भीम जयंतीने दिली वेगळी ओळख

दादा प्रल्हाद शिंदे, विठ्ठल शिंदे, विठ्ठल उमप, वामनदादा कर्डक या दिग्गजांनी बाबासाहेबांची अनेक अजरामर गीते गायली आहेत. त्यांचा वारसा मी पुढे न्यायचा प्रयत्न केला.
Anand Shinde will always be alive till Bhim Jayanti
Anand Shinde will always be alive till Bhim Jayantisakal
Updated on
Summary

दादा प्रल्हाद शिंदे, विठ्ठल शिंदे, विठ्ठल उमप, वामनदादा कर्डक या दिग्गजांनी बाबासाहेबांची अनेक अजरामर गीते गायली आहेत. त्यांचा वारसा मी पुढे न्यायचा प्रयत्न केला. अनेक गाणी आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी लिहून घेतली आणि ती गायली. त्यातील अनेक गाण्यांशिवाय भीम जयंती पूर्णच होत नाही. त्यामुळे भीम जयंती असेल तोपर्यंत आनंद शिंदे कायम जिवंत असेल.

आंबेडकर जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर कार्यक्रम व्हायचे. त्यासाठी गावोगावी फिरायचो. रात्री प्रवास दिवसा कार्यक्रम, कधी दिवसा प्रवास रात्री कार्यक्रम, असा दिनक्रम असायचा. आरामासाठी किंवा झोपण्यासाठी वेळ काढावा लागत असे. प्रवासामध्येच आराम करावा लागायचा. एक एप्रिलपासून सुरू होणारा दौरा साधारणत: ११ जूनपर्यंत चालायचा. कुठे छोटे, कुठे मोठे कार्यक्रम व्हायचे. त्याप्रमाणेच स्टेजची रचना असायची; मात्र त्यावर कार्यक्रम करण्याची मजा काही औरच होती.

आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमामध्येच अनेक अजरामर गीते तयार झाली आहेत. नवीन गाणी लिहिली जायची. चाली लावल्या जायच्या. ती गाणी लाईव्ह सादर केली जायची. गाणं प्रेक्षकांना आवडलं तर ते गाणं रेकॉर्ड केलं जायचं. लोकांच्या शिट्ट्या आणि टाळ्यांसह वन्स मोर आला की समजून जायचं की गाणं हिट आहे.

साधारणत: १९८१ पासून आम्ही भीम गीते, कव्वाली, जलसा असे कार्यक्रम करीत आहोत. अनेकदा एकाच दिवशी दोन ते तीन कार्यक्रमदेखील असायचे. धावपळ व्हायची; पण प्रत्येक कार्यक्रम वेगळा कसा होईल याची काळजी घ्यायचो. वाजंत्री, कोरस यांची वेगवेगळी टीम बनवायचो. कोणत्या कार्यक्रमात कोणती गाणी गायची, हेही ठरवायचो. त्यामुळे येणाऱ्या प्रेक्षकांनाही प्रत्येक कार्यक्रम वेगळा वाटायचा.

अनेक गावांतून बोलावणं यायचं. सगळीकडेच जाणं शक्य नसायचं. काहींना नकार द्यावा लागायचा. लोक नाराज व्हायचे. त्यावेळी दौरे करणं इतकं सोपं नव्हतं. प्रवासाची मुबलक साधनं नव्हती. आयोजकांकडेही फारसं आर्थिक भांडवल नसायचं. आम्हा कलाकारांनाही खूप कमी पैसे मिळायचे. आंबेडकर जयंती असल्याने आम्हीदेखील पैशांसाठी आग्रही नसायचो.

जयंतीसाठी आवश्यक भीमगीतं बनवण्याचे काम वर्षभर सुरू असायचं. त्यासाठी वादकांची वेगळी टीम तयार केली होती. यात फक्त प्रसिद्धच नाही तर अगदी नवखे कलाकारदेखील होते. मी कुणाचाही चेहरा बघून कधीच गाणं घेतलं नाही. बाबासाहेबांचं जे गाणं मला भावतं ते मी आवर्जून गातो; गीतकार, संगीतकार कुणीही असो. प्रबोधनात्मक गाणी मी अधिक पसंत करायचो. पूर्वी रात्रभर कार्यक्रम व्हायचे. आता सरकारी निर्देशांमुळे साधारणत: तीन तासांचे कार्यक्रम करतो. कव्वाली प्रकारातील बाबासाहेबांची गाणी मला विशेष आवडतात. त्यात हिंदी, मराठी गीतांचा समावेश असतो. गिरीराज पवार, हरेंद्र जाधव, वामनदादा कर्डक, विठ्ठल शिंदे, मनवेल गायकवाड, रमेश वाकचौरे, चंद्रकांत निरभवणे, बन्सी भैय्या साळवे, मधुकर पाठक यांसारखे अनेक दिग्गज त्यावेळी माझ्या सोबत होते. गिरीराज पवार हा १७ वर्षीय तरुण गीतकार त्यावेळी विविधांगी गाणी लिहायचा. त्यांनी ‘येणार बाई, बॅरिस्टर साहेब माझा’ हे गाणं लिहून दाखवलं. मला ते आवडलं. आम्ही ते गाणं केलं. या गाण्यामुळे गिरीराज यांचीदेखील गीतकार म्हणून ओळख झाली. अशी अनेक गाणी उदयास आली.

सोनियाची उगवली सकाळ, चला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हा रे, मै भीमका दिवाना हू, लाल दिव्याच्या गाडीला अशी असंख्य गीते आहेत, जी प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहेत. मला प्रत्येक कार्यक्रमात ही गाणी आजही गावी लागतात. या गाण्यांशिवाय भीम जयंती पूर्णच होत नाही. जेव्हा जेव्हा भीम जयंती येते तेव्हा तेव्हा माझी गाणी वाजवली जातात. त्यामुळे भीम जयंती असेल तो पर्यंत आनंद शिंदे कायम जिवंत असेल. एक नवीन ओळख मला या भीम गीतांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()