सन २०२४ हे वर्ष साने गुरुजींचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष म्हणून महाराष्ट्रभर साजरे होत आहे. महामानवांचे जीवनकार्य आणि विचारांचे स्मरण हे अशा पर्वणीच्या निमित्तानेच होते. आज (ता. ११ जून) त्यांचा स्मृतिदिन! त्यानिमित्त त्यांच्या साहित्यामधून जे विचार मांडले, ते करुणोपनिषदासारखेच लेखकाला भासतात...
डॉ. सुनीलकुमार लवटे
साने गुरुजींनी पाच दशकांच्या लाभलेल्या काळात प्रबोधन, संघटन, संघर्ष, लेखन कार्य केले. स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद ही भारताची संविधानिक मूल्ये खरे तर साने गुरुजींच्या साहित्यातून भारतीय संस्कार आणि संस्कृतीची प्रतीके बनून पुढे येताना आपण सर्व अनुभवत असतो. साने गुरुजींनी शंभराहून अधिक ग्रंथ लिहिले आहेत. ते सर्व लेखन अद्याप समग्र वाङ्मय म्हणून प्रकाशित झालेले नाही.
साने गुरुजी ‘विद्यार्थी’ मासिक चालवित. तसेच ‘छात्रालय’ दैनिकही हस्तलिखित रूपात अमळनेरच्या प्रताप विद्यालयाचे वसतिगृह चालवित असताना नियमितपणे पहाटे चारला उठून लिहित असत. विद्यार्थ्यांनाही लिहायला प्रेरणा व प्रोत्साहन देत. तो सारा ऐवज साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात कुलूपबंद सुरक्षित आहे. तो जनतेसाठी खुला व्हायला हवा. हा सर्व आग्रह, अट्टाहास यासाठी की, साने गुरुजींचे विचारधन हा वर्तमान सांस्कृतिक अरिष्टावरील रामबाण उपाय वाटतो. साने गुरुजींचे जे विपुल साहित्य आहे, ते कथात्मक, चारित्र्यप्रधान साहित्याचीच चर्चा वा वाचन अधिक होताना दिसते. पण, साने गुरुजींचे खरे वैचारिक वैभव शोधायचे झाले तर ते त्यांच्या निबंधावर साहित्यातच आढळते.
भारतीय संस्कृतीचे भवितव्य
सांस्कृतिक, वैचारिक साहित्यांत ‘भारतीय संस्कृती’ आणि ‘संस्कृतीचे भवितव्य’ या दोन रचना परस्परपूरक म्हणून पुढे येतात. ‘भारतीय संस्कृती’ साने गुरुजींचे मौलिक लेखन आहे. ‘संस्कृतीचे भवितव्य’ हा ग्रंथ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या ‘द फ्युचर ऑफ सिव्हिलायझेशन’चे भाषांतर होय. हे दोन्ही ग्रंथ आपणास संस्कृती (कल्चर) आणि सभ्यता यातील फरक समजावतात. संस्कृती ही गतकालीन असते. तिचे वर्तमान रूप म्हणजे सभ्यता (सिव्हिलायझेशन). संस्कृती उन्नत होणे म्हणजे तिचे सभ्यतेत रुपांतर होणे. ‘भारतीय संस्कृती’ ग्रंथ संस्कृतीचे वर्णन नसून, तिचे सभ्यतेत रूपांतराची तळमळ होय. साने गुरुजींच्या शब्दांत सांगायचे तर ‘‘भारतीय संस्कृतीच्या आत्म्याशी येथे भेट आहे. तिच्या अंतरंगाचे येथे दर्शन आहे.’’
