‘जिम कॉर्बेट’ : व्याघ्रसंवर्धनाचा आरंभ

वाघांच्या संवर्धनाची कहाणी ज्या जंगलापासून सुरू झाली त्या जंगलाची माहिती आपण आज घेणार आहोत. हे जंगल म्हणजे ‘जिम कॉर्बेट व्याघ्रप्रकल्प’.
Elephant
ElephantSakal
Updated on

भारताच्या अनेक भागांत नैसर्गिक विविधता, समृद्धी आढळते, त्यामुळे कोणत्याही भागातील जंगलाला भेट दिल्यावर वेगळाच आनंद मिळतो. या नैसर्गिक समृद्धीच्या संवर्धनप्रयत्नांना जोडून ठेवणारा प्राणी आपल्याला लाभला आहे व तो म्हणजे ‘वाघ’.

वाघांच्या संवर्धनाची कहाणी ज्या जंगलापासून सुरू झाली त्या जंगलाची माहिती आपण आज घेणार आहोत. हे जंगल म्हणजे ‘जिम कॉर्बेट व्याघ्रप्रकल्प’. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुढाकारानं व्याघ्रसंरक्षणाची मोहीम १९७३ मध्ये सुरू करण्यात आली आणि ‘प्रोजेक्ट टायगर’ या प्रकल्पाची स्थापना झाली. याअंतर्गत भारतातील नऊ जंगलांना व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. ‘जिम कॉर्बेट’ हा त्यापैकी पहिला व्याघ्रप्रकल्प. व्याघ्रसंरक्षणाच्या कामाचा आरंभ करणारे ‘जिम कॉर्बेट’ हे जंगल आशिया खंडातील पहिलं राष्ट्रीय उद्यान म्हणूनही ओळखलं जातं.

रामगंगेच्या या भागाला १९३६ मध्ये ब्रिटिशांनी संरक्षण देण्याचा निर्णय घेतला व सुमारे ३२३.७५ चौरस किलोमीटरच्या जंगलाला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आलं. या जंगलात शिकारीला बंदी घालण्यात आली. लाकूडकटाईही जीवनावश्यक असेल तेवढीच मर्यादित करण्यात आली. संख्येनं घटत चाललेले कमी होणारे वाघ वाचवणं हा या जंगलाला संरक्षण देण्याचा हेतू होता. आग्रा व अवध या संयुक्त प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर सर माल्कम हेली यांच्यावरून ‘हेली राष्ट्रीय उद्यान’ असं या जंगलाचं नामकरण करण्यात आलं. व्याघ्रसंवर्धनाच्या दृष्टीनं ब्रिटिश सरकारनं टाकलेलं हे प्रशंसनीय पाऊल होतं. मात्र, पुढं दुसऱ्या महायुद्धाच्या काळात संरक्षणाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शिकार आणि अवैध जंगलतोडीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या. स्वातंत्र्योत्तर काळात पुन्हा स्थानिक सरकारकडून निसर्गसंवर्धनाकडे लक्ष पुरवण्यात आलं आणि ‘जिम कॉर्बेट जंगला’चं वैभव पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली.

उत्तराखंड राज्यातल्या नैनिताल जिल्ह्यातील या राष्ट्रीय उद्यानाचं नाव १९५४-५५ मध्ये बदलून ‘रामगंगा राष्ट्रीय उद्यान’ असं करण्यात आलं. पुढं १९५५-५६ मध्ये ज्येष्ठ निसर्ग-अभ्यासक आणि संवर्धक जिम कॉर्बेट यांचं नाव त्याला देण्यात आलं व ‘जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान’ म्हणून ते ओळखलं जाऊ लागलं. १९७३ मध्ये व्याघ्रप्रकल्प घोषित झाल्यावर व्याघ्रसंवर्धनाच्या आणि संरक्षणाच्या प्रयत्नांत वाढ झाली आणि त्याचाच एक भाग म्हणून जंगलाचं क्षेत्रही वाढवण्यात आले. आज सुमारे ८२१.९९ चौरस किलोमीटरचा कोअर भाग आणि सुमारे ४६६.३२ चौरस किलोमीटरचा बफर भाग असं सुमारे १२८८.३१ चौरस किलोमीटर भागात हे जंगल पसरलेलं आहे.

