अभिनयाचं विद्यापीठ!
गेली पाच ते सहा दशके आपल्या अभिनयाने समांतर आणि व्यावसायिक चित्रपट गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा आज वाढदिवस. आपल्या चतुरस्र अभिनयाच्या जोरावर त्यांनी रंगभूमीबरोबरच चित्रपटसृष्टीतही कमाल केली. त्यांचा अभिनय नवोदितांबरोबरच अनेक प्रस्थापित कलाकारांना आजही प्रेरित करतो. प्रसिद्ध अभिनेत्री दीप्ती नवल यांनी नसीरजींसोबत अनेक सिनेमांत काम केलं. पहिला सिनेमाही त्यांच्यासोबतच केला. नसीरजींच्या अद्भुत अभिनय कौशल्याचा त्यांनी मांडलेला अनुभवपट त्यांच्याच शब्दांत...
नसीरुद्दीन शाह म्हटलं, की एका चतुरस्र अभिनेत्याचं रूप नजरेसमोर तरळून जातं. आपल्या देशाचे ते सर्वोत्कृष्ट आणि अष्टपैलू अभिनेते आहेत. आजवरच्या माझ्या एकूणच अभिनय कारकिर्दीत त्यांचा रोल सर्वाधिक महत्त्वाचा राहिला आहे. कारण, माझ्या सुरुवातीच्या काळातच मला त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली.
मी सर्वात पहिल्यांदा त्यांच्याबरोबर ‘जुनून’ चित्रपट केला. त्या चित्रपटातील माझ्या एक-दोन सीनसाठी मी त्यांच्या सेटवर गेली होती. त्या वेळी आमची खऱ्या अर्थाने पहिली भेट झाली. त्या भेटीतच मला त्यांचा अभिनय अनुभवता आला. त्यांची काम करण्याची पद्धत पाहता आली. ते ज्या पद्धतीने काम करत होते ते पाहून मी खूपच प्रभावित झाले. प्रत्येक सीनचा ते वारंवार विचार करीत होते.
तो सीन अधिक चांगला व्हावा म्हणून दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्याशी सातत्याने चर्चा करीत होते. त्यानंतर ते स्वतःला त्या सीनमध्ये झोकून देत होते. एक वेगळ्याच प्रकारचं डेडिकेशन मी त्यांच्या कामाबाबत पाहिलं. त्यांची काम करण्याची पद्धत जवळून पाहिल्याने त्यांच्याकडून खूप काही शिकता आलं. माझ्यासाठी ती एक अभिनयाची इन्स्टिट्यूटच आहे.
नसीरभाईंचा शशी कपूर यांच्यासोबतचा एक सीन आठवतो. त्यात ते घोड्यावर बसून येतात आणि एक प्रकारच्या अस्वस्थतेतून म्हणतात, ‘जावेदभाई हम दिल्ली हार गये और आप यहा बैठे कबुतर उडा रहे हो...’ त्यांचा तो सीन विसरणं निव्वळ अशक्यच आहे. मला तो अजूनही आठवतो. त्याकरिता त्यांनी काय आणि कशी तयारी केली हे मला माहीत आहे आणि मी ते समोरून पाहिलं आहे.
खरं तर मी अभिनयाचं कोणतंच प्रशिक्षण घेतलेलं नाही. मी नसीरभाईंसारख्या दिग्गज कलाकारांना, म्हणजे शशी कपूर, शबाना आझमी, जेनिफर कपूर इत्यादींना बघूनच अभिनय शिकले... करत गेले. त्यामुळे नसीर हे पहिले अभिनेते आहेत ज्यांना मी अभिनयाच्या दृष्टीने अभ्यासलं. मी त्यांच्या कामाचा बारकाईने अभ्यास केला.
एखाद्या सीनसाठी ते कशी तयारी करतात, तांत्रिक बाबींशी कशी सांगड घालतात, त्यासाठी ते कशा प्रकारे तयारी करतात इत्यादी सर्व मी त्यांच्याकडून शिकून घेतलं. त्यानंतर आम्ही एकत्र ‘कथा’ चित्रपट केला. त्यातील त्यांचं काम वाखाणण्याजोगं होतं.
‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘मिर्च मसाला’, ‘फिराक’, ‘कथा’, ‘होली’, ‘मोहन जोशी हाजीर हो’, ‘हम पाँच’, ‘अपना जहा’, ‘कभी पास कभी फेल’ आणि ‘एक घर’ अशा एक ना अनेक चित्रपटांत आतापर्यंत आम्ही एकत्र काम केलं आहे. सगळ्यांचा अनुभव लाजवाब... ‘मने’ नावाच्या एका दाक्षिणात्य चित्रपटातही आम्ही सोबत काम केलं आहे. तो चित्रपट गिरीश कासार वल्ली यांचा होता. तो करतानाही मला नसीरभाईंकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांच्यासोबत केलेल्या प्रत्येक चित्रपटाच्या खूप साऱ्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत.
नसीरभाई म्हणजे मोठ्या ताकदीचे कलाकार. त्यांची निरीक्षणशक्ती दांडगी, वाचन पक्कं आणि काम तितकंच अभ्यासपूर्ण. भूमिका छोटी असो वा मोठी, नसीरभाई त्यामध्ये आपल्या अभिनयाचे असे काही रंग भरणार की ती भूमिका पाहणाऱ्याला आवडलीच पाहिजे. त्यांच्याकडून त्याबाबत खूप काही शिकण्यासारखं आहे. माझ्या कारकिर्दीतील त्या खूप महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. खूप मोठे गुरू आहेत. मी असं नक्कीच सांगू शकते, की नसीरुद्दीन शाह अभिनयाचं एक महान असं विद्यापीठच आहे...
