अरब आक्रमकांनी सन ६३४ पासून ७१० पर्यंतच्या ७६ वर्षांत भारतावर जवळपास पंधरा वेळा आक्रमण केलं आणि प्रत्येक वेळी त्यांचा दणदणीत पराभव झाला, हे आपण गेल्या वेळी पाहिलं.
याच कालखंडात जगात इतरत्र त्यांनी जे प्रचंड मोठे आणि आश्चर्यकारक विजय मिळवले होते त्यांच्या पार्श्वभूमीवर इस्लामचं भारतातील अपयश विशेष डोळ्यात भरण्यासारखं होतं. मात्र, हा इतिहास आजवर आपल्यापासून लपवला गेला आणि ‘भारताचा इतिहास हा पराभवांचा इतिहास आहे’ हेच आपल्या माथी मारण्यात आलं.
इराकमधील अरब सैन्याचा सेनापती अल् हज्जाज हा इस्लामी साम्राज्यवादाचा कडवा पुरस्कर्ता होता. भारतावर विजय मिळवण्याची महत्त्वाकांक्षा त्याला स्वस्थ बसू देईना. सैन्याची जमवाजमव व स्वारीची तयारी यासाठी त्यानं प्रचंड मेहनत घेतली. अतिशय कडवे व पराक्रमी लढवय्ये खास सीरियाहून बोलावण्यात आले. या स्वारीसाठी खलिफाची परवानगी मिळवण्यात हज्जाजला एका घटनेचा उपयोग झाला.
श्रीलंकेहून एक जहाज अल् हज्जाजसाठी भेट म्हणून काही मुस्लिम तरुणींना घेऊन निघालं होतं. त्या तरुणींचं वाटेतच समुद्री चाच्यांनी अपहरण केलं. तेव्हा, त्यांना सोडवून अरेबियाकडे पाठवून द्यावं असा निरोप हज्जाजनं सिंधचा राजा दाहीर याला पाठवला. त्यावर दाहीरनं असं उत्तर दिलं की ‘हे चाचे आमचं ऐकत नाहीत, त्यामुळे याबाबतीत आम्ही काहीही करू शकत नाही.’ हे उत्तर ऐकून अधिकच चिडलेल्या हज्जाजनं खलिफा वालिदकडे दाहीर विरुद्ध जिहादच्या मोहिमेची परवानगी मागितली व खलिफानं थोडेफार आढेवेढे घेऊन शेवटी परवानगी दिली.
बलवान आणि सुसज्ज सैन्य समुद्राच्या मार्गानं देबल (सध्याचं कराची) बंदराकडे हज्जाजचा जावई महंमद-बिन-कासिमच्या नेतृत्वाखाली रवाना करण्यात आलं.
आजवर झालेल्या पराभवांचा बदला घेण्याच्या भावनेनं पेटलेल्या अल् हज्जाजनं या सैन्याला निरोप देताना सांगितलं, ‘मी अल्लाची शपथ घेतो की माझ्या ताब्यातील इराकची संपूर्ण दौलत जरी खर्च झाली तरी माझ्या हृदयातील बदल्याची आग ही मोहीम यशस्वी झाल्याशिवाय शमणार नाही.’ भारतात सतत होणाऱ्या पराभवामुळे अरबांचं नेतृत्व किती संतप्त आणि वेडंपिसं झालं होतं हे यावरून लक्षात येतं.
महंमद-बिन-कासिम हा फक्त सतरा वर्षांचा असला तरी इतक्या तरुण वयातही एक कार्यक्षम व मुत्सद्दी सेनापती म्हणून प्रसिद्ध होता. त्याचबरोबर अत्यंत धर्मवेडा, जिहादच्या कल्पनेनं प्रेरित झालेला व काफिर हिंदूंना मुसलमान बनवण्याच्या महत्त्वाकांक्षेनं पछाडलेला एक कडवा मुसलमानही होता. झुंजार योद्ध्यांचं मोठं सैन्य आणि त्या काळातील आधुनिक युद्धसामग्री घेऊन तो सन ७११ मध्ये मकरान इथं दाखल झाला.
