रंग खेळपट्टीचे

खेळपट्टी किती महत्वाची हे मागील लेखात स्पष्ट केलंच आहे. खेळपट्टी चांगली ठेवणं यासाठी अनेक बाबी महत्वाच्या असतात. क्रिकेटमध्ये खेळपट्टी हे अत्यंत महत्त्वाचं अंग.
Cricket Pitch
Cricket PitchSakal
Updated on

खेळपट्टी किती महत्वाची हे मागील लेखात स्पष्ट केलंच आहे. खेळपट्टी चांगली ठेवणं यासाठी अनेक बाबी महत्वाच्या असतात. क्रिकेटमध्ये खेळपट्टी हे अत्यंत महत्त्वाचं अंग. सामन्याचा निकाल, खेळाडूंची कामगिरी अशा अनेक गोष्टी या खेळपट्टीशी थेट संबंधित असतात. मागील अंकात सहा बाबींचा विचार रकेला. आता आपण खेळपट्टीबाबत कुठल्या गोष्टी परिणामकारक ठरतात याचा विचार करू.

खेळपट्टी रोलिंग

खेळपट्टीवर रोलिंग केल्यामुळे ती अधिक टणक होते, त्यामुळे अधिक वेगवान व उसळी घेणारी खेळपट्टी तयार होते; पण असमान उसळणाऱ्या चेंडूचा धोका कमी होतो. सामन्यादरम्यान खेळपट्टीवर रोलिंग करता येत नाही; पण फलंदाजी करणाऱ्या संघाचा कर्णधार, डाव सुरू होण्याआधी (सामन्याच्या पहिल्या डावाव्यतिरिक्त) आणि सामन्याच्या इतर दिवसांच्या सुरुवातीस, खेळपट्टीवर जास्तीत जास्त ७ मिनिटांपर्यंत रोलर फिरविण्याची विनंती करू शकतो. मैदानावर जर एकापेक्षा जास्त रोलर उपलब्ध असतील, तर कोणते रोलर वापरायचे ते फलंदाजी करणाऱ्या संघाचा कर्णधार ठरवतो.

झाडलोट

खेळपट्टीवरील कचरा रोल होऊन खेळपट्टीला होणारा धोका टाळण्यासाठी खेळपट्टीवर रोलर फिरविण्याआधी खेळपट्टीची झाडलोट केली जाते. प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला, जेवणाच्या वेळेत आणि दोन डावांदरम्यानसुद्धा खेळपट्टी झाडली जाते. पण, पंचांच्या मते जर खेळपट्टीच्या एखाद्या पृष्ठभागाला झाडलोट केल्यास धोका निर्माण होत असेल, तर अशावेळी त्या भागातून कचरा झाडलोट न करता हाताने साफ करणं आवश्यक असतं.

कापणी

ज्या दिवशी खेळ होणार असेल अशा प्रत्येक दिवशी ग्राउंड्समन (क्रीडांगणाची देखभाल करणारा कर्मचारी) खेळपट्टीवरील गवताची कापणी करतो. एकदा सामना सुरू झाल्यानंतर ही कापणी पंचांच्या देखरेखीखाली होते.

फूटहोल्स आणि फूटहोल्ड्स

मैदान खेळण्याजोगं बनवण्यासाठी फलंदाज आणि गोलंदाजांमुळे खेळपट्टीवर झालेले फूटहोल्स पंचांनी दुरुस्त करून घेणं गरजेचं असतं. एकापेक्षा जास्त दिवसाच्या सामन्यात गोलंदाजांमुळे झालेल्या फूटहोल्समध्ये भराव टाकून ती जागा खेळासाठी सुरक्षित करणं गरजेचं असतं. खेळाडूसुद्धा त्यांचे फूटहोल्स माती टाकून सुरक्षित करू शकतात, परंतु असं करताना दुसऱ्या संघासाठी ते चुकीचं ठरणार नाही, याची काळजी घेणं गरजेचं असतं.

