करिष्म्याला मरण नाही!

गेल्या रविवारी पॉप कल्चरबाबत जाण व आवड असणाऱ्या बहुतांशी लोकांच्या दिवसाची सुरुवात एका बातमीने झाली. ही बातमी होती मॅथ्यू पेरी या अभिनेत्याच्या मृत्यूची.
matthew perry
matthew perrysakal
Updated on

‘फ्रेंड्स’ या प्रचंड लोकप्रिय मालिकेतील एक पात्र होते चँडलरचे. मॅथ्यू पेरीने साकारलेल्या या भूमिकेने अचंबित केले. त्यामुळे पेरीच्या अवघ्या ५४ व्या वर्षी झालेल्या मृत्यूने सर्वांना हळहळ वाटणे स्वाभाविक आहे.

गेल्या रविवारी पॉप कल्चरबाबत जाण व आवड असणाऱ्या बहुतांशी लोकांच्या दिवसाची सुरुवात एका बातमीने झाली. ही बातमी होती मॅथ्यू पेरी या अभिनेत्याच्या मृत्यूची. पेरीच्या मृत्यूच्या बातमीनंतर सोशल मीडियावर आणखी एक नाव घेतलं गेलं, ते होतं चँडलर बिंगचं. चँडलर बिंग म्हणजे ‘फ्रेंड्स’ या प्रचंड लोकप्रिय मालिकेत पेरीने साकारलेलं पात्र...

ऐंशी-नव्वदीच्या दशकात वाढलेल्या, तसेच त्यानंतरच्या पिढ्यांमध्येही अनेक लोकांसाठी ‘फ्रेंड्स’ ही त्यांच्या आवडीच्या सिटकॉम्सपैकी एक असते. ‘फ्रेंड्स’ ही काही जगातील सर्वोत्कृष्ट सिटकॉम नसली, तरी ती जगातील सर्वाधिक लोकप्रिय जरूर आहे. नव्वदच्या दशकात ही मालिका प्रसारित होऊ लागली आणि त्यानंतरच्या दशकांत अमेरिकेप्रमाणे भारतातही ही मालिका वारंवार पुनःप्रसारित होत राहिली.

जागतिकीकरणानंतर ज्या काही गोष्टी भारतीयांसमोर आल्या, त्यात ‘फ्रेंड्स’चाही समावेश होतो. फावल्या वेळात बऱ्याचदा सोबत असणाऱ्या या सहा अमेरिकन मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपने निखळ मैत्री, प्रेम व लैंगिक संबंध आणि एकूणच ‘जगण्या’विषयीच्या अनेक संकल्पना जगासमोर मांडल्या. वन नाईट स्टँड, फ्लिंग यांसारख्या सध्या चलतीत असणाऱ्या संज्ञा व संकल्पना अमेरिकेच्या पलीकडे पोचवल्या.

त्यामुळेच सांस्कृतिक फरक व मर्यादा असूनही ही मालिका, त्यामधील पात्रं जगाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध ठरली. इतकी की, अनेक लोकांनी पाहिलेली पहिली इंग्रजी मालिका हमखास ‘फ्रेंड्स’ असते. अनेक लोक इंग्रजी शिकण्यासाठी म्हणून ही मालिका पाहायला सुरुवात करतात. (सध्या प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या ‘बीटीएस’ या के-पॉप बँडमधील आरएम या रॅपर, संगीतकारानेही त्याच्या इंग्रजी भाषा शिक्षणाचं श्रेय ‘फ्रेंड्सला दिलं आहे!)

‘फ्रेंड्स’मधील या सहा जणांमध्ये एक पात्र होते चँडलरचे. मॅथ्यू पेरीच्या या पात्राने बहुतांशी लोकांना अचंबित केले. हा त्यांच्या ग्रुपमधला विनोदवीर. तो जवळपास नेहमीच काहीतरी बोलून सर्वांना हसायला भाग पाडत असे. किंबहुना तो साध्यात साधं वाक्यही अशाप्रकारे म्हणायचा की, त्यातून हवा तो विनोदी परिणाम साधला जाईल.

