नेवाशाचं मोहिनीराजमंदिर

महाविष्णूंचा तेरावा अवतार म्हणजे मोहिनी-अवतार. या मोहिनीराजांचं मंदिर नगर जिल्ह्यातील नेवासा इथं असून हे मंदिर म्हणजे काळ्या दगडातील कलाकुसरीचा उत्तम नमुना होय.
nevasa mohinirajmandir
nevasa mohinirajmandirsakal
Updated on
Summary

महाविष्णूंचा तेरावा अवतार म्हणजे मोहिनी-अवतार. या मोहिनीराजांचं मंदिर नगर जिल्ह्यातील नेवासा इथं असून हे मंदिर म्हणजे काळ्या दगडातील कलाकुसरीचा उत्तम नमुना होय.

- अंजली कलमदानी anjali.kalamdani10@gmail.com

महाविष्णूंचा तेरावा अवतार म्हणजे मोहिनी-अवतार. या मोहिनीराजांचं मंदिर नगर जिल्ह्यातील नेवासा इथं असून हे मंदिर म्हणजे काळ्या दगडातील कलाकुसरीचा उत्तम नमुना होय. संत ज्ञानेश्वरमहाराजांनी सन १२१२ मध्ये नेवासा इथं ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली. प्रवरा नदीच्या काठी वसलेल्या छोट्याशा नेवाशात गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी हे मंदिर असून त्याचा काही भाग अपूर्णावस्थेत होता. गावकऱ्यांच्या जिव्हाळ्याचं, श्रद्धेचं स्थान असलेल्या या मंदिराची शैली पश्चिम महाराष्ट्रातील मंदिरांशी मिळती-जुळती आहे. शिखराची रचना शेखरी पद्धतीची मानली जाते.

पौराणिक माहितीनुसार, अमृतमंथनातून निर्माण झालेल्या अमृतापासूनमोहिनीरूपातील महाविष्णूंनी दैत्यांना दूर ठेवलं व देवतांना अमृत वाटलं. अमृत वाटत असताना त्यांनी राहूचा पराभव केला. हेच मोहिनीरूप या मंदिरात स्थित आहे.

समुद्रमंथनातून निर्माण झालेली लक्ष्मी ही महाविष्णूंची अर्धांगिनी असल्यानं मंदिरात मोहिनीराजांबरोबरच लक्ष्मीचीही मूर्ती आहे. पौराणिक माहितीनुसार, राहूचं शीर ‘म्हैशासुर’ पर्वतावर पडलं व तिथून प्रवरा ‘नदा’चा उगम झाला. या ‘नदा’स ‘अमृतवाहिनी’ असं म्हणतात.

मंदिराचा नवीन भाग १७७३ मध्ये अहिल्याबाई होळकरांचे दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी पाच लाख रुपये खर्चून बांधला. १७.२५ मीटर उंचीच्या काळ्या दगडातील मंदिराच्या शिखरावर अतिशय प्रमाणबद्ध असं कोरीव काम आहे. सभागृहातील मंडपाला तीन बाजूंनी प्रवेशद्वार आहे. सात मीटर लांब व ६.५ मीटर रुंद मंडपाला सभोवती व छतावर लक्षवेधी कोरीव काम आहे. सभागृहाचे दगडी खांब व त्यावरच्या ऐटदार यक्षांनी वरचं छत तोलून धरलं आहे. गर्भगृहावरील कळस टप्प्याटप्प्यानं आकाशाकडे झेपावताना त्यांवर एकमेकांत गुंतलेल्या घटांची रचना करण्यात आलेली आहे. मंडपावरील घुमटाचं काम मात्र अपूर्णावस्थेत होतं. मंडपात गणपती, विष्णू, हनुमान यांच्या मूर्ती आहेत.

