प्रचंड एक्साईटमेंटनं आलेल्या श्रद्धाच्या फोनला, मकरंद गडबडीत असतानाही त्याच्याकडं भरपूर वेळ असल्यासारखा उत्तर देतो.
‘ऐक नाऽऽऽऽऽ!’
‘अगं हो हो, एक मिनीट जरा! हेडफोन तर लावू दे!’
‘पटकन लाव ना!’
‘अगं हो की!! काय झालंय असं? हां! बोल आता...’
प्रचंड एक्साईटमेंटनं आलेल्या श्रद्धाच्या फोनला, मकरंद गडबडीत असतानाही त्याच्याकडं भरपूर वेळ असल्यासारखा उत्तर देतो.
‘तुला माहितीये... मला ना आज खूप छान वाटतंय! म्हणजे खूपच छान वाटतंय.’
‘ते तर वाटणारच... मला फोन केला आहेस ना तू!.’
‘झालं? स्वतःचं कौतुक? बोलू मी?’
‘बोला बोला!’
‘...तर मला छान अशासाठी वाटलं की मी ना आज माझ्या जुन्या सोसायटीत गेले होते. म्हणजे जिथे माझं सगळं बालपण गेलंय. आजही सगळं अगदी डोळ्यासमोर मला दिसत होतं... आमच्या लपाछपीच्या जागा, गणपती उत्सवातला मांडव, माझ्या सोसायटीतून खालून दिसणारी आमच्या घराची बाल्कनी, आमचा दुपारी खेळायचा झाडाखालचा कट्टा... सगळं सगळं पुन्हा इतक्या वर्षांनी मी इतकं मनसोक्त न्याहाळलं... भरपूर वेळ तिथंच रेंगाळले...’
मकरंद इकडं फोनवर शांतपणे छान स्माइल घेऊन श्रद्धाचं सगळं वर्णन ऐकत होता. ही तिची सुंदर वर्णनं त्याला तिच्यातल्या एका वेगळ्या व्यक्तीची ओळख करून देत होती. ती व्यक्ती जी बालपणात रमते, हरवते आणि ते नसलं तरी असं कोणालातरी सांगून जपते. तिच्या गप्पा इकडून तिकडं रमत गमत वेगवेगळी वळणं घेत होत्या.
‘अरे तिथं ना खूप मंदिरं आहेत, आजू-बाजू सोसायटीच्या. गणपतीचं, रामाचं, साई बाबांचं... आई बाबा मला नेहमी घेऊन जात ह्या मंदिरात. एक विठ्ठलाचं सुद्धा सुंदर मंदिर आहे, माझ्या तिथल्या एका लहानपणीच्या मैत्रिणीचे बाबा आम्हाला तिथे नेहमी न्यायचे.’
मग तिनं एक छोटा पॉज घेतला.
‘तुला तर माहितीचे नंतर काय झालं... जेव्हा ते सगळं आम्हाला सोडावं लागलं ना, तेव्हा.. तेव्हा मी त्या मंदिरात जाऊन प्रण घेतला...’
तिचा आवाज थोडा बदलला होता.
‘प्रण? आणि तू? बापरे! काय घेतलास?’ त्यानं विचारलं.
‘मी पुन्हा माझ्या बिल्डिंगमध्ये पाय तोवर ठेवणार नाही, जोवर मी आयुष्यात काहीतरी बनत नाही...’
फोनवर दोघांमध्ये फक्त अर्धा मिनीट शांतता होती. मकरंद काळामागं पडलेलं, बरचसं अटलेलं असं श्रद्धाचं सगळं दुःख इथे फिल करत होता. श्रद्धा, तिला कोणीतरी इतकं आपुलकीनं ऐकणारं सापडल्याचा अनुभव जगत होती.
तेवढ्यात मकरंदच्या घरातून जोरात कोणाच्यातरी त्याला बोलावण्याचा आवाज येतो.
‘आलो आलो...’
मकरंद कोणालातरी ओरडून सांगतो.
‘अरे, तुला गडबड आहे का?’ श्रद्धा विचारते.
‘नाही नाही... तू बोल!’
‘अरे, असं नको करू... मी बोलत राहीन, तुझी कामं राहतील.’
‘सगळी कामं थांबू शकतात... पण हे नाही!’
‘काय? काय नाही?’
‘हेच... तुझं ५० मिनिटं काहीतरी इतकं मनापासून सांगणं. आधी लोकांना खूप बोलायचं असायचं पण फोन कॉल महाग असल्याने ते बोलायचे नाहीत. आता मोबाईलवर अनलिमिटेड टॉकटाइम असतानाही लोकांकडे ही सलग न ऑकवर्ड सायलेन्स येता गप्पा मारायची कलाच उरली नाहीये. कधीनव्हं ते असा कलाकार सापडलाय जो मनमोकळं बोलतो तर जरा घेऊ दे मला आनंद.’
मकरंद छान एक सुरात बोलतो. ते ऐकून श्रद्धाची फुललेली गोड स्माइल त्याला फोन वरून जाणवते.
‘कदाचित गप्पा अशा सलग ऐकण्याची कला फार दुर्मिळ लोकांकडे टिकून आहे रे...’ ती म्हणते आणि दोघंही छान हसतात.
‘तुझ्या जुन्या सोसायटीत नेशील मला कधीतरी?’
‘नेईन की! पण एका अटीवर...’
‘काय?’
‘मला असं बोलावसं वाटलं की मी तुला फोन करून तुझे तास दोन तास घेईन मधून अधून, तू ते सहन करायचं. डील?’
‘बापरे... फारच अवघड अट आहे... अमsss चल मंजूर!’
कधी कधी टॉम अँड जेरीसुद्धा एकमेकांसाठी बनी आणि नैना होतात, नाही का?
mahajanadi३३३@gmail.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.