तराईक्षेत्रात येणारं हे जंगल म्हणजे जैवविविधतेचा खजिना आहे. इथं प्राणी, पक्षी, झाडं अशा निसर्गाच्या प्रत्येक घटकात विविधता पाहायला मिळते. दाट ओलसर पांगली वनप्रकारात मोडणाऱ्या या जंगलाचा सुमारे ७३ टक्के भाग हा घनदाट वृक्षांनी व्यापलेला आहे, तर सुमारे १० टक्के भागात गवताळ प्रदेश आहे. रामगंगा आणि कोसी या इथल्या जीवनवाहिनी आहेत. या नद्यांनी या जंगलाच्या सौंदर्यात भर टाकली आहे. जंगलाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, जंगलात असणारी अप्रतिम भौगोलिक विविधता. जंगलाच्या उत्तरेला असलेली लघुहिमालयीन पर्वतरांग आणि दक्षिणेला असलेली शिवालिक पर्वतरांग यांमुळे जंगलात दाट अरण्याबरोबरच गवताळ प्रदेश, उंच-सखल टेकड्या, रामगंगेमुळे तयार झालेली ‘पतली दून’ ही दरी अशी भौगोलिक विविधता पाहायला मिळते. हे जंगल वाघांसाठी तर प्रसिद्ध आहेच; शिवाय हत्तींची संख्याही इथं चांगल्या प्रमाणात आहे. इतर प्राणी-पक्षीही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात.

एडवर्ड जेम्स कॉर्बेट अर्थात् जिम कॉर्बेट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून जंगलाला त्यांचं नाव देण्यात आलं आहे. कुमाऊँच्या भागात नरभक्षक बनलेल्या अनेक वाघांना आणि बिबट्यांना मारून त्या वेळी तिथल्या जनतेला त्यांनी संकटातून मुक्त केलं होतं. कॉर्बेट यांनी ठार केलेल्या नरभक्षक वाघांनी आणि बिबट्यांनी कमीत कमी १२०० माणसं मारली होती, म्हणजे किमान तेवढ्या लोकांची तरी दफ्तरी नोंद आढळते.

पैकी चंपावतच्या नरभक्षक वाघानं ४३६, तर पानारच्या नरभक्षक बिबट्यानं ४०० माणसं मारल्याची नोंद आढळते. या सर्वावर आधारित कॉर्बेट यांनी काही पुस्तकंही लिहिली आहेत. ‘रुद्रप्रयागचा नरभक्षक’, ‘कुमाऊँचे नरभक्षक’, ‘देवळाचा वाघ’ ही त्यांपैकीच काही. लहानपणापासून निसर्गाचं आकर्षण असल्यामुळे पुढं त्यांनी शिकार पूर्णपणे बंद करून टाकली. बंदूक धरणारे हात निसर्गसंवर्धनासाठी पुढं आले. या जंगलाला ब्रिटिश सरकारच्या काळात राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचं मानलं जातं. त्यांनी केलेल्या निसर्गसंवर्धनाच्या कार्याचा गौरव म्हणूनच या जंगलाला ‘जिम कॉर्बेट व्याघ्रप्रकल्प’ असं नाव देण्यात आलं आहे.

तराईचा भूप्रदेश, घनदाट जंगल, उंचसखल टेकड्या, विस्तीर्ण गवताळ प्रदेश, कमनीय वळणं घेत वाहणारी रामगंगा नदी, डोळ्याचं पारणं फेडणारं नदीचं पात्र आणि जंगलात आढळणारी अप्रतिम विविधता यांमुळे ‘जिम कॉर्बेट’ हे जंगल निसर्गप्रेमींना वेड लावतं. या जंगलात गेल्यावर निसर्ग आपल्याला बरंच काही सांगून जातो. त्याच्या ‘मौनाचं भाषांतर’ करण्याची कला मात्र आपल्याकडे हवी. निसर्गाशी एकदा आपण एकरूप झालो की हेच मौनाचं भाषांतर आपल्याला महाकाव्य वाटू लागेल यात शंका नाही!

कसे जाल? : पुणे/मुंबई-दिल्ली-रामनगर-जिम कॉर्बेट

भेट देण्यासाठी उत्तम कालावधी : ऑक्टोबर ते मे

काय पाहू शकाल? :

सस्तन प्राणी : सुमारे ३८ प्रजाती. वाघ, बिबट्या, हत्ती, सांबर, चितळ, भेकर, मुंगूस, वानर, लालतोंडं माकड, नीलगाय, अस्वल, हॉग डिअर, ब्लॅक बेअर, यलो थ्रोटेड मार्टिन इत्यादी.

पक्षी : सुमारे ५५० हून अधिक प्रजाती. लिनिएटेड बार्बेट , ब्लू-थ्रोटेड बार्बेट, क्रीम्सन ब्रेस्टेड बार्बेट, सोनपाठी सुतार , लाँग टेल्ड् ब्रॉडबिल, गोल्डन ओरिअल, स्टॉर्क बिल्ड् किंगफिशर, फोर्कटेल्स, खलीज फेन्सन्ट , डार्टर, ब्राऊन डीपर, तुरेवाला सर्पगरूड , लिटिल ग्रीन हेरॉन, पाँड हेरॉन्स, बूटेड हॉक ईगल, पल्लाज फिश ईगल इत्यादी.

सरपटणारे प्राणी : मगर, कासव, सुसर, धामण, नाग, नागराज, घोणस, हिमालयन पिट वायपर, मण्यार, घोरपड इत्यादी.

(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)

(शब्दांकन : ओंकार बापट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.