मात्र, बाह्यभागावर कुठंच देव-देवतांच्या मूर्ती नाहीत. प्रवेशद्वाराजवळील द्वारपालांच्या व हत्तींच्या प्रतिमा सोडल्या तर उर्वरित भागावर पाना-फुलांचं कोरीव काम आहे. ते अप्रतिम असून काळ्या दगडाचे सपाट प्रतल व काही अंतरावर नाजूक कोरीव कामाचे पट्टे अशी रचना कौशल्यानं विचारपूर्वक साधलेली दिसते. मंदिर भव्य असलं तरी त्याला आवार नाही. ते वस्तीनं वेढलेलं आहे. असं असलं तरी मंदिराचा भव्यपणा, उंची व काळ्या पाषाणातील तपशीलवार कारागिरी या बाबी लक्ष वेधून घेतातच.

दक्षिणेकडील किंवा महाराष्ट्रातील इतरत्र असलेल्या अशा आकाराच्या मंदिराला सभोवती आवार व प्रवेशद्वार असतं. इथं कदाचित मंदिराचा काही भागच पूर्णत्वाला गेल्याचं दिसून येतं, त्यामुळे वस्तीचा विस्तार मंदिरालगत येऊन भिडला असावा किंवा काळाच्या ओघात बांधलेली सीमाभिंत नाहीशी होऊन वस्ती मंदिरापाशी येऊन भिडली असावी. याला कागदोपत्री किंवा कसलाच पुरावा उपलब्ध नाही.

महाराष्ट्रात नेवासा इथून येणारा काळा बेसॉल्ट दगड त्याच्या गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे. टणक काळ्या दगडात बांधलेल्या मंदिरावर कारागिरांनी उत्कृष्ट कलाकुसर साधली आहे. दगडाच्या टणकपणामुळे त्यावर नाजूक कलाकुसर साधणं हे कारागिरीचं कसब आहे आणि दगडाच्या टणक गुणधर्मामुळे त्यावरील कारागिरी सुस्थितीत टिकलीही आहे. सन २०१६ मध्ये मंदिराची तपशीलवार रेखांकनं ‘किमया’च्या वास्तुविशारदांच्या गटानं केली. त्या वेळी मंदिराच्या कलाकुसरीच्या काही भागांचे टवके काही ठिकाणी उडालेले आढळले. मंदिरात अनेक ठिकाणी तैलरंगाचे थर लावण्यात आले होते.

उपलब्ध निधीनुसार, ‘मोहिनीराज देवस्थान संस्थान सार्वजनिक न्यासा’तर्फे टप्प्याटप्प्यानं काम करण्यास सुरुवात झाली. सन १९७६ मध्ये भक्तानं दिलेल्या दानातून दगडावर रंग चढले होते. काळानुरूप जुन्या झालेल्या रंगांमुळे कलाकृतीचं सौंदर्य झाकोळलं गेलं होतं. रंगकाम काळजीपूर्वक उतरवल्यावर कलाकृतीचं मूळ सौंदर्य पुन्हा झळाळू लागलं. तैलरंग उतरवण्यासाठी कागदी लगद्यात नैसर्गिक घटक मिसळून रंग काढण्याच्या तंत्राचा अवलंब करण्यात आला. रंग काढल्यावर दगडावरील कलाकुसर अधिक उठावदार दिसू लागली.

मंडपाच्या छतावर आतल्या बाजूनं गोलाकार नाजूक कारागिरी दगडात कोरलेली आहे. मंडपाच्या भिंती सुरक्षेच्या दृष्टीनं पूर्णपणे छतापर्यंत उचलल्यामुळे मंडपात पुरेसा उजेड येत नव्हता. भिंती उतरवून, काळ्या दगडात अर्ध्या उंचीची भिंत बांधून तीवर जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. लवकरच त्या जागी नाजूक कलाकुसरीच्या दगडी जाळ्या बसवण्यात येणार आहेत.

