प्रेमाची 'सेकंड इनिंग' (आदित्य महाजन)

aaditya mahajan
aaditya mahajan
Updated on

राम कपूर आणि साक्षी तंवर यांची "केमिस्ट्री' रसिकांची अतिशय आवडती. तिचा पुन्हा एकदा अनुभव देणारी "कर ले तू भी मोहब्बत' ही वेब सिरीज प्रेमाच्या "सेकंड इनिंग'वर छान भाष्य करते. एकीकडे भरपूर भांडत असताना परस्परांतल्या प्रेमाचीही अनुभूती घेणाऱ्या या जोडीचं उलगडणारं नातं ही या सिरीजची खासियत.

साधेपणानं, नाजूक क्षणांना दुजोरा देऊन, नयनरम्य पॉजेस घेऊन आपल्या अदाकारीनं सगळ्यांना एका गोंडस प्रेमकथेत अडकवणं हे राम कपूर आणि साक्षी तंवरसाठी काही नवीन नाही. 2011 ते 2013 या काळात टीव्हीवर "बडे अच्छे लगते हैं' या मालिकेतून धुमाकूळ घालणारी ही जोडी एकता कपूरनं गेल्या वर्षी पुन्हा एकत्र आणली. या वेळी मात्र वेब सिरीजच्या स्वरूपात. या सिरीजचं नाव "करले तू भी महोब्बत.'

"अल्ट बालाजी' या नावानं वेब पोर्टलवर बालाजी टेलिफिल्म्सनं नवीन इनिंग सुरू केली आणि त्यात एकता कपूरचे लाडके कलाकार नसतील असं कसं होईल? "लाइफ इन अ मेट्रो' या चित्रपटातल्या "कर ले तू भी मोहब्बत' या खूप गाजलेल्या सुरेख गाण्याचे बोल एकता कपूरनं उचलले आणि तिनंच लिहिलेल्या संकल्पनेवर ही वेब सिरीज रंगवली. तसं पाहिलं, तर "बडे अच्छे लगते हैं'च्या गोष्टीशी बरंच साम्य या वेब सिरीजमध्ये बघायला मिळतं; पण तरी थोडासा वेगळेपणा आणि इंटरनेट माध्यमामुळे घेतलेली कथानकातली थोडीशी सूट नक्कीच जाणवते. हे सगळं असूनसुद्धा राम-साक्षीच्या जोडीला बघायला रसिकांना खूप आवडतं आणि स्क्रीनप्लेमध्ये असलेल्या सगळ्या त्रुटी आपण बाजूला ठेवून डोक्‍याला जास्त त्रास न देणारी प्रेमकथा, 15-15 मिनिटांच्या एपिसोड्‌समधून एका निरागस हास्यानं बघत राहतो.

करण खन्ना (राम कपूर) हा हिंदी चित्रपटांतला एक बडा नट असतो. अनेक वर्षं हिट चित्रपट दिल्यानंतर गेल्या तीन वर्षांत तो एकही हिट चित्रपट देऊ शकलेला नाही. त्याची "मार्केट व्हॅल्यू' थोडी कमी झाली असली, तरी लोकांच्या मनात, आणि खास करून मुलींच्या मनात करण घर करून बसलेला असतो. हे सगळं समीकरण राम कपूरचं मोट्ठं पोट बघता तसं आपल्या मनाला पटत नाही; पण रामनं साकारलेल्या खडूस आणि गर्विष्ठ हिरोच्या अभिनयामुळं ते हळूहळू आपल्याला "पचायला' लागतं. करण घटस्फोटित. त्याला हृदय असतं; पण ते कसं वापरायचं हे कळत नसतं. दारू पिण्याच्या व्यसनानं घसरत चाललेलं करिअर परत वर आणण्याची संधी करणकडे येते आणि ती असते हिरानी नामक मोठ्या दिग्दर्शकाचा चित्रपट. हा चित्रपट करायचा असल्यास निर्व्यसनी होण्याची अट करणला घातली जाते आणि नाईलाजाने करण ती अट मान्य करतो.

