सेलिब्रिटींच्या आठवणी...

उत्तम सिंग यांनी माझी इलय राजा यांच्याशी भेट घालून दिली. त्यावेळी उत्तम सिंग म्हणाले की, ‘यह आनंद, हमारे महाराष्ट्र का दलेर मेहंदी है’. इलय राजा यांनी माझ्या गाण्याचं खूप कौतुक केलं आणि...
सेलिब्रिटींच्या आठवणी...
Updated on
Summary

उत्तम सिंग यांनी माझी इलय राजा यांच्याशी भेट घालून दिली. त्यावेळी उत्तम सिंग म्हणाले की, ‘यह आनंद, हमारे महाराष्ट्र का दलेर मेहंदी है’. इलय राजा यांनी माझ्या गाण्याचं खूप कौतुक केलं आणि...

उत्तम सिंग यांनी माझी इलय राजा यांच्याशी भेट घालून दिली. त्यावेळी उत्तम सिंग म्हणाले की, ‘यह आनंद, हमारे महाराष्ट्र का दलेर मेहंदी है’. इलय राजा यांनी माझ्या गाण्याचं खूप कौतुक केलं आणि म्हणाले की ‘आपकी आवाज और गाणे का अंदाज मुझे बहुत पसंद है..’ इलय राजा यांच्यासारख्या अष्टपैलू संगीतकारांनी माझ्या पाठीवर मारलेली कौतुकाची थाप हे माझ्या आजही स्मरणात आहे.

‘माझा नवीन पोपट...’ हा अल्बम त्यावेळी चांगलाच गाजला झाला होता. या गाण्याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’नेदेखील घेतली होती. या गाण्याला आणि माझ्या गायकीला त्यावेळी एवढी प्रसिद्धी मिळाली, की दादा कोंडके यांना त्यावेळी गोल्डन, तर मला प्लॅटिनम डिस्क मिळाली होती. ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी यांच्या हस्ते माझा गौरव करण्यात आला होता. त्यावेळी लाहिरी यांनी माझ्यासाठी काढलेले गौरवोद्गार माझ्या आजही स्मरणात आहेत. ‘महाराष्ट्र का मायकल जॅक्सन’, अशा शब्दांत त्यांनी माझे कौतुक केले.

रिएलिटी शोजला त्यावेळी नुकतीच सुरुवात झाली होती. असाच एक ‘जलसा’ नावाचा कार्यक्रम टीव्हीवर यायचा. त्यात प्रसिद्ध संगीतकार आनंदराज आनंद हेदेखील प्रमुख पाहुणे म्हणून होते. एके दिवशी त्यांनी मला या कार्यक्रमासाठी बोलावलं होतं. या कार्यक्रमाला मी गेलो तेव्हा मला हे आश्चर्याचा धक्काच बसला. प्रसिद्ध सुफी गायक राहत फतेह अली खानदेखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. माझी ओळख करून देताना आनंद राज आनंद यांनी ‘महाराष्ट्र का राहत फतेह अली खान’, अशी माझी ओळख करून दिली. अगदी मनापासून प्रेमाने त्यांनी माझं स्वागत केलं. माझ्याशी छान गप्पा मारल्या. ‘आपके वालीद के गाने भी हम बहोत बार सून चुके है’, असे त्यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रातील म्हणा किंवा शिंदे परिवारातील म्हणा, गाणे अगदी पाकिस्तानपर्यंत ऐकली जातात, याचं मला खरंच कौतुक वाटलं.

