‘माझा एकही फोटो चांगला आला नाहीये!’ ‘माधुरी नेहमीसारखी फोटो काढल्यावर अर्धवट नाराज होऊन म्हणाली.
‘माझा एकही फोटो चांगला आला नाहीये!’ ‘माधुरी नेहमीसारखी फोटो काढल्यावर अर्धवट नाराज होऊन म्हणाली.
‘कोणी सांगितलं हे?’ नेहमीसारखी नाईलाजाने मान हलवत आणि भुवया उंचावत आराध्यने विचारलं.
‘कोणी कशाला सांगायला हवं? मीच सांगतीये ना...’
‘उगाच काहीही! काय तुला फोटोतसुद्धा इतकं परफेक्शन लागतं काय माहीत? कुठे टाकतसुद्धा नाहीस तू फोटो. तरी जगात भारी फोटो हवा.’
‘गप रे! उगाच तुला फोटो न काढता येण्याचं खापर तू मला सल्ले देऊन कव्हर करू नकोस.’ ‘वाह रे वाह! हे बरंय तुझं. तुला नाही आवडला, की समोरचा लगेच फालतू फोटो काढतो का? लहानपणी ‘कोल्ह्याला द्राक्षं आंबट’ ही गोष्ट ऐकली आहेस ना? तूचेस तो कोल्हा... आज हिरवा वन पिस घालून आलाय हा कोल्हा या सिमेंटच्या जंगलात माझ्यावर टीका करायला,’’ आराध्य म्हणतो आणि नकळत हसतो. ते ऐकून आणि आराध्यला पाहून माधुरी पण हसते.
‘अरे पण खरंच तुला फोटो काढता येत नाही अरे!’ माधुरी मतावर ठाम राहून म्हणते. ‘हट! तुला कळत नाही, की तू इतकी सुंदर आहेस की तू कुठूनही आणि कुठल्याही अँगलने फोटो काढलास ना, तरी त्या फोटोला छान किंवा उत्तम फोटो म्हणूनच कन्सिडर केलं जाणारे.’
‘उगाच काहीही. असं ना फक्त तुला वाटतं... बाकी कोणालाही नाही. तेसुद्धा तुला मी...’ ‘असं काही नाहीये! त्याचा काही इथे संबंध नाही. मी हा तुझा फोटो समजा पोस्ट केला सोशल मीडियावर, तर मला २०० लोक कमेंट करून सांगतील, की किती छान आहे ही मुलगी.’
‘ते ना तू त्यावर काहीतरी छान चारोळी वगैरे लिहून टाकतोस ना, त्याला मिळालेली दाद असते ती. आणि त्यात तुझे इतके फॉलोअर्स आहेत ना, की ते लगेच तुला उचलून धरतात. आणि मग हे सगळं एकत्र करून तू मला हे पटवून द्यायचा प्रयत्न करतोस, की मी खूप सुंदर दिसते.’
आराध्य एक गाल उडवून ‘पच’ करतो आणि मोबाईल खिशात ठेवत असताना म्हणतो, ‘कोल्ह्याला फोटो खराबच!’
माधुरी त्याच्या या वाक्यावर त्याला जोरात हातावर फटका मारते.
‘हे बघ, तू आज खूप गोड दिसतेस त्याचा गैरफायदा घेऊ नकोस असलं काहीतरी वागून आत्ताच सांगतोय!’ आराध्य खोटं खोटं चिडत म्हणातो. माधुरीसुद्धा त्याला तोंड वाकडं करून जीभ दाखवते आणि ती जीभ दाखवत असतानाच आराध्य पटकन तिचा अजून एक फोटो मोबाईलमध्ये काढतो.
‘वाह! हा आत्तापर्यंतचा बेस्ट क्लिक आहे,’ आराध्य मोठी चिडवणारी स्माईल देत म्हणतो. ‘ताबडतोब तो डिलिट कर!’
‘ऐक ना, मी नाही करणारे...’ ‘आराध्य ताबडतोब डिलिट कर. तू कुठेतरी ते पोस्ट करशील आणि ते फार ऑड वाटेल,’ त्याचं नाव घेऊन तिने वाक्य म्हटल्याने आराध्यला तिचा सिरियसनेस जाणवला.
‘हे घे फोन, तूच डिलीट करून टाक सगळं,’’ असं म्हणत त्याने त्याचा मोबाईल अनलॉक करून तिच्याकडे दिला.
तिने मोबाईल घेतला आणि स्क्रीन पाहताच ती थोडी गोड हसली; पण तरीही नाराज असल्याचा चेहऱ्यावरचा भाव तिने कंटिन्यू केला आणि फोन त्याला तसाच दुसऱ्या सेकंदाला परत देऊन टाकला. फोन परत घेत आराध्यही गोड हसला. त्याने खूप आधी काढलेला, तिचा एक आकाशाकडे बघून हसणारा फोटो, त्याच्या मोबाईल स्क्रीनवरच्या वॉलपेपर मधून आता अजूनच छान हसत होता.
‘बदल तो!’ ‘अजिबात नाही!’
‘वाईट आलाय तो!’ ‘अजिबात नाही!’
‘तू कधीच ऐकणार नाहीस ना?’ ‘अजिबात नाही!’
माणसाने आपल्या जवळच्या माणसाला आपला आरसा केला, की खरा आरसा दाखवतो त्यापेक्षा जास्तं सुंदर असणं म्हणजे काय, हे जाणवतं नाही का?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.