पुण्यातील मंडई पूर्वी शनिवारवाड्यासमोरील पटांगणात भरायची. ब्रिटिशांच्या काळात त्यांनी गावठाणात मंडईची इमारत बांधली, तीच आजची ‘महात्मा फुले मंडई’.
- अंजली कलमदानी
मंडईतून ताज्या भाज्या आणणं, निगुतीनं स्वयंपाक करणं आणि कुटुंबानं त्याचा आस्वाद घेणं हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. दोन-तीन दिवसांनी एकदा भाजीमंडईच्या रंगीबेरंगी दुनियेची फेरी भरपूर आनंद देणारी असते.
आपल्या हवामानाला अनुसरून मंडई भरते ती मोकळ्या जागेत. पुण्यातील मंडई पूर्वी शनिवारवाड्यासमोरील पटांगणात भरायची. ब्रिटिशांच्या काळात त्यांनी गावठाणात मंडईची इमारत बांधली, तीच आजची ‘महात्मा फुले मंडई’.
त्याच वेळी कॅन्टोन्मेंट भागात असणाऱ्या ब्रिटिशांच्या वस्तीला सोईचं जावं म्हणून सदर बाजाराच्या जवळ आजच्या शिवाजी मार्केटची उभारणी केली. मंडईसाठी भली मोठी इमारत बांधण्याची प्रथा आपल्याकडे नव्हती;
परंतु राजकीय व सांस्कृतिक वर्चस्व वास्तूच्या प्रभावी व चिरस्थायी माध्यमातून दाखवण्याची राज्यकर्त्यांची पद्धत होती. ब्रिटिशांनी त्याचा पुरेपूर फायदा उठवला, तसंच धूळ व उष्मा यांच्यापासून संरक्षण मिळालं. ब्रिटिशांना लागणारे विशिष्ट पाश्चिमात्य पदार्थ इथं उपलब्ध होऊ लागले. मांसविक्रीचा वेगळा भाग असल्यामुळे तीसुद्धा सोय झाली.
लेफ्टनंट जनरल रॅास व लेफ्टनंट जनरल डुकॅट यांनी रेखांकित केलेली शिवाजी मार्केटची इमारत १८८५ मध्ये बांधली गेली. गफार बेग रस्त्यावर असलेली ही मंडई ब्लंडेल रस्ता व सलढाणा गल्लीनं वेढलेली आहे. पुण्याच्या लष्कर भागात दोन प्रकारची वस्ती आहे. लष्कराचा राखीव भाग, ज्यामध्ये लष्करातील वस्ती व कचेऱ्या आहेत.
हा भाग विरळ वस्तीचा व भरपूर हिरवाई असलेला आहे. लष्करातील दुसरा भाग हा दाट वस्तीचा असून शिवाजी मार्केट दाट वस्तीत; परंतु विरळ वस्तीच्या जवळ आहे. पुण्याच्या ---मध्यपूर्वे---
कडे असलेल्या या मंडईचं वैशिष्ट्य म्हणजे, तिच्याभोवती वेढलेल्या विविध धर्मांच्या, प्रांतांच्या, स्तरांच्या खवय्यांसाठी अतिशय सोईची अशी ही जागा आहे. गेली १३६ वर्षं सभोवती राहणाऱ्या पुणेकरांना त्यांच्या गरजेच्या जिनसा पुरवण्यात यशस्वी ठरलेल्या शिवाजी मार्केटमध्ये आणि तिथं येणाऱ्या ग्राहकांमध्ये एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं आहे.
व्हिक्टोरियन काळात बांधल्या गेलेल्या मंडईच्या इमारतीत गॉथिक, मुघल व मराठी अशा सर्व शैलींची सरमिसळ पाहायला मिळते. ३७ हजार २५० चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या इमारतीची जमिनीवरील व्याप्ती दोन चौकोनांमध्ये विभागली आहे. एका चौकोनात मध्यवर्ती चौकाभोवती मांसाहाराचा स्वतंत्र विभाग आहे.
दुसऱ्या चौकोनात भाज्या, फळं, किराणा असे विविध गाळे आहेत. एकमजली इमारतीचा जमिनीवरील पसारा जास्त असला तरी दूर अंतरावरून नजरेत भरेल असा इमारतीचा लक्ष वेधून घेणारा भाग नसूनही ही इमारत या भागातील एक महत्त्वाची खूण किंवा लँडमार्क ठरली आहे ती तिच्या उपयोगामुळे. वास्तुकलेचे अद्वितीय, नजरेत भरण्याइतकं तिचं भव्य असं वेगळेपण नाही.
सेंट झेवियर चर्चसमोरच मंडईची इमारत असल्यामुळे शैलीमध्ये साधर्म्य राखण्याचा प्रयत्न केला गेला आहे. खांडकी दगडातील बांधकामात गॉथिक शैलीच्या कमानी उठावदार दिसतात. मुख्य प्रवेशद्वाराची कमान इतरांपेक्षा वेगळी भासते. आतमध्ये लोखंडी खांबांच्या तळाची व उंचीवरची जाणीवपूर्वक केलेली कलाकुसर नजरेत भरते.
उतरत्या छपराला आधार देणाऱ्या लयदार त्रिकोणी कैच्या व आधाराचे खांब असं सोपं स्थापत्य मंडईच्या संकुलात वापरलेलं आहे. मंडईत पुरेसा प्रकाश व भरपूर खेळती हवा राखली जाईल अशी संरचना आहे.
