भारताला निसर्गसंपदेचा फार मोठा वसा लाभलेला आहे असं आपण कायम ऐकतो-वाचतो. भारताच्या पूर्वेकडील/ईशान्येकडील राज्यांमध्ये तर निसर्गानं आपल्या रंगांची अगदी मुक्तपणे उधळण केली आहे! अनेक निसर्गसुंदर भागांनी पूर्व भारत डोळ्यांचं पारणं फेडतो. इथल्या अनेक भागांमध्ये निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येतो. आपल्या निसर्गवैभवानं पूर्व भारताचं सौंदर्य वाढवणाऱ्या आसाम राज्यातील एका सुरेख जंगलाची माहिती आज आपण घेऊ या. आसाम राज्य म्हटल्यावर आपल्या डोळ्यांपुढं दोन गोष्टी लगेच उभ्या राहतात. त्या म्हणजे, ‘एकशिंगी गेंडा’ आणि ‘चहा’. ‘एकशिंगी गेंडा’ या जगातील चौथ्या सर्वात मोठ्या सस्तन वन्यप्राण्यासाठी प्रसिद्ध असलेलं ‘काझीरंगा’ हे आसाममधलं अप्रतिम जंगल.
गोलाघाट, नागाव आणि कर्बी आंगलाँग या जिल्ह्यांत पसरलेल्या या अभयारण्याच्या निर्मितीची कथा मोठी रंजक आहे. सन १९०४ मध्ये भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांची पत्नी मेरी व्हिक्टोरिया यांनी या जंगलाला भेट दिली. अनेक वर्षांपासून एकशिंगी गेंड्यांचं आश्रयस्थान असणारे हे जंगल; पण मेरी व्हिक्टोरिया यांना मात्र या भेटीत एकही गेंडा दिसला नाही. या जंगलाला संरक्षण देण्याची मागणी त्यांनी आपल्या पतीकडे केली. त्यानंतर ता. ११ जून १९०५ रोजी २३२ चौरस किलोमीटर जंगल ‘प्रस्तावित संरक्षित भाग’ म्हणून घोषित करण्यात आलं.
नंतर तीन वर्षांनी ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावरील १५४ चौरस किलोमीटर भाग या भागाला जोडण्यात आला. सन १९०८ मध्ये या प्रस्तावित भागांना मिळून संरक्षित क्षेत्र घोषित करण्यात आलं. पुढं भारत स्वतंत्र झाल्यावर या भागाचं नाव ‘काझीरंगा अभयारण्य’ असं ठेवण्यात आलं. गेंड्यांची शिकार करणाऱ्याला सन १९५४ मध्ये आसाम सरकारनं कठोर शिक्षा आणि दंड घोषित केला. सन १९७४ मध्ये सुमारे ४३० चौरस किलोमीटरच्या या जंगलाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला. सन १९८५ मध्ये ‘युनेस्को’नं या जंगलाला ‘जागतिक वारसास्थळ’ म्हणून घोषित केलं. पुढं या जंगलात असलेलं वाघांचं अस्तित्व आणि या जंगलाचं व्याघ्रसंवर्धनातील महत्त्व लक्षात घेऊन सन २००७ मध्ये ‘काझीरंगा व्याघ्रप्रकल्प’ घोषित करण्यात आला. आज सुमारे ६२५.५८ चौरस किलोमीटरचा कोअर भाग आणि सुमारे ५४८ चौरस किलोमीटरचा बफर भाग मिळून सुमारे ११७३.५८ चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात हा व्याघ्रप्रकल्प पसरलेला आहे.
सन २०१८ मध्ये वनविभाग आणि काही स्वयंसेवी संस्थांनी एकत्रितरीत्या केलेल्या गणनेत काझीरंगा अभयारण्यात एकशिंगी गेंड्यांची संख्या सुमारे २४१३ इतकी नोंदवण्यात आली. जगात गेंड्यांच्या एकूण पाच जाती आहेत. यापैकी मोठा एकशिंगी गेंडा अर्थात् भारतीय एकशिंगी गेंडा ही जात भारतात आढळते. गेंडा हा सस्तन वन्यप्राण्यांच्या विषमखुरी गणातील प्राणी आहे. यांना तीन खूर असतात. भारतीय गेंड्याची सरासरी लांबी दोन ते चार मीटर असते, तर उंची सरासरी १.७ मीटर असते. भारतीय गेंड्याला एकच शिंग असतं आणि त्याची लांबी सुमारे ३८ ते ४१ सेंटिमीटर असते. या गेंड्याची त्वचा जड, केसविरहित आणि घड्या असलेली असते. कातडीवर तीन मोठ्या घड्या असतात.
