अमेरिकी पेच

अमेरिका सध्या एका विचित्र पेचातून जाते आहे. जगातल्या या सर्वात प्रभावशाली देशाची निवडणूक येऊ घातली आहे. जानेवारीत तिथं नवे अध्यक्ष विराजमान होतील.
Joe Biden and Donald Trump
Joe Biden and Donald Trumpsakal
Updated on

अमेरिका सध्या एका विचित्र पेचातून जाते आहे. जगातल्या या सर्वात प्रभावशाली देशाची निवडणूक येऊ घातली आहे. जानेवारीत तिथं नवे अध्यक्ष विराजमान होतील. त्यात विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन यांनाच पुन्हा संधी मिळेल की त्यांना आव्हान देणारे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची वर्णी लागेल हे ठरेल. मात्र, या दोघांतून कुणाला निवडावं असाच पेच अमेरिकेपुढं असेल; याचं कारण, दोघंही वयानं ऐंशीकडं वाटचाल करत आहेत.

बायडेन यांचं वार्धक्य जाणवायला लागलं आहे. त्यांच्याकडून सुटणारी वाक्यं, त्याच्या हालचालींतला थकवा पाहता ते जगाला वळण देणाऱ्या महाशक्तीचं नेतृत्व किती सक्षमपणे करू शकतील अशी शंका तयार करणारं आहे. नेमकं त्यावरच ट्रम्प आणि त्यांचा रिपब्लिकन पक्ष भर देत आहे, तर ट्रम्प पुन्हा अध्यक्ष होणं म्हणजे अमेरिकेच्या जगातल्या नेतृत्वालाच ओहोटी लागणं असं डेमोक्रॅटिक पक्षाचं सांगणं आहे.

त्यासाठी आधार आहे ती अध्यक्ष म्हणून ट्रम्प यांची वादग्रस्त आणि उटपटांग कारकीर्द, तसंच अध्यक्षपद सोडताना त्यांनी केलेल्या अशोभनीय उचापती. ट्रम्प यांना अमेरिकेनं पुन्हा संधी दिली तर ते ‘न्यायालयानं दोषी ठरवलेले पहिले अध्यक्ष’ ठरतील. अर्थात्, याचा रिपब्लिकन पक्षाच्या मतपेढीला काहीही फरक पडत नाही.

मात्र, ट्रम्प यांचा म्हणून समोर आलेला ‘प्रोजेक्ट २०२५’ हा अजेंडा काठावरच्या मतदारांवर परिणाम घडवणारा ठरू शकतो, म्हणूनच अमेरिकेचं नॅरेटिव्हचं युद्ध ‘थकलेला नेता की उदरामतवादाला चूड लावू पाहणारी एकाधिकारशाही?’ अशा दोन नकारात्मक प्रतिमांतून ठरवलं जात आहे.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बायडेन आणि ट्रम्प एकमेकांसमोर असतील, हे जवळपास निश्चित आहे. अमेरिकेत अध्यक्षपदाच्या उमेदवारांमध्ये टीव्हीवरून थेट चर्चा किंवा वाद होतो. त्यात इच्छुक उमेदवाराची निरनिराळ्या प्रश्नांवरची मतं काय हे समजून घेता येतं. त्यावरून अनेकदा अमेरिकी नागरिक मतं ठरवत असतात.

तिथं एखाद्या पक्षाचा म्हणून मतदार आपली नोंदही करतात; मात्र काठावरचे मतदार बहुतेक वेळेस निर्णायक ठरतात. त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचं एक साधन टीव्हीवरील दोन उमेदवारांमधल्या अशा चर्चा हे असतं. अशा पहिल्या चर्चेत बायडेन यांची कामगिरी अत्यंत खराब होती. ते अडखळताना स्पष्टपणे जाणवत होतं. ही पहिलीच सलामी त्यांच्या पक्षाला अडचणीत आणणारी होती.

त्या चर्चेनंतर ‘बायडेन यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार म्हणून लढावं काय,’ असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला. पक्षातल्या अनेकांनी, पक्षाला निधी पुरवणाऱ्यांनी आणि अगदी अमेरिकेतल्या प्रतिष्ठित माध्यमांनीही ‘आता बायडेन यांनी थांबावं आणि डेमोक्रॅटिक पक्षानं नवा उमेदवार जाहीर करावा’ असं सुचवलं. मात्र, बायडेन पुन्हा लढण्यावर ठाम आहेत.

या वादात एका प्रश्नावर ‘बायडेन काय म्हणाले हे त्यांनाही समजलं नसेल,’ अशी टिप्पणी ट्रम्प यांनी केली आणि बायडेन यांचं अडखळणं, वाक्यं ऐकूही येणार नाहीत असं पुटपुटणं यातून, बायडेन हे कमालीचे थकले आहेत; ते ट्रम्प यांच्यासारख्या अत्यंत आक्रमक नेत्याला तोडं कसं देणार, अशी चर्चा सुरू झाली. खरं तर ट्रम्प यांची अमेरिकेतली प्रतिमा पुरती डागाळलेली आहे.

