सुरुवात तुर्की आक्रमणांची

सातव्या शतकात सुरू झालेली अरबांची आक्रमणं ही भारतावरील इस्लामी आक्रमणांची पहिली लाट होती असं म्हटलं, तर मध्य आशियातून होणारी तुर्कांची आक्रमणं ही इस्लामी आक्रमणांची दुसरी लाट म्हणता येईल.
Turkey Attack
Turkey Attacksakal
Updated on

अवघ्या १२५ वर्षांत पूर्वेला मध्य आशियापासून पश्चिमेला स्पेनपर्यंत विस्तीर्ण भूप्रदेशावर आपलं एकछत्री राज्य प्रस्थापित करणाऱ्या आणि त्यानंतर अवघ्या दीडेकशे वर्षांत या प्रदेशातील सर्व लोकांना इस्लाम धर्म आणि अरेबिक भाषा स्वीकारायला भाग पाडणाऱ्या अरबांना भारतात मात्र साडेतीनशे वर्षं उलटून गेली तरी सीमेवरील काही छोटे किरकोळ प्रदेश वगळता सतत पराभवाचाच सामना करावा लागला, हे आपण गेल्या वेळच्या लेखात बघितलं.

सातव्या शतकात सुरू झालेली अरबांची आक्रमणं ही भारतावरील इस्लामी आक्रमणांची पहिली लाट होती असं म्हटलं, तर मध्य आशियातून होणारी तुर्कांची आक्रमणं ही इस्लामी आक्रमणांची दुसरी लाट म्हणता येईल. तुर्की लोक हे मध्य आशियातील कझाकस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान या प्रदेशातील भटके लोक होते. इस्लामच्या उदयापूर्वी त्यांच्यापैकी बहुतेकांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला होता.

महमूद गझनी, महंमद घोरी, बाबर यांच्यासारख्या तुर्की लोकांच्या क्रौर्याच्या कहाण्या ऐकल्या की त्यांचे पूर्वज अहिंसेला मानणाऱ्या बौद्ध धर्माचे अनुयायी होते याचं आश्चर्य वाटतं; पण अरबांप्रमाणेच भटकी जीवनपद्धती, कठोर हवामान, सतत वाट्याला आलेला संघर्ष यामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व आक्रमक बनलं होतं. सातव्या-आठव्या शतकात जेव्हा इस्लामनं मध्य आशियावर कब्जा केला तेव्हा हे तुर्की लोक मुस्लिम झाले आणि उमायद खलिफांच्या काळात अरबांच्या पदरी गुलाम व नोकरचाकर म्हणून राहू लागले. अब्बासिद खिलाफतीच्या वेळेपर्यंत त्यांचं शौर्य व कडवेपणा पाहून त्यांना सैन्यात ‘गुलाम-योद्धे’ म्हणून संधी मिळू लागली.

महमूद गझनी, महंमद घोरी, कुतुबुद्दीन ऐबक, अल्तमश हे सगळे आक्रमक, गुलामवंशातूनच आलेले होते. म्हणूनच कुतुबुद्दीन ऐबक याच्या राजवटीला ‘गुलाम-राजवट’ किंवा ‘स्लेव्ह-डायनेस्टी’ म्हणून ओळखलं जातं.

अब्बासिद खिलाफतीच्या अस्तानंतर इस्लामच्या साम्राज्यात अरबांचं महत्त्व कमी होऊन तुर्की, इराणी, अफगाण मुस्लिमांचा प्रभाव वाढू लागला. त्यातही तुर्कांनी आपला आक्रमकपणा, शौर्य, क्रौर्य, कडवेपणा यांमुळे झपाट्यानं प्रगती केली व ते स्वतःची राज्ये स्थापित करू लागले. हे तुर्की योद्धे घोडेस्वारीत अत्यंत पारंगत होते. त्यामुळे वेगवान हालचाली करून शत्रूला गारद करण्यात त्यांचा हातखंडा होता.