मी त्या वेळी अमेरिकेमध्ये शिकत होते. तेथे मी श्याम बेनेगल यांचा ‘भूमिका’ चित्रपट पाहिला. मला तो खूपच आवडला. त्या वेळीच मी निश्चय केला, की श्याम सरांबरोबर काम करायचं. भारतात आल्यानंतर मी त्यांना भेटायला आवर्जून त्यांच्या कार्यालयात गेले. त्या वेळी तेथे नसीरभाई आणि बेंजामिन गिलानी यांच्यात एका गंभीर विषयावर चर्चा सुरू होती. माझ्या माहितीप्रमाणे ते एका नाटकावर चर्चा करीत होते.
तेव्हा तेथे नसीरभाईंना मी पहिल्यांदा पाहिले. त्या वेळी खरं तर मी श्याम सरांसोबत बोलत होते; पण माझा एक कान नसीरजींचं जे डिस्कशन सुरू होतं त्याकडे होता. तेव्हा आपण त्यांच्याबरोबर काम करणार आहोत, याची काही कल्पनाच नव्हती. तेथे केवळ मी त्यांना पाहिलं होतं आणि त्यानंतर ‘जुनून’मध्ये मी पहिल्यांदा त्यांच्यासोबत काम केलं.
नसीरजींचे रंगभूमीबरोबरच चित्रपटसृष्टीतील योगदान मोठं आहे. आजही त्यांचे चित्रपट आवडीने पाहिले जातात. त्यांच्या अभिनय कौशल्याविषयी बोलावं तेवढं थोडंच आहे. ते एक ग्रेट अॅक्टर आहेत आणि हे त्यांच्या प्रत्येक कामातून आपल्याला दिसून येतं. मी त्यांचे अनेक चित्रपट पाहिलेले आहेत. त्यांचे बहुतांश चित्रपट मला अतिशय आवडतात. त्यांचा ‘पार’ चित्रपट अतिशय उत्तम आहे. त्याचं दिग्दर्शन गौतम घोष यांनी केलं आहे. त्या चित्रपटावर माझं विशेष प्रेम आहे. त्यात त्यांच्यासोबत शबाना आझमी आणि ओम पुरीही आहेत.
माणूस म्हणूनही ग्रेट
नसीरजी एक अभिनेता म्हणून कमालीचे आहेतच; पण त्यांच्यासोबत काही चित्रपट एकत्र केल्यामुळे ते माणूस म्हणून कसे आहे, हेदेखील मला जवळून पाहता आलं. एक सहकलाकार म्हणून त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आपल्याबरोबरच्या कलाकारांना सोबत घेऊन पुढे कसं जायला हवं, हे त्यांना खूप चांगलं कळतं.
त्यांच्यासोबत काम करताना तुम्हाला असं कधीच वाटणार नाही, की त्यांनी इंडस्ट्रीमध्ये खूप काम केलं आहे आणि आपण येथे नवीन आहोत, नवोदित कलाकार आहोत. त्यामुळेच सिने क्षेत्रातील न्यू कर्मसना त्यांच्यासोबत काम करणं खूप सोपं जातं. मी व्यावसायिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अनेकांना पाहिलं आहे. त्यांचा अनुभव घेतला आहे. मी इथे कुणाचं नाव घेणार नाही; परंतु व्यावसायिक चित्रपटांमध्ये काम करणारे काही कलाकार सहकलाकाराला समजूनच घेत नाहीत. म्हणावं तसं सहकार्य करीत नाहीत.
साहजिकच समोरचा कलाकार नाराज आणि अस्वस्थ होतो. त्याचा परिणाम त्याच्या कामावर होतो अन् अर्थातच तो अभिनयात कमी पडतो; परंतु नसीरजी अशा कलाकारांमध्ये नाही. समांतर चित्रपट असो की व्यावसायिक, प्रत्येकात काम करणाऱ्या सहकलाकाराला ते समजून घेतात आणि समजावून सांगतातही... त्यांना कधीच नाराज करीत नाहीत. एखादी गोष्ट चुकली, की योग्य पद्धतीने समजावून सांगतात. त्यामुळे आज अनेक नवोदित कलाकार त्यांना आदर्श मानतात.
भूमिका कोणतीही असो...
चित्रपटसृष्टीमध्ये जसजसा बदल होत गेला तसतसा नसीरभाईंनी स्वतःमध्येही बदल केला. त्यांनी समांतर आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या चित्रपटांत काम केले. कधी मुख्य भूमिका; तर कधी चरित्र भूमिका त्यांनी वकुबीने साकारल्या आहेत. गेली पाच ते सहा दशके ते अभिनय करीत आहेत. अभिनय हाच त्यांचा ध्यास राहिला आहे. मोठ्याबरोबरच छोट्या पडद्यावरही त्यांनी काम केलं आहे.
नसीरभाई म्हणजे एक असा कलाकार आहे की जो कोणत्याही भूमिकेत स्वतःला जुळवून घेऊ शकतो. समांतर ते व्यावसायिक चित्रपट असा त्यांचा मोठा प्रवास राहिला आहे. विनोदी, अॅक्शन आणि खलनायक असे भूमिकेचे वेगवेगळे पैलू त्यांनी पडद्यावर आपल्या सशक्त अभिनयाने सजविले आहेत. त्यामुळे तो सगळ्यांचाच आवडता कलाकार आहे आणि राहीलही... अशा माझ्या मित्राला आणि गुरूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.