उपरोध या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे चँडलर आणि चँडलर म्हणजे मॅथ्यू पेरी... या पात्राचा हजरजबाबीपणा आणि वाक्‌चातुर्य यामध्ये ‘फ्रेंड्स’च्या लेखकांसोबतच पेरीच्या कामाचा, त्याच्या कायिक अभिनयाचा आणि भाषिक कौशल्यांचा मोठा वाटा आहे. मालिकेच्या सेट्सवर काय घडत होते, ते पाहिले तर तेव्हाही पेरीचा गमतीशीर स्वभाव आणि विनोदी वृत्ती दिसून येते. त्यामुळेच तर चाहत्यांच्या मनात, बोलण्यातही दोन नावं एका दमात येतात.

चँडलर बिंगने मैत्री व प्रेम या दोन्हींचे उत्तम पायंडे पाडले. त्याची सर्वांशी, त्यातही विशेषतः जोई या पात्राशी असलेली मैत्री पाहून प्रत्येकाला त्याच्यासारखा मित्र हवाहवासा वाटतो; तर मोनिकाचा पार्टनर बनल्यानंतर त्याने स्वतःवर घेतलेली मेहनत, तिच्यासाठी नि त्यांच्या नात्यासाठी घेतलेले परिश्रम यांमुळे त्याच्यासारखा पार्टनर आयुष्यात असावा, असं वाटतं. हा सारा मॅथ्यू पेरीच्या कामाचाच तर परिणाम आहे! त्यामुळे पेरीच्या अवघ्या ५४ व्या वर्षी झालेल्या मृत्यूने सर्वांना हळहळ वाटणे स्वाभाविक आहे.

विनोदी कामासाठी प्रसिद्ध असणाऱ्या अभिनेत्यांची प्रचंड गंभीर समस्या आणि उलथापालथ असलेली वैयक्तिक आयुष्यं पाहिली, तर त्यांची मनातील भीती, अस्वस्थता दिसते. गेल्या वर्षी मॅथ्यू पेरीचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. त्याचे नाव ‘फ्रेंड्स, लवर्स, अँड द बिग टेरिबल थिंग’. यात उल्लेखलेली ती ‘बिग टेरिबल थिंग’ म्हणजे पेरीची व्यसनाधीनता. ‘फ्रेंड्स’ ही मालिका बनत असताना त्यातल्या काही सीजनच्या चित्रीकरणादरम्यान पेरी नशेच्या अमलाखाली होता.

त्याच्या आठवणीनुसार तर केवळ नवव्या सीजनमध्येच काय तो पूर्णतः शुद्धीत, न प्यालेल्या अवस्थेत होता. त्यानंतर पुढची अनेक वर्षे तो व्यसनातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत राहिला. त्याच्या व्यसनी असण्याबद्दल खुलेपणाने बोलत राहिला. याहीपुढे जात तो इतरांना व्यसनातून बाहेर पडण्यासाठी मदत करू लागला. त्यानं त्याच्या मॅलिबुमधील आलिशान घराला काही काळासाठी व्यसनमुक्ती केंद्रात रूपांतरित केलं होतं.

इतरांना मदत करता यावी, याच उद्देशाने एक संस्था स्थापन करण्याचाही त्याचा मानस होता. पेरी म्हणाला होता की, माझ्या मृत्यूनंतर मला केवळ फ्रेंड्समधील भूमिकेकरिता ओळखलं जाऊ नये, तर सोबतच मला व्यसनाधीन व्यक्तींकरिता केलेल्या मदतीच्या प्रयत्नांसाठी ओळखले जावे. बरं, त्यानंतर त्याने काही काम केलं नाही, असंही नाही.

