच मुख्यतः वापरले जाते. मुलांच्या शिक्षणातील या खऱ्या समस्या आहेत.

त्या दूर करण्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन, जरी आज होत नसेल, तरी यापुढे शाळांची नियमित शैक्षणिक तपासणी करणे आणि योग्य ते मार्गदर्शन पुरवणे फार गरजेचे आहे. वेळ पडली तर आणि दृष्टी आणि तळमळ असेल तर इंग्रजी माध्यमाचाही आपल्या समाजाच्या आणि संस्कृतीच्या उत्कर्षासाठी वापर करता येतो, हा आपल्याच इतिहासातील धडा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com