श्रीपुरुषोत्तममंदिर

आषाढ संपताना श्रावण महिना अधिक मासानं सुरू होत आहे. अधिक मासाला ‘पुरुषोत्तममास’ असंही संबोधलं जातं.
shri purushottam mandir
shri purushottam mandirsakal
Updated on

- अंजली कलमदानी, anjali.kalamdani10@gmail.com

आषाढ संपताना श्रावण महिना अधिक मासानं सुरू होत आहे. अधिक मासाला ‘पुरुषोत्तममास’ असंही संबोधलं जातं. श्रीविष्णूंचा अवतार पुरुषोत्तम यांच्या नावानं पुरुषोत्तममास साजरा करताना भक्तगण बीड जिल्ह्यातील माजलगाव इथल्या पुरुषोत्तमपुरीचा मार्ग धरतात. इथं पुरुषोत्तमाचं भारतातील एकमेव मंदिर असून अधिक महिन्यात इथं यात्रा भरते.

हिंदू पंचांगानुसार, सूर्यवर्षगणनेनुसार ३६५ दिवस असतात व चांद्रवर्ष गणनेनुसार ३५४ दिवस भरतात. दरवर्षी पडणाऱ्या ११ दिवसांच्या फरकांचं संतुलन दर तीन वर्षांनी ३३ दिवसांत साधण्यासाठी चांद्रवर्षगणनेनुसार एक ‘अधिक’ महिना तयार होतो. चांद्रवर्ष व सूर्यवर्ष कालगणनेचं गणित सुव्यवस्थित जुळण्यासाठी अधिक महिन्याची निर्मिती पंचांगानुसार होते.

अर्थातच याला धार्मिक परंपरेची जोड देऊन व्रतवैकल्यं साजरी होतात. ‘अधिकमास’, ‘पुरुषोत्तममास’ किंवा ‘मलमास’ अशी नावं धारण करणाऱ्या या महिन्यात पुरुषोत्तमाचं महत्त्व असून यानिमित्तानं पुरुषोत्तममंदिराबद्दल जाणून घेणं उचित ठरावं.

भगवान पुरुषोत्तमाचं पुरुषोत्तमपुरी इथलं मंदिर यादवकालीन असून सन १३१० मधलं आहे. पुरुषोत्तममंदिराला जोडून सहालक्षेश्वराचं शिवमंदिर आहे. इतिहासाचा मागोवा घेताना मंदिराजवळ शेतात सापडलेल्या तीन ऐतिहासिक ताम्रपटांवरील - जे ताम्रपट सध्या हैदराबाद इथल्या उस्मानिया विद्यापीठात जतन केलेले आहेत - मजकुरावरून यादवकुळातील राजा रामचंद्र यांनी (१२७१ ते १३१२) त्यांचा मंत्री पुरुषोत्तम यास जमीन दान करण्याचे (आग्रहार) आदेश दिल्याचा उल्लेख आहे.

ताम्रपट वजनाला जडशीळ असून १.८’’x१.२’’ आकारमानात आहेत. २१ किलो वजनाचे ताम्रपट ज्या कडीनं मंदिरातील बांधकामात गुंतवले होते ती वजनदार गरुडप्रतिमेची पितळी कडी गावांमधील भक्तांच्या पूजेत आहे. ताम्रपटांतील मजकुराविषयीची व इतर तपशिलाची माहिती भारतीय पुरातत्त्व खात्यानं ‘एपिग्राफिका इंडिका’मध्ये(व्हॉल्यूम - २५ , पान - १९९ ते २५५) प्रसिद्ध केली आहे. यादवकाळात हेमाद्री किंवा हेमाडपंती शैलीतील वास्तूंची निर्मिती केली गेली. यात मंदिरांच्या भिंती भक्कम, मोठ्या चिऱ्यांमध्ये बांधताना त्यांवर फारशी कलाकुसर केली जात नसे.

गोदावरी नदीच्या काठी हिरवाईनं नटलेल्या समृद्ध भूप्रदेशात पुरुषोत्तममंदिर व त्यालगतच सहालक्षेश्वर हे शिवमंदिर अशी दोन्ही मंदिरं वास्तुकलेच्या दृष्टीनं वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

भक्कम मोठ्या आकारातील चिऱ्यांमध्ये जोत्याचं बांधकाम केलेलं असून पाया, तसंच कळसाच्या पायापर्यंतचं बांधकामही काळ्या पाषाणातच आहे. सहालक्षेश्वर मंदिराच्या शिखराचं काम कलाकुसरीच्या वीटकामात असून आतील बाजूनं अप्रतिम लाकूडकाम आहे.