‘भारतीय संस्कृती’मध्ये असलेल्या २३ भागांपैकी ११ भागांत संस्कृतीच्या मूलभूत तत्त्वज्ञानाची चर्चा साने गुरुजींनी केली आहे. भाषेच्या सुलभ, सुबोधतेचे सौंदर्य म्हणजेच साने गुरुजींची भाषा आणि शैली. कर्म, भक्ती, ज्ञान, त्यागाचा महिमा ही भारतीय संस्कृतीची खरी अंगे होत. हे ‘भारतीय संस्कृती’तून साने गुरुजी समजावतात. त्यांच्या ‘गीताहृदय’ ग्रंथातही त्याचाच प्रतिध्वनी आपणास ऐकू येतो. साने गुरुजींनी सर्व कर्मांना समान लेखले आहे. या ग्रंथातून साने गुरुजी संतांनी सांगितलेली समानता खरी मानतात. कर्मपण त्यांच्या लेखी सजीव आणि निर्जीव असते. याचा साक्षात्कार घडवणारे साने गुरुजी हे पहिले तत्त्वज्ञानी होत. या ग्रंथात अहिंसा तत्त्वज्ञानाच्या उत्क्रांतीचा उहापोह गगनीय ठरतो. भारतीय समाजरचना वर्णाश्रमावर आधारित होती. साने गुरुजी तिचे विवेचन ‘रंग’ संकल्पनेच्या आधारावर करू पाहतात. वर्ण म्हणजे रंग नव्हे तर वृत्ती, व्यवहार, कृती, कर्म होय. प्रत्येकाने आपला उपजत स्वभाव लक्षात घेऊन कर्म करावे, असे ते सांगतात. एका अर्थाने ते जन्मधिष्ठित वर्णाश्रम व्यवस्था नाकारतात.
`भारतीय संस्कृती’मधील मृत्यू चिंतन अधिक लोभस आहे. साने गुरुजींच्या मृत्यूनंतर आचार्य अत्रेंनी आपल्या ‘मराठा’तील मृत्यूलेखनाचं शीर्षक दिले होते ‘मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी’ हिंदी साहित्यिक रामवृक्ष बेनिपुरी नियमित दैनंदिनी लिहित. ‘डायरी के पन्ने’ या शीर्षकाने ती प्रसिद्ध आहे. साने गुरुजींनी मृत्यूचे वर्णन विविध पद्धतीने केले आहे. १) ईश्वराचेच एक स्वरूप, २) वस्र फेकणे, ३) महायात्रा, ४) आईच्या कुशीत जाऊन झोपणे, ५) माहेरी जाऊन येणे, ६) अनंतात स्नान, ७) विस्मरण, ८) अमर प्रकाश. हे मृत्यूरूप वैविध्य अपवाद होय. या मृत्यू महाकाव्याचा शेवट करीत साने गुरुजी म्हणतात, ‘भारतातील सर्व प्रकारचे दैन्यदास्य, सर्व प्रकारचे विषय वैषम्य, सर्व प्रकारचे अंधार दूर करण्यासाठी देहाची बलिदाने करावयास लाखो कन्या-पुत्र उठतील, त्या वेळेसच भारतीय संस्कृतीचा सुगंध दिवंगत जाईल व भारत नवतेजाने फुलेल.’
साने गुरुजींना प्रेम, त्याग, अहिंसा या त्रितत्त्वावर उभी संस्कृती दिसणे हे त्यांच्यावरील गांधीवादाच्या गारुडाचेच निदर्शन म्हणायला हवे. साने गुरुजींना ‘भारतीय संस्कृती’तील समाजरचना साम्यवादी, समाजवादी अभिप्रेत होती. तिचे वर्णन करत वि. स. खांडेकरांनी म्हटले होते की, साम्यवादावर गांधीवादाचे कलम म्हणजेच समाजवाद होय.
साने गुरुजींनी ज्या ग्रंथांची भाषांतरासाठी निवड केली त्यामागे एक विशिष्ट दृष्टी आणि ध्येयवाद दिसून येतो. भगिनी निवेदिता यांच्या ‘रिलिजन अॅन्ड धर्मा’चे भाषांतर त्यांनी ‘राष्ट्रीय हिंदुधर्म’ नावाने केले आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्री जोशी यांचा ‘हिंदुधर्माची समीक्षा’ आणि ‘सर्वधर्म समीक्षा’ ग्रंथ याचेच जुळे भावंड होय. साने गुरुजींचे आस्वाद्य भाषांतर आहे ‘स्वदेशी समाज.’ हा ग्रंथ रवींद्रनाथ टागोर यांच्या याच नावाने बंगालीत प्रसिद्ध असलेल्या कृतीचे भाषांतर होय. भारतीय शक्ती (अस्मिता) मारली जाणार नाही, आपणच आपल्या देशाची चिंता वाहिली पाहिजे. त्यासाठी अहोरात्र कष्ट केले पाहिजेत. खेड्यांतून आपले राष्ट्रीय जागृतीचे कार्य सुरू झाले पाहिजे. भारतीय श्रेष्ठत्व आज नाहीसे झाले आहे. ते परत मिळवू तेव्हाच हिंदुस्थानचा इतिहास पुरा होईल. हे विचार अधोरेखित करणारा हा ग्रंथ साने गुरुजींना आकर्षक वाटावा, हे त्यांच्या स्वभावधर्मास शोभणारेच होते.