मैदानावरील सराव

सामन्याच्या कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी नियमानुसार खेळपट्टी, तसंच मुख्य खेळपट्टीच्या बाजूच्या खेळपट्टीवर गोलंदाजी किंवा फलंदाजीच्या सरावासाठी परवानगी नसते. सामन्याच्या दिवशी मैदानाच्या इतर भागात पंचांच्या परवानगीनंतर सरावाची मुभा दिली जाते. परंतु, सदर सराव केल्याने मैदानाची हानी होऊ शकते, असं जर पंचांना वाटत असेल, तर ते सरावासाठी परवानगी देत नाहीत.

दिशा

क्रिकेट मैदानाच्या मध्यभागी खेळपट्टीसाठी वापरल्या जाणाऱ्या क्षेत्राला स्क्वेअर असं म्हणतात. क्रिकेटची खेळपट्टी ही सहसा व्यावहारिकदृष्ट्या दक्षिणोत्तर दिशेने असते, कारण तसं नसल्यास दुपारच्या वेळी सूर्यामुळे पश्चिमेकडे तोंड असलेल्या फलंदाजाला ते त्रासदायक वाटू शकतं.

संरक्षित किंवा धोकादायक क्षेत्र

हा खेळपट्टीचा मधला भाग असतो. क्रिकेटच्या नियमानुसार, चेंडू टाकल्यानंतर गोलंदाजाने ह्या क्षेत्रातून धावत जाणं (फॉलो थ्रू) टाळणं गरजेचं आहे, नाहीतर त्यामुळे खेळपट्टीवर असा पॅच तयार होतो की, ज्यामुळे चेंडूला अनपेक्षित स्विंग आणि बाउन्स मिळू शकतो.

गोलंदाजांकडून सामन्याचा निकाल बदलण्यासाठी या क्षेत्राचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे एखादा गोलंदाज संरक्षित क्षेत्रावरून धावल्यास पंच गोलंदाज आणि त्याच्या संघाचा कर्णधार यांना ताकीद देतात. गोलंदाजाने पुन्हा एकदा तसं केल्यास पंच त्यांना एक दुसरी आणि शेवटची चेतावणी देतात; पण तिसऱ्यांदा त्याची पुनरावृत्ती झाल्यास पंचांकडून गोलंदाजाला बाहेर काढलं जातं आणि उर्वरित डावासाठी तो गोलंदाज पुन्हा गोलंदाजी करू शकत नाही.

संरक्षित क्षेत्राची अशा प्रकारची आखणी यासाठी केलेली असते की, साधारणतः याच क्षेत्रात चेंडूचा टप्पा पडतो आणि जर हे क्षेत्र गोलंदाजाच्या पायाच्या ठशांमुळे खराब झालं, तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला त्याचा गैरफायदा मिळू शकतो.

गोलंदाज किंवा इतर कोणत्याही खेळाडूला ह्या क्षेत्रावरून धावत जाऊन क्षेत्ररक्षण करण्यास हा नियम मज्जाव करत नाही, फक्त गोलंदाजाच्या फॉलो- थ्रूसाठी हा नियम लागू होतो. फलंदाजही धाव घेताना या क्षेत्रातून पळू शकत नाही; पण तसं केल्यास पंचांकडून फलंदाजाला ताकीद दिली जाते. पण, पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाल्यास फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावांची पेनल्टी लावण्यात येते.

खेळपट्टी झाकणं

सुरुवातीला झाकून न ठेवलेल्या खेळपट्ट्यांवर क्रिकेट खेळवलं जाई. खेळपट्टी झाकून ठेवण्याची सुरुवात १९७० च्या दशकात झाली. पाऊस आणि ड्यूपासून खेळपट्टी सुरक्षित ठेवण्यासाठी ग्राउंड्समन खेळपट्टी झाकून घेतात. रात्रीच्या वेळी खेळपट्टी झाकली गेल्यास सकाळी खेळ सुरू होण्याच्या आधी शक्य तितक्या लवकर खेळपट्टीवरचे कव्हर्स काढले जातात. कव्हर्सचा वापर केल्याने किंवा न केल्याने खेळपट्टीवरून फलंदाजाकडे चेंडू कसा येईल ह्यावर मोठा परिणाम होत असतो.

