ठाण्याच्या एका महिला सदस्यांची मुलगी, पुण्यात राहते. गेल्या काही वर्षांमध्ये स्वतःच्या आईच्या व्यक्तिमत्त्वातला सकारात्मक बदल ती पाहत होती.
डॉ. आनंद नाडकर्णी anandiph@gmail.com
दिवशी दुपारी, गच्च भरलेल्या नाट्यगृहातील उत्साह असा होता की एखाद्या शाळेचा वार्षिकोत्सव असावा. पडद्यामागं लगबग, मेकअप आणि वेशभूषेची धांदल, विंगेतून डोकावून पाहणारे चेहरे! ‘आपली’ माणसे कुठं बसली आहेत ते पाहणाऱ्या नजरा. फरक एवढाच, की स्टेजवरून सादरीकरण करणारे सगळे होते ज्येष्ठ नागरिक आणि त्यांचे ‘पालक’ म्हणून आले होते त्यांच्याबरोबरच्या आणि नंतरच्या पिढ्यांचे सदस्य. कार्यक्रम सुरू झाला गणेशवंदन करून आणि नंतर नंतर असा चढत गेला, विचारू नका. दणदणीत लावणी (Marathi Lavani), खर्डे भारूड, तीस जणांनी गायलेला भीमपलास राग, उत्तम अभिवाचन, संस्कृत आणि जर्मन भाषांमधल्या नाटिका. वार्षिक स्पर्धांमध्ये क्रमांक मिळवलेल्यांचा बक्षीस समारंभ देखील. तुम्ही विचाराल, कुठे भरते ही ‘पाठशाला’?
गेली सहा वर्षे ठाण्यामध्ये ‘सप्तसोपान मनमेंदू संवर्धन केंद्र’ हा उपक्रम आमच्या आयपीएच (Institute for Psychological Health) या संस्थेतर्फे चालवला जातो. ह्या प्रकल्पाची जन्मकथा मोठी मनोरंजक आहे. ‘Active and Healthy Aging’ म्हणजे ‘ऊर्जावान आणि निरोगी वृद्धत्व’ ही कल्पना जगातल्या संशोधकांनी एका जागतिक अभ्यासाद्वारे संशोधनासाठी घेतली. अशा आयुष्याचा दर्जा मापन करणारं एक उपकरण (स्केल) तयार करताना भारतासाठीचा विदा (डेटा) तयार करून त्याचं पृथक्करण करण्याची जबाबदारी आमच्या संस्थेच्या संस्थापक-विश्वस्त आणि मानसशास्त्रज्ञ (Psychologist) डॉ. शुभा थत्ते यांच्यावर सोपवण्यात आली. त्या स्वतःच खरं तर लयबद्ध ज्येष्ठत्वाचं एक चालतंबोलतं उदाहरण. अडीच तीन वर्षे चाललेल्या ह्या शोधअभ्यास पाहणीमधून हाताला लागलेलं सत्य असं होतं, की आनंदी वृद्धत्वाच्या एक नव्हे तर पाच किल्ल्या आहेत.
स्थिर शारीरिक स्वास्थ्य (आजार-व्याधी असतानाही), नियमित जीवनपद्धती, कौटुंबिक आधार व्यवस्था, सामाजिक मैत्रीसमूह (Friendship Network) आणि नवं नवं शिकण्याची क्षमता जागृत ठेवणं आणि जोपासणं असे हे पाच पैलू. आमच्या असं लक्षात आलं, की यातील पाचव्या पैलूला न्याय देणारी, रचना आणि व्यवस्था आपल्याकडं नाही. सामाजिक मैत्रीसमूहासाठी, ज्येष्ठ नागरिक संघ आहेत. त्यांच्यातर्फे होणारे ‘इव्हेंट्स’ आहेत. शारीरिक स्वास्थ्य आणि जीवनशैलीचे मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ आहेत. डॉक्टर्सपासून योगशिक्षक आणि फिजिओथेरपिस्टपासून ध्यानधारणा शिकवणारे शिक्षक... पण नव्या ज्ञानार्जनासाठी ‘सततचे शिकणं’ हा पैलू मात्र त्या त्या व्यक्तीवरच सोडून दिला आहे.
‘शिकणं’ म्हणजेच ‘आनंददायी शिक्षण? ते बाल वयापर्यंत का मर्यादित ठेवायचं? ‘दुसऱ्या’ बालपणाचीसुद्धा ती गरज आहेच की. तर मग आपण ज्येष्ठजनांची ‘पाठशाळा’ का नाही काढायची. अगदी विषयवार. त्यात भाषा असतील, कला असतील, खेळ असतील, नवीन कौशल्यं असतील. नवा छंद असेल. शिक्षक आणि अभ्यासक्रम असेल. आयुष्यभर, मेंदूमधले जे ‘मार्ग’ भरपूर वापरले गेले ते नाही वापरायचे. समजा, एक ताई सेवानिवृत्त झाल्या भाषाशिक्षक म्हणून तर त्यांनी ब्रिज शिकायचा, ओरिगामी शिकायची, नृत्य शिकायचं. ज्यांची अकाउंटंट म्हणून हयात गेली त्यांनी नवी भाषा, सुगम संगीत आणि नाट्यअभिवाचन शिकायचं. निदान तीन तरी नव्या पायवाटा मेंदूमध्ये तयार व्हायला हव्यात. आणि किमान सहा महिने शिकायचं. गोडी लागली तर अधिक विषय घ्यायचे. त्याच विषयांच्या खोलात जायचं.