कळसाच्या पोकळीत एक लहान खोली असून तीमध्ये सुमारे २०० वटवाघळांची वसाहत होती. त्यांच्या मल-मूत्रानं ही जागा अतिशय खराब झाली होती. वटवाघळांना बाहेर काढून या जागेची डागडुजी व स्वच्छता करण्यात आली. मंदिराच्या गर्भगृहावरील पवित्र जागा आता स्वच्छ आणि नीटनेटकी आहे. पितळी पत्रा लावलेलं गर्भगृहाचं जुनं लाकडी दार नगरच्या कारागिरांनी उत्कृष्टपणे नवीन पितळी कलाकुसरीनं सुसज्ज केलं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, उत्कृष्ट नाजूक कलाकुसरीनं परिपूर्ण असलेल्या मंदिराच्या गर्भगृहावरील कळस पूर्ण आहे; पण मंडपावरील घुमटाकार कळस चुन्याची घोटाई करून अपूर्णावस्थेतच होता.

उर्वरित मंदिराला सुसंगत दगडी घुमटाकार आवरण चढवण्याचं आम्ही ठरवलं. सद्यस्थितीमधील घुमटाचा बाह्याकार व दगडाचं चढत जाणारं छत यांचं नियोजित आकारमान या दोन बाबींचं विश्लेषण करून कारागिरांना जागेवर काम करण्यास सोपं जावं यासाठी फर्मे (स्टेन्सिल) तयार करण्यात आले. दगडी घुमट पूर्ण झाल्यावर मंदिरशैलीचे कळस व मंडप हा अनुबंध आता परिपूर्ण दिसत आहे. खासगी ट्रस्टनं काम करताना भक्त, विश्वस्त, सल्लागार, कारागीर आणि आर्थिक नियोजन यांची सांगड घालून सर्वानुमते एकत्र काम करणं गरजेचं असतं.

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे काम आमच्याकडे आमचे शिक्षक, प्रसिद्ध वास्तुविशारद व्ही. व्ही. बडवे सर घेऊन आले. या मंदिराचं परंपरेनुसार बडवेपद त्यांच्या नातलगांकडे असून, त्यांनी व बडवे कुटुंबीयांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास ही एक मोठी जबाबदारी आहे. माघ शुद्ध रथसप्तमीपासून माघ वद्य षष्ठीपर्यंत पंधरा दिवस मोहिनीराजांची यात्रा दरवर्षी असते. सात दिवस गावातील प्रत्येक कुटुंबाकडून नंदादीप लावला जातो. जवळजवळ शंभर दिवे देवापुढं लावल्यानंतरचं दृश्य पाहण्यासारखं असतं.

माघ पौर्णिमेला देवाचा गोंधळ असतो, त्याला ‘भळंद’ असं म्हणतात. ता. १० फेब्रुवारी २०२३ रोजी ‘ग्रामवदैवत मोहिनीराज वार्षिक यात्रा उत्सवा’ची सांगता होणार आहे. त्या दिवशी सकाळी सहा वाजता वडार समाजाच्या वतीनं प्रवरासंगम इथून भक्तांनी आणलेल्या कावडीनं जलाभिषेक आहे. महाप्रसादानंतर पालखीचं आगमन होऊन काला असा उत्सवाचा क्रम-उपक्रम असतो. त्यानिमित्तानं बैलगाडाशर्यत, कुस्ती अशा खेळांचा आनंदही गावकरी घेतात. गावातील मंदिर हे जसं श्रद्धास्थान असतं तसंच ती सर्वांना एकत्र जाणणारी जागाही असते. तिचं कोंदणही व्यवस्थित राखणं आणि गावाचा वारसा पुढं संक्रमित करणं ही काळाची गरज आहे. मोहिनीराजाचं मंदिर हे मोहिनी पडावं इतकं सुस्वरूप आहे. काही शतकांपूर्वी अपूर्ण राहिलेलं हे बांधकाम या शतकात पूर्णरूप पावलं याचं समाधान आहे.

(लेखिका वास्तुविशारद व नगरविन्यासकार असून, जतन-संवर्धनक्षेत्रात कार्यरत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.