युद्धाची रणनीती आणि व्यूहरचना यातही ते परंगत होते, तसंच टोळ्यांमधील सततच्या संघर्षात टिकून राहण्यासाठी अंगी बाळगलेली दगाबाजी व या सगळ्या बाबींना इस्लामच्या तत्त्वज्ञानामुळे मिळालेली धर्मवेडाची आणि जिहादच्या प्रेरणेची जोड, यामुळे तुर्कांची आक्रमणं अत्यंत हिंसक, क्रूर, अत्याचारी व विधिनिषेधशून्य असत. हिंदूंच्या ‘धर्मयुद्ध’ या संकल्पनेच्या विरुद्ध टोक म्हणजे तुर्कांची आक्रमणं असं म्हणता येईल.

गझनी राजवटीची सुरुवात

अब्बासिद खिलाफतीच्या अस्तानंतर उदयाला आलेल्या समानिद राजवटीतील राजा अब्दुल मलिक याच्या पदरी अलप्तगिन नावाचा एक गुलाम होता. त्याचं शौर्य व हुशारी बघून राजानं त्याची बाल्ख प्रदेशाचा प्रमुख अधिकारी म्हणून सन ९५६ मध्ये नेमणूक केली. त्यानंतर तो इराणमधील खुरासाण प्रांताचा प्रमुख सेनापती झाला. राजाच्या मृत्यूनंतर खुरासाणमध्ये सुरू झालेल्या संघर्षामुळे त्याला अफगाणिस्तानातील गझनीकडे पळून यावं लागलं.

गझनीचा राजा अबूबकर याचा पराभव करून त्यानं सन ९६२ मध्ये गझनवी राजवटीची सुरुवात केली. अलप्तगिननं सुबुक्तगिन नावाच्या एका मुलाला गुलाम म्हणून विकत घेतलं होतं. त्याचं नेतृत्वकौशल्य, शौर्य, कडवेपणा यांसारखे गुण बघून त्यानं त्याला आपल्या राज्यात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या. शेवटी अलगप्तगिनच्या मृत्यूनंतर सुबुक्तगिन गझनीचा राजा झाला. ज्या काबूलच्या हिंदुशाहीनं अरबांच्या नाकी नऊ आणले होते त्या काबूलवर सुबुक्तगिननं हल्ले करायला सुरुवात केली.

हिंदू राजा जयपाल यानं मोठ्या सैन्याची जमवाजमव करून गझनीवर आक्रमण केलं. शत्रूकडून होणाऱ्या संभाव्य आक्रमणाचा धोका ओळखून त्याआधीच त्याच्यावर हिंदू राजानं आक्रमण केल्याचं क्वचितच आढळणारं हे एक उदाहरण होतं.

सन ९६६-६७ मध्ये झालेली ही लढाई अनेक दिवस चालली. अल् उत्बी या इतिहासकारानं नमूद करून ठेवल्यानुसार, सुबुक्तगिन व त्याचा मुलगा महमूद यांना पराभव समोर दिसू लागला होता; पण अचानक आलेलं बर्फाचं वादळ व पाऊस यांमुळे तुर्कांचा निश्चित वाटणारा पराभव टळला आणि जयपालला शांततेचा तह करणं भाग पडलं. या वेळी सुबुक्तगिनला पाठवलेल्या संदेशात राजा जयपाल म्हणतो, ‘आम्हा भारतीयांची खानदानी वृत्ती तुम्ही जाणताच.

विध्वंस व मृत्यूची आम्हाला भीती नाही. जेव्हा आमच्या आत्मसन्मानाचा प्रश्न येतो तेव्हा आम्ही आगीची धग आणि खंजिराची धार यावर स्वतःला झोकून देऊ शकतो.’ दुर्दैवानं अशा झुंजार वीरांचा इतिहास दडपून टाकून भारतीयांचा आत्मसन्मान नष्ट करण्याचं कारस्थान काही लोकांनी रचलं व सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादानं ते तडीस नेलं.

या तहामुळे निर्माण झालेली शांतता फार काळ टिकली नाही. सुबुक्तगिननं पुन्हा आपलं आक्रमण सुरू केलं. जयपालला आतापर्यंत तुर्कांकडून भारताला असलेल्या मोठ्या धोक्याची पूर्ण जाणीव झाली होती. इतिहासकार फिरिश्ता याच्या नोंदीनुसार, त्यानं दिल्ली, अजमेर, कालिंजर, कनौज इथल्या राजपूत राजांकडून सैन्य व पैसे यांची मदत गोळा करून एक लाखाहून अधिक सैन्य उभं केलं.