प्रवेश घेताना आणि सहा महिन्यांनंतर, मनमेंदूची चाचणी घ्यायची. त्यासाठीचे ‘स्केलस्’ आहेतच. आम्ही पंधरा ते वीस विषयांच्या वर्गांची यादी केली. शिक्षक शोधायला सुरुवात केली. प्रश्न होता जागेचा. राज्य सरकारच्या, सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे, एक परिसर आम्हाला वापरण्यासाठी मिळाला. त्यासाठी तत्कालीन लोकप्रतिनिधींनी खूपच मदत केली आणि सुरू झालं, सप्तसोपान मनमेंदू संवर्धन केंद्र. मोठ्या उमेदीनं मंडळी जमू लागली. ऊर्वी कर्णिक या आमच्या सहकारी मानसशास्त्रज्ञ मुलीनं या साऱ्या आजी-आजोबांना आपलेसं केलं. कोरोना महामारीच्या कालातही यातील अनेक ‘शिकवण्या’ ऑनलाइन सुरू राहिल्या. तो काळ संपला तशी या केंद्राची दुसरी शाखा ठाण्याच्या घोडबंदर रोडवर सुरू झाली. तिथेही प्रशिक्षक येऊ लागले. ज्येष्ठ नागरिक जमू लागले. वर्ग सुरू झाले.
ठाण्याच्या एका महिला सदस्यांची मुलगी, पुण्यात राहते. गेल्या काही वर्षांमध्ये स्वतःच्या आईच्या व्यक्तिमत्त्वातला सकारात्मक बदल ती पाहत होती. आमच्या संस्थेच्या, पुण्याच्या केंद्रात भेटली तेव्हा, ही व्यवसायानं वकील, गौरी नातू मला म्हणाली, “डॉक्टर, पुण्यामध्ये आपण असं केंद्र का नाही काढत?” मी सहजपणे म्हणालो, “तू जबाबदारी घेत असशील तर नक्की काढू.” हा संवाद हवेमध्ये विरला नाही. गौरीचा स्नेह होता तो निवारा वृद्धाश्रम या पुण्यातील दीडशे वर्षे जुन्या संस्थेबरोबर. तिनं ही कल्पना संस्थेच्या अध्यक्षांना आणि विश्वस्तांना सांगितली. त्यांच्याबरोबर माझी पहिली भेट झाली आणि दोन्ही संस्थांचे सूर जुळले.
ठाण्याचे सप्तसोपान तर पुण्याचे ‘निवारा सुखसोपान.’ निवारा संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी या प्रकल्पाला अगदी घरचं कार्य म्हणून स्वीकारलं. एवढंच काय पण जेव्हा उपक्रमासाठी लागणारा निधी उभा करण्याची वेळ आली, तेव्हा प्रकल्प देणगी किंवा अन्य आर्थिक मदत मिळेपर्यंत आर्थिक भारही उचलला. इथंही विविध विषय शिकवणाऱ्या वीस स्वयंसेवी प्रशिक्षकांची टीम तयार झाली. पुण्याच्या मध्यभागात निवाराचा अगदी नयनरम्य परिसर आहे. सहा वर्षांपूर्वी आम्ही सप्तसोपान प्रकल्पाचं उद्घाटन केलं होतं ते वीणाताई गवाणकर आणि डॉ. रवीन थत्ते या ‘रोल मॉडेल्स’च्या बरोबरच्या गप्पांनी.
सुखसोपानच्या उद्घाटनासाठी पुन्हा एकदा वीणाताई तर आल्याच आणि त्यांच्याबरोबर होते एमकेसीएलचे विवेक सावंत आणि प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी. कार्यक्रम दणक्यात पार पडला आणि चार महिन्यांमध्ये सभासद संख्या शंभराच्या घरात पोहोचली आहे. होळीच्या निमित्तानं मंडळी ‘रंगांशी हितगुज’ करून चित्रं काढताहेत. नववर्षाचं स्वागत करायला चक्क लेझीमचा वर्ग सुरू झाला आहे.
