आनंदाचे रंग अन् तरंग

माणसाच्या जीवनाला सर्वांगीण समृद्धता देणाऱ्या घटकांतून त्याच्या आनंदाचे मोजमाप केले जाते. ज्या देशातील अधिकाधिक जनता आनंदी तो आनंद निर्देशांकात आघाडीवर राहतो. जनतेच्या आनंदासाठी त्या देशातील राज्यकर्ते, सामाजिक धोरणकर्त्यांनी त्या अनुषंगाने प्रयत्न केले पाहिजेत, प्रसंगी चुका दुरुस्त कराव्यात.
world happiness index Finland top list of 146 countries while India at 126th position
world happiness index Finland top list of 146 countries while India at 126th positionSakal
Updated on

- डॉ. रिता शेटिया

माणसाच्या जीवनाला सर्वांगीण समृद्धता देणाऱ्या घटकांतून त्याच्या आनंदाचे मोजमाप केले जाते. ज्या देशातील अधिकाधिक जनता आनंदी तो आनंद निर्देशांकात आघाडीवर राहतो. जनतेच्या आनंदासाठी त्या देशातील राज्यकर्ते, सामाजिक धोरणकर्त्यांनी त्या अनुषंगाने प्रयत्न केले पाहिजेत, प्रसंगी चुका दुरुस्त कराव्यात.

जागतिक आनंद निर्देशांकाचा अहवाल दरवर्षी २० मार्च रोजी, जागतिक आनंद दिनी प्रकाशित केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी २०२४चा जागतिक आनंद निर्देशांक अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स) नुकताच प्रकाशित केला. हा अहवाल जगभरातील देशातील नागरिकांच्या आनंदाचे मोजमाप करतो.

१४६ देशांच्या या यादीत फिनलंड अव्वल असून, भारताचे स्थान १२६वे आहे. असे का होते, याचा मागोवा घेऊया. आनंद निर्देशांक हे सर्वसमावेशक सर्वेक्षण साधन आहे; जे आनंद, समाधान, कल्याण, आनंदाची भावना आणि आनंदाची इतर क्षेत्रे मोजते.

मनोवैज्ञानिक कल्याण, आरोग्य, वेळेचे संतुलन, समुदाय, सामाजिक समर्थन, शिक्षण, कला व संस्कृती, पर्यावरण, सरकार, भौतिक कल्याण आणि काम त्याचबरोबर टिकाऊपणा आणि लवचिकतेच्या पैलूंचे मूल्यांकन करते.

आनंद निर्देशांकाची व्याख्या भूतानच्या सकल राष्ट्रीय आनंद निर्देशांकातून आली. १९७२ मध्ये, भूतानने संपत्ती, आराम आणि आर्थिक वाढ यांसारख्या इतर घटकांपेक्षा आनंदाला प्राधान्य देणे सुरू केले.

त्यांनी मोजता येण्याजोग्या घटकांवर आधारित आनंदासाठी एक अनुक्रमणिका तयार केली. तेव्हापासून या निर्देशांकाचा मागोवा घेतला गेला. भूतानमध्ये, आनंद निर्देशांक ग्रॉस नॅशनल हॅपिनेस (जीएनएच) आणि ग्रॉस नॅशनल हॅपिनेस इंडेक्स (जीएनएचआय) यावरून मोजला जातो.

जुलै २०११ मध्ये, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने आनंद विकासाच्या सर्वांगीण व्याख्येबाबत ठराव केला. आपल्या सदस्य देशांना त्यांच्या लोकांच्या आनंदाचे मोजमाप करण्यासाठी आणि सार्वजनिक धोरणांचे मार्गदर्शन करण्यात मदतीसाठी माहिती मागविली होती.

