'कवच कुंडल'धारी पनवेल

‘मिशन कवच कुंडल मोहीम’ राबवून दुसरा डोस १०० टक्के पूर्ण करणारी ‘कवच कुंडल’धारी पनवेल महानगरपालिका महाराष्ट्रात दुसरी ठरली.
100 percent vaccination Ganesh Deshmukh is Commissioner of Panvel Corporation
100 percent vaccination Ganesh Deshmukh is Commissioner of Panvel Corporationsakal
Updated on

जागतिक महामारी घोषित केलेल्या कोविड विषाणूचा प्रादुर्भाव पनवेल महापालिका क्षेत्रात रोखण्यामध्ये आयुक्त गणेश देशमुख यांचे भरीव योगदान लाभले आहे. कोविडच्या सुरुवातीच्या काळात अपुऱ्या आरोग्य सेवासुविधांमध्येदेखील योग्य नियोजन आणि योग्य निर्णय घेऊन देशमुख यांनी कोविडची रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यात यश मिळवले.

कोविडच्या पहिल्या लाटेत पनवेल महापालिकेनंतर काही काळ देशमुख हे ठाणे महानगरपालिका येथे अतिरिक्त आयुक्त होते. तिथे असतानादेखील कोविड काळातील त्यांचे काम वाखणण्याजोगे होते. साऱ्या राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा होत असताना त्यांनी रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रात्रंदिवस संपर्कप्रणाली वापरून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला. त्यांच्या या अविरत प्रयत्नांमुळे अनेक नागरिकांचे प्राण वाचले.

पनवेल महानगरपालिकेत पुन्हा आयुक्त म्हणून देशमुख परत आले तेव्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती होती. पनवेल पालिका क्षेत्रासह रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून रुग्ण या ठिकाणी उपचारास येण्याची शक्यता असल्याने कळंबोली येथील भारतीय कापूस निगम येथील जम्बो कोविड सेंटर महत्त्वाचे ठरणार होते. ते सेंटर सुसज्ज ठेवण्यासाठी देशमुख यांची कार्यपद्धत मोलाची ठरली.

भारतीय कापूस निगमच्या गोडावूनमध्ये सिडकोच्या माध्यमातून सर्व सोयींनी युक्त असे सुसज्ज ६५० खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभारले गेले. यामध्ये १०० आय.सी.यू. खाटा प्रौढांसाठी, ५० आय.सी.यू. खाटा लहान मुलांसाठी, ४०० ऑक्सिजन खाटा प्रौढांसाठी, १०० ऑक्सिजन खाटा लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या.

कोविड १९ची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेची सांशकता तज्ज्ञांनी व्यक्त करत असताना या लाटेत आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुक्त गणेश देशमुख यांनी सर्व संबधित विभागांना वारंवार सूचना, आढावा बैठकींमध्ये बेड व्यवस्थापन आणि ऑक्सिजन पुरवठा याविषयीच्या महत्त्वाच्या सूचना देत होते.

डेल्टा प्लस उत्परिर्वतित विषाणूचा धोका वाढल्यावर आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचे आदेश वैद्यकीय आरोग्य विभागास गणेश देशमुख यांनी दिले. याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता वारंवार बैठका घेण्यात येत होत्या. सोबतच, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कंटेन्मेट झोन, इंडिया बुल्स येथील विलगीकरण केंद्र, कोरोनाबाधित रुग्णांची अद्ययावत माहिती, बेड मॅनेजमेंट, औषध वितरण या सर्वांचा सातत्याने आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्त आवश्यक त्या सूचना देत होते.

कोरोनाच्या या संकटात लसीकरण हे मोठे कवच होते. ज्या नागरिकांनी लसीकरण पूर्ण केले नाही, त्यांना लस घेण्याचे आवाहन करून देशमुख यांनी जनजागृती करण्यास पुढाकार घेतला. त्यांच्याच नेतृत्‍वात पनवेलमध्ये लसीकरणाची मोहीम शिस्तबद्ध राबवण्यात आली. याचा फायदा तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी झाला. या लसीकरण कार्यक्रमामध्ये पहिल्या टप्प्यात हेल्थ वर्कर्स, दुसऱ्या टप्प्यात पहिल्या फळीतील कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक त्यानंतर १८-४५ वयोगटातील नागरिक या सर्व टप्प्यात जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले. याबरोबरच दिव्यांग, गरोदर माता, यांच्यासाठी लसीकरणाचे विशष सत्रे आयोजित करण्यात येत होती.

अनेक कुटुंबांमध्ये काही कारणाने अंथरुणावर झोपून असलेले रुग्ण किंवा वयोवृद्ध यांचे कोविड लसीकरण करण्यासाठी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिकेने पाऊल पुढे टाकले. अशा नागरिकांना रुग्णालयात किंवा लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करणे शक्य नसते. या रुग्णांना, वयोवद्ध नागरिकांचे त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करण्यात आले.

कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पनवेल कार्यक्षेत्रातील कंटेन्मेट झोनमधील नागरिकांनी कोरोनाच्या सूचनांचे गांभीर्याने पालन करावे, असे आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी सातत्याने दिले. तसेच मास्क न वापरणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश देऊन मार्शल्सची नेमणूक करून, शहराला कोविड संसर्गापासून रोखण्यासाठी शिस्त लावली. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी आयुक्तांच्या निर्देशानुसार महापालिकेने ग्रामीण भागांवर लक्ष केंद्रित केले. ग्रामीण भागात ६८ ठिकाणी लसीकरणासाठी दहा पथकांची निवड केली. ही पथके ग्रामीण भागात आठवड्यातील ठराविक दिवशी लसीकरण कार्यक्रम राबवित होती. सद्यपरिस्थितीत पालिका क्षेत्रात दोन्ही डोसचे लसीकरण ११० टक्के झाले आहे. पहिल्या डोसचे लसीकरण झाल्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी जनजागृती करण्यात आली. या उपक्रमांतर्गत महापालिका क्षेत्रातील विविध सोसायट्यांमधील ज्या नागरिकांचे लसीकरण राहिले आहे, अशा नागरिकांनी भोंगा गाडीजवळ येऊन लस वाहिकेमध्ये येऊन आपले लसीकरण पूर्ण केले. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवून देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका क्षेत्रात मिशन कवचकुंडल मोहीम राबविली गेली. त्याप्रमाणे पालिकेला यशही मिळाले. दुसरा डोस १०० टक्के पूर्ण करणारी पनवेल महानगरपालिका महाराष्ट्रात दुसरी ठरली.

कोरोनाच्या जास्त जोखमीच्या काळात आयुक्तांच्या निर्देशानुसार एका दिवसांत साडेचार हजार ते पाच हजार चाचण्या करण्यात आल्या. त्यातही ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळतो त्या इमारतीतील, वसाहतीतील प्रत्येकाच्या चाचण्या करून कोरोनाच्या विषाणूला आहे तेथेच रोखण्यासाठी टारगेटेड टेस्टिंगवर भर दिला गेला. प्रामुख्याने रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, मॉल, बाजारपेठा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या गेल्या.

कोविड-१९ या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास ५० हजार रुपये इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. त्यासाठी राज्य सरकारने कार्यान्वित केलेल्या ऑनलाईन वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले होते. त्यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाची मदत घेऊन सर्व लाभार्थ्यांचे अर्ज एकाच वेळी भरण्यासाठी नाट्यगृह सर्व सोयी-सुविधांनी सज्ज होते.

पनवेल महापालिका क्षेत्रात ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढल्यानंतर या सर्वांचे आजाराचे स्वरूप सौम्य असून, त्यांच्यापासून संक्रमण वाढू नये, यासाठी पालिकेने उभारलेल्या कळंबोली येथील सीसीआयच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये ओमिक्रॉन विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

१ जानेवारी रोजी महापालिका क्षेत्रातील १५-१८ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे निर्देश शासनाने दिल्यानंतर गणेश देशमुख यांनी उत्तम पद्धतीने या लसीकरणाचे नियोजन करून महापालिकेच्या वतीने रोज दहा शाळांमध्ये लसीकरण करण्यात आले. यासाठी दहा लसीकरणाच्या टीम तयार करण्यात आल्या. यामध्ये डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांचा समावेश होता.

पनवेलकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आयुक्तांनी तिसऱ्या लाटेदरम्यान नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला. या उपक्रमांतर्गत कोरोना बाधित रुग्णांना वेबेक्स ॲपच्या माध्यमातून राष्ट्रीय व राज्य कृती दलाच्या सदस्यांकडून ऑनलाईन पद्धतीने थेट मार्गदर्शन देण्यात आले. या मार्गदर्शन सत्रांमध्ये कोविड-१९ च्या तिसऱ्या लाटेमध्ये नवीन काय आहे, नियमित लक्षणे आणि तक्रारी, रुग्णांसाठी विलगीकरण, मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत, उपचारांची मानक तत्त्वे काय आहेत, कुटुंबातील सदस्यांनी किती व कशी काळजी घेतली पाहिजे, विलगीकरणादरम्यान आहार आणि पोषक तत्त्वांचे व्यवस्थापन कसे करावे, या साऱ्या प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञांच्या मार्फत देण्यात आली.

देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दुसरा डोस घेऊन नऊ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झालेल्या आरोग्यकर्मी (हेल्थ वर्कर), पहिल्या फळीतील कोरोना योद्धे (फ्रन्ट लाईन वर्कर) तसेच व्याधीग्रस्त (कोमॉर्बिड) असणारे ६० वर्षांवरील नागरिक यांना ‘प्रिकॉशन डोस’ देण्यास सुरुवात करण्यात आली.

एकूणच कोविड परिस्थितीमध्ये पनवेल कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी घेतलेली मेहनत आणि सुयोग्य नियोजन याचा परिपाक म्हणजे पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात रोजच्या कोविड रुग्णांची संख्या अवघ्या दोनवर येऊन पोहचली आहे.

कोरोनाची भीतीदायक दुसरी लाट गेल्यानंतर तिसरी लाट रोखण्याचे आव्हान होते. त्या वेळी पनवेल महानगर पालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे गणेश देशमुख यांच्या हातात आली. त्यांनी तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी आरोग्यसेवा भक्कम करण्यासाठी सुसज्ज जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी मार्गदर्शन केले. हे संकट रोखण्यासाठी लसीकरण हे मोठे कवच होते. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवून देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन कवच कुंडल मोहीम’ राबवून दुसरा डोस १०० टक्के पूर्ण करणारी ‘कवच कुंडल’धारी पनवेल महानगरपालिका महाराष्ट्रात दुसरी ठरली.

- गणेश देशमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.