पटकथा लेखनाचा मास्टर मानल्या जाणाऱ्या ॲरन सॉर्किनची ‘स्टुडिओ ६० ऑन द सनसेट स्ट्रिप’ (२००६-०७) ही मालिका किंवा इतर चित्रपट व मालिकांमध्ये तो दिसला. सॉर्किनच्या ‘द वेस्ट विंग’मध्ये (१९९९-२००६) तर तो पाहुणा कलाकार म्हणून दिसला आणि त्या भूमिकेसाठी एमी पुरस्काराचे नामांकनही मिळवले! असे असूनही त्याच्या मृत्यूनंतर फ्रेंड्सबाबत बोलणे न टाळता येण्यासारखे आहे. कारण या मालिकेचा प्रभावच मुळी अनन्यसाधारण आहे.

‘फ्रेंड्स’चा प्रभाव जाणून घ्यायचा आहे? - भारतात तर ‘फ्रेंड्स मालिका’ या थीमवर आधारलेले कॅफे आहेतच, पण आपल्या इथे महाराष्ट्रातील पुण्यात अशा थीमचा एक कॅफे आहे. ‘फ्रेंड्स’ न पाहिलेल्या किंवा ‘फ्रेंड्स’सारख्या मालिकेकडे तुच्छतेने पाहणाऱ्या लोकांनाही मालिकेतील पात्रं माहीत असतात. इंग्रजी सिनेमे आणि मालिका पाहणाऱ्या, स्मार्टफोन हाती असणाऱ्या जवळपास प्रत्येकाच्या नजरेखालून ‘फ्रेंड्स’मधील एखादी क्लिप, मालिकेचा एखादा एपिसोड गेलेला असतो.

ज्यात ही मालिका भाषेपासून सुरुवात करत सांस्कृतिक प्रभाव पाडते. २०२४ मध्ये ‘फ्रेंड्स’ या मालिकेच्या प्रसारणाला सुरुवात होण्याच्या घटनेला तीस वर्षे पूर्ण होतील... आणि यानंतर ‘फ्रेंड्स’ पाहत असताना त्यातील चँडलर बिंग साकारणारा मॅथ्यू पेरी अस्तित्वातच नाही, हे मध्येच कधीतरी आठवत राहील. अमेरिकेत बनलेल्या एका मालिकेने, त्या मालिकेतील एका पात्राने इथे भारतात बसणाऱ्या लोकांच्या मनात घर करणे; मॅथ्यू पेरीच्या मृत्यूने इथल्या चाहत्यांच्या मनात कालवाकालव होणे, हा या मालिकेचा प्रभाव आहे.

चँडलर बिंगने आणि पर्यायाने पेरीने आपल्याला चपखलपणे सादर केलेली अनेक वाक्य (किंवा सध्याच्या दृष्टीने मीम टेम्प्लेट्स) पुरवलेली आहेत. ‘आय ॲम होपलेस अँड ऑकवर्ड अँड डेस्परेट फॉर लव्ह!’ किंवा ‘आय ॲम नॉट ग्रेट ॲट गिव्हिंग ॲडवाइस्. कॅन आय इंटरेस्ट यू इन अ सार्कॅस्टिक कमेंट?’ किंवा ‘कुड् आय बी...’ म्हणत सुरू होणारी बरीचशी वाक्यं किंवा ही यादी बरीच मोठी होईल.

सांगायचा हेतू हा की, जोवर मैत्री, प्रेम, अस्वस्थता, मूर्खपणा, निव्वळ अशक्य फालतूपणा, उपरोध अशा असंख्य भावना अस्तित्त्वात आहेत, तोवर चँडलर बिंगला मरण नाही. आणि आपल्यावर कॅमेऱ्याचे उपकार असल्याने मॅथ्यू पेरीच्या करिष्म्यालाही मरण नाही...

shelar.abs@gmail.com

(लेखक प्रसिद्ध समीक्षक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.