कलेचे स्थान सर्वश्रेष्ठ
लिओ टॉल्सटॉयच्या ‘व्हॉट इज आर्ट’ या शीर्षक ग्रंथाचे भाषांतर साने गुरुजींनी ‘कला म्हणजे काय? नावाने मराठीत केले आहे. हा मूळ ग्रंथ तसा रशियन भाषेतला. त्याच्या इंग्रजी तर्जुम्याचे हे मराठी भाषांतर. या ग्रंथातून लक्षात येते की, कला हा एक मानवीय व्यापार (व्यवहार) होय. मानवी जीवनात कलेचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे. कारण ती मानवी सद्भगवनांचा परिपोष करते. साने गुरुजींचे मौलिक लेखन असो वा भाषांतर त्या सर्वांमागे मानवी कल्याणाची भावना ही त्याची पूर्वअटच असते.
साने गुरुजींच्या वैचारिक साहित्यातला अचर्चित वा दुर्लक्षित ग्रंथ म्हणजे ‘स्वराज्यसंस्थापक श्री शिवराय’ हा होय. श्री शिवरायांचे तेजस्वी जीवन आणि साने गुरुजींची स्फूर्तीदायी शैली यांचा मनोज्ञ संगम म्हणजे हा ग्रंथ होय. लाटेतून महापुरुष उत्पन्न होतो,’ अशा गौरवपूर्ण शब्दांत साने गुरुजींनी शिवावताराची प्रशंसा केली आहे. या शिवचरित्राचे लेखन साने गुरुजींनी राष्ट्रीय दृष्टीने केले आहे. यात संत आणि शाहिरांनी केलेल्या शिवचरित्राची उजळणी आहे. शिवस्मारक म्हणजे स्वातंत्र्याचा लढा व भगवा रंग म्हणजे त्याग व संन्यस्त वृत्तीचे प्रतीक अशी केलेली मीमांसा मोठी कालसूचक आहे.
साने गुरुजींच हे समग्र वैचारिक साहित्य संदेश देणारे, प्रवचन करणारे असे हेतू पूर्वक केलेले लेखन होय. हे लिखाण भारताच्या भविष्य घडणीचा खटाटोप, धडपड आहे. ‘हृदयात सेवा, वदनात सेवा’ असे त्याचे स्वरूप आहे. त्यांचे साहित्य म्हणजे करुणेचा झरा नि कळवळा. म्हणून ते ‘कला म्हणजे काय?’च्या प्रस्तावनेत त्राग्याने सर्व कलाकार, साहित्यिकांना विचारतात, ‘महाराष्ट्रातील कलावंतांनो ! हा महाराष्ट्र, मुमूर्ष व मरणोन्मुख महाराष्ट्र, जरा येऊन डोळेभरून पहा तरी. पहा त्याच्या जखमा, पहा त्याच्या वेदना, पहा त्याची पदोपदी होणारी मानखंडना... हे विराट दुःख, ही अपार आपत्ती, याच्या दर्शनाने नाही का तुमचे डोळे भरून येत? नाही का तुमचे हृदय विरघळत? या अपार दुःखाला वाचा फोडावी, असे नाही का तुम्हाला वाटतं?’’ अशा साने गुरुजींच्या साहित्यातील प्रश्नांच्या सरबत्तीमागे सर्वसामान्यांच्या दुःखाचे करुण उपनिषद मला नेहमी अनुभवायला मिळते नि मी माझ्यापरीने दुःखहरणाचे प्रयोग करीत राहतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.