जगात क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही निवडक खेळपट्ट्या :

कृत्रिम खेळपट्टी

जगात काही ठिकाणी हौशी सामन्यांसाठी कृत्रिम खेळपट्टी वापरली जाते. ही खेळपट्टी काथ्याची मॅट किंवा कृत्रिम टर्फ अंथरलेल्या काँक्रीटच्या स्लॅबपासून बनवलेली असते. काही वेळा काथ्याच्या मॅट किंवा चटईवर ती अस्सल खेळपट्टी वाटावी म्हणून माती टाकतात. ज्या ठिकाणी क्रिकेट सामान्यतः खेळलं जात नाही, अशा ठिकाणी एखादा प्रदर्शनीय सामना अशा खेळपट्टीवर खेळवला जातो.ड्रॉप इन खेळपट्टी :

ही खेळपट्टी एका कारखान्यात तयार केली जाते व नंतर मैदानावर क्रेनच्या साहाय्याने बसवण्यात येते. ही खेळपट्टी बनवताना हलकी स्टील फ्रेम ह्यात भरली जाते, यामुळे खेळपट्टीची कार्यक्षमता वाढते, तसंच ती कारखान्यातून मैदानावर नेण्यासही सोपी जाते. या पोर्टेबल पिचला ‘ड्रॉप इन पिच’ असंही म्हटलं जातं. ‘ड्रॉप-इन’ खेळपट्ट्यांचा पहिल्यांदा वापर १९७७ मध्ये झालेल्या कॅरी पॅकरच्या ‘वर्ल्ड सीरीज क्रिकेट’मध्ये केला गेला होता.

सध्या न्यूझीलंडमधील ऑकलंडच्या ईडन पार्क व वेल्लिंग्टनच्या वेस्टपॅक स्टेडियमध्ये या खेळपट्ट्यांचा वापर केला जातो. कारण नंतर ही मैदानं फुटबॉल व रग्बी खेळण्यासाठी वापरली जातात, तेव्हा या खेळपट्ट्या पुन्हा बाहेर काढल्या जातात. ऑस्ट्रेलियातील एमसीजी, ॲडिलेड ओव्हल, ऑप्टस स्टेडियम पर्थ इथंही या खेळपट्ट्या वापरल्या जातात.

न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंड, दक्षिण आफ्रिका

केपटाउनमधील ही क्रिकेट खेळपट्टी अतिशय दुर्मीळ आहे. ही खेळपट्टी हवामानाला अनुसरून कार्य करत असते. यावर वेगवान गोलंदाजाला स्विंग मिळतो, तर स्पिनर्सलाही ही खेळपट्टी मदत करते. जर हवा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असेल, तर चेंडू एकदम वेगाने आउट स्विंग होतो. या मैदानावर सामना अनिर्णीत राहण्याचं प्रमाण फार कमी आहे.

इंग्लंड आणि वेल्समधील खेळपट्ट्या

मुख्यतः हवामानावर अवलंबून असणाऱ्या हिरव्या, स्विंगला उत्तेजन देणाऱ्या आणि आर्द्रतायुक्त परिस्थिती असलेल्या, असं इंग्रजी खेळपट्ट्यांचं वर्णन करता येतं. हंगामाच्या सुरुवातीस बहुतेक फलंदाजांना खूपच काळजीपूर्वक खेळावं लागतं, कारण इंग्लिश खेळपट्ट्या ह्या येथील हवामानाप्रमाणे फारच चपळ असतात. नंतर उन्हाळ्यामध्ये खेळपट्ट्या जास्त टणक होतात आणि त्यांच्यावरील हिरवळ कमी होऊन फलंदाजी करणं सोपं होतं.

