बदलत्या काळानुसार, बदलत्या तंत्रज्ञानानुसार आर्थिक क्षेत्रातील गैरव्यवहार, घोटाळे यांचं स्वरूप बदलत चाललं आहे. ‘व्हाइट कॉलर’ गटात मोडणारी ही गुन्हेगारी वरकरणी साधी-सरळ भासत असली, तरी त्यामागचा कुटिल हेतू, चलाखी आणि कार्यपद्धती भन्नाट असते. या साऱ्या गोष्टी प्रसिद्धी माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांमधून सविस्तरपणानं उलगडल्या जातातच असं नाही.
देशभर गाजलेल्या ३१ वर्षांपूर्वीच्या हर्षद मेहता प्रकरणापासून अगदी अलिकडच्या हिंडेनबर्ग प्रकरणापर्यंत अनेक आर्थिक गडबड-घोटाळ्यांच्या चर्चा अधूनमधून झडत असतात. मात्र, त्यात नक्की काय घडलं, याचा उलगडा सर्वसामान्यांना होत नाही. मात्र, या प्रकरणाच्या तपासकार्यात सहभागी असणाऱ्यांनाच याचे ‘खरे अंतरंग’ समजत असतात, जे सहजपणे सार्वजनिक केले जात नाहीत.
सुमारे १५ वर्षांपूर्वी अर्थविश्वात खळबळ उडवून देणारे असेच एक प्रकरण म्हणजे ‘सत्यम कॉम्प्युटर्स’मधील गैरप्रकार आणि त्याचा सर्वेसर्वा रामलिंग राजूचं सर्वांना चक्रावून टाकलेले प्रताप ! कंपनीच्या ताळेबंदात अनेक वर्षे गफलती केल्याची कबुली खुद्द कंपनीचा प्रवर्तकच देतो आणि त्यामुळे सारे कॉर्पोरेट विश्वच चक्रावून जातं.
तिथूनच ‘सत्यम’च्या ‘असत्यम’ची खरी कहाणी सुरू होते. राजूनं नक्की काय केले, का केलं, ते कसं उघड झालं, ‘अंदर की बात’ काय होती, त्याचा तपास करताना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं, हाच मध्यवर्ती धागा पकडून प्रसिद्ध फोरेन्सिक ऑडिटर अपूर्वा प्रदीप जोशी यांनी ‘आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग’ या नव्या पुस्तकाच्या माध्यमातून या ‘वेगळ्या विश्वा’चा रंजक वेध घेतला आहे.
‘सत्यम’ प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या आणि स्वतः अपूर्वा जोशी यांचे मार्गदर्शक असलेल्या सीए मयूर जोशी या पडद्यामागच्या नायकाची कहाणी या पुस्तकात, एखाद्या चित्तथरारक चित्रपटाप्रमाणे उलगडत जाते. मयूर जोशी हे रिस्कप्रो मॅनेजमेंट कन्सल्टन्सी या कंपनीचे संचालक आणि त्यांच्याच सोबत अपूर्वा जोशी काम करतात.
त्यामुळं मयूर जोशी यांची आर्थिक गुन्ह्यांमधील तपास-कार्यपद्धती त्यांनी अगदी जवळून पाहिली, अनुभवली आहे. त्यामुळे ‘स्टोरी टेलिंग’ पद्धतीने मांडणी करत ते या आर्थिक घोटाळ्यांच्या सत्यशोधनाचा प्रवास घडवतात. पुस्तकातील प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी सलगतेचा धागा गुंफत त्या वाचनप्रवास प्रवाही ठेवतात, त्यामुळं शेवटपर्यंत उत्सुकता टिकून राहते. आर्थिक गुन्ह्यांचं हे गुंतागुंतीचं विश्व सोप्या भाषेत उलगडून दाखवण्याचं कसब उल्लेखनीय आहे. त्याचं श्रेय अचूक आणि नेटकं शब्दांकन करणाऱ्या सुश्रुत कुलकर्णी यांनाही द्यायला हवं.
‘सत्यम’च्या घोटाळ्याच्या निमित्तानं हर्षद मेहता, केतन पारेख, अमेरिकतील सब-प्राइम क्रायसिस, व्हिडिओकॉन-धूत-कोचर, नीरव मोदी-चोक्सी, आयएल अँड एफएस घोटाळा, हिंडेनबर्ग-अदानी या प्रकरणांचा धांडोळा घेताना, स्वातंत्र्यपूर्व काळात बुडालेल्या बँकांची कहाणी, गाजलेलं एन्रॉन प्रकरण, कॉसमॉस बँकेवरचा सायबर हल्ला, चाणक्यनीतीत कौटिल्यानं लिहून ठेवलेले घोटाळ्यांचे ४० नमुनेही पुस्तकाचे संदर्भमूल्य वाढवत नेताना दिसतात. हे सारे एकत्र वाचायला मिळणे हा वाचकांसाठी चित्तथरारक अनुभव ठरू शकतो, हे निश्चित.
पुस्तकाचं नाव : आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग (हर्षद ते हिंडेनबर्ग)
लेखिका : अपूर्वा प्रदीप जोशी
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे (०२०- २४४७३४५९)
पृष्ठं : १८४, मूल्य : ३०० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.