या गेंड्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं महाकाय आणि मजबूत शरीर. त्याच्या शरीराकडं पाहिलं की एक गोष्ट मात्र लगेच लक्षात येते ती ही की त्याचे पाय खांबासारखे जड आणि आखूड असतात. एवढा अवजड देह असूनही हे गेंडे काही कालावधीसाठी ताशी सुमारे ४०-४५ किलोमीटर वेगानं दौडू शकतात. पूर्ण वाढ झालेले नर हे एकांडे असतात, तर माद्या, लहान पिल्लं आणि वयात येणाऱ्या काही नरांचा समावेश कळपात असू शकतो.
ज्या अवयवासाठी या गेंड्याची मोठ्या प्रमाणावर शिकार केली गेली तो अवयव म्हणजे त्याचं शिंग. भारतीय आणि जावा जातीच्या गेंड्याला एक शिंग असतं, तर इतर जातींमध्ये दोन शिंगं असतात. शिंगं भरीव आणि मजबूत असतात. आयुष्यभर त्यांची वाढ होते. झाडांची पानं, बांबूचे धुमारे, छोटी झुडपं, फळं, पाण्यातील वनस्पती हे या गेंड्याचं प्रमुख अन्न आहे. गेंड्याची श्रवणेंद्रिये आणि घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असतं, दृष्टी मात्र अधू असते. काझीरंगात आढळणारं गवत आणि लहान झुडपं ही परिस्थिती भारतीय एकशिंगी गेंड्यासाठी आदर्श वसतिस्थानाची मानली जाते. मादी एका वेळी एकाच पिल्लाला जन्म देते. भारतीय एकशिंगी गेंड्याचं आयुष्य सुमारे ३०-४५ वर्षं असतं. आपल्या महाकाय शरीरामुळे आणि अफाट ताकदीमुळे, वाघाचा अपवाद वगळता, गेंड्याला तसे नैसर्गिक शत्रू नाहीत. पूर्णपणे वाढ झालेल्या गेंड्याच्या वाटेला वाघही शक्यतो जात नाही. लहान गेंड्यांना कळपापासून दूर करून मारण्याचं तंत्र वाघ अवलंबतो. वाघाचा अपवाद सोडला तर गेंड्याचा एकच शत्रू आहे व तो म्हणजे माणूस. एकशिंगी गेंड्याच्या शिंगात औषधी गुण असतात या भ्रामक कल्पनेमुळे गेंड्याची मोठ्या प्रमाणावर शिकार केली गेली. बेसुमार शिकारीमुळे गेंड्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली होती; पण भारतीय वन्यजीव कायद्यान्वये या गेंड्यांना मिळालेलं संरक्षण आणि वनविभागानं केलेले प्रयत्न यांमुळे भारतीय गेंड्यांची संख्या वाढली. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आसाम वनविभागानं शिकाऱ्यांना अटकाव करण्यासाठी ‘शूट ॲट साईट’ ऑर्डर दिली होती. या ऑर्डरमुळे मोठ्या प्रमाणावर वादही निर्माण झाला होता. मात्र, वनविभागाचा निश्चय आणि सरकारचा पाठिंबा यामुळे ही ऑर्डर कायम राखली गेली आणि वनविभागानं त्याआधारे केलेल्या कारवाईमुळे अवैध शिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर जरब बसली.
