क्रिकेट आणि बॉलिवूडचे लव्ह कनेक्शन जुने आहे. क्रिकेटपटू आणि हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अर्थात बॉलिवूडमधल्या काही अभिनेत्री एकत्र काम करताना, एकत्र फिरताना दिसले आहेत. क्रिकेटपटू आणि ‘बॉलिवूड दिवां’चं हे कॉम्बिनेशन इतकं अप्रतिम आहे, की ते कुठेही गेले तरी स्पॉटलाइट फक्त त्यांच्यावरच असतो. यातील काही जोड्या केवळ ब्रँड एंडोर्समेंट्स किंवा जाहिरातींमध्येच नव्हे तर वास्तविक जीवनातही प्रचंड हिट ठरल्या आहेत. क्रिकेटपटूबरोबर आयुष्य व्यतीत करणाऱ्या काही अभिनेत्री आहेत. तर काही अफेअर्सच्या चर्चा संपूर्ण देशात रंगल्या होत्या.
बॉलिवूड आणि क्रिकेटचं ७० च्या दशकापासून नातं आहे. मन्सूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर यांच्यापासून ही सुरवात झाली. आजही बॉलिवूडच्या तारका आणि टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटर्समध्ये अफेयरच्या बातम्या येत असतात. यात विराट कोहली- अनुष्का शर्मासारखी काही रिलेशनशिप्स विवाहाच्या बोहल्यापर्यंत पोहोचतात, तर दीपिका पादुकोण-युवराज सिंगसारखा काही नात्यांचा प्रवास मध्येच थांबतो.
क्रिकेटच्या मैदानाचा वाघ आणि अभिनय विश्वाची राणी. बॉलिवूड आणि क्रिकेटची ही प्रेमळ भागीदारी या दोघांनी सुरू केली होती. शर्मिला टागोर या मन्सूर अली खान पतौडी यांच्या प्रेमात पडल्या होत्या. सुरवातीला दोघांच्याही घरून या नात्याला आणि लग्नाला प्रचंड विरोध झाला होता. शर्मिला या आधुनिक विचारसरणीच्या कुटुंबातल्या होत्या. तर, मन्सूर अली खान पतौडी हे नवाबी राजघराण्यातील होते. मात्र, त्यांच्या प्रेमापुढे कुटुंबीयांनी माघार घेत, लग्नाची परवानगी दिली.
लग्नानंतर शर्मिला टागोर यांचे नाव बेगम आयेशा सुलतान असं ठेवण्यात आलं. लग्नानंतर शर्मिला यांचं करियर संपेल, अशी शक्यता देखील वर्तवली गेली. मात्र, सगळे अंदाज खोटे ठरवत त्यांनी आपली कारकीर्द गाजवली. त्या वेळी कुणीही या विवाहाला लव्ह जिहाद म्हटलं नाही, हे विशेष. हे लग्न टिकलं आणि क्रिकेटपटू आणि नट्यांच्या लग्नाचा एक नवा पायंडा पडला.
रवी शास्त्री - अमृता सिंग
दिग्गज क्रिकेटपटू रवी शास्त्री आणि प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंग यांच्या अफेअरच्या चर्चाही कोणे एके काळी चवीने चघळल्या गेल्या. १९८६ साली ''सिनेब्लिट्झ'' या प्रसिद्ध मॅगझिनच्या कव्हरपेजवर दोघांचा एकत्रित फोटोही छापला गेला. ''बॉलिवूडशादीज.कॉम'' या वेबसाइटने तर दोघांचा साखरपुडा झाला होता, असाही दावा केला होता. पण रवी शास्त्रींना घर आणि कुटुंब सांभाळणारी पत्नी हवी होती. मात्र यशाच्या शिखरावर असलेल्या अमृताला लग्नासाठी ही तडजोड मान्य नव्हती. त्यामुळे या नात्याचे पुढे विवाहात रूपांतर झाले नाही.
नीना गुप्ता - सर व्हिव्हियन रिचर्ड्स
सर व्हिव्हियन रिचर्ड्स हे क्रिकेट इतिहासातील महान खेळाडूंपैकी एक. भारतामध्ये १९८७ साली विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी वेस्ट इंडिजचे संघाचे रिचर्ड्स आणि अभिनेत्रीची पहिल्यांदा भेट झाली. त्यानंतर या दोघांचा संपर्क वाढत गेला आणि त्यांच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. रिचर्ड्स हे विवाहित असूनही नीना गुप्ताच्या प्रेमात पडले होते.
त्यामुळे ते सीरिज संपल्यानंतर नीना यांना त्यांच्यासोबत घेऊन जाऊ शकले नाही. मात्र त्या वेळी फार उशीर झाला होता. नीना या प्रेग्नंट होत्या. त्यानंतरही नीना गुप्ता यांनी सर्वांचा विरोध झुगारत मुलीला जन्म दिला. नीना यांनीच पुढे त्या मुलीला (मसाबाला) लहानाचं मोठं केलं.