लवकरच त्यानं देबलच्या किल्ल्याला वेढा घातला. खूप प्रयत्न करूनही किल्ला अभेद्यच राहिला हे पाहिल्यावर एका स्थानिक फितुरानं महंमद-बिन-कासिमला हिंदूंचं शौर्य व मनोधैर्य यांचं गुपित सांगितलं. ‘किल्ल्यातील मंदिरावर जोपर्यंत झेंडा फडकतो आहे तोपर्यंत देव आपलं रक्षण करणार ही हिंदूंची श्रद्धा आहे, त्यामुळे ते हार मानणार नाहीत,’ हे ऐकल्यावर महंमद-बिन-कासिमनं आटोकाट प्रयत्न करून तो झेंडा उतरवण्यात यश मिळवलं. हा अपशकुन मानून किल्ल्यातील सैनिक दरवाजे उघडून कुठलाही मागचा-पुढचा विचार न करता अरब सैन्यावर तुटून पडले. कुठल्याही योजनेशिवाय अचानक केलेला हा हल्ला अर्थातच अयशस्वी झाला आणि त्यांची कत्तल उडाली.
इतिहासकार अल्-बिलादुरी म्हणतो, ‘त्यानंतर तीन दिवस देबल शहरात मृत्यूचं तांडव सुरू होतं. देऊळ उद्ध्वस्त केलं गेलं, मूर्ती फोडल्या गेल्या, पुजाऱ्यांची कत्तल करण्यात आली, देवळाच्या अवशेषांवर मशिदीचं बांधकाम सुरू झालं. शहरातील सर्व संपत्ती लुटली गेली. स्त्रियांना महंमद-बिन- कासिमच्या जनानखान्यात पाठवण्यात आलं. उमायाद खिलाफतीच्या नियमानुसार लूट व ताब्यात घेतलेल्या स्त्रिया यांपैकी एक पंचमांश भाग खलिफाकडे पाठवण्यात आला व बाकी विजयी सैनिकांमध्ये वाटून टाकण्यात आला.’
इस्लामी आक्रमणांचं धर्मवेड, क्रौर्य, अत्याचार आणि बेबंद लुटारूपणा यांची पहिली झलक अशा प्रकारे भारताला देबल इथं मिळाली. यानंतर महंमद-बिन-कासिमनं आपला मोहरा अलोरच्या किल्ल्याकडे वळवला. तिथं राजा दाहीर हा त्याच्या दोन राण्या राणीबाई आणि लाडी, तसंच राजपुत्र जयसिया यांच्यासह युद्धासाठी तयार होता. त्याला त्याच्या अमात्यानं सल्ला दिला की, ‘अरबांचं सैन्य मोठं व शक्तिशाली आहे, तेव्हा तुम्ही आपल्या कुटुंबासह दुसरीकडे स्थलांतर करावं.’
यावर राजा दाहीरनं उत्तर दिलं, ‘माझ्या सैन्याला व त्यांच्या कुटुंबीयांना सोडून मी सुरक्षित ठिकाणी पळून जाणार नाही. मी खुल्या मैदानात अरबांशी लढेन. मी जिंकलो तर राज्य सुरक्षित राहील व हरलो तर इतिहास माझ्या शौर्याचे गोडवे जाईल. आता अरब व भारतातील इतर राज्ये यांच्या दरम्यान मी उभा आहे.’
महंमद-बिन-कासिम व राजा दाहीर यांच्या सैन्यांत घनघोर युद्ध झालं. ‘चचनामा’ या सिंधच्या इतिहासाचं कथन करणाऱ्या अली हमीद लिखित ऐतिहासिक ग्रंथात म्हटलं आहे की, ‘दुसऱ्या दिवशी मुस्लिम सैन्य पराभवाच्या अगदी जवळ पोहोचलं होतं; पण त्या वेळी भारतीय राजांच्या बाबतीत नेहमी घडणारी दुर्दैवी घटना घडली. हत्तीवरील अंबारीत बसून लढणाऱ्या राजा दाहीरला अचानक एक बाण लागला व तो खाली कोसळला.
राजा पडलेला बघून सैन्यात पळापळ सुरू झाली व बघता बघता निश्चित विजयाचं रूपांतर पराभवात झालं. राणीबाई व इतर स्त्रियांनी जोहार केला, तर राजपुत्र जयसिया व राणी लाडी यांनी ब्राह्मणाबादच्या किल्ल्यात आश्रय घेतला. राणी लाडीनं आपली संपत्ती व दागिने विकून युद्धासाठी पैसे उभे केले. ब्राह्मणाबादचा किल्ला सहा महिने अत्यंत शौर्यानं लढवल्यानंतर जयसिया व त्याच्या सैन्याला पराभव स्वीकारावा लागला.’
यानंतर महंमद-बिन-कासिमच्या सैन्यानं मुलतानकडे कूच केलं. तिथल्या सूर्यमंदिरातील सुवर्णमूर्ती व प्रचंड संपत्तीच्या कथा महंमद-बिन-कासिमच्या कानावर पडल्या होत्या.
