आपण याआधी नायकीदेवी, कुर्मादेवी यासारख्या वीरांगनांची ओळख करून घेतली. ज्यांनी परकीय आक्रमकांशी फक्त संघर्षच केला नाही; तर त्यांचा दणदणीत पराभवही केला. याच परंपरेतील आणखी एका वीरांगनेची आज आपण ओळख करून घेणार आहोत.
रामप्यारी गुर्जर
तुघलक राजवटीतील दिल्लीचा सुलतान नसिरुद्दीन महम्मद शाह तुघलक याच्या कारकिर्दीत मध्य आशियातील समरकंदचा सम्राट तैमूरलंग यानं भारतावर आक्रमण केलं. १३९८ च्या डिसेंबर महिन्यात तैमूरच्या सैन्यानं दिल्लीत प्रलयकारी अत्याचार केले. व्हिन्सेंट स्मिथ याच्या ‘द ऑक्सफर्ड डिक्शनरी ऑफ इंडिया’ या ग्रंथात या अत्याचारांचं वर्णन केलं आहे. लेखक म्हणतो, ‘हिंदूंची घरं लुटून एकामागून एक जाळून टाकण्यात आली.
स्त्रियांवर बलात्कार करण्यात आले व लाखो लोकांना गुलाम बनविण्यात आलं. एक लाख लोकांची कत्तल करून त्यांच्या मुंडक्यांचे मिनार उभे करण्यात आले. अत्याचार आणि अपमानाचे हे व्रण भरून यायला शंभर वर्षं जावी लागली, असं म्हटलं जातं.’
‘झफरनामा’ या ग्रंथाचा हवाला देऊन हेन्री मायर्स इलियट व जॉन डॉसन त्यांच्या ‘द हिस्टरी ऑफ इंडिया ॲज टोल्ड बाय इट्स हिस्टोरियन्स’ या ग्रंथात म्हणतात, ‘तैमूरचे सैनिक लूट आणि विध्वंस करण्यासाठी अधिकच आतुर झाले होते. त्या शुक्रवारी संध्याकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत १५ हजार सैनिकांनी शहरात लुटालूट आणि जाळपोळीचं थैमान घातलं.
दिल्लीच्या अपवित्र, पाखंडी लोकांनी अनेक ठिकाणी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक शिपायाला २० हून अधिक गुलाम मिळाले. काही जणांनी तर ५० ते १०० पुरुष, स्त्रिया आणि मुलांना गुलाम बनवलं.
तैमूरच्या रक्तपिपासू सैन्यानं मांडलेल्या या प्रलयाच्या बातम्या दिल्लीजवळील हरियाना, पश्चिम उत्तर प्रदेश व उत्तराखंड या भागातील जाट प्रदेशात पोचल्या. जाटांचा प्रमुख देवपाल यानं महापंचायत बोलवून जाट, गुर्जर, अहीर, वाल्मीकी राजपूत, ब्राह्मण या सर्व जाती-जमातींना आमंत्रण दिलं.
डाव्या इतिहासकारांनी नेहमीच असं प्रतिपादन केलं आहे, की इस्लामनं भेदाभेद संपवून, समता प्रस्थापित करून एक ऐतिहासिक जबाबदारी पार पाडली. यामुळं भारतातील तथाकथित खालच्या जातींनी इस्लामचं स्वागतच केलं. काही हिंसा झालीच असेल, तर ती प्रगतिशील शक्ती (म्हणजे परकीय आक्रमक) आणि सरंजामशाही वृत्तीच्या उच्च जाती यांच्यातील वर्ग संघर्षामुळंच झाली.
अशाप्रकारे त्यांनी एक हजार वर्षांचे जुलूम आणि अत्याचार एका फटक्यात झालेच नाहीत, म्हणून नाकारून टाकले. डाव्या इतिहासकारांचा हा प्रचार किती खोटा आहे, हे या महापंचायतीचं वर्णन करणाऱ्या, पर्शियन इतिहासकार याझदी याच्या झफरनामा या ग्रंथातील नोंदींवरून स्पष्ट होतं. यामध्ये विविध जाती-जमातींच्या सहभागाचं वर्णन केलं आहे.
या आधीही आपण कामरूपचा राजा पृथू याच्याबरोबर लढलेल्या राजबोंगशी व बोडो, तसेच राणा हमीरसिंगबरोबर लढलेल्या भिल्ल व चरण या आदिवासी जमाती, राजा सुहेलदेवबरोबर लढलेले बहुजन समाजातील २१ राजे, महम्मद घोरीशी कडवा संघर्ष करून शेवटी त्याला ठार करणारे खोखर गोत्री जाट अशी अनेक उदाहरणं बघितली.
हिंदू धर्मातून जबरीने धर्मांतर केलेल्या खुश्रू खान यानं इसवीसन १३२० मध्ये सुलतान कुतुबुद्दीन मुबारक खिलजी याला त्याच्या सर्व मुस्लिम सरदारांसह ठार केलं. या बंडात त्याला गुजरातमधील बेवारी किंवा पटवारी समाजातील वीस हजार लोकांनी साथ दिली. अमीर खुस्रो आणि इब्न बतुता यांनी नमूद केलं आहे, की बेवारी हे कनिष्ठ मानल्या गेलेल्या जातीचे हिंदू होते. ज्यांचं शौर्य आणि स्वामीनिष्ठा वाखाणण्यासारखी होती.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वतः औरंगजेब दक्षिणेच्या स्वारीवर गेला असता, उत्तरेत जाटांनी मोठं बंड केलं होतं. खरं हे आहे, की बेवारी, कोळी, आग्री, जाट, गुज्जर, खोखर, गोंड, भिल्ल, सतनामी, रेड्डी अशा बहुजन समाजातील अठरापगड जातींनी इस्लामी आक्रमकांशी नेहमीच कडवा संघर्ष केला. भारतातील उच्च, नीच सर्वच जातींच्या लोकांना आपली दैवतं, मंदिरं यांच्याबद्दल तेवढीच श्रद्धा होती आणि त्यांच्या विटंबनेचं त्यांना सारखंच दुःख होत होतं.
