या जगण्यावर : जपा, आपल्या आठवणी!

ya jagnyawar
ya jagnyawar
Updated on

आठवणे आणि विसरणे या गोष्टी वर वर साध्या वाटल्या तरी आयुष्यात महत्वाच्या असतात. आपल्या आठवणी म्हणजे आपण व्यतीत केलेले जीवन! आपण आपल्या अनुभवांनी आणि आठवणींनी घडतो. अनुभव शहाणपण शिकवतात. आपल्या जीवनाचा मुख्य दस्तऐवजच तो! म्हणूनच आठवणींना मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात तशाच पडू देणे योग्य नाही. मधून मधून उसंत मिळेल तेव्हा आपल्या आठवणींचा धांडोळा घेतला पाहिजे. विशेषतः आपल्या मनाला बळ देणाऱ्या आठवणींची जपणूक केली पाहिजे.

अनेक वर्षांपूर्वी सरकारी नोकरीत असताना मी अभ्यासी रजा घेतली होती. अभ्यासानंतर जो वेळ असायचा त्यात मी एकदा जुन्या आठवणी लिहून काढायला बसलो. मुंबईच्या दैनंदिन धावपळीत मी लहानपणाच्या, तरुणपणीच्याही अनेक आठवणी चक्क विसरून गेलो होतो. त्यापैकी अनेक आठवणी सुंदर होत्या, काही गमतीदार होत्या, काही विचित्र म्हणाव्या अशा होत्या; काही दुःखदायी होत्या. बालपणीच्या आणि तरुणपणीच्या आठवणी, मित्रांबरोबर घालवलेले सुंदर क्षण मी एका अर्थाने परत मिळविले होते. शिवाय, त्या आठवणींवर झालेले चिंतन मला बरेच काही शिकवून गेले. पुढे या विषयावरील मिलन कुंदेरा यांची सुरेख कादंबरी वाचल्यानंतर तर आपल्या आठवणी आयुष्यात उत्तरोत्तर किती महत्वाच्या ठरतात, याचेही आकलन झाले. आपली जीवनयात्रा पुढचा रस्ता न्याहाळीतच सुरू असते. मात्र आयुष्यातील शहाणपण हे आपल्या भूतकाळातील आठवणींवर आणि अनुभवावर केलेल्या चिंतनातून येत असते.

ya jagnyawar
या जगण्यावर : ‘अपना टाईम आयेगा’

आपण अनेकदा एकटे पडतो, दुःखी होतो. पुढील रस्ता अंधुक होतो. कधी अपयशही पदरी पडते! अशा कठीण प्रसंगात आपल्या चांगल्या आठवणीच आपल्याला आधार देतात. कुठे तरी पहिला नंबर आलेला असतो, पाठीवर कौतुकाची थाप पडलेली असते. आपण कुणाला तरी उत्स्फुर्तपणे महत्वाची मदत केलेली असते; कुणीतरी आपल्यालाही मदतीचा हात दिलेला असतो. वाईट काहीतरी होईल असे वाटत असतांनाच अचानक चांगले दिवस येतात. देवदूत भेटावा, तशी एखादी व्यक्ती आयुष्यात येते. टाळ्यांच्या कडकडाटात स्टेजवर आपण एखादे बक्षीस स्वीकारले असते. अशी चित्रे, अशा आठवणी मनाला उभारी देतात, मन उल्हासित करतात, उर्जा देतात. सध्याचे अवघड प्रश्न सोडवायला आत्मविश्वास देतात. जीवन प्रवाही असते, दुःखसुद्धा कायमचे नसते, हेही कळायला लागते. अशा आठवणी जपल्या पाहिजेत. वारंवार त्या डोळ्यापुढे आल्या पाहिजेत. आपले आणि प्रिय व्यक्तींचे फोटो, त्यातील उल्हासित चेहरे हेही आत्मबळ वाढवत असतात.

आपल्या आठवणी आणि अनुभव नेहमी अगदी सरळ असतात, असेदेखील नाही. अनेकदा आठवणी आणि अनुभवांचा अर्थ लावावा लागतो. विशेषतः नकारात्मक आणि वेदनादायी आठवणी व अनुभव या दृष्टीने महत्वाचे असतात. त्यातून आपण अनेक गोष्टी शिकतोही. आपल्या झालेल्या चुका लक्षात येतात. आठवणींच्या पेटाऱयात मागची काही वर्षे शोधताना आपण अधिक वस्तुनिष्ठ होतो. वेदनादायी आठवणीतील दाहकता कमी होते आणि दुःखही स्वीकारायला शिकतो. असे चिंतन आपणांस बरेच काही शिकवते, सकारात्मक करते. म्हणूनच जपलेल्या आठवणी आणि अनुभव यांचा अर्थ लावणेही महत्वाचे आहे.

ya jagnyawar
या जगण्यावर... मनात घर करणारं घर!

आयुष्यात पुढे पाहा, मागे वळून पाहू नका, हा सल्ला अर्थातच महत्वाचा आहे. मात्र पन्नाशीनंतर आठवणींचा साठा वाढू लागतो. अशा वेळी मध्यम वयातच आठवणींचा अर्थ लावणे, चांगल्या आठवणींची जपणूक करणे सुरू केले पाहिजे. विशेषतः सकारात्मक, आनंददायी आठवणी साठवून ठेवल्या पाहिजेत. शेवटी शरीर थकायला लागते तेव्हा मनाच्या दिव्याची ज्योत मोठी होते. अशा एकाकी काळात आपल्याच उत्तम आठवणींची साथ महत्वाची ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.