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९६९ च्या दरम्यान गुप्तधनाच्या आशेनं काही साधूंनी पुरुषोत्तमाचं मंदिर उतरवलं व पुन्हा बांधलं. पुनर्बांधणी करताना मात्र यादवकालीन मंदिराच्या बांधकामशैलीला बगल देत जमेल तसं ते बांधलं गेलं, त्यामुळे शिखराचं काम विसंगत झालं. त्यावर रंगरंगोटीही आहे.

बुजुर्ग गावकऱ्यांच्या मते, पुरुषोत्तमाचं मंदिरही सहालक्षेश्वर मंदिराइतकंच सुबक वीटकामात व लाकूडकामात होतं. एकाशेजारी एक असलेल्या मंदिरांची बांधकामशैली ही निश्चितच एकसारखी असणार. नियोजित प्रकल्पानुसार, सद्य परिस्थितीत विसंगत बांधकामाचं पुरुषोत्तममंदिर पारंपरिक बांधकामशैलीत बांधणं उचित होणार आहे.

दोन्ही मंदिरं नदीकाठी असलेल्या काळ्या भुसभुशीत जमिनीवर उभारलेली आहेत. कोयनेचा १९७२ चा भूकंप व किल्लारीचा १९९३ चा भूकंप यांमुळे दोन्ही मंदिरांमध्ये मोठ्या भेगा पडलेल्या असून दगडांचे थरही हललेले आहेत. सहालक्षेश्वरमंदिराचा तर काही भाग पडलेलाही आहे. मात्र, या मंदिराच्या शिखराचं वीटबांधकाम अद्वितीय आहे.

दगडासारखंच दिसणारं; परंतु लाकडी कलाकुसरीनं परिपूर्ण असलेलं शिखराच्या आतील छत ही वास्तुकलेची दुर्मिळ अदाकारी गेली आठ शतकं टिकून आहे. मंदिराचे खांब यादवकालीन पद्धतीनं काळ्या दगडातील असून त्यावर सोनेरी रंग चढवलेला आहे; पण उत्कृष्ट लाकूडकाम मात्र रंगरंगोटीपासून बचावलं आहे.

सहालक्षेश्वरमंदिराच्या मंडपावर घुमटाकार लाकडी छताची रचना दगडीरचनेसदृश साधताना २४ भौमितिक भागांमध्ये विभागून चौकोनी मंडपाला चारही कोपऱ्यांमध्ये तोलून धरण्यासाठी आधाराची(स्क्विंचेस) सोय यादवकालीन बांधकामशैलीत विचारपूर्वक केलेली आहे.

दोन्ही मंदिराचं ऐतिहासिक, सांस्कृतिक महत्त्व विचारात घेता व सद्य परिस्थितीतील त्यांची अवस्था पाहता त्यांचं जतन-संवर्धन शास्त्रीयदृष्ट्या व्हावं यासाठी सरकारनं पुरातत्त्‍व खातं, तसंच महाराष्ट्र रस्ते महामंडळाद्वारे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला व कामही तातडीनं सुरू झालं आहे.

वास्तविक, यादवकालीन मंदिरासाठी काम करताना इतिहास, मंदिराची शैली, बांधकामसामग्री व सद्यस्थितीस कारणीभूत घटना, शास्त्रीय विश्लेषण यांवर आधारित नियोजित प्रकल्पबांधणी तयार करावी लागते. विशेषतः सहालक्षेश्वरमंदिराचे वीटकामातील कळसावरचे वैशिष्ट्यपूर्ण तपशील जाणून घेऊन भूमीजा पद्धतीचं बांधकाम, कळसांच्याच प्रतिमा कळसावर साकारताना साकारलेली विटांमधील कलकुसर यांचं तपशीलवार रेखांकन करणं ही कामं वास्तुविशारदांसाठी आव्हानात्मक होती.

कारण, डळमळीत पाया सुधारण्यासाठी शिखर उतरवणं व पाया भक्कम करून त्याच पद्धतीनं शिखराची पुनर्बांधणी करणं यासाठी वीट अन् वीट त्या काळी कशी रचली आहे, त्याचं परिमाण, त्रिमितीतील रचना यांचं दस्तऐवजीकरण करणं हे कौशल्याचं काम ‘किमया वास्तुविशारद’च्या टीमनं केलं.

तपशिलाचा भाग रेखांकित करताना तात्कालिक कारागिरांच्या विचारप्रक्रियेत डोकावण्याचा प्रयत्न करावा लागतो. लाकडी छताचं अलौकिक बांधकाम साधणाऱ्या कारागिरांची अभियांत्रिकी विचारप्रक्रिया काय असावी हेही अजमावावं लागतं. पुरुषोत्तममंदिराचा सुबक कळस उतरवून सामग्रीची कमतरता, शैलीच्या अभ्यासाचा अभाव यामुळे अर्धवट, विसंगत बांधकामाचा मागोवा घ्यावा लागतो.

