वास्तवावर प्रकाशझोत

मानवी मूल्यांची पडझड अस्वस्थ करत आहे. याच गोष्टीची बारकाईने नोंद घेत गीतेश शिंदे यांनी ‘सीसीटीव्हींच्या गर्द छायेत’ या कवितासंग्रहातून मनात साचलेल्या अनेक प्रश्नांना मोकळी वाट करून दिली आहे.
cctv chya gard chayet Anthology of poetry
cctv chya gard chayet Anthology of poetrysakal
Updated on

- आशीष निनगुरकर

मानवी मूल्यांची पडझड अस्वस्थ करत आहे. याच गोष्टीची बारकाईने नोंद घेत गीतेश शिंदे यांनी ‘सीसीटीव्हींच्या गर्द छायेत’ या कवितासंग्रहातून मनात साचलेल्या अनेक प्रश्नांना मोकळी वाट करून दिली आहे. त्यामुळे हा कवितासंग्रह वास्तवतेची जाणीव करत अनेक संवेदना प्रखरपणे मांडून त्यावर उपाययोजना करण्यासाठी साद घालत आहे.

अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. मध्यंतरी कोरोनाने थैमान घातले व त्यामुळे जगण्याची गणिते बदलली. माणुसकी हा धर्म लोप पावताना दिसत आहे. अनेक ठिकाणी भेदभाव केला जात आहे. मानवी हव्यासाची ठिणगी नातेसबंधांसह निसर्गालाही भस्मसात करतेय. प्रत्येक जण एकमेकांकडे संशयाने बघत आहे.

या सर्व गोष्टींची बारकाईने नोंद घेत कवी गीतेश शिंदे यांनी ‘सीसीटीव्हींच्या गर्द छायेत’ या कवितासंग्रहातून मनात साचलेल्या अनेक प्रश्नांना मोकळी वाट करून दिली आहे. गीतेश मूळचे ठाण्याचे. ‘निमित्तमात्र’ या कवितासंग्रहानंतरचा त्यांचा हा दुसरा कवितासंग्रह. ‘शब्दालय प्रकाशन’ची उत्तम निर्मिती असलेला व प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांच्या पाठराखणने तसेच अन्वर हुसैन यांच्या मुखपृष्ठ व रेखाचित्रे यांनी सजलेला हा कवीचा दुसरा कवितासंग्रह आहे.

कवीने जगाकडे डोळसपणे पाहिलेले आहे आणि जगण्यातील वास्तविकता, वेदना, संवेदना कवीमनाला टोचत आहेत हे या कवितासंग्रहातील अनेक कवितांमधून अधोरेखित होते. आजच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जगात माणूस जगणे विसरला आहे. मोकळा श्वास घ्यायला विसरला आहे. घरा-घरांमधील संवाद कमी झाला आहे.

खरंतर सध्याचे जग यंत्रांचे झालेले असताना अगदी घरात, प्रवासातदेखील आपण कधी मोबाईल, इयरफोन, टीव्ही किंवा लॅपटॉप यातच गुंतलेलो असतो; पण अशा वातावरणात आत्ताच्या युगात या कवीला वास्तव जग टोचते यापेक्षा तो हे बदल बारकाईने पाहतोय व त्यावर निःसंकोचपणे व्यक्त होतोय.

आजूबाजूची बदललेली जीवनशैली सध्याचा धावणारा काळ नि थांबलेला काळ कवींच्या लेखणीतून व्यक्त होतोय. सध्याचं जग पाहून नि पर्यायाने अनुभवून कवींची लेखणी नि:शब्द झालेली आहे. त्यात उदासीनता, भीती व खदखद आहे, सल आहे, प्रेम आहे, सुरक्षिततेची भावना आहे.

मनातल्या भावनांचे केलेले वर्णन म्हणजे कला असते. ही कला शब्दांच्या रूपात व्यक्त झाली की आपण तिला कविता म्हणतो. साहित्य हे नकळत त्या त्या काळाचे दस्ताऐवजीकरण करत असते. गीतेश शिंदे यांचा ‘सीसीटीव्हीच्या गर्द छायेत’ हा कवितासंग्रह वाचताना कवीने किती खोलवर विचार केला आहे हे प्रकर्षाने लक्षात येते.

बदलत्या काळातील प्रतीके आणि परिमाणे हे गीतेश शिंदे यांच्या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. सध्याच्या युगात असलेली सोशल मीडियाची सर्व माध्यमे त्यांच्या कवितेत दिसून येतात. त्यामुळे ही कविता आजची भारदस्त कविता वाटते व तितक्यात आतल्या आत आपल्या मनाला भावते. आभासी जगातील वास्तव त्यांनी आपल्या कवितेतून अतिशय प्रभावीपणे मांडले आहे. त्यातील त्रुटी, कृत्रिमता यावर नेमकं बोट ठेवलं आहे.

भूतकाळातील मानवी जग, निसर्गसृष्टी आणि सध्याच्या जगातील अंतर्विरोधातून ही कविता निर्माण झाली आहे. आजच्या जगातील रिळाचित्रदर्शनातील (रिल्समधील) स्वमग्न, सेल्फी समाजाच्या एकाकी रंजनमायेची असोशी या कवितेतून प्रकटली असून आभासी मायाजाळात हरवलेल्या जगाच्या मायाबंधाची ही जाणीव आहे.

भाषा आणि भावना रक्तबंबाळ झालेल्या जगाचे हे संवेदन आहे. कवितेतील या ताणतणावाला समांतर स्त्रीत्वाचा आणि वडील-मुलाचा जाणीवशोध आहे. स्त्रीचा सृष्टिशोध तसेच इतरेजनांचा तिच्याविषयीचा शोध या कवितेत असून त्यास गतविस्मृतींचे पदर आहेत.

बदलत्या तांत्रिकतेच्या आहारी जाऊन माणसाची जीवनशैली कशी कृत्रिम बनत चालली आहे, हे दर्शविणाऱ्या कविता या संग्रहात आहेत. पर्यावरणाच्या ऱ्हासाने व्यथित करणाऱ्या या कविता आहेत. स्त्री-पुरुष, मुलगा-बाप यांच्यातील नात्याचे हृदयदावक प्रसंगांचे, आठवणींचे चित्रण असणाऱ्या या कविता आहेत.

एकंदरीत वाचकाला तांत्रिकता, पर्यावरणाचा ऱ्हास अंतर्मुख, मानवी नातेसंबंध व अशा इतर अनेक विषयांवर भाष्य करणाऱ्या या कविता सर्वच बाबतीत अंतर्मुख करायला लावणाऱ्या आहेत. हा संग्रह वाचून आपले डोळे सताडपणे उघडे होतात आणि एका व्यापक दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीकडे नव्याने पाहू लागतात.

खरंतर आपण या गोष्टींकडे पाहून अनोळख्यागत केलेले असते; परंतु कवी यावर भाष्य करून आपल्याला एक नवा विचार देऊ पाहतोय. एकूण ८५ कवितांचा पुष्पगुच्छ असणाऱ्या या कविता काळजात घर करून राहतात व अंतर्मनात एक वेगळी साद घालतात.

कवितासंग्रह : सीसीटीव्हींच्या गर्द छायेत

कवी : गीतेश गजानन शिंदे

प्रकाशक : शब्दालय प्रकाशन

पृष्ठसंख्या : १२८; मूल्य : २५० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.