त्यांच्या विरोधात अनेक खटले प्रलंबित आहेत, तसंच त्यांच्यावर अनेक आरोप आहेत...‘मागची निवडणूक हरल्यानंतर जमावाला ‘व्हाईट हाऊस’वर हल्ला करायची चिथावणी त्यांनी दिली...अनेक महत्त्वाची आणि गोपनीय कागदपत्रं त्यांनी आपल्या घरी नेऊन ठेवली...आपले एका महिलेशी संबंध निवडणुकीत उघड होऊ नयेत म्हणून तिला प्रंचड रक्कम दिली...’ अशा स्वरूपाचे हे आरोप असून त्यांबाबत चौकशी सुरू आहे.

त्यांतले काही आरोप सिद्धही झाले; मात्र, यातून ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षातल्या उमेदवारीवर काही परिणाम झाला नाही. उलट, त्यांच्यावरच्या प्रत्येक आरोपाच्या आणि खटल्याच्या वेळी त्यांनी पक्षाला आपल्याबरोबर अधिकाधिक फरफटायला भाग पाडलं.

‘आपल्यावरचे आरोप राजकीय आहेत आणि त्याहीपलीकडं अमेरिकेचे हितसंबंध धोक्यात आणणाऱ्यांकडून ते होतात,’ हे नॅरेटिव्ह समर्थकांच्या गळी ट्रम्प उतरवू शकले. एका अर्थानं तिथं अंध समर्थकांचा एक संप्रदाय तयार झाला आहे. मागच्या खेपेस ‘ट्रम्प पराभूत झाले तरी ट्रम्पवाद संपलेला नाही,’ असा इशारा दिला जात होता. त्या ट्रम्पवादाचं प्रदर्शन आता अमेरिकेत जाहीरपणे सुरू आहे आणि तिथल्या सगळ्या सहिष्णू उदारमतवाद्यांना वाकुल्या दाखवत, ट्रम्प पुन्हा विजयी होऊ शकतात, ही शक्यता अधिकाधिक ठळक बनते आहे.

ट्रम्प यांच्यापेक्षा बायडेन बरे!

अमेरिकेच्या निवडणुकीत प्रभावी ठरू शकणाऱ्या तीन बाबी मागच्या काही काळात समोर आल्या आहेत आणि त्यांची दखल अमेरिकेत घेतली जातच आहे; मात्र जगालाही ती घेणं भाग आहे. उभय उमेदवारांमधल्या चर्चेनंतर ट्रम्प यांचा आत्मविश्वास वाढणं स्वाभाविक आहे. मात्र, त्यातून बायडेन बाजूला हटण्याची शक्यता कमी. एकतर पक्षातल्या पुरेशा प्रतिनिधींचा पाठिंबा त्यांच्या उमेदवारीला आधीच मिळाला आहे.

त्यांची उमेदवार म्हणून निवड ही औपचारिकता बनली असताना त्यांनी स्वतःच माघार घेतली तरच नव्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागेल आणि निवडणूक तोंडावर असताना नवा उमेदवार ठरवणं आणि त्याच्याभोवती प्रचार गुंफणं सोपं नाही. या स्थितीत बायडेन कायम राहिल्यास ते देशाचं नेतृत्व कसं करतील आणि जगाच्या प्रश्नांना किती उत्साहानं सामोरे जातील हा प्रश्न आहे.

दुसरीकडं, ट्रम्प यांच्यानंतर अमेरिकेची घसरलेली पत सावरताना बायडेन यांनी दिलेलं योगदान विसरायचं कारण नाही, असं त्यांचे समर्थक सांगतात. चीनशी थेट शत्रुत्व न घेता चीनला रोखण्यासाठी आघाडी बनवण्याचे बायडेन यांचे प्रयत्न, त्या प्रयत्नांना येणारं यश हा त्यांच्या मुत्सद्देगिरीचा आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारातल्या अनुभवाचा परिणाम असल्याचं सांगितलं जातं.

इंडोपॅसिफिक क्षेत्रातला भारत-जपान-ऑस्ट्रेलियासह ‘क्वाड’सारखा गट साकारणं असो की युरोपीय देशांना ‘अमेरिका साथीला राहील’ असा विश्वास देणं असो; यांतून, ट्रम्प यांच्या कारकीर्दीत जी अनिश्चितता दाटत होती ती दूर करण्यात बायडेन यांना यश आलं होतं. ‘नाटो’ देशांना एकसंधपणे उभं करण्यात त्यांनी यश मिळवलं.

