स्मारक रमा-माधव यांचं

सन १७१३ ते १८१८ या कालखंडातल्या पेशवाईनं पुणं गाजवलं. पुण्याला ओळख देणाऱ्या वास्तूंची निर्मिती केली.
history Peshwa Memorial of Rama-Madhava Shaniwar Wada pune
history Peshwa Memorial of Rama-Madhava Shaniwar Wada punesakal
Updated on
Summary

सन १७१३ ते १८१८ या कालखंडातल्या पेशवाईनं पुणं गाजवलं. पुण्याला ओळख देणाऱ्या वास्तूंची निर्मिती केली.

- अंजली कलमदानी

पेशवाईच्या सुवर्णकाळापासून ते अस्तापर्यंत अनेक चढ-उतारांच्या कथांचे संदर्भ पुणे आणि आसपासच्या भागात आजही अस्तित्वात आहेत. सन १७१३ ते १८१८ या कालखंडातल्या पेशवाईनं पुणं गाजवलं. पुण्याला ओळख देणाऱ्या वास्तूंची निर्मिती केली. त्यांना पेशवाईथाटाची शैली मिळाली. अद्ययावत् पाणीपुरवठा शहराला देऊन फळबागांनी इथली जमीन संपन्न करण्यात आली.

प्रत्येक पेशव्यांच्या कारकीर्दीत पुण्यानं वेगळी अनुभूती घेतली. पानिपतच्या पराभवानंतर पुण्याची घडी बसवण्यात आपलं जीवन पणाला लावलं ते माधवराव पेशवे यांनी. रमा-माधव ही जोडी इतिहासात वेगळ्या रूपात अमर झाली.

शनिवारवाड्याशिवाय रमा-माधव यांच्या समर्पित आयुष्याची कहाणी सांगणाऱ्या खुणा पुण्याजवळील थेऊर इथं अस्तित्वात आहेत. माधवराव पेशव्यांचं अखेरच्या काळात वास्तव्य थेऊरच्या चिंतामणी-मंदिरात होतं.

पतिनिधनानंतर अवघ्या तेविसाव्या वर्षी सती गेलेल्या रमाबाईंचं वृंदावन तिथं नदीकाठी आहे. चिंतामणी-मंदिराच्या जतन-संवर्धनानंतर रमाबाईंच्या दुर्लक्षित समाधीचं जतन-संवर्धन चिंचवड देवस्थानच्या ट्रस्टनं केलं आहे.

नाशिकचे शिवाजी बल्लाळ जोशी यांची कन्या रमाबाई यांचा जन्म १७४८ चा. पाचव्या वर्षी रमाबाईंचा विवाह माधवराव पेशवे यांच्याशी झाला. माधवरावांचं वय साडेआठ वर्षं. वधूपरीक्षा व कुंडली यांच्या सोपस्कारानंतर नऊ डिसेंबर १७५३ रोजी पुण्यात हा विवाह झाला.

शनिवारवाड्यात सासू गोपिकाबाई आणि इतर खाशा स्त्रियांच्या सहवासात रमाबाई वावरू लागल्या. पानिपतच्या लढाईत रमाबाईंचे दीर विश्वासराव व चुलतसासरे सदाशिवभाऊ मारले गेले. पुत्राच्या व भावाच्या मृत्यूच्या धक्क्यानं नानासाहेब पेशव्यांनी पर्वतीवर देह ठेवला.

अशा कठीण समयी वयाच्या सोळाव्या वर्षी माधवराव हे पेशवेपदावर आले आणि रमाबाई बाराव्या वर्षी पेशवीणबाई झाल्या. धोरणीपणानं राज्यकारभार सांभाळणाऱ्या, अष्टौप्रहर राजकारणात गुंतलेल्या कर्तबगार पतीचा रमाबाईंना अभिमान वाटे.

राजकारणातले निर्णय व त्यानुसार नातेसंबंधातील तणाव, भाऊबंदकी, गृहकलह यांच्यामुळे होणारे क्लेश आदी बाबींना रमाबाईंनी पतीसमोर कधीही वाचा फोडली नाही. पत्नीच्या या सोशिकपणाबद्दल माधवरावांना रमाबाईंचं कौतुक वाटे.

मस्तानीचा नातू अलीबहादूर याचं पालनपोषण रमाबाई पुत्रवत् करत व ही गोष्ट गोपिकाबाईंना आवडत नसे. विवाहानंतर अकरा वर्षांनी रमाबाई वयात आल्या. पतीसमवेत त्या कर्नाटकाच्या मोहिमेवर गेल्या होत्या. निस्सीम पतिभक्तीशी एकरूप झालेल्या रमाबाईंचं विश्व माधवरावांभोवती सीमित होते.

धार्मिक स्वभावाच्या रमाबाई गंगापूर, त्र्यंबकेश्वर, वाई इथं देवदर्शनाला जात. पेशवे घराण्यातील धार्मिक व्रतवैकल्यं त्या नित्यानं करत. सिद्धटेक, मोरगाव, थेऊर, जेजुरी, कुरकुम ही पेशवाईतील प्रसिद्ध पंचयात्रा त्या पतीसमावेत मोहिमेपूर्वी करत.

