दिवसाचे दूत...!

हवेवाटे बीजप्रसार होणाऱ्या झाडांसारखं स्वप्नांचं असतं. कुठल्या स्वप्नाला कुठला दिवस भावेल, कुठली वाऱ्याची झुळूक पुरेल, कुठलं पाणी लाभेल हे सांगता यायचं नाही.
Aerial seed dispersal
Aerial seed dispersalsakal
Updated on

- विशाखा विश्वनाथ

हवेवाटे बीजप्रसार होणाऱ्या झाडांसारखं स्वप्नांचं असतं. कुठल्या स्वप्नाला कुठला दिवस भावेल, कुठली वाऱ्याची झुळूक पुरेल, कुठलं पाणी लाभेल हे सांगता यायचं नाही; पण ध्यानीमनी नसताना, आपणहून रुजवलेलं नसताना कुठल्याशा फटीत सदाफुलीचं रोप वाढत राहतं आणि एके दिवशी अचानक सुखद धक्का देतं...

लंच ब्रेकमध्ये मैत्रिणीला कॉल केल्यावर सहज म्हटलं, एमबीए परीक्षा संपल्यावर पुन्हा नवीन काय शिकायचं? हा प्रश्न दोन पेपर बाकी असतानाच पडलाय. काहीतरी पूर्ण होऊन जाईल हे ठीक आहे; पण नवीन काही शोधायला तर हवंच, नाहीतर कंटाळेन मी... त्यावर ती तडक म्हणाली, थांब... थांब याविषयी मी कालच काही तरी वाचलं आणि मला ते फार भारी वाटलं. पुढे तिने मानव कौल यांच्या एका कथेचा संदर्भ दिला.

एका सोनाराच्या दुकानात दागिन्यांना पॉलिश करणं ही त्या कथेच्या नायकाची नोकरी असते आणि महात्मा गांधीजींना भेटल्याचे किस्से इतरांना ऐकवणं हा त्याचा छंद. गांधीजींच्या एका किश्याविषयी बोलत असताना तो असंच एका माणसाला सांगतो की, गांधीजींची वैष्णोदेवीला जाण्याची इच्छा होती. मला वैष्णोदेवीला जायचंय.

त्या यात्रेसाठी लागणारा खर्च साधारण एक हजार रुपये इतका आहे आणि तेवढे पैसे कथानायक खर्च करूच शकतो हे ठाऊक असल्याने समोरची व्यक्ती त्याला चटकन ‘मग तुझ्याकडे इतके पैसे नाहीयेत का’ असं विचारते. त्यावर कथानायक म्हणतो, ‘प्रश्न पैशाचा नाहीय, माझं हेही स्वप्न पूर्ण झालं तर पूर्ण करावं असं दुसरं कुठलंच स्वप्न माझ्याकडे नाहीय’, असा काहीसा त्या कथेचा आशय होता.

या कथेचा संदर्भ देऊन पूर्ण होताच मैत्रीण म्हणाली, विशाखा एकच एक मोठं स्वप्न असावं; पण नवीन स्वप्नंही उगवत राहायला हवीत. जी पूर्ण करण्यासाठी झटत राहता येईल. हा थॉट छानय की नाही? आमचं बोलणं झाल्यावर तीन दिवसांपासून डोक्यात घोळत असलेली कुसुमाग्रजांची कविता अजून जोरात उसळी मारून डोक्यात फिरत राहिली. तसा त्या कवितेचा थेट या सगळ्याशी संबंध नव्हता; पण तिचं नाव ‘स्वप्नांची समाप्ती’ म्हटल्यावर सगळ्या वळणवाटा स्वप्नांच्या दिशेने जाणाऱ्याच... हे समजायला जरासा अवधीसुद्धा पुरलाच.

आता अर्थात आमचा विषय नवीन स्वप्नं पाहण्याचा किंवा पाहिलेली स्वप्नं पुरवून, उरवून पूर्ण करण्याविषयीचा होता आणि इथे, कवितेचं नाव थेट ‘स्वप्नांची समाप्ती’! कुठलीही भव्यदिव्य गोष्ट पूर्ण करण्याचं स्वप्न उराशी बाळगून धीरोदात्तपणे, स्वप्नपूर्तीसाठी झटणं वेगळं, ते पूर्ण झाल्यावर रीतं वाटणंही वेगळं... पण स्वप्नं पाहण्याची उसंत न मिळणं किंवा कर्तव्यांच्या आड स्वप्नं सतत नजरेआड करणं वेगळं.