बदलत्या जागतिक रचनेत चीन, रशिया, इराण, उत्तर कोरिया यांसारख्या देशांकडून अमेरिकी हितसंबंधांना आव्हान दिलं जात आहे. त्यावर ‘लोकशाही विरुद्ध एकाधिकारशाही’ अशी या संघर्षाची मांडणी करत, जगातल्या लोकशाहीचं नेतृत्व अमेरिका करेल, असं सांगणं हेही त्यांच्या परराष्ट्रधोरणाचं वैशिष्ट्य. बायडेन यांनी, नव्यानं कुठंही अमेरिका लष्करी मोहिमेत अडकणार नाही, याची दक्षताही घेतली.

युक्रेनयुद्ध हा त्यांच्या काळातला मोठा पेच राहिला, तसंच पश्चिम आशियातल्या गाझा पट्टीतलं इस्राईल-हमास यांचं युद्ध हाही पेच म्हणून समोर आला. यात युक्रेनला शस्त्रसज्ज करायचं आणि रशियाला विजय मिळवू द्यायचा नाही हे बायडेन यांच्या धोरणाचं सूत्र होतं. इस्राईलसोबत अमेरिका ठामपणे उभी राहिली. स्थलांतरितांच्या अमेरिकेतल्या संवेदनशील प्रश्नावर बायडेन मध्यम मार्ग स्वीकारताना दिसतात.

बायडेन यांच्या नेतृत्वाखालील ही अमेरिकी चाल अमेरिकेच्या साथीदारांसाठी परिचयाची आणि बव्हंशी आश्वासक राहिली. त्याचंच प्रतिबिंब म्हणजे ‘थकले असले तरी ट्रम्प यांच्यापेक्षा बायडेन बरे; निदान धोरणातलं सातत्य राहील आणि अगदीच उलथापालथी घडवणार नाहीत याची निश्चिती’ असं अनेकांना वाटण्यातून पडलेलं दिसतं. साहजिकच, बायडेन यांच्या जिंकण्याच्या शक्यतेवर भरवसा डळमळीत झाला असला तरी संपलेला नाही. अर्थात् याचा लाभ ट्रम्प उठवायचा प्रयत्न करत राहतील.

‘प्रोजेक्ट २०२५’ : अडचणीचा मामला...

दुसरी अचानक घडलेली; मात्र ट्रम्प यांना बळ देणारी घटना म्हणजे, ट्रम्प यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला. प्रचारसभेत त्यांच्यावर झालेल्या गोळीबारातून ट्रम्प बचावले; मात्र यातून अमेरिकेतलं वातावरण किती दूषित झालं आहे याचं दर्शन जगाला घडलं. हल्लेखोराला सुरक्षारक्षकांनी जागेवरच संपवलं; मात्र अध्यक्षपदाच्या शर्यतीतल्या उमेदवारावर असा हल्ला होणं हे जगाला चकित करणारं होतं. यातून अमेरिकेत बोकाळलेली बंदूकसंस्कृतीही पुन्हा चर्चेत आली.

शस्त्र बाळगण्याचा तिथं कुणालाही अधिकार आहे. तो अमर्याद असला पाहिजे हीच रिपब्लिकन पक्षाची भूमिका असते. या हल्ल्यानंतर ट्रम्प अधिकच आवेशात प्रचारात सहभागी होत आहेत. त्याचा त्यांना लाभ होईल असाच कयास आहे. बायडेन यांचं लडखडणं आणि ट्रम्प यांच्यावरचा हल्ला या दोन्ही बाबी रिपब्लिकन प्रचाराला बळ देणाऱ्या आहेत. अलीकडच्या बहुतेक सर्वेक्षणांत ट्रम्प हे बायडेन यांच्याहून आघाडीवर असल्याचं चित्र दिसतं आहे. त्यातही याचं प्रतिबिंब दिसतं.

मात्र, याच काळात चर्चेत आलेला आणखी एक मुद्दा आहे तो ‘प्रोजेक्ट २०२५’चा. यात ट्रम्प हे अध्यक्ष झाले तर धोरणात्मक चौकट काय असेल याची तपशीलवार मांडणी करण्यात आलेली आहे. त्यातले बहुतेक मुद्दे ट्रम्प यांनी यापूर्वी समर्थन केलेले आहेत.

मात्र, काही बाबी कदाचित ट्रम्प यांनाही अमलात आणाव्याशा वाटत असल्या तरी आता त्यांच्यावर जाहीरपणे बोलणं म्हणजे काही मतं दुरावणं असल्यानं ‘या ‘प्रोजेक्ट २०२५’शी आपला काहीच संबंध नाही,’ असा ट्रम्प यांचा पवित्रा आहे, तर ‘हेच ट्रम्प यांचं व्हिजन आहे,’ असं सांगत, त्याचा काठावरच्या मतांवर परिणाम व्हावा, असा डेमॉक्रॅटिक पक्षाचा प्रयत्न आहे.

