दिल्लीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचे प्रयत्न तीनदा झाले. मात्र, कधी सत्ताधाऱ्यांची मर्जी राखण्यासाठी आयोजकांनी दिलेले निमंत्रण परत घेतले, तर कधी स्वकीयांनीच दिल्लीला विरोध केला होता. मात्र, भारताच्या राजधानीत मराठी भाषक समाजाचा दबाव गट निर्माण होण्याची गरज भागविण्यासाठी दिल्लीत संमेलन होणे ही गरजच होती. तो झेंडा शेवटी रोवला गेला, हे महत्त्वाचे.