एकात पूर्णत्वाची गोडी आहे; तर दुसऱ्यात हतबलता, अगतिकता आहे. कुसुमाग्रजांच्या या कवितेत ‘काढ सखे तुझे गळ्यातील चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पार उभे दिवसाचे दूत’ या ओळी आहेत. प्रेम, माया, ममता, विश्वास या सगळ्या भावना मनाच्या ठायी असताना, प्रेयसीचे हात चांदण्यांसारखे भासत असतानाही कर्तव्याशी बांधिलकी असल्याने प्रेमाच्या मोहपाशातून स्वतःला मुक्त आणि अलिप्त ठेवू पाहणारा प्रियकर सातत्याने त्याच्या प्रेयसीला दिवसाच्या दूताविषयी सांगतो आहे.

हे दिवसाचे दूत म्हणजे कर्तव्य आणि व्यवहार. फक्त गंमत अशी आहे की, प्रेयसीच्या हातांना चांदण्याचे हात ही लोभस उपमा देताना कुसुमाग्रज तिच्यापासून लांब जाण्यासाठी भाग पाडणाऱ्या, कर्तव्यांच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याला अजिबातच रुक्ष उपमा देत नाहीत. ‘दिवसाचे दूत’ म्हणून संबोधतात. म्हणूनच कवितेचं नाव ‘स्वप्नांची समाप्ती’ असं असलं तरी किंवा कवितेतलं वर्णन वर वर व्यवहाराकडे परतून जाण्याच्या अपरिहार्यतेचं असलं तरी वास्तवात जगताना ‘क्षितिजाच्या पार उभे दिवसाचे दूत’ या ओळी मनात आशावाद जागवायला पुरेशा आहेत.

कविता म्हणा किंवा अजून काही, सगळं सलग आणि सरसकट कधीच, कशालाच विशेषतः आयुष्याला किंवा वास्तवात जगताना लागू पडत नाही; पण तुकड्या-तुकड्यात स्वतंत्रपणे मार्गदर्शक नक्कीच ठरू शकतं. आपण रात्रीला काय समजतो आणि नवा दिवस म्हणजे कर्तव्य बजावत राहण्याचा, व्यवहाराचं ओझं वाहत राहण्याचा अव्याहतपणा जर आपण समजत असू तर मात्र दिवसाचे दूत जाचक वाटणं फारच स्वाभाविक आहे.

चांदण्यांची स्वप्नमय रात्र, अर्थात प्रेम, माया, सुख, आनंद, सुरक्षितता यांचं चांदणं सदोदित आणि कायमच नसणार आहे आणि राहिलं तरीसुद्धा त्याचं मोल कमी झालेलं असेल. म्हणूनच दिवसाच्या दूतांचं असणं महत्त्वाचंच आहे. छोट्या-मोठ्या स्वप्नपूर्तीनंतर नव्या स्वप्नांचा शोध घेणंही.

एक स्वप्न जगून झाल्यावर, नव्या स्वप्नांच्या दिशेने प्रवास करायचा तर कर्तव्याच्या वाटेवर पाऊल टाकणंही. एक स्वप्न पूर्ण झाल्यावर, एक ध्येय गाठल्यावर नव्या स्वप्नांचा, दिशेचा, वाटेचा, ध्येयाचा शोध घेणंही...

हवेवाटे बीजप्रसार होणाऱ्या झाडांसारखं स्वप्नांचं असतं, कुठल्या स्वप्नाला कुठली रात्र पुरेल, कुठला दिवस भावेल, कुठली वाऱ्याची झुळूक पुरेल, कुठलं पाणी लाभेल हे सांगता यायचं नाही; पण ध्यानीमनी नसताना, आपणहून रुजवलेलं नसताना कुठल्याशा फटीत सदाफुलीचं रोप वाढत राहील आणि एके दिवशी अचानक अंगणात सदाफुलीची फुलं दिसल्यावर आश्चर्याचा सुखद धक्का बसावा तशी स्वप्नं तुम्हाला सुखद धक्का देतील; पण ती दिसण्यासाठी उजेड मात्र हवा. रात्र सरून दिवसाच्या वाटेवर चालायला हवं आणि त्यासाठी दिवसाचे दूत दिसल्यावर दुःखी-कष्टी होण्यापेक्षा त्यांच्या मागोमाग, नव्या चांदण्यांच्या प्रदेशात जाण्यासाठीची पायपीटही करायला हवीच!

vishakhavishwanath11@gmail.com

(लेखिका ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’विजेत्या साहित्यिक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.