इथं या समीकरणात येते तमीळ कुटुंबातली, मुंबईत अनेक वर्षं स्थायिक झालेली व्यसनमुक्ती करणारी एक डॉक्‍टर आणि कौन्सिलर त्रिपुरासुंदरी नागराजन. टोपणनाव टिप्सी'. ही साध्या घरात राहणारी, एका पठडीतलं "बोअरिंग' आयुष्य जगणारी आणि कमीत कमी माणसांशी बोलणारी, अविवाहित तत्त्ववादी आणि थोडीशी कटकटी अशी साक्षी तंवर. टिप्सीला करणची दारूची सवय घालवण्यासाठी नेमलं जातं, आणि ही दोन टोकाची पात्रं एकमेकांच्या आयुष्यात येतात. एकमेकांशी काडीभरसुद्धा पटत नसताना, दोघं कसंतरी एकमेकांना सहन करायला लागतात. त्यांची टिपिकल "नोक-झोक' आजही बघायला तितकीच मजा येते आणि म्हणूनच ही सिरीज लोकप्रिय होत गाजते आहे.

घटस्फोट झालेल्या बायकोपासून झालेल्या मुलीच्या लग्नासाठी करण टिप्सीला बरोबर घेऊन महाबळेश्वरच्या एका पॉश रिसॉर्टमध्ये येतो आणि गोष्टीत नव-नवीन घडामोडी सुरू होतात. घटस्फोट झाल्यानंतर कायमच त्याच्यावर चिडून असलेली करणची बायको राधिका (श्वेता कवात्रा) आणि मुलगी त्रिशा यांच्याशी करण एकीकडं आपले संबंध सुधारत असतो, तर दुसरीकडं तिथंच हळूहळू एकमेकांच्या चांगल्या गोष्टी जवळून अनुभवत टिप्सी आणि करण एकमेकांच्या प्रेमात पडू लागतात. मध्येच टिप्सीची आई येते, तर मध्येच टिप्सीचा लहानपणीचा मित्र. सगळे गुंते सुटतच असतात आणि सगळं छान होतच असतं, की तेवढ्यात एकता कपूर स्टाइल "कहानी में ट्‌विस्ट' येतो आणि पहिला सीझन एक रुखरुख ठेवून संपतो.

फेब्रुवारी 2018पासून दुसऱ्या सीझनला सुरवात झाली आणि अजून काही नवीन पात्रं गोष्टीत आली. मात्र, तरीही गोष्ट फिरत राहते टिप्सी आणि करणच्या एका ओळखीच्या, पण तरी थोड्या हटके आणि निरागस प्रेमाभोवती. संपूर्ण सिरीजमध्ये "कर ले तू भी मोहब्बत' या प्रीतमच्या गाण्याचा सुंदर वापर केला गेला आहे. त्याचबरोबर "दिल मेरा' हे बोल वापरून प्रेमात पाडण्यात मोठ्ठा हातभर लावणारं पार्श्वसंगीत या वेब सिरीजचा प्राण आहे, असं म्हणायला हरकत नाही. इंटरनेट माध्यमाचा फायदा घेत या सिरीजमध्ये बरेच चावट विनोद आणि "रंगीन' पात्रं घेतली आहेत. खास उल्लेख करायचा तर टिप्सीला प्रोत्साहन देणारी नव्या काळातली तिची बहीण (तन्वी व्यास) ही आपल्या रसिकांची आवडती व्यक्तिरेखा आहे. तसंच करणच्या प्रेमात मागं लागणारी आणि आपल्याला हसवायचा प्रयत्न करणारी "रोमिला' ही वेडसर व्यक्तिरेखा आपल्याला फैज जालालीच्या थोड्याशा ओव्हरऍक्‍टिंगमुळे नक्कीच लक्षात राहते. दुसऱ्या सीझनमध्ये टिप्सीचा आधीचा निर्दयी आणि ड्रग्सच्या आहारी गेलेला बॉयफ्रेंड पलाश ही व्यक्तिरेखासुद्धा समीर कोच्चर यानं दमदारपणे निभावली आहे.