तसंच कत्तल, लुटालूट, बलात्कार, गुलामी याबाबत आक्रमकांनी जाती-जातींमध्ये भेदभाव केल्याच्या कुठेही नोंदी नाहीत. त्यामुळं काही जातींनी इस्लामचं स्वागतच केलं, हे प्रतिपादन केवळ कम्युनिस्टांच्या आवडत्या वर्गसंघर्षाच्या सिद्धांताच्या हट्टापायी करण्यात आलं, हे उघड आहे.
पण अशी शेकडो उदाहरणं जागोजागी उपलब्ध असूनही, भारतात जाती-जातींमध्ये फूट पाडणं आणि परकीय आक्रमकांचा गौरव करणं हेच ज्यांचं उद्दिष्ट आहे, त्या डाव्या इतिहासकारांनी या सगळ्या वास्तवाकडं साफ दुर्लक्ष करून आपलं प्रचारकी इतिहासकथन तसंच सुरू ठेवलं. असो.
महापंचायतीनं असं ठरवलं, की दिल्लीहून धर्मवेडाचा हा वडवानल आपल्याकडं नक्की सरकणार. त्याला गनिमी काव्यानं तोंड देण्याची आपण पूर्ण तयारी केली पाहिजे. याप्रमाणं एक लाख वीस हजार लढवय्यांचं एक दल तयार करण्यात आलं, ज्यात चाळीस हजार युवतींचाही समावेश होता. पुरुषांच्या दलाचं नेतृत्व महाबली जोगराजसिंग गुर्जर व हरवीरसिंग गुलिया यांच्याकडं, तर युवती दलाचं नेतृत्व रामप्यारी गुर्जर या वीस वर्षांच्या तरुणीकडं होतं.
रामप्यारीचा जन्म उत्तर प्रदेशातील सहारणपूरच्या एका गुर्जर कुटुंबात झाला होता. तिला लहानपणापासून मर्दानी खेळांची व शस्त्रास्त्रांची आवड होती. शस्त्रास्त्रांचं शिक्षण घेऊन ती युद्धकलेत पारंगत झाली होती. तिच्या साथीला हरदाई जाट, देवीकौर राजपूत, चंद्रो ब्राह्मण, रामदाई त्यागी यासारख्या अनेक शस्त्रपारंगत युवती सज्ज होत्या.
लहान मुलं आणि वृद्धांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. पाचशे तरुण घोडेस्वारांवर तैमूरच्या सैन्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली. दिल्लीचं तळपट करून तैमूरचं सैन्य जसं मेरठच्या दिशेनं मार्गक्रमण करू लागलं, तशी त्यांना गावंच्या गावं रिकामी पडलेली आढळली. लूट किंवा संहार करण्यासाठी काहीच मागं शिल्लक नव्हतं.
जोगराजसिंग, हरवीर गुलिया व रामप्यारी गुर्जर यांनी छोट्या छोट्या तुकड्या करून तैमूरच्या सैन्यावर हल्ले करायला सुरुवात केली. रात्री तिखट हल्ले चढवायचे आणि दिवसभर अदृश्य व्हायचं या रणनीतीमुळं तैमूरच्या सेनेचं मोठं नुकसान होऊ लागलं. रात्रीची जागरणं व अकस्मात होणारे हल्ले यामुळं चिडचिड्या झालेल्या तैमूरच्या सेनेनं हरिद्वारवर हल्ला चढवला.
तिथं जोगराजसिंग महापंचायतीच्या संपूर्ण सैन्यासह तैमूरच्या सैन्यावरवर तुटून पडला. आधीच त्रस्त झालेल्या तुर्की सैन्याला प्रचंड मार खावा लागला. नेमबाज म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरवीरसिंग गुलियाचा बाण खुद्द तैमूरच्या छातीत घुसला व तो जखमी झाला.
या सपशेल पराभवानं निराश झालेला तैमूरलंग भारतातील दिग्विजयाचं आपलं स्वप्न अर्धवट सोडून परत गेला. या युद्धात झालेल्या जखमांनी त्याची शेवटपर्यंत पाठ सोडली नाही व तो समरकंदला पोचल्यानंतर सात वर्षांतच अल्लाला प्यारा झाला. क्रूरकर्मा तैमूरचं नाव काहीजण आजही आवर्जून आपल्या मुलांना देत आहेत. मात्र, जोगराज, हरवीर व रामप्यारी यांची नावंही कोणाला माहीत नाहीत. हे कधी बदलणार? इतिहासातील खऱ्या हिरोंना त्यांचं योग्य स्थान कधी मिळणार?
(लेखक ब्रँडिंग-तज्ज्ञ असून, ‘असत्यमेव जयते?’ या इतिहासविषयक पुस्तकाचं लेखन त्यांनी केलं आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.