गझनीच्या वाढत्या धोक्याला पायबंद घालण्याचा हा निकराचा प्रयत्न होता. अत्यंत घनघोर लढाईनंतर सुबुक्तगिनच्या कौशल्यपूर्ण युद्धनेतृत्वामुळे तुर्कांचा विजय झाला. सन ९९८ मध्ये गझनीचं राजेपद सुबुक्तगिनचा मुलगा महमूद गझनी याच्याकडे आल्यानंतर गझनी-हिंदूशाही यांच्यातील संघर्ष पुन्हा सुरू झाला. सन १००१ मध्ये पेशावर इथं झालेल्या लढाईत महमूद यानं जयपालचा पराभव केला व पन्नास हत्ती आणि मोठ्या रकमेच्या बदल्यात तह केला. या पराभवाचा अपमान सहन न होऊन जयपालनं अग्नीत प्रवेश करून जीव दिला.

यानंतर आनंदपाल, त्रिलोचनपाल, भीमपाल या हिंदूशाही राजांनी महमूद गझनीशी कडवा संघर्ष केला. या लढायांमध्ये अनेक वेळा पराक्रमी हिंदुशाही राजांनी महमूदला मोठ्या अडचणीत आणलं; पण कुठल्या ना कुठल्या कारणानं नशिबाचे फासे त्याच्या बाजूनं पडत गेले व तो अडचणीतून सुटत गेला. शेवटी १०२६ मध्ये भीमपालच्या मृत्यूनंतर हिंदुशाहीचा अंत झाला. या पराक्रमी हिंदू राजांनी जवळपास चारशे वर्ष प्रथम अरब व नंतर तुर्की आक्रमकांना भारतात प्रवेश करू दिला नाही.

परकी आक्रमणाच्या झंझावाताला दिलेरपणे आपल्या छातीवर झेलत देशाचं रक्षण करणाऱ्या या महापराक्रमी वीरांना कुठल्याही कृतज्ञ राष्ट्रानं आपल्या इतिहासात मानाचं स्थान दिलं असतं. भारतानं मात्र कृतघ्नपणे त्यांची नावंही विस्मृतीत ढकलून दिली.

महमूद गझनीच्या दरबारातील इतिहासकार अल् बरूनी लिहितो : ‘हिंदुशाही या राजवंशाचा आता अंत झाला आहे आणि त्याच्या अस्तित्वाची पुसटशी निशाणीदेखील शिल्लक राहिलेली नाही. आपल्याला हे नमूद केलं पाहिजे की, या भव्य-दिव्य राजघराण्यातील राजे हे उच्च आचार-विचार असलेले लोक होते आणि त्यांनी नेहमी जे योग्य आणि चांगलं तेच केलं.’

अशी दाद कट्टर शत्रूकडूनही मिळवणाऱ्या या महान योद्ध्यांना देशानं आज प्रणाम केला पाहिजे व इतिहासात त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे स्थान न देता त्यांना विसरून गेल्याबद्दल मनोमन त्यांची क्षमा मागितली पाहिजे.

महमूद गझनीची आक्रमणं व संघर्ष

सन १००१ ते १०२७ या कालावधीत महमूद गझनीनं भारतावर एकूण सतरा वेळा आक्रमणं केली. डावे इतिहासकार नेहमी अशी मखलाशी करतात की, ‘महमूदचा उद्देश लुटालूट करून संपत्ती गोळा करण्याचा होता. त्याच्या मोहिमांमागील प्रेरणा धार्मिक नव्हे तर आर्थिक होती.’

हे अर्थातच धादांत असत्य आहे. स्वतःला अभिमानानं ‘बुतशिकन’ (मूर्तिभंजक) म्हणवून घेणाऱ्या महमूदनं शेकडो मंदिरांचा विध्वंस केला, मूर्ती फोडल्या, त्यांचे तुकडे गझनीला नेऊन तिथल्या मशिदींच्या पायऱ्यांवर बसवले. संपत्तीची लूट किती केली असेल याची मोजदाद करणं तर अशक्यच. हिमाचल प्रदेशातील नागरकोटच्या मंदिरात महमूदला सोन्याच्या सात लक्ष मोहरा, २६००० किलो सोनं, ७५ किलो हिरे-माणकं इतकी संपत्ती मिळाली. मथुरेच्या मंदिराचं वर्णन करताना इतिहासकार अल् उत्बी म्हणतो : ‘मथुरेचं प्रमुख मंदिर बांधून पूर्ण करण्यासाठी २०० वर्षं लागली असावीत व दहा कोटी दिनार खर्च आला असावा.