दक्षिणेकडील नामवंत संगीतकार इलय राजा यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली. त्यांच्यासाठी मी ‘हॅलो जय हिंद’ या चित्रपटासाठी एक गाणं गायलं. संगीतकार उत्तम सिंग हे या चित्रपटाचे अरेंजर होते. आम्ही जेव्हा गाण्याच्या सेटिंगसाठी भेटलो, त्यावेळी उत्तम सिंग यांनी माझी इलय राजा यांच्याशी भेट घालून दिली. त्यावेळी उत्तम सिंग म्हणाले की, ‘यह आनंद, हमारे महाराष्ट्र का दलेर मेहंदी है’. इलय राजा यांनी माझ्या गाण्याचं खूप कौतुक केलं आणि म्हणाले की ‘आपकी आवाज और गाणे का अंदाज मुझे बहुत पसंद है..’ इलय राजा यांच्यासारख्या अष्टपैलू संगीतकारांनी माझ्या पाठीवर मारलेली कौतुकाची थाप हे माझ्या आजही स्मरणात आहे.

‘टी-सीरिज’चे मालक गुलशन कुमार यांचाही माझ्यावर भारी जीव होता. त्यांच्यासोबत मी अनेक अल्बम केले, अनेक गाणी गायली आहेत. गुलशन कुमार नेहमी म्हणायचे, ‘‘आपकी आवाज सिर्फ महाराष्ट्र की आवाज नही है, आपकी आवाज देश की आवाज है, आप मेरे साथ दिल्ली चलो, आप वहापेही रहो. हम बहुत सारे अलग अलग भाषाओके गीत रेकॉर्ड करेंगे’’. त्यावेळी त्यांनी माझ्यासाठी राहण्याचीही व्यवस्था केली. इतकेच नव्हे, तर माझ्या मुलांचा दिल्लीतील शाळेत प्रवेशही निश्चित केले होते. यादरम्यान त्यांनी माझ्याकडून अनेक गाणी गाऊन घेतली. ‘तूतक तूतक तूतिया’सारखं पंजाबी गाणंदेखील फार गाजलं; मात्र कॅसेटवर त्यावेळी गुलशन कुमार यांनी माझं नाव आनंद शिंदेऐवजी आनंद शिंदिया असं लिहिलं होतं. त्यांना म्हणालो, ‘साहाब, मेरा नाम तो गलत छप गया..’ ते म्हणाले की, ‘नही.. मैने जानबूजकर किया है, आप मराठी हो यह बात किसी को पता ना चले... यहॉं के सुननेवालो को भी लगे की आप यहींके हो, यह मेरा प्रयास है’; मात्र मी ते नम्रपणे टाळलं. मी म्हटलं, ‘नहीं साहाब, माझे जे नाव महाराष्ट्रात आहे, तेच कायम राहावं. माझं नाव आनंद शिंदे असंच लिहावं’. त्यांनी माझं म्हणणं नम्रपणे स्वीकारलं.

सोनू निगम आणि माझ्यात खूप चांगलं मैत्रीचं नातं आहे. सोनू निगम मला गुरुस्थानी मानतो. एकदा फार गमतीशीर प्रसंग घडला होता. गुलशन कुमार यांचं लग्न होतं. त्या लग्नासाठी मीही माझ्या मुलांना घेऊन गेलो होतो. त्यावेळी माझ्या मुलांना सोनू फार आवडायचा. कारण त्यावेळी सोनूची बरीच गाणी हिट झाली होती. टी-सीरिजसाठी मी आणि सोनू यांनी अनेक अल्बम केले होते. सोनूला लग्नामध्ये बघताच माझा मुलगा उत्कर्ष प्रचंड खूश झाला. त्याने धावत जाऊन सोनूच्या पाया पडून आशीर्वाद घेतला; मात्र सोनू माझा आशीर्वाद घेण्यासाठी वाकला, हे बघून उत्कर्षला फार आश्चर्य वाटलं. सोनूच्या ही बाब हे लक्षात येताच त्याने उत्कर्षला सांगितलं की ‘अरे आपके पास तो पूरा म्युझिकका युनिव्हर्सिटी पडा है, आपको मेरे पैर छूने की बिल्कुल जरूरत नही’. सोनूसोबत अशा अनेक आठवणी आहेत.