नवशिक्षणाची द्वारे खुली झाल्यावर माणसांमध्ये पडणारा फरक आम्ही हरघडी अनुभवत आहोत. जणू थबकलेल्या जगण्याला प्रवाहीपण मिळत आहे. आयुष्याचा हेतू नव्यानं गवसत आहे. ब्रिज, कॅरम, बुद्धिबळ सारखे खेळ असतील, तर इथं त्याचं पद्धतशीर प्रशिक्षण असतं. हे फक्त छंदवर्ग नव्हेत. ठाण्यातील आमच्या अभिवाचन शिकणाऱ्या सदस्यांनी, मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या खुल्या स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसे पटकावली. ठाण्याचा गट तर त्यांचं स्वतःचं ‘ई-त्रैमासिक काढू लागला आहे. या प्रवासात शिकणारे अनेकदा शिकवणारे सुद्धा होत आहेत. महत्त्वाचे तत्त्व असं, की हे ‘मॉडेल’ भारतामध्ये कुठंही राबवता येण्यासारखं आहे. पण त्याला असलेला शास्त्रीय पाया प्रत्यक्षात आणायला मनमेंदू आरोग्यक्षेत्रातील व्यावसायिकांनी सुद्धा आपला सहभाग देणं गरजेचं आहे आणि तरुण पिढीनं आपला सेवाभाव व्यक्त करण्यासाठी अशा प्रकल्पांचं नियोजन करायचं आहे. नाशिक शहरात असलेली आमची आय.पी.एच. माइंडलॅब आणि तिथं कार्यरत असा मेमरी क्लब एकत्र येऊन लवकरच सुरू करत आहेत, ‘स्नेहसोपान’ या उपक्रमाला.
नाटकाच्या भाषेत बोलायचं तर ‘संध्याछाया’मधल्या वृद्धत्वाकडून आपण ‘संज्याछाया’च्या ऊर्जावान ज्येष्ठ जनांपर्यंत आलो आहोतच. नाटकामध्ये दाखवलेलं ते चित्र प्रत्यक्षात जगण्यासाठी, नवशिक्षणाधिष्ठित प्रकल्पांची गरज आहे. ज्येष्ठ जनांसाठीच्या नियमित ‘प्रशिक्षण पाठशाला’ तयार होणं यामध्ये, शैक्षणिक धोरणाचं Natural Extension तर आहेच पण या वयातल्या मन-मेंदूची आघात सहन करण्याची तितिक्षा वाढवण्यासाठी सुद्धा असं शिस्तबद्ध, शास्त्रीय आणि तरीही धमाल उपक्रम व्हायला हवेत. युरोपामध्ये पानगळीचा ऋतू (शिशिर, ऑटम) सुरू होतो आणि हळूहळू हिवाळ्याकडं सरकायला लागतो. काही दिवसांसाठी एक चमत्कार घडतो. हिवाळ्याला चकवा देऊन वसंताचीच चाहूल लागते. पशुपक्षी आणि झाडंही भांबावतात. पण या निर्मितीच्या लाटेबरोबर जुळवून घेतात. काही काळच चमक दाखवणाऱ्या या काळाला म्हणतात ‘इंडियन समर’ अर्थात शिशिरामधला वसंत. याच शीर्षकाचा एक नितांतसुंदर लेख, वि. द. घाटे ह्यांनी लिहिला आहे. सप्तसोपानच्या सहाव्या वर्धापन समारंभामध्ये मी या लेखाचा संदर्भ दिला.
हा मजकूर लिहिताना, विवेक सावंतांचा उल्लेख आला म्हणून त्याला फोन केला. तर त्यानं वि. द. घाट्यांचे त्यानं जवळून पाहिलेले अनुभव सांगितले. त्यांच्या जवळचे सारे कुटुंबीय-मित्र त्यांना ‘दादा’ म्हणायचे. दादा त्यांचा ‘इंडियन समर’ मनोमन जगले. नियमित पत्ते खेळायचे. विदुषी इरावती कर्वे या त्यांच्या ‘भावविश्वस्त’ होत्या. जयवंत कुलकर्णी यायचे तर त्यांच्याकडून, ‘मायेच्या मळ्यामंदी कोण ग उभी’ म्हणून घ्यायचे. त्यांना, चोरपावलांनी येणाऱ्या ‘ग्लॉकोमा’ या दृष्टिआजाराची चाहूल लागली, तेव्हा त्यांनी त्यावरही एक ललित-लेख लिहिला होता. थोडक्यात ‘शिशिरामध्ये वसंत’ फुलवणाऱ्यांची सुद्धा एक परंपरा होती आणि आहे. म्हणून मेंदुविज्ञानाची चौकट देऊन या परंपरेला एका विधायक शैक्षणिक जनचळवळीचं स्वरूप द्यायचं आहे. कुडकुडणाऱ्या हिवाळ्यामधल्या ऊबदार क्षणांची बेगमी आतापासूनच करायला हवी नाही का! (सप्तसोपान, सुखसोपान उपक्रमातील सहभाग तसेच अधिक माहितीसाठी लेखकाशी ई-मेलवर संपर्क साधावा.)
(लेखक हे विख्यात मनोविकारतज्ज्ञ, विचारवंत, नाटककार, संगीतकार, कवी, चित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.