पहिला जागतिक आनंद अहवाल १एप्रिल २०१२रोजी प्रसिद्ध केला, ज्यामध्ये जागतिक आनंदाची स्थिती, आनंद व दुःखाची कारणे आणि धोरणात्मक परिणामांची रूपरेषा दिली. याआधी भूतानने त्यांचे मुख्य विकास निर्देशांक म्हणून ‘सकल देशांतर्गत उत्पन्ना’ऐवजी ‘सकल राष्ट्रीय आनंद’ स्वीकारला होता.

आनंद निर्देशांक प्रत्येक देशासाठी महत्त्वाचा आहे, कारण तो व्यक्तीचा आनंद, सामुदायिक कल्याण, सामाजिक न्याय, आर्थिक समानता आणि पर्यावरणीय टिकाऊपणाचे मूल्यांकन करतो. दुसरे म्हणजे आनंद निर्देशांक सामाजिक बदलांना चालना देण्यासाठी सहाय्यभूत ठरतो. धोरणकर्त्यांना नागरिकांच्या कल्याण व समाधानासाठी योजना बनवण्यासाठी आवश्यक आकडेवारी प्रदान करतो.

संयुक्त राष्ट्रे ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क’ हा अहवाल प्रकाशित करतात. अहवालात देशांतर्गत उत्पादन, आयुर्मान, उदारता, सामाजिक समर्थन, स्वातंत्र्य आणि भ्रष्टाचार या सहा घटकांवर आधारित आनंदाचे मोजमाप केले जाते.

१. स्थूल राष्ट्रीय उत्पादन : देशाच्या आर्थिक समृद्धीच्या मूल्यांकनासाठी देशांतर्गत उत्पन्नाची (जीडीपी) आकडेवारी उपयुक्त आहे. दरडोई उत्पन्नाच्या पातळीचा लोकांच्या जीवनावर आणि परिणामी जागतिक आरोग्य निर्देशांकावर थेट परिणाम होतो. दरडोई ‘जीडीपी’ जितका जास्त तितकी देशाची अर्थव्यवस्था निरोगी.

२. आयुर्मान : आयुर्मानाचा उपयोग जीवनाची गुणवत्ता आणि आरोग्यसेवेच्या सुलभतेच्या मूल्यांकनासाठी केला जातो. उच्च आयुर्मान म्हणजे निरोगी लोकसंख्या, सुलभ आरोग्यसेवा आणि सर्वसाधारणपणे उच्च दर्जाचे जीवन. दीर्घ आयुर्मानाच्या देशांना जागतिक आरोग्य निर्देशांकामध्ये उच्च दर्जा दिला जातो.

३. सामाजिक सहकार्य : सामाजिक संबंधासाठी नातेवाईक, मित्र असणे आवश्यक आहे. एखादी समस्या उद्भवल्यास ते मदतीस येतात. एखाद्या व्यक्तीला संकटसमयी मदत करणारे कोणी नसेल तर तिची दयनीय अवस्था होते. सामाजिक सहकार्य चांगल्या प्रकारे मिळाल्यास व्यक्ती दुःख, उदासीनतेपासून दूर राहते.

४. औदार्य : म्हणजे दानधर्म करण्याची सवय. धर्मादाय संस्थांना मदतीची लोकांची तयारी असेल तर ती उदारता थेट समृद्धीशी संबंधित आहे. जितके जास्त दान दिले जाईल तितके ते लोक अधिक आनंदी राहतील.

५. स्वातंत्र्य : हे मूलभूत घटकांपैकी एक आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे जीवन निवडायचे असते, स्वतःचा अधिकार हवा असतो. स्वातंत्र्य म्हणजे संधी- प्रवासाची, मतदानाची आणि प्रात्यक्षिकांमध्ये सहभागाची, इ. संधी जितक्या अधिक तितके जीवनमान चांगले.