अभिनेता गोविंदा आणि माझी मैत्री साधारणत: १९८० पासूनची आहे. आजही आम्ही एकमेकांच्या चांगले संपर्कात आहोत. गोविंदा, जॉनी लिव्हर, सुदेश भोसले, माझा भाऊ मिलिंद यांच्यासोबत आम्ही अनेक शोज केले. या मैत्रीमुळेच गोविंदाच्या ‘हत्या’ या चित्रपटांमध्ये जॉनी लिव्हरने लोहाराचं काम केलं आहे. हे काम करताना त्याने ‘माझा नवीन पोपट हा..’ हे गाणं गुणगुणलं आहे. हादेखील आमच्या मैत्रीचा एक धागा आहे. गोविंदासोबतच्या या मैत्रीमुळेच माझा मुलगा आदर्श शिंदे याच्या ‘नंदू नटवरे’ या चित्रपटासाठी मी गोविंदाची भेट घेतली होती. या चित्रपटासाठी त्यांनी एक गाणं करावं असं, मी त्यांना सांगितलं. ‘कुछ प्रॉब्लेम नहीं’, असं म्हणत त्यांनी मला तात्काळ होकार कळवला. त्यांच्यामुळे आता गोविंदासारखा हिंदीतला सुपस्टार पहिल्यांदाच मराठी चित्रपटात दिसणार आहे.

माझ्या आवडत्या गायकांमध्ये सुखविंदर सिंग यांचेदेखील नाव आहे. गायक म्हणूनच नव्हे, तर सुखविंदर मला माणूस म्हणूनही आवडतो. त्यालाही माझा आवाज आणि गाणं खूप आवडतं. सुखविंदर आणि मी टी-सीरिजसाठी अनेक गाणी रेकॉर्ड केली. सुखविंदर सिंग यांचं स्वतःचं हनुमान मंदिर आहे. त्या मंदिरात दरवर्षी एक भव्यदिव्य कार्यक्रम होतो. त्यासाठी ते मला आवर्जून बोलावतात. तिथे मी अनेकदा गाणी गायलेलो आहे. आमच्यातील ऋणानुबंध सुरांच्या माध्यमातून घट्ट विणल्या गेले आहे.

प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य हा तर माझ्या कुटुंबातील सदस्याप्रमाणेच आहे. आमच्या ‘नंदू नटवरे’ या चित्रपटाविषयी मी त्यांना भेटायला गेलो होतो. मी म्हणालो की, या चित्रपटासाठी एक गाणं तुम्ही करा. ते म्हणाले, एक गाना नही सारी फिल्म मैं करुंगा, असं सांगत त्याने संपूर्ण चित्रपट करायची तयारी दर्शवली. गणेश यांनी अनेकदा माझ्या मुलांना सांगितलं की, ‘तुमच्या पप्पांच्या गाण्यावरच मी नाचायला शिकलो. आम्ही गावांकडे असताना अनेकदा झाडावर मोठमोठे भोंगे लावून त्यांची गाणी ऐकत आलोय. त्यामुळे मी केवळ त्यांचा मित्रच नाही तर फार मोठा फॅनदेखील आहे’. गणेशप्रमाणेच शाहिद कपूर यांचादेखील माझ्यावर फार प्रेम आहे. या प्रेमाखातर मी त्यांच्यासाठी हिंदी चित्रपटात एक गाणंदेखील गायलं आहे.

सचिन पिळगांवकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची माझ्याशी चांगले मैत्री होती. माझ्या आयुष्यात त्यांना एक वेगळंच स्थान आहे. सचिन यांनी माझ्या प्रेमाखातर मला संपूर्ण फिल्मसिटी दाखवली. लक्ष्मीकांत बेर्डे आणि आनंद शिंदे हे तर एक वेगळंच समीकरण आहे. माझा आवाज अगदी चपखलपणे कुणाला सूट होत असेल, तर तो लक्ष्मीकांत बेर्डे यांना. त्यांच्यासाठी मी गायलेली अनेक गाणीदेखील गाजली; मात्र लक्ष्मीकांत यांनी अकाली एक्झिट घेतल्याने मनाला खूप वेदना झाल्या. त्यांच्या निधनाची बातमी मला समजली, त्यावेळी ‘अरे माझा हिरो गेला’, असे शब्द माझ्या तोंडून बाहेर पडले. लक्ष्मीकांत यांच्यानंतर भरत जाधव यांच्यासाठी गाणी गायचा योग आला. त्यांच्यावरदेखील माझा आवाज अगदी सूट होत असल्याचे त्यांनी अनेकदा मान्य केले आहे.

