योगी तथा योगेंद्र पुराणिक असं या तरुणाचं नाव. अंबरनाथच्या सेंट्रल स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण. स्काउट, एनसीसीमधून तावूनसुलाखून निघालेलं बालपण. पुढे पुण्यातून बारावी पूर्ण केली.
अंबरनाथ हे मुंबईचं उपनगर. एकेकाळची श्रीमंत नगरपालिका; पण अंबरनाथ शहर नव्हतंच. अगदी सत्तर-ऐंशीच्या दशकात अंबरनाथ एखाद्या गावासारखंच होतं. याच गावात लहानाचा मोठा झालेला एक तरुण. वडील ऑर्डनन्स फॅक्टरीत कामाला. कुटुंब तसं मध्यमवर्गीयच. या तरुणाने गगनभरारी घेतली आणि तो थेट जपानला जाऊन पोहोचला. नुसताच पोहोचला नाही, तर जपानच्या टोकिओ शहराचा नगरसेवकही बनला.
योगी तथा योगेंद्र पुराणिक असं या तरुणाचं नाव. अंबरनाथच्या सेंट्रल स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण. स्काउट, एनसीसीमधून तावूनसुलाखून निघालेलं बालपण. पुढे पुण्यातून बारावी पूर्ण केली. योगींनी सैन्यदलात जावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा; पण बाकी सगळं नीट व्हायचं आणि मुलाखतीत गडबड व्हायची, त्यामुळे वडील नाखूष असायचे. मग वडिलांनी इंजिनिअरिंगला जायला सांगितलं; पण तिथं अगदी थोड्या गुणांनी फ्री सीट हुकली.
योगींना भौतिकशास्त्राची आवड, त्यामुळे बी.एस्सी.ला जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वडिलांनी दीड वर्ष बोलणंच टाकलं; पण वडिलांनी दिलेला एक सल्ला योगींनी मानला आणि जपानी आणि जर्मन भाषा शिकायला सुरुवात केली. स्पॅनिशही शिकले; पण जपानी भाषेवर प्रेम जडलं. हे करत असताना बी.एस्सी. पूर्ण झालं आणि १९९६ मध्ये जपानची शिष्यवृत्ती योगींना मिळाली. १९९९ मध्ये पुन्हा एकदा जपान सरकारची शिष्यवृत्ती मिळाली. त्यातून जडलं जपानशी नातं. १९९६ मध्ये जपानीच्या मध्यमस्तराच्या परीक्षेत पहिला क्रमांक मिळाला. त्यातच एका आयटी कंपनीत नोकरी मिळाली. वय होतं अवघं १९ वर्षांचं. पहिल्या पगारात नवी सायकल घेतली, दुसऱ्या पगारात कॉम्प्युटर घेतला. २००१ मध्ये आयबीएम कंपनीने जपानमध्ये पाठवलं. त्यानंतर जपानमध्ये असतानाच योगींनी इन्फोसिसमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. आयटी प्रोजेक्ट्समध्ये बँकिंग इन्शुरन्स विषयाचे प्रोजेक्ट्स असत. त्यातून फायनान्स विषयाची गोडी लागायला लागली. त्यामुळे आयआयएम कोलकताचा एक वर्षाचा कोर्स करून बँकिंगचं ज्ञान मिळवलं. इथं नशिबाने वेगळं वळण घेतलं. त्याच सुमारास नॅस्कॉमच्या ग्लोबल सेमिनारमध्ये जाण्याची संधी मिळाली. या सेमिनारमध्ये योगींच्या शेजारी बसले होते जपानच्या दुसऱ्या क्रमांकाच्या बँकेचे सीईओ. त्यांना तिथं इंग्रजीत काय चाललंय हेच समजत नव्हतं. मग योगींनी त्यांना अस्खलित जपानीत माहिती द्यायला सुरुवात केली.
परतीच्या प्रवासात विमानात तेच सीईओ शेजारच्या सीटवर होते, त्यांनी योगींना थेट ऑफरच दिली. तिथून योगींचा बँकिंग क्षेत्राचा प्रवास सुरू झाला. योगींना बँकेत चांगल्या पदावर काम करायची संधी मिळाली. तिचा फायदा घेत योगींनी भारतात तसंच चीनमध्ये मिझो बँकेच्या शाखाही उघडल्या. त्यानंतर योगींनी जपानच्या बँकांचे सल्लागार म्हणून काम करायला सुरुवात केली. पुढे जपानच्या बँकेत योगी संचालकही बनले. असं पद भूषविणारे ते बहुधा पहिलेच भारतीय.
एवढं सगळं कमी पडलं म्हणून की काय, योगींनी जपानमध्ये चक्क भारतीय खाद्यपदार्थांचं रेस्टॉरंटच सुरू केलं. योगींच्या पत्नी चीनच्या, त्यामुळे योगी काही काळ चीनमध्येही गेले. पण, नंतर नशिबाचे फेरे त्यांना पुन्हा जपानमध्येच घेऊन आले, बरोबर मुलगाही होता. मुलगा वडिलांकडे राहील, असं पती-पत्नींनी ठरवलं. योगींच्या आई काहीवेळा योगींकडे राहायच्या. अशातच मायलेकांना दोघांनाही इन्फ्लूएंझा झाला. त्या वेळी मुलगा बाहेरून बटर चिकन आणि नान घेऊन यायचा. असे आठ दिवस झाल्यानंतर योगींच्या मनात आलं, की इथं बटर चिकनशिवाय काही मिळतच नाही का? आणि खरोखरच ती वस्तुस्थिती होती. त्या वेळी बोलता बोलता योगींना रेस्टॉरंट काढण्याची कल्पना सुचली. २०१२ च्या ऑगस्टमध्ये ही कल्पना सुचली.
ऑक्टोबरमध्ये जागाही घेतली आणि फेब्रुवारी २०१३ मध्ये रेस्टॉरंट सुरूही झालं. योगींच्या आईंचं नाव रेखा. म्हणून रेस्टॉरंटला नाव दिलं ‘रेका’. हळूहळू रेस्टॉरंटचा जम बसला. नोकरी, व्यवसाय याबरोबरच योगी समाजात काम करत राहिले. २०११ मध्ये जपानमध्ये मोठा भूकंप झाला. त्या वेळी हाहाकार माजला होता. त्या वेळी योगी जपानीतल्या बातम्या पाहून, ऐकून भारतीय व अन्य परदेशी नागरिकांना माहिती देत. अशातून योगींचा जनसंपर्क वाढत गेला. त्यातच योगी रहात त्या भागातल्या एका जपानी नगरसेवकाने ‘लिटिल इंडिया’ बनविण्याची टूम काढली; पण ती योजना यशस्वी होण्यासारखी नव्हती, त्यामुळे योगींनी त्याला विरोध करायला सुरुवात केली. समाजातूनही योगींना साथ मिळाली, त्यामुळे योगींनी प्रवाहात उतरायचं ठरवलं आणि चक्क निवडणुकीच्या रिंगणात योगी उतरले. तिथल्या स्थानिक खासदारांनी योगींना निवडणुकीत मदत केली. ही निवडणूक योगी जिंकले आणि टोकिओच्या महापालिकेतले प्रवेश करणारे पहिले भारतीय ठरले. अतिशय वेगळ्या वाटेवरचा योगी तथा योगेंद्र पुराणिक यांचा हा प्रवास मराठी माणसाला अभिमान वाटावा असाच आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.