ऑस्ट्रेलियामधील खेळपट्ट्या

खेळपट्टीच्या पृष्ठभागाच्या बाऊन्स निर्माण करण्याच्या क्षमतेमुळे ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्या पारंपरिक पद्धतीने वेगवान गोलंदाजांसाठी चांगल्या मानल्या जातात. विशेषतः पर्थमधील वाका मैदानावरील खेळपट्टी ही जगातील सर्वांत जलद खेळपट्टी मानली जाते.

ब्रिस्बेन क्रिकेट मैदानावरील खेळपट्टीदेखील वेगवान गोलंदाजांना त्याच्या उसळीसाठी साहाय्य करणारी म्हणून ओळखली जाते. तथापि, अशा प्रकारच्या उसळी देणाऱ्या खेळपट्ट्यादेखील धावा करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करून देतात, कारण ह्या खेळपट्ट्यांवर पुल, हूक आणि कट शॉट्स खेळण्यास प्रोत्साहन मिळतं.

असे फटके चांगले खेळणाऱ्या फलंदाजांना या खेळपट्ट्यांवर भरपूर यश मिळू शकतं. ॲडलेड ओव्हल आणि सिडनी क्रिकेट मैदानासारख्या इतर स्टेडियमवरील खेळपट्ट्यांवर तिसऱ्या दिवसानंतर फिरकी गोलंदाजांना मदत मिळायला सुरुवात होते.

भारतातील खेळपट्ट्या

भारतीय क्रिकेट बोर्डाची खेळपट्टीबाबत काही मार्गदर्शक तत्त्वं आहेत, त्यांचं पालन प्रत्येक राज्य संघटनेला करणं आवश्यक असतं. त्यानुसार खेळपट्टी ही ‘स्पोर्टिंग’ (संतुलित) असावी अशी अपेक्षा असते. म्हणजेच ती फक्त फिरकीला किंवा वेगवान गोलंदाजीला अशी एकतर्फी अनुकूल नसावी अशी अपेक्षा असते.

भारतातील खेळपट्ट्यांची विशेषता वेगळी सांगण्याची गरज नाही. पण, आयपीएलमुळे मात्र भारतीय खेळपट्ट्यांची ही विशेषता बऱ्यापैकी ओसरली. कारण आयपीएलच्या निमित्ताने प्रत्येक देशातले बरेच खेळाडू भारतात इतक्या मॅचेस खेळतात की, त्या खेळपट्ट्यांचं नावीन्य आता त्यांच्यासाठी राहिलेलं नाही.

टी-२० विश्वचषक २०१६ मधील उपांत्य सामन्यात भारताविरुद्ध वानखेडेवर मॅच विनिंग इनिंग खेळलेला वेस्ट इंडीजचा लेंडल सिमन्स असो (ज्याचं आयपीएलमध्ये वानखेडे स्टेडियम हे होम ग्राउंड होतं), की भारतात खोऱ्याने धावा करणारे ए. बी. डिव्हिलीयर्ससारखे खेळाडू असोत, आयपीएलमुळे भारतातील खेळपट्ट्या विदेशी खेळाडूंसाठी नवख्या राहिल्या नाहीत.

पण, भारतात आल्यावर फिरकी गोलंदाजी खेळण्यासाठी तुमच्याकडे स्किलसेट हवाच, नाहीतर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेसारख्या नांग्या टाकून खेळपट्टीच्या नावाने खडे फोडायला रान मोकळं आहे.

आपण गल्ली क्रिकेट खेळताना फक्त ‘आपल्याला पहिली फलंदाजी मिळावी’ या उद्देशाने नाणेफेक करतो; पण व्यावसायिक क्रिकेटमध्ये खेळपट्टी आणि हवामानामुळे नाणेफेकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे ‘खेळाडूचं आयुष्य त्याच्या गुणवत्तेसोबत खेळपट्टीही ठरवते’, हे मात्र नक्की!

(लेखक क्रीडा क्षेत्राचे अभ्यासक असून एका माध्यम संस्थेचे संचालक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.