अजय-अतुल यांची आठवण तर लईच भारी आहे. अजय-अतुल यांना एक गाणं माझ्याकडूनच रेकॉर्ड करून घ्यायचं होतं; मात्र त्यांचा माझ्याशी संपर्क होत नव्हता. साधारणतः सहा महिने ते माझा शोध घेत होते. त्यांचा माझ्याशी संपर्क होत नव्हता. एके दिवशी मी नातू आल्हादला घेऊन गार्डनमध्ये फिरत होतो. त्यावेळी अजय-अतुल यांनी मला पाहिले आणि माझ्याकडे धावत आले. ‘अहो आनंदजी, आम्ही तुम्हाला गेली सहा महिने शोधतोय; मात्र तुमच्याशी संपर्क काही होत नव्हता. आम्ही एक गाणं बनवलं आहे आणि आमची इच्छा आहे की ते तुम्ही गावं..’ त्यावेळी मी दौऱ्यावर जाणार होतो. माझ्याकडे वेळ नव्हता. ते म्हणाले, ‘काही हरकत नाही, तुम्ही दौऱ्यावर जाऊन या; आपण नंतर रेकॉर्ड करू. पण आम्हाला हे गाणं तुमच्याच आवाजात रेकॉर्ड करायचं आहे.’ ते गाणं होतं ‘कोंबडी पळाली...’ आणि पुढे गाण्याचा इतिहास आपण सर्व जाणताच. अजय-अतुल यांच्याविषयी मला एक गोष्ट सांगावं वाटतं की त्यांनी माझ्या आवाजासोबत अनेक प्रयोग केले. माझा आवाज त्यांना खूप आवडतो. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची गाणी त्यांनी माझ्याकडून गाऊन वेगवेगळे प्रयोग केले.

माझे वडील प्रल्हाद शिंदे यांच्यानंतर संगीत क्षेत्रातील माझ्या गुरुस्थानी आहेत, ते ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर. त्यांचा गोल्डन आवाज मला फार भावतो. ज्यावेळी माझी बायपास सर्जरी करण्याचे ठरले, त्यावेळी मी प्रचंड तणावात होतो. खरंतर शस्त्रक्रियेला मी अक्षरशः घाबरलो होतो. शस्त्रक्रियेनंतर मी गाऊ शकेन की नाही ही शंका माझ्या मनात होती. त्यामुळे मी शस्त्रक्रिया करायला टाळत होतो. ज्यावेळी ही बाब मुलांना समजली, त्यांनी तात्काळ सुरेश वाडकर यांना सांगितले. त्यांनी सांगितलं की, ‘तुम्ही काही चिंता करू नका, मी आनंदशी बोलतो’. थोड्याच वेळात त्यांनी मला फोन केला आणि म्हणाले, ‘आनंद, तू घाबरू नकोस. ही शस्त्रक्रिया करून घे. तू लवकर ठणठणीत बरा होऊन पुन्हा एकदा त्याच जोशात गाशील...’ सुरेशजींच्या एका फोनमुळे मला मोठा धीर मिळाला आणि मी शस्त्रक्रियेसाठी तयार झालो. केवळ मराठीच नव्हे, तर हिंदीबरोबर अनेक भाषेतील संगीत क्षेत्रातली मान्यवरांशी माझे ऋणानुबंध आहेत आणि त्यामुळेच मला वेगळ्या रंगाची, वेगळ्या ढंगाची गाणी गाण्याची संधी मिळाली. त्यांचा मी शतशः ऋणी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()