शिवाय, मंदिर उतरवल्याशिवाय त्याची पायाबांधणी ही कुठल्या शास्त्रावर आधारित आहे व पुनर्बांधणी कशी व्हायला हवी हे कोडं सोडवणं जतन-संवर्धनाच्या कामी नेहमीच आव्हानात्मक असतं व त्याचा परिणाम नियोजित कामाच्या अंदाजपत्रकावर होतो.

पुरुषोत्तममंदिरासमोर अंबामातेचं जोतं आहे; पण त्याला मंडप नाही, शिवमंदिरासमोर नंदी आहे; पण मंडप नाही. नियोजित कामात या दोहोंनाही मंडप तयार करणं प्राप्त आहे. काम करण्यासाठी पुरुषोत्तमाची मूर्ती, तसंच शिवपिंड हलवणं ही कंत्राटदारांसाठी, गावकऱ्यांसाठी जोखमीची गोष्ट होती. सध्या मंदिरातील देव धार्मिक संस्कारांनंतर अन्यत्र हलवून मंदिराच्या दगडाचं क्रमवार रेखांकन करून मंदिर उतरवण्याचं काम सुरू आहे.

सहालक्षेश्वरमंदिरातील पिंड हलवताना तिच्याखाली दीड इंच आकाराचं एक तोळ्याचं सुवर्णाचं कासव एका गोलाकार दगडी आवरणात सुरक्षित सापडलं. मंदिराचा मोठा डोलारा समर्थपणे तोलून धरण्याची संकल्पना कूर्मावतारात दिसून येते. मंदिराचा पाया अजमावताना वीस मीटर खोलीवर खडक सापडल्यावर काम सुरू करण्यापूर्वी केलेल्या अंदाजपत्रकाचा पायाच डळमळतो!

नियोजित प्रकल्पात दोन्ही मंदिरांचं पारंपरिक पद्धतीनं जतन-संवर्धन करून मंदिर मूळ स्वरूपात; पण भक्कम पायावर उभं राहील.

मंदिराभोवती सध्या असलेल्या विसंगत इमारतींच्या जागी पारंपरिक पद्धतीच्या ओवऱ्या दगड व चुना यांचा वापर करून बांधण्यात येणार आहेत, तसंच काही अंतरावर भक्तनिवास, भोजनालय, वैद्यकीय सुविधाकेंद्र, स्वच्छतागृहं उभारताना मंदिराला जाणारे रस्तेही सुधारले जाणार आहेत. सर्व गावकऱ्यांनी हा प्रकल्प उत्स्फूर्तपणे उचलून धरून सहकार्य केलं आहे.

आमदार, गावकरी, प्रशासन, सल्लागार व भक्तगण यांच्या सहकार्यानं प्रकल्प वेगानं पूर्ण होईल अशी आशा आहे. एखादं मंदिर हे त्या गावाचं, प्रदेशाचं श्रद्धास्थान असतं; पण त्याचबरोबर एखाद्या कालखंडाच्या वास्तुकलेचं प्रतीकही असतं. त्याची शैली, सामग्री ही त्या शतकाचं प्रतिनिधित्व करत असते. असा वारसा नैसर्गिक आपत्ती, लोटलेला काळ यांमुळे विस्कळित होत असतो.

ताम्रपटात जमिनीचा उल्लेख येतो; पण वास्तूचा नाही हे दुर्दैव. वारसा मोडकळीस आला म्हणून तो मोडीत न काढता आठशे वर्षं जुन्या असलेला वास्तुऐवज पुनरुज्जीवित झाला तर पुढच्या अनेक पिढ्यांसाठी त्या कालखंडाची वास्तुशैली ‘वारसा’ म्हणून उपलब्ध राहील.

त्या वेळची कौशल्यपूर्ण कला, अभियांत्रिकी मूल्यं यांपासून नव्या उभारल्या जाणाऱ्या आधुनिक इमारतींच्या तुलनेत वेगळं असं ‘स्वत्व’ शिकण्यासारखंही असेल. वारसा म्हणून अभिमानास्पद अशी पारंपरिक, दुर्मिळ वास्तुशैली पुढच्या पिढीकडे सुरक्षितपणे सुपूर्द होईल.

(लेखिका वास्तुविशारद व नगरविन्यासकार असून, जतन-संवर्धनक्षेत्रात कार्यरत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.