दगडात बांधलेलं हे प्रचंड मंदिर व तिथलं अप्रतिम कोरीव काम पाहून महमूदही थक्क झाला. आतमध्ये वीस फूट उंचीच्या संपूर्ण सोन्याच्या पाच मूर्ती होत्या. एकीला साधारणतः पन्नास हजार दिनार किमतीच्या माणकांचे डोळे बसवलेले होते, तर दुसरीवर ४५० मिश्कल वजनाचा एक अद्वितीय नीलम (सफायर) बसवलेला होता. मंदिराच्या सौंदर्याचं वर्णन करणं तर अशक्यच. टनावारी सोनं, चांदी व हिरे-माणकं काढून घेतल्यानंतर इतर शेकडो मंदिरांचं जे झालं तेच या मंदिराच्याही नशिबी आलं. राखरांगोळी करून ते जमीनदोस्त करण्यात आलं.

या मोहिमांचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे, लाखो स्त्री-पुरुषांना गुलाम बनवून इराण, खुरासाण व मध्य आशियातील गुलामांच्या बाजारपेठेत विकण्यात आलं. इतक्या मोठ्या प्रमाणात गुलाम उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या किमती दहा दिरहामच्याही खाली आल्या. त्यामुळे भारतात उत्तम सामाजिक प्रतिष्ठा व पत असलेल्या लोकांनाही सर्वसामान्य मुसलमानांच्या पदरी गुलाम म्हणून राहावं लागलं. स्त्रियांच्या नशिबी तर यापेक्षाही वाईट म्हणजे कुंटणखान्यातलं आयुष्य आलं.

अफगाणिस्तानातील गझनी या गावी एक स्तंभ उभारण्यात आला आहे. त्याखाली कोरली गेलेली अक्षर आहेत, ‘दुख्तरे हिंदुस्तान नीलामे दो दिनार’ (हिंदुस्थानच्या लेकींचा दोन दिनारमध्ये लिलाव). या गुलामांचा मध्य आशियाकडील प्रवासही अतिशय खडतर अशा पर्वतराजीमधून होत असे. सततचा प्रवास आणि कडाक्याची थंडी सहन न झाल्यामुळे हजारो गुलामांचा प्रवासातच मृत्यू होत असे.

या कथा ऐकून चौदाव्या शतकातील मोरोक्कन प्रवासी इब्न बतूता यानं या पर्वतराजीचं नामकरण हिंदुकुश (किलर ऑफ हिंदूज्) असं केलं. आफ्रिकेतील लोकांना गुलामगिरीत ढकलल्याबद्दल अमेरिकेनं व संपूर्ण जगानं त्यांची माफी मागितली. अमेरिकेत आजही त्याविषयी चळवळी सुरू आहेत; पण त्यांच्यापेक्षाही अधिक संख्येनं गुलाम बनवण्यात आलेल्या हिंदू , बौद्ध, जैन यांच्याबद्दल कुणी अवाक्षरही काढत नाही.

उलट ‘असं काही झालंच नाही,’ अशा प्रकारे हे इतिहासातून पुसून टाकण्यात आलं आहे. या कारस्थानात परकीयांपेक्षाही स्वकीयांचाच वाटा अधिक आहे हे खरं दुर्दैव. भारतातल्या मोहिमांमुळे महमूदकडे अपार संपत्ती जमा झाली. गझनीमध्ये तो या लुटलेल्या संपत्तीचं प्रदर्शन मांडत असे. ते बघण्यासाठी सर्वदूर प्रदेशांमधून लोक येत असत व आश्चर्यानं थक्क होत असत. मुस्लिमविश्वात त्याची प्रसिद्धी व प्रतिष्ठा गगनाला भिडली होती.

इस्लामी आक्रमणाच्या या दुसऱ्या लाटेत पुढं काय घडलं हे जाणून घेऊ पुढच्या लेखात.

(लेखक ब्रँडिंग-तज्ज्ञ असून, ‘असत्यमेवजयते?’ या इतिहासविषयक पुस्तकाचं लेखन त्यांनी केलं आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.