इमारतीवर दगडकामातील रेखीव मुखवटे, कमानीच्या खालच्या टोकाला दगडातील छोटे मिनार (टरेट्स), कमानीवरील नक्षीकाम अशी माफक कलाकुसर बारकाईनं पाहिल्यास नजरेस पडते. छताच्या कडांना लाकूडकामातील नाजूक कलाकृतींच्या पट्ट्या (फेशिया बोर्ड) लावलेल्या आहेत. मध्यवर्ती चौकात मोठं कारंजं आहे. लाकूडकाम, दगडी बांधकाम व इमारतीचा एकंदर बाज हा एका कालखंडातील वास्तुशैलीचं प्रतीक आहे.
स्वातंत्र्यानंतरच्या काळात या इमारतीची पुरेशी देखभाल केली गेली नाही. ब्रिटिशांच्या काळात पाण्याचे मोठे पाईप लावून मंडई धुतली जायची, असं तिथले एक जुने गाळाधारक सांगतात. आजही पाईप अस्तित्वात असूनदेखील धुण्याची क्रिया मात्र बंद झाली आहे. जुनेपणामुळे आणि रोजच्या वापरामुळे इमारतीचे काही भाग झिजले आहेत. अतिक्रमणं व तात्पुरत्या दुरुस्त्या यांमुळे संपूर्ण इमारतीची अवस्था दीनवाणी झाली आहे. जलनिःसरणव्यवस्थेचं पुनरुज्जीवन ही अत्यावश्यक निकड आहे.
भाजीपाला व मांस यातून तयार होणाऱ्या कचऱ्याच्या पुरेशा नियोजनाचा अभाव ही मोठी समस्या आहे. पावसाळ्यात वाहणारं सांडपाणी, कचरा आणि त्यातून निर्माण होणारी दुर्गंधी व कुजणाऱ्या मांसामुळे, भाजीमुळे होणारी अपायकारक स्थिती याकडे यंत्रणेनं लक्ष देणं गरजेचं आहे. गेल्या वर्षी काही भागाला आग लागून नुकसानही झालं.
काही वर्षांपूर्वीही इमारत पाडून त्या जागी नवीन टोलेजंग अद्ययावत मार्केट बांधावं अशी संकल्पना कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे मांडण्यात आली. शिवाजी मार्केटबद्दल कुठल्या ना कुठल्या प्रकारची आस्था असणारे, ज्यांचं पोट त्या जागेतील व्यवसायांवर पिढ्यान् पिढ्या चालू आहे
असे व ‘वारसा’ याबद्दल जाणीव असणारे अशांनी या संकल्पनेला प्रतिकार करून ती योग्य नसल्याचं सर्वांना पटवून दिलं. जतन-संवर्धनाचा प्रकल्प तयार झाला; परंतु काही काळानं अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात.
नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या दृष्टीनं शहराचा वारसा हा कितपत महत्त्वाचा विषय असतो यावर सारं काही अवलंबून असतं. ‘वारसायादी’तील प्रथम श्रेणीची इमारत हीच फक्त वास्तुकलेचा उत्तम नमुना किंवा अत्युच्च ऐतिहासिक महत्त्वाची म्हणून जतन करावी का? अनेक वर्षं ज्या इमारतीनं लोकांच्या काही दैनंदिन गरजा इमानेइतबारे भागवल्या आहेत,
ज्या वास्तूबद्दल लोकांच्या मनात जिव्हाळा आहे, एका कालखंडातील वास्तुशैलीचं प्रतीक असलेली इमारत काही मूलभूत सुविधांनी व डागडुजीनं पुन्हा उजळणार असेल तर तिच्या जतन-संवर्धनाला प्राधान्य का मिळू नये? ता. १८ एप्रिल हा ‘जागतिक वारसादिन’ म्हणून साजरा केला जातो.
वास्तुरूपी ‘वारसा’ नक्की कशाला म्हणायचं याबद्दल प्रत्येकाची मतभिन्नता असते, काही साशंकता असतात. कलाकुसरीनं परिपूर्ण इमारत असलेल्या आणि ज्यांना ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व आहे, अशा इमारतीच फक्त वारसा की वर्षानुवर्षं एखाद्या वास्तूनं समाजाची निकड भागवून समाजाशी एक ऋणानुबंध जुळवला आहे तोही वारसा?
शहराच्या मध्यवर्ती भागात टोलेजंग मार्केट बांधून त्याकडे आकृष्ट होणाऱ्या वाहनांच्या रहदारीचा ताण घेण्याइतके इथले रस्ते सक्षम आहेत का किंवा नियोजित वाहनतळांची सुविधा मध्यवर्ती भागात भागवण्याची क्षमता दाट वस्तीत शक्य आहे का याचा संगोपांग विचार झाला पाहिजे.
पुढच्या पिढ्यांसाठी एखाद्या कालखंडाचा वारसा जपणं हाही विकासाचाच भाग असतो. वास्तुरूपी वारसा असलेली व हवामान, राहणीमान यांच्याशी सुसंगत असलेली भाजीमंडई शतकांपेक्षा जास्त टिकली आहे यातच ‘मंडई’ या संकल्पनेचं गमक सामावलेलं आहे.
शिवाजी मार्केटला नक्की वारसा का म्हणायचं हा प्रश्न अनेकांना पडतो. डागडुजी, जलनिस्सारण, कचरानियोजन, स्वच्छता यांसारख्या मूलभूत गरजांचं पुनरुज्जीवन होण्याकडे हा संभ्रमित ‘वारसा’ आस लावून वाट पाहत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.