काझीरंगा जंगलाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, इथं आढळणारं ‘हत्तीगवत’. हत्तीगवत हे नावाप्रमाणेच उंच आणि दाट असतं. या गवतात लपलेला हत्तीही दिसणं कठीण होतं, तर छोट्या प्राण्यांची काय कथा! पण अशा प्रकारच्या गवतामुळे या प्राण्यांना नैसर्गिक संरक्षण मिळालं आहे, तसंच शाकाहारी प्राण्यांवर अवलंबून असणाऱ्या वाघासारख्या शिकारीप्राण्यांनाही दबा धरण्यासाठी उत्तम संधी मिळते. साहजिकच निसर्गाचा योग्य समतोल राखला जातो. याशिवाय, काझीरंगामध्ये दलदलयुक्त भागसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे या भागांवर अवलंबून असणारी नैसर्गिक परिसंस्थाही इथं चांगल्या प्रमाणावर दिसून येते. काझीरंगा जंगलाला ब्रह्मपुत्रा नदीनं विळखा घातला आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. जंगलाच्या उत्तरेची आणि पूर्वेची सीमा ही ब्रह्मपुत्रा नदी आहे, तर दक्षिणेला मोर-दिफ्लु ही नदी वाहते. जंगलातून दिफ्लु आणि मोर धनसिरी या आणखी दोन महत्त्वाच्या नद्या वाहतात. पोषक वातावरण आणि मुबलक खाद्य यामुळे जंगलात वाघांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक वर्षं वाघांच्या घनतेबाबत काझीरंगा अभयारण्य भारतात पहिल्या क्रमांकावर होतं. नुकत्याच झालेल्या व्याघ्रगणनेनुसार, आता हे जंगल दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय जंगलात हत्ती आणि रानम्हशी यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. पक्षीजगताच्या दृष्टीनंही काझीरंगा जंगलाला वेगळं महत्त्व आहे. काझीरंगा जंगलात पक्षीवैविध्य चांगल्या प्रमाणात आहे.
या नितांतसुंदर जंगलाला दरवर्षी उद्भवणारा धोका म्हणजे ब्रह्मपुत्रा नदीला प्रचंड प्रमाणावर येणारा पूर. या पुरात अनेक जीवांना प्राण गमावावे लागतात; पण इथं आढळणारं हत्तीगवत दरवर्षी उगवण्यासाठी असा पूर येणंही तितकंच आवश्यक असतं. दरवर्षी येणारा पूर, वाढता मानवी हस्तक्षेप, शिकारीची टांगती तलवार असूनही काझीरंगा आपला दिमाख टिकवून आहे. निसर्गाच्या नानाविध रंगांची उधळण पाहण्याकरता प्रत्येकानं किमान एकदा तरी काझीरंगाला भेट द्यायलाच हवी. मात्र, इथं एकदाच येऊन आपलं पोट भरत नाही! आपण पुनःपुन्हा या जंगलाला भेट दिली की आपण काझीरंगाच्या रंगात हरवून जातो...
कसे जाल? : पुणे/मुंबई-गुवाहाटी-नागाव-काझीरंगा
भेट देण्यासाठी उत्तम कालावधी : नोव्हेंबर ते एप्रिल
काय पाहू शकाल? :
सस्तन प्राणी : सुमारे ३५ प्रजाती : एकशिंगी गेंडा, वाघ, बिबट्या, हत्ती, बाराशिंगा, सांबर, हॉग डिअर, भेकर, गवा, रानडुक्कर, रानमांजर, मुंगूस, रानम्हशी, फिशिंग कॅट, लेपर्ड कॅट, पाणमांजर, खोकड, कोल्हा इत्यादी.
पक्षी : सुमारे ४८० हून अधिक प्रजातींचे पक्षी : लेसर व्हाईट फ्रंटेड गुज, फेरुजीनस डक, लेसर ॲडज्युटंट स्टॉर्क, ग्रेटर ॲडज्युटंट स्टॉर्क, एशियन ओपनबिल, ब्लिथ्स किंगफिशर, डालमेशन पेलिकन, स्पॉट-बिल्ड् पेलिकन, ईस्टर्न इम्पिरिअल ईगल, ग्रेटर स्पॉटेड फिश ईगल, व्हाईट-टेल्ड् फिश ईगल, पल्लाज् फिश ईगल, ग्रे हेडेड फिश ईगल, लेसर केस्ट्रल, व्हाईट विंग्ड् वूड डक इत्यादी.
सरपटणारे प्राणी : मगर, आसाम रुफ्ड् टर्टल, नागराज, अजगर, धामण, नाग, घोणस, मण्यार, दिवड, घोरपड इत्यादी.
(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)
(शब्दांकन : ओंकार बापट)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.