६. भ्रष्टाचार : व्यवहारातील भ्रष्टाचारामुळे गुंतवणुकीवर विपरित परिणाम होतो. कामगिरीचा दर्जा खालावतो. सरकारी खात्यामधील भ्रष्टाचारामुळे मानवी हक्कांचे उल्लंघन, सामाजिक अन्याय आणि खराब आर्थिक कामगिरी होऊ शकते. त्यामुळे सरकार आणि व्यावसायिक भ्रष्टाचार या दोन्हींचा थेट संबंध आर्थिक कामगिरी आणि वैयक्तिक आनंदाच्या खालावणाऱ्या पातळीशी आहे.

चित्र भारतातले

भारतात सत्तेवर आलेल्या प्रत्येक सरकारकडून देशवासीयांच्या जीवनमानात, सकारात्मक बदल घडवून आणल्याचा दावा केला जातो. मग ते केंद्रातले सरकार असो किंवा राज्यातले सरकार असो. प्रत्येक सरकार जनतेसाठी काय-काय केले, या कामांची यादी जाहीर करते.

प्रत्यक्षात झालेली कामे आणि जाहीर झालेली यादी यात तफावत असते. भारतीय आनंदी नसल्याचं चित्र जागतिक आकडेवारीतून समोर आले आहे. त्याचे कारण म्हणजे एकीकडे आपण विकास झाल्याचे सांगतो; परंतु तो कोणाचा झाला, हे जर पहिले तर भारतात मूठभरांकडे एकवटलेली संपत्ती आणि बहुसंख्य गरीब यांच्यातील दरी दिवसेंदिवस रुंदावत आहे. संपत्ती आणि आनंद यांचा परस्परसंबंध आहे.

गरिबी, भ्रष्टाचार, पायाभूत सुविधांचा अभाव, दुय्यम दर्जाच्या आरोग्य व शैक्षणिक सुविधा, मानसिक स्वास्थ्यासाठी पोषक वातावरणाचा अभाव, बेरोजगारी, वाढती लोकसंख्या, जागतिक तापमानवाढ, प्रदूषण अशा घटकांचा व्यक्तीच्या स्वास्थ्यावर, आनंदावर परिणाम होतो. भारत जगातील सर्वाधिक प्रदूषित देशांपैकी एक आहे.

त्यामुळे श्वसनाचे आजार, आरोग्यविषयक समस्या वाढतात. देशात आजही सर्व बाबतीत असमानता, भेदभाव आणि सामाजिक अन्याय, जाती आणि लिंगभाव भेद आहे. अर्थशास्रातील संकल्पनेनुसार हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, केवळ आर्थिक वाढ नागरिकांच्या आनंदाची आणि कल्याणाची हमी देऊ शकत नाही.

मानवी विकास आणि जीवनातील समाधान यांचा एकमेकांशी संबंध असतो, हे लक्षात घ्यावे. आनंद निर्देशांकाचे मोजमाप करणारे बहुतेक घटक मानवी विकासाच्या बदलत्या परिस्थितीवर अवलंबून असतात. आर्थिक कल्याणामध्ये नेहमीच सामाजिक कल्याण समाविष्ट नसते.

म्हणून, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीच्या विश्लेषणात मानवी विकास निर्देशांक आणि आनंद निर्देशांक या दोन्हींना महत्त्व आहे. भारताचे आनंद निर्देशांकात खालचे स्थान सर्वच भारतीयांसाठी चिंतेचे कारण आहे. सरकारने केवळ योजनांची घोषणा न करता त्याचा लाभ तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवावा. त्याचा लाभ त्यांना मिळत नसेल तर काय उपाययोजना करता येतील, याचा विचार करावा.

नागरिकांचा आनंद, कल्याण यांना प्रतिकूल ठरणाऱ्या घटकांबाबत वेळीच उपाययोजना केल्या पाहिजेत. भारतीयांचे भवितव्य उज्ज्वल घडवण्यासाठी सरकारी यंत्रणांबरोबरच समाजसेवी संस्था, उद्योग-व्यावसायिक घटक यांनी विकासासाठी एकत्रितपणे काम केले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.