मोहसीन खान - रीना रॉय
नागिन, जानी दुश्मन, कालिचरण, सनम तेरी कसम यांसारखे अनेक हिट चित्रपट देणाऱ्या रीना रॉय करियरच्या शिखरावर होत्या. यानंतर त्या पाकिस्तानी क्रिकेटर मोहसीन खानच्या प्रेमात पडल्या. आपल्या करियरला अलविदा म्हणत त्यांनी १९८३ मध्ये मोहसीन खानसोबत लग्न केले. पुढे मोहसीनने अभिनय क्षेत्रातही आपले नशीब आजमावले, पण त्याला यश मिळाले नाही. त्यांचे हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. पुढे त्यांचा घटस्फोट झाला.
अझहरुद्दीन - संगीता बिजलानी
९० च्या दशकाच्या सुरवातीच्या काळात जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान संगीता आणि अझहर यांची भेट झाली होती. पुढे त्यांच्या गाठीभेटी वाढत गेल्या. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी १९९६ मध्ये लग्न केले. संगीता यांच्यासोबत लग्न करण्यासाठी अझहर यांनी त्यांची पहिली पत्नी नौरीनला घटस्फोट दिला. त्या वेळी अझहर यांना पोटगी म्हणून पहिल्या पत्नीला १ कोटी रुपये द्यावे लागले होते.
त्या वेळी हा देशातील एक महागडा घटस्फोट म्हणून गणला गेला होता. पुढे अझहर-संगीता यांचे १४ वर्षांचे विवाहसंबंध २०१० मध्ये संपुष्टात आले. या दोघांनीही कायदेशीररीत्या विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर अलिकडच्या काळातही हा ट्रेंड चालूच आहे. युवराज सिंगचे पहिल्यांदा अभिनेत्री किम शर्माबरोबर नाव जोडले गेले होते. त्यानंतर दीपिका पादुकोणसोबत त्याचे अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पुढे त्याने अभिनेत्री हेजल कीचशी लग्न केले. युवराज सिंगसोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्री हेजल कीचने चित्रपट करणे सोडले होते.
भारताचा वेगवान गोलंदाज झहीर खानची ईशा शर्वाणीबरोबर अफेअरची चर्चा होती. पुढे त्याने अभिनेत्री सागरिका घाटगेशी लग्न केले. त्यानंतर सागरिकाच्या करियरला ब्रेक लागला. लग्नापूर्वी ती शेवटची इडासा नावाच्या चित्रपटात दिसली होती.
हरभजन सिंगसोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्री गीता बसरा ही सुद्धा फिल्मी जगापासून दुरावली. तसेच हार्दिक पांड्यासोबत लग्न केल्यानंतर नताशा स्टॅनकोविकही चित्रपटांपासून दूर आहे.
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याचे नाव अभिनेत्री तमन्ना भाटिया, इजाबेल लेटे यांच्याशी जोडले गेले. विराटला जवळपास दोन वर्ष डेट केल्याची कबुली खुद्द इजाबेलने दिली होती. पुढे २०१३ साली विराटच्या आयुष्यात अनुष्का शर्माची एंट्री झाली आणि दोघांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली.
जवळपास चार वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर विराट-अनुष्का विवाहाच्या बंधनात अडकले. भारताचा फलंदाज लोकेश राहुलचे नाव निधी अग्रवालबरोबर जोडले गेले होते. तो काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत विवाह बंधनात अडकला.
तर अशा अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटपटूंना त्यांच्या आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडलं आणि सुखानं संसार केला. अर्थात सर्वांचीच नाती यशस्वी ठरली नाहीत. काही नाती तर लग्नाच्या उंबरठ्यावर जाण्याआधीच तुटली. पण एक गोष्ट मात्र नक्की, की या जोड्यांच्या अवतीभवती प्रचंड लाइमलाइट, ग्लॅमर व लोकप्रियतेचे वलय होते आणि आजही असते.
पण त्याची दुसरी बाजू अशी, की जेवढी त्यांना लोकप्रियता मिळते, तेवढंच या अभिनेत्री-क्रिकेटपटूंना ट्रोलिंगचं शिकार व्हावं लागलं आहे. अलिकडच्या काळात जेव्हा एखादा क्रिकेटपटू मैदानावर अपयशी ठरतो आणि त्याची बायको अथवा गर्लफ्रेंड ही अभिनेत्री असेल, तर त्याच्या अपयशाला तिला जबाबदार ठरवलं जातं.
इतकंच नाही तर सोशल मीडियावर तिच्यावर यथेच्छ खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते. अलिकडेच विराट-अनुष्का, राहुल-अथिया, हार्दिक पांड्या-नताशा या जोड्यांना अनेकदा ट्रोल करण्यात आलं. सोशल मीडियावरील हा ट्रेंड कितीही संतापजनक असला, तरी हीच सध्याची वस्तुस्थिती आहे.