ट्रम्प यांच्यासाठी म्हणून ठरवलेलं आणि ट्रम्प यांच्याच आधीच्या सरकारमधल्या अनेकाच्या सहभागानं ठरवलेलं हे प्रस्तावित धोरण त्यांच्या निवडीत एक अडथळा बनू शकतं असा एक आंतर्विरोध अमेरिकेत समोर आला आहे.

‘प्रोजेक्ट २०२५’ हा ‘हेरिटेज फाउंडेशन’ या संस्थेनं तयार केला आहे. हे संघटन रिपब्लिकन पक्षासाठी काम करणारं आहे.

९०० च्या वर पानांच्या दस्तऐवजात, अमेरिकेतल्या उजव्या विचारसरणीच्या लोकांना स्वप्नवत् वाटेल अशा अनेक बाबींचा समावेश आहे. या संस्थेचे अध्यक्ष आणि ट्रम्प यांचे एकेकाळचे सहकारी केव्हिन रॉबर्टस् यांच्या मते, या अहवालात दुसरी अमेरिकी क्रांती घडवण्याची क्षमता आहे. या अहवालानुसार, ट्रम्प यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीत अमेरिकेतल्या नोकरशाहीवर पूर्ण कब्जा मिळवला जाईल.

लाखो कर्मचाऱ्यांना नारळ देऊन ट्रम्प यांच्याशी निष्ठावंत असणाऱ्यांची नेमणूक करता येईल. सन १८८३ पर्यंत सरकारी नोकर अध्यक्षाच्या मर्जीनं भरण्याची पद्धत अमेरिकेत रूढ होती, ती कायद्यानं बदलण्यात आली. आता हे चक्र उलटं फिरवायचा प्रयत्न असेल. अमेरिकेतलं न्याय खातं थेटपणे अध्यक्षांच्या नियंत्रणात आणलं जाईल, जे अधिकारविभाजनाच्या सिद्धान्ताशी विसंगत असेल. शिक्षण खात्यालाच टाळं लावावं आणि बायडेन यांनी देऊ केलेली शैक्षणिक कर्जमाफी संपुष्टात आणावी असंही यात सुचवण्यात आलं आहे.

स्थलांतरितांविषयी अत्यंत कठोर भूमिका घ्यावी, यात सर्व स्थलांतरितांना त्यांच्या मायदेशी सक्तीनं पाठवावं, तसंच मेक्सिकोच्या सीमेवर भिंत घालावी अशा अनेक प्रस्तावांचा समावेश या अहवालात आहे. गर्भपातावर संपूर्ण बंदी आणि त्याला मदत करणाऱ्यांवर कारवाईचीही तरतूद त्यात आहे. हवामानबदलासाठीच्या संशोधनावर खर्च कमी करावा आणि तेल आणि गॅसच्या विरोधातली सर्व धोरणं थांबवावीत अशा अनेक बाबी त्यात आहेत.

त्यात प्रामुख्यानं अध्यक्षांचे अधिकार अमर्याद वाढवावेत असाच सूर आहे. याचा वापर करून बायडेन यांनी ‘हे तर अमेरिकेला संपुष्टात आणणारं धोरण’ अशी टीका केली. यातल्या टोकाच्या उपायांचा अमेरिकेतल्या काठावरच्या मतदारांवर परिणाम होऊ शकतो, त्याचाच लाभ डेमोक्रॅटिक पक्ष घेत आहे. एरवी, आपली मतं बिनधास्तपणे मांडणाऱ्या आणि त्याभोवती आपला निष्ठावंत मतदार उभा करण्याचं कौशल्य लाभलेल्या ट्रम्प यांना ‘प्रोजेक्ट २०२५’ मात्र अडचणीचा मामला बनतो आहे, म्हणूनच ते ‘हा अहवाल कुणी केला, याची आपल्याला माहिती नाही’ अशी सारवासारव करत आहेत.

अमेरिकेची निवडणूक तूर्त तरी बायडेन यांची प्रकृती, ट्रम्प यांच्यावरचा हल्ला आणि ट्रम्प विजयी झालेच तर अमेरिकेचं स्वरूप कसं एकाधिकारशाहीकडं झुकेल या मुद्द्यांभोवती फिरत आहे. पक्षातल्या दबावामुळं बायडेन यांनी माघार घेतली तर वरील मुद्द्यांपैकी त्यांचं वय आणि प्रकृतीचा मुद्दा निकालात निघेल. मात्र, ‘प्रोजेक्ट २०२५’ आणि ट्रम्प यांची संभाव्य धोरणं, त्यांतून अमेरिकेत होऊ शकणारे व्यापक बदल हा निवडणुकीत मुद्दा राहीलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.