थोरल्या वाड्याची कहाणी

शनिवारवाड्याच्या रोषणाईनं गतकाळाचं वैभव या वास्तूला प्राप्त झालं की काय, असंही काहींना वाटू लागलं. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षी शनिवारवाडा उत्सवाचा केंद्रबिंदू झाला...
Amrit Mahotsav Dr Uday Kulkarni writes Archeology Department illuminated colors of indian flag on Shaniwar Wada pune
Amrit Mahotsav Dr Uday Kulkarni writes Archeology Department illuminated colors of indian flag on Shaniwar Wada punesakal
Updated on
Summary

शनिवारवाड्याच्या रोषणाईनं गतकाळाचं वैभव या वास्तूला प्राप्त झालं की काय, असंही काहींना वाटू लागलं. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षी शनिवारवाडा उत्सवाचा केंद्रबिंदू झाला...

स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आदल्या दिवशी पुण्यात शनिवारवाड्यासमोर मोठ्या संख्येनं नागरिक जमले होते आणि मध्यरात्र होताच त्यांनी मोठ्या जल्लोषानं स्वातंत्र्यदिन साजरा केला. पुरातत्त्व खात्यानं वाड्यावर तिरंग्याच्या रंगातील प्रकाशझोत टाकले होते. अनेक शतकं उपेक्षित असलेल्या या वास्तूला त्या प्रकाशझोतामुळे अचानक क्षणिक संजीवनीचा स्पर्श झाल्याचा आभास निर्माण झाला. ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेनं अनेक घरांवर आधीच राष्ट्रध्वज लहरत होता. शनिवारवाड्याच्या रोषणाईनं गतकाळाचं वैभव या वास्तूला प्राप्त झालं की काय, असंही काहींना वाटू लागलं. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षी शनिवारवाडा उत्सवाचा केंद्रबिंदू झाला...कदाचित्, त्यामागं ऐतिहासिक कारणही असू शकेल.

छत्रपती शिवाजीमहाराजांनी मोगली सत्ता दूर करून स्वायत्त स्वराज्याची निर्मिती केली. शनिवारवाड्याशेजारील लाल महालापासून ते दुर्गराज रायगडापर्यंत स्वराज्याचं वारं दक्षिणेत वाहू लागलं. शिवकाळानंतर अनेक अग्निदिव्ये पार करून हे स्वराज्य साम्राज्याकडे झेपावलं. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर अवघ्या १२ वर्षांत मराठा फौजा दिल्लीत पोहोचल्या. तेथील पातशाह बदलला. बाजीराव पेशवे यांनी माळव्यात आणि बुंदेलखंडात मराठेशाही स्थापन केली. चिमाजी अप्पा यांनी कोकणात फिरंग्यांची सत्ता खिळखिळी केली. हे पराक्रम होत असताना, ता १० जानेवारी १७३० रोजी शनिवारवाड्याची पायाभरणी झाली. आणि, दोनच वर्षांत तेथील प्राथमिक बांधकाम पूर्ण झालं. ‘भोवती मोठा तट बांधू नये,’ ही छत्रपती शाहूमहाराजांची आज्ञा मान्य करून हे काम तेव्हा अर्धंच सोडून दिलं गेलं. बाजीरावांनी येथूनच निघून दिल्लीला धडक दिली. नानासाहेबांच्या काळात मराठा फौजेनं पेशावर ते कावेरीपर्यंत संचार केला.

ब्रिटिशांची राजवट येण्यापूर्वी भारतातील अखेरचं एतद्देशीय साम्राज्य मराठ्यांचंच. देशातील सर्व राजकीय हालचालींचा शनिवारवाडा हा तत्कालीन केंद्रबिंदू. पुणं ही जणू भारताची तत्कालीन राजधानीच. सन १७५२ च्या सुमारास दिल्लीचा पातशाह मराठ्यांचा आश्रित झाला. तेव्हापासून, पानिपतनंतरची काही वर्षं सोडली तर, दिल्लीवर मराठ्यांचंच आधिपत्य होतं. सन १७७१ ते १८०३ या काळात शिंदेशाहीचा ध्वज दिल्लीत लहरत असे. तब्बल दीडशे ते पावणेदोनशे वर्षं भारताच्या इतिहासावर मराठेशाहीचा शिक्का उमटला. ही दिमाखदार वाटचाल सुरू असताना, एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस, आपापसातील यादवीमुळे मराठेशाहीचं तेज कमी होऊन मराठ्यांना ब्रिटिशांकडून पराभव पत्करावा लागला.