कर्नाटकाच्या मोहिमेतच माधवरावांची प्रकृती खालावली. राजयक्ष्म्यासारख्या दुर्धर व्याधीनं माधवरावांना गाठलं. पतीच्या बळावत जाणाऱ्या आजाराला उतार पडावा म्हणून रमाबाईंनी गणपतीपुळे इथं धर्मशाळा बांधली.

कुलदैवत हरिहरेश्वर व श्रीवर्धन इथं यात्रा केली. हरिहरेश्वरला पाच लक्ष रुपयांचा नवस केला आणि चौघडा सुरू करून नित्यपूजा करण्याची प्रथा रमाबाईंनी सुरू केली. ती आजतागायत सुरू आहे. माधवरावांचं दुखणं विकोपाला गेल्यावर ते थेऊर येथील चिंतामणी-मंदिरात वास्तव्यास गेले.

शनिवारवाड्यात मृत्युंजयजप, थेऊर मोरगाव इथं सहस्त्रनामाची आवर्तनं अशा धार्मिक गोष्टी रमाबाईंनी करवून घेतल्या. मात्र, माधवरावांच्या व्याधीला उतार पडला नाही. माधवरावांचा मृत्यू अटळ आहे हे दिसताच रमाबाईंनी सती जाण्याचा निर्णय घेतला. पेशवाईला आपण वारस देऊ शकलो नाही हे शल्य रमा-माधव दाम्पत्याला होतंच.

रमाबाईंनी सती जाण्याचा निर्णय घेतल्याचं माधवरावांना समजताच त्यांनी विरोध केला; परंतु निर्णयाशी त्या ठाम राहिल्या. ता आठ नोव्हेंबर १७७२ रोजी सकाळी माधवराव हे जग सोडून गेले. ता. १९ नोव्हेंबर १७७२ रोजी दुपारी रमाबाई सती गेल्या. पेशवे घराण्यात सती जाणाऱ्या रमाबाई दुसऱ्या स्त्री होत.

या समाधीचं पुनरुज्जीवन चिंचवड देवस्थान ट्रस्टनं ‘किमया’च्या सल्लागारांच्या सल्ल्यानं पूर्ण केलं आणि ‘श्रीराम कन्स्ट्रक्शन’नं ते प्रत्यक्ष साकारलं. भीमेच्या संथ प्रवाहाच्या काठी विसावलेल्या स्मारकाकडे जाण्यासाठीची वाट दुर्लक्षित होती.

घाटाची दुर्दशा व समाधीची पडझड अशा अवस्थेत जतन-संवर्धनाचा नवीन आराखडा तयार झाला. खांडकी घडवलेल्या दगडात टप्प्याटप्प्यानं उतरणारी रुंद पायवाट तयार झाली. वाहनतळ, तसंच समाधीला साजेसं प्रवेशद्वार तयार झालं. नदीकाठी घाटांचे तुटलेले दगड बदलून समाधीच्या भोवतीचा परिसर नेटका तयार झाला.

समाधीची डागडुजी करून, तीवर साजेशी चार नक्षीदार खांबांना तोलणारी छत्री तयार करण्यात आली आहे. नदीच्या प्रवाहात, ऊन्ह-पावसात तग धरतील अशी भरभक्कम आणि रमाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी रेखांकनं तयार करण्यात आली. उतरत जाणाऱ्या वाटेच्या दुतर्फा रंगीबेरंगी फुलझाडं लावण्यात आली आहेत.

ता. आठ नोव्हेंबरला रमा-माधव पेशव्यांची पुण्यतिथी असते. कर्तबगार पेशवा आणि कणखर आणि सत्त्वशील रमाबाई ही पेशवाईतील अद्वितीय अशी जोडी होती. थेऊरच्या चिंतामणी-मंदिराला जाताना वाट थोडी वाकडी करून या पुनरुज्जीवित स्मारकाला इच्छुकांनी अवश्य भेट द्यावी.

एखाद्या समाधीचं जतन-संवर्धन करताना ते अत्यंत संवेदनशीलतेनं करणं गरजेचं असतं. संबंधित स्थळाशी मिळती-जुळती बांधकामसामग्री, कमीत कमी बांधकाम यांचा योग्य वापर करून त्या जागेशी निगडित चिरकालीन स्मृती आणि पावित्र्य यातून जाणवणारी स्पंदनं यांची अनुभूती मिळणं महत्त्वाचं असतं.

वास्तू लहान असली तरी तिचं महत्त्व विशेष असतं. वास्तुरूप, निसर्ग आणि भावना यांचा योग्य तो समतोल साधणं हेच त्या व्यक्तीविषयी आदर दाखवण्याचं स्थापत्यकलेचं कसब आहे. थोरले माधवराव पेशवे व रमाबाई यांचं स्मारक म्हणून थेऊर इथं भीमा नदीकाठी घाटावर सतीचं वृंदावन बांधण्यात आलं. ‘रमा-माधव स्मारका’चा जीर्णोद्धार १९०८ मध्ये झाला; परंतु काळाच्या आणि नदीच्या प्रवाहात त्याच्या पुनरुज्जीवनाची निकड पुन्हा निर्माण झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.