‘चचनामा’ या ग्रंथात सूर्यमंदिराच्या विध्वंसाचं विस्तृत वर्णन करण्यात आलं आहे. त्याच्या तपशिलात न जाता, मूर्तीची विटंबना व विध्वंस केल्यानंतर मंदिरातील प्रचंड संपत्ती लुटण्यात आली एवढंच जाणून घेऊ. ३३० पेटारे भरून सोनं व जडजवाहीर महंमद-बिन-कासिमच्या हाती लागलं. लुटीच्या एक पंचमांश भाग, एक कोटी वीस लाख दिरहम खलिफाकडे पाठवून देण्यात आले. महंमद-बिन-कासिमच्या मोहिमेचा एकूण खर्च याच्या निम्मा म्हणजे ६० लाख दिरहम इतका होता.
हेन्री मायर्स इलियट त्याच्या ‘द हिस्टरी ऑफ इंडिया ॲज टोल्ड बाय इट्स हिस्टोरियन्स’ या ग्रंथात म्हणतो, ‘या विजयाच्या वार्ता ऐकून हज्जाजला हर्षवायू व्हायचा बाकी राहिला. त्यानं आपल्या सैन्याला निरोप पाठवला, ‘मूर्तिपूजकांना कुठलीही सूट देऊ नका, त्यांचे गळे कापा, हीच अल्लाची आज्ञा आहे. त्यांना अभय देण्याचा विचारही करू नका; कारण, त्यामुळे तुमचंच काम लांबणार आहे.’
अशा प्रकारे सिंध प्रांत पूर्णपणे अरबांच्या ताब्यात गेला; पण भारतातील हा पहिला विजय मिळवण्यासाठी त्यांना तब्बल ७७ वर्षं वाट बघावी लागली. इतक्या वेळेत त्यांनी निम्म्या जगावर आपलं साम्राज्य स्थापन केलं होतं.
महंमद-बिन-कासिम इतिहासात अजरामर झाला. पाकिस्तानात तर त्याची आठवण ‘पहिला पाकिस्तानी’ म्हणून काढली जाते. आपली भारतीय मुळं नाकारून अरब वंशाचा अभिमान बाळगण्याची पाकिस्तान्यांची धडपड यामागं आहे हे उघडच आहे.
गंमत अशी की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरब राष्ट्रांशी असलेले भारताचे संबंध दृढ केल्यापासून पाकिस्तान आता तुर्कस्तानकडे झुकू लागला आहे व आता ‘आपण तुर्कांचे वंशज आहोत,’ असं मानू लागला आहे. वारा बदलेल तसा वारसा बदलण्याच्या या भूमिकेमुळे पाकिस्तानचं भवितव्य अंधकारमय बनत चाललं आहे. याऐवजी त्यांनी ‘धर्म मुस्लिम असला तरी आमची संस्कृती भारतीय आहे,’ असा विश्वास बाळगला असता तर त्यांची अशी बिनबुडाच्या लोट्यासारखी अवस्था झाली नसती. शेकडो किलोमीटर दूरवरील इंडोनेशियाला जे जमलं ते काल-परवापर्यंत भारताचाच भाग असलेल्या पाकिस्तानला जमलं नाही हे त्यांचं दुर्दैव.
राजा दाहीरनं त्याच्या हौतात्म्याआधी दाखवलेला, ‘मी हरलो तरी इतिहास माझ्या शौर्याचे गोडवे गाईल’ हा विश्वास मात्र अनाठायी ठरला. त्याचं नाव इतिहासात फक्त एक नोंद म्हणून राहिलं. त्यानं केलेल्या प्रखर प्रतिकाराची आठवण त्याच्या देशबांधवांनी ठेवली नाही. भारताच्या इतिहासाबाबत पुढं कशी दिशाभूल केली जाणार आहे हे त्याला माहीत असतं, तर त्यानं असा विश्वास बाळगलाच नसता. या सदरात आपण भारतमातेच्या अशा अनेक सुपुत्रांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी परकीय आक्रमकांशी प्रखर संघर्ष तर केलाच; पण अनेकदा मोठे विजयही मिळवले, ज्यांच्याबद्दल आपल्याला कधीच सांगण्यात आलं नाही.
आपल्याला ज्ञात असलेला इतिहास असं सांगतो की, महंमद-बिन -कासिमच्या सिंधवरील विजयानंतर परकीय आक्रमणांच्या लाटांवर लाटा भारतावर कोसळत राहिल्या आणि भारतीय सतत पराभूत होत राहिले. प्रत्यक्षात खरं काय घडलं हे जाणून घेऊ पुढील लेखात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.