सतत "माझं तुझ्यावर कसं प्रेम आहे,' ही गोष्ट करण टिप्सीला समजावण्यात वेळ घालवत असतो, तर टिप्सीही तिच्या आधीच्या काही अनुभवांमुळे झालेल्या अर्ध दगड- हृदयाला सांभाळत या प्रेमापासून लांब जायचा प्रयत्न करत असते. या सगळ्यामध्ये बरेच चांगले संवाद आपल्याला राम आणि साक्षीच्या तोंडून ऐकायला मिळतात. अनेकदा ऑकवर्ड सिच्युएशनमध्ये सारखे अडकणारे करण-टिप्सी यांची प्रेम व्यक्त केल्यानंतर होकार-नकाराच्या मधली त्रासदायक परिस्थिती राम आणि साक्षी उत्तम हावभावांनी दर्शवतात. दोघांची एकमेकांसाठीची ओढ, प्रेमात एकमेकांना दिलेला आदर याचं दर्शन घडतं आणि प्रेम कसं करावं याची शिकवण मिळते ती त्यांच्या उत्तम अभिनयामुळं. मध्येमध्ये येणारे बालिश संवाद, फालतू गोष्टींवरून होणारी त्यांची भांडणं, करणचा अतिसमजूतदारपणा, टिप्सीचं करणवर प्रेम असूनही भूतकाळातल्या जखमांमध्ये अडकून राहणं, करणनं तिच्यासाठी केलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीमुळं तिचं अजून प्रेम वाढणं आणि इतकं सगळं करूनही टिप्सीचं करणला लवकर होकार न देणं, हे सगळं कितीही टिपिकल असलं आणि कदाचित खऱ्या आयुष्यात अनुभवलेलंदेखील असलं, तरी ते आपल्याला गोंडस स्वरूपात परत पाहायला आवडतं. हसवण्याचा थोडाफार प्रयत्न केला गेला आहे; पण आपण त्याला "प्रयत्न'च म्हणूया. पांचट विनोदांना टिप्सीनं खुनशीपाणे "बिहेव मिस्टर खन्ना!' असं सुनावणं आणि करणचं त्यावरचं मिश्‍किल हसणं थोडंसं आपल्या ओठांना हलवतं.
टिप्सीची आई आणि मावशी आणि त्यांनी घातलेला घोळ, हा भाग या गोष्टीत फारच अती आणि ताणलेला वाटतो. तिथंच करण आणि त्याच्या पहिल्या बायकोकडून झालेल्या मुलीबरोबरचे सीन्स छान आहेत आणि त्यांच्या नात्यातली सुधारणा अजून काही सीन्समध्ये दाखवायला हवी होती असं वाटत राहतं. या गोष्टीत उणीवा आहेत. त्या खूप लक्षात येणार नाहीत, याचा दिग्दर्शक आणि लेखक बऱ्यापैकी प्रयत्न करतात आणि आपल्याला पटेल अशी गोष्ट समोर ठेवतात. तुम्ही जर वेडसरपणाकडे झुकणारं आणि "क्‍युट'वालं प्रेम करत असाल तर तुम्हाला प्रेमात पडल्यावर "अरेच्या! आपली अशीच गत झाली होती राव!' असंसुद्धा सारखं वाटत राहील, यात काहीच शंका नाही. प्रेमाच्या पेचात अडकलेली दोन पात्रं आणि त्यांच्यात होणारा बऱ्यापैकी "मॅच्युअर्ड' आणि प्रेमभावनेला न्याय देणारे संवाद हा भाग एखाद्या सिरीज किंवा मालिकेमधून खूप कमी वेळा बघायला मिळतो आणि म्हणूनच रसिक "करले तू भी महोब्बत'च्या आगामी येऊ घातलेल्या तिसऱ्या सीझनची वाट नक्कीच बघत असतील.

एखादी शांत, कधीही आस्वाद घेता येईल आणि कितीही वेळा परत बघता येईल अशी, प्रेमाबद्दल खूप काही शिकवणारी ही सिरीज नक्की बघा. त्यात पहिल्या सीझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये प्रेमात पडलेली टिप्सी अर्थात साक्षी तंवर हातांचा आकार हृदयासारखा करून, करणकडे पाठ वळवून, डोळ्यांत अश्रू, बोटात करणनं दिलेली अंगठी आणि ओठांवर "मिस्टर खन्ना' हे नाव घेऊन उभी असते आणि त्या सुंदर पार्श्वसंगीतानं सीझनचा शेवट होतो, तेव्हा तुमच्या डोळ्यांत अगदी अश्रू उभे राहिले नाहीत, तरी तुमचं हृदय नक्कीच खूप जड होतं. हीच तर या राम-साक्षीच्या जोडीची वेगळी जादू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.