नवाब पतौडी किंवा मोहसीन खान मैदानात एखाद्या वेळी अपयशी ठरले म्हणून शर्मिला टागोर किंवा रीना रॉय यांच्यावर कधी कुणी टीका केली नाही. तेव्हा पतौडी किंवा कोणतेही खेळाडू मैदानावर अपयशी ठरायचे, तेव्हा गल्लोगल्ली, ऑफिसेसमध्ये त्याच्या चर्चा व्हायच्या. पण त्या काळात होणारी टीका ही मर्यादित असायची.
काळानुरूप टीकेमध्ये आणि टीकेच्या पद्धतीमध्ये बदल होत गेले आहेत. सध्याच्या काळात सोशल मीडियावरून कुणीही उठतं आणि फारसा विचार न करता कुणालाही ट्रोल करत असतं. खास करून जर फॉर्मात नसलेल्या क्रिकेटपटूची बायको अथवा गर्लफ्रेंड बॉलिवूडशी संबंधित असेल, तर ही टीका अधिकच बोचरी असते. अनुष्का-आथियालाही अशाच ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
क्रिकेटपटू जेव्हा परदेश दौऱ्यावर जातात, तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांच्या गर्लफ्रेंड किंवा, बायको असावी की नसावी यावरही अनेकदा वादंग उठत असतात. पण यात काय चुकीचं आहे? एखाद्या पुरुषाच्या खेळात महिलेमुळे कसा व्यत्यय येऊ शकतो? उलट क्रिकेटपटूच्या पडत्या काळात त्याला त्याचं मनोबल वाढवणाऱ्या व्यक्तीची गरज असते. त्याची जवळची व्यक्ती त्याला योग्य सल्ला देऊन त्याचं मनोबल उंचावायला मदत करू शकते. मग ती व्यक्ती त्याची गर्लफ्रेंड असू शकते अथवा बायको.
या गोष्टी ट्रोलर्सना समजण्यापलिकडच्या आहेत. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे, नाव-आडनावावरून जोक करणे किंवा मनोधैर्य खच्ची होईल अशी टिपणी करणे यांसारखे हातखंडे ट्रोलर्स वापरतात. समोरची व्यक्ती महिला असेल तर मात्र लिंगभेद करणारी टिपणी किंवा बलात्काराची धमकीसुद्धा त्यातून सुटलेली नाही.
लक्ष वेधून घेण्यासाठी, इतरांना त्रास देण्यासाठी, दुःख देण्यासाठी, तसंच मनोधैर्य खच्ची करण्यासाठी लोक ट्रोलिंगचा शस्त्र म्हणून वापर करतात. त्यातून त्यांना कधीकधी मानसिक समाधान मिळतं. तसंच कधीकधी त्यांना त्यांच्यातली नकारात्मकता दुसऱ्यावर ढकलायची असते म्हणून ते ट्रोल करतात. पण ट्रोलिंग सहन करणारी माणसं यामुळे दुखावली जातात. त्यांच्या मानसिक आरोग्यावर याचा परिणाम होतो.
एखादा खेळाडू चांगला खेळ खेळत नसेल, तर प्रतिस्पर्धी संघानं त्याच्याविरोधात योग्य डावपेच रचले किंवा त्याच्या टेक्निकमध्ये काहीतरी कमतरता आहे, असं म्हणणं जास्त योग्य ठरते. पण तो क्रिकेटपटू त्याच्या बायकोच्या अथवा गर्लफ्रेंडच्या असण्यामुळे चांगला परफॉर्म करत नाही, हे म्हणणं चुकीचं आहे. जर एखाद्या डॉक्टरकडून चूक घडली तर आपण त्याच्या बायकोला त्याचं दोषी धरतो का? किंवा एखाद्या ठेकेदाराने बांधलेला रस्ता पहिल्या पावसातच वाहून गेला, तर त्याच्या गर्लफ्रेंडला आपण चुकीचं ठरवतो का?
नवरात्री म्हणजे ‘स्त्री शक्तीचा आणि सन्मानाचा जागर’ म्हणत एकीकडे महिलांची भक्ती करणारे आपण सोशल मीडियावर दिवसरात्र महिलांना अपमानाचे कटू घोट पाजतो. किती हा विरोधाभास!
आपण सर्व जण क्रिकेट या खेळावर व क्रिकेटपटूंवर खूप प्रेम करतो. त्यामुळेच त्या क्रिकेटपटूंना आणि त्यांच्या पार्टनरलाही आदर द्यायलाच हवा. त्याच्या चांगल्या काळातही आणि पडत्या काळातही.
(लेखक क्रीडा क्षेत्राचे अभ्यासक असून एका माध्यम संस्थेचे संचालकही आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.