बाजीराव रघुनाथ पेशवे यांनी वसईच्या तहावर सही करून पुण्यात आपली सत्ता पुन्हा प्रस्थापित केली; पण ब्रिटिशांची सत्ता झुगारून देणं त्यांना अशक्य झालं. शनिवारवाड्यातून पेशवे शुक्रवारवाड्यात गेले. सन १८१२-१३ मध्ये शनिवारवाड्यातील इमारतीत काही आगी लागल्याच्या नोंदी सापडतात. या थोरल्या वाड्याचं महत्त्व हळूहळू कमी होऊ लागलं होतं. ब्रिटिशांचं आधिपत्य असह्य झाल्यानं बाजीरावांनी पुन्हा एकदा फौज जमा करण्यास सुरुवात केली; पण तोपर्यंत आपापल्या छोट्या स्वार्थांसाठी सरदारांनी राज्याचं हित पाहणं सोडून दिलं होतं. ‘स्वातंत्र्य गेलं...आपला सन्मानही गेला,’ ही खंत बाजीरावांना होतीच; आणि, यातून तिसऱ्या ‘मराठे-आंग्ल’ युद्धाला ता. पाच नोव्हेंबर १८१७ रोजी खडकी इथं तोंड फुटलं. युद्धात यश मिळालं नाही आणि ता. १७ नोव्हेंबरला ब्रिटिश तोफखाना आणि कवायती फौजेसमोर येरवड्याच्या युद्धातही पराभव झाला. जोपर्यंत वाड्यावर जरीपटका लहरत होता तोपर्यंत मराठेशाही अंशतः जिवंत होती. ता १७ नोव्हेंबरला ब्रिटिशांनी पुण्यात प्रवेश केला, नाकाबंदी केली...आणि, सर्वप्रथम जरीपटका उतरवून युनियन जॅक त्या ठिकाणी फडकवला. या एका कृतीनं मराठेशाही संपली आणि भारतीय स्वातंत्र्यही गमावल्याची जाणीव झाली. जून १८१८ मध्ये बाजीराव रघुनाथ अखेर माळव्यात ब्रिटिशांना शरण गेले आणि औपचारिकपणे देशात ब्रिटिशांची सत्ता दृढ झाली.

‘एक बेवारशी अनाथ वास्तू’ असा या थोरल्या वाड्याचा पुढील इतिहास आहे. जिथून भारतखंडाचं राजकारण चालवलं जात असे, तिथं काही मामुली कचेऱ्या, एक तुरुंग आणि मतिमंदांसाठीचं रुग्णालय सुरू करण्यात आलं. येथील वाडे पाडून तेथील लाकडं इतरत्र वापरण्याचा सपाटा ब्रिटिशांनी चालवला. आणि, अवघ्या दहा वर्षांत हा ऐतिहासिक वाडा एका मोठ्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

एका समकालीन पत्रात अशी नोंद सापडते

‘शुII ७ गुरुवारी थोरला वाडा शनवारचा येथे आगीचा उपद्रव होऊन चौसोपी व आरसेमहाल, गणपती रंगमहाल वगैरे दरोबस्त काम जळाले. मोठा प्रलय जाला. आठ दिवस जाले. चुकून पाच-पन्नास खण राहिले. साहेबांनी प्रयत्न केला तथापि उपाय चालला नाही, दोन दिवस आगीचा उपद्रव होता.’

यानंतर शनिवारवाड्याच्या तट व नगारखाना तेवढा शिल्लक राहिला. ज्या प्रांगणात दर दसऱ्याला सैन्याचा सराव होत असे तिथं बटाटे विकले जाऊ लागले. विसाव्या शतकात मात्र इंग्लंडचा राजपुत्र आला तेव्हा इथं थोडी साफसफाई झाली, थोडा जीर्णोद्धारही झाला; परंतु स्वातंत्र्यानंतर केंद्र सरकारच्या पुरातत्त्व खात्यानं केवळ तट जपणं आणि बागबगीचे जपणं एवढंच काम केलं. मात्र, आजही येथील मराठा शैलीची सर्वात मोठी अशी दोन भीत्तिचित्रं उपेक्षित राहिल्यानं खराब होत चालली आहेत. तिकडे लक्ष द्यायला सरकारला सवड झालेली दिसत नाही.

दिल्ली दरवाज्यात पहिलं भीत्तिचित्र आहे ते महाराष्ट्राचं प्रिय दैवत श्रीगणपतीचं, तर दुसरं आहे शेषशायी महाविष्णूचं. शनिवारवाड्याचं चित्र महापालिकेच्या चिन्हावरही झळकतं; पण त्यातील ऐतिहासिक ठेव्याचं हवं तसं जतन पालिका, राज्य आणि केंद्र सरकार यांच्याकडून होताना दिसत नाही. शनिवारवाडा आपल्या इतिहासात एक महत्त्वाचं स्थान भूषवतो. एकेकाळी इथून एका स्वतंत्र देशाचा कारभार केला जात होता. कदाचित्, त्यामुळेच या स्वातंत्र्यदिनी इथं एवढी गर्दी जमली. शिवनेरी, रायगड, शनिवारवाडा

यांसारख्या वास्तूंना भेट दिल्यावर प्रत्येक पिढीला प्रेरणा मिळते. इथं इतिहास घडला. भावी पिढ्यांत राष्ट्रभावना प्रज्वलित करण्यासाठी मराठा साम्राज्याच्या या प्रतीकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कदाचित्, या अमृतमहोत्सवी वर्षी प्रकाशझोतातील रंगांव्यतिरिक्त या भीत्तिचित्रांच्या रंगांनाही उजळ अवस्था लाभेल. कोण जाणे, असं होऊही शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.