भारताच्या प्रत्येक भागाला जैवविविधतेचा वरदहस्त लाभलेला आहे. देशातल्या कोणत्याही भागातला निसर्ग बघा, त्याचं सौंदर्य निराळं, तिथल्या जंगलांची मजा निराळी. या जंगलात फिरताना येणारे नानाविध अनुभव आपल्या पदरात समृद्धीचं दान टाकत असतात. हे दान गोळा करत मी आजवर अनेक जंगलात पुष्कळ वेळा भटकंती केली. अगदी भारतातल्या प्रत्येक भागातल्या जंगलांचा मनसोक्त आस्वाद घेतला. आजवर आपण माहिती घेतलेल्या जंगलांमध्ये मी असं बऱ्याचदा नमूद केलंय की मला दक्षिण भारतातल्या जंगलांनी काकणभर अधिक भुरळ घातली आहे. पण पश्चिम भारतातल्या विशेषतः राजस्थानातील जंगलांचं अप्रूपही मला वाटत आलंय. इथली जंगलं बघितली निसर्गाचा अविष्कार पाहून बोटं तोंडात घालावीशी वाटतात. खडकाळ डोंगरात असलेल्या वाघांच्या साम्राज्याचं रणथंबोर आणि तिथली जैवविविधता याची माहिती आपण याआधीच्या लेखातून घेतली आहे. इथला निसर्ग बघताना एवढ्या रुक्ष वातावरणात वाघांनी स्वतःला कसं काय जुळवून घेतलं असेल याचा आपल्या मनात अनेकदा विचार येऊन जातो. राजस्थानातील जंगलांची हीच खरी गंमत आहे. वरवर ही जंगलं ओसाड, रूक्ष वाटली तरी त्यात जैवविविधतेचं नंदनवन फुललेलं आहे. त्याकडे बघण्याची दृष्टी साफ हवी.
राजस्थानमध्ये असंच एक जंगल आहे जे खरं तर ओसाड वाळवंटात पसरलेलं आहे पण इथली जैवविविधता पाहण्यासारखी आहे. इतर जंगलांसारखी इथे खूप हिरवाई नाही. या राष्ट्रीय उद्यानाचा बराचसा भाग हा खडकाळ टेकड्यांनी व्यापलेला आहे तर उर्वरित भागात वाळवंट आहे. जैसलमेरच्या पश्चिमेकडे पसरलेल्या या राष्ट्रीय उद्यानाचे नाव आहे ‘मरू राष्ट्रीय उद्यान’ (डेझर्ट राष्ट्रीय उद्यान). सुमारे ३१६२ चौरस किलोमीटर एवढ्या प्रचंड भागात पसरलेलं जंगल जैवविविधतेचा विलक्षण नमुना आहे. हे जंगल जगातील मोठ्या राष्ट्रीय उद्यानांपैकी एक गणले जाते. विविध प्रजातींच्या स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांसाठी स्वर्ग अशी या जंगलाची ख्याती आहे. या जंगलाच्या एकूण सुमारे ३हजार १६२ चौरस किलोमीटर क्षेत्रापैकी सुमारे एकोणीसशे चौरस किलोमीटर क्षेत्र जैसलमेर या जिल्ह्यात येते तर सुमारे १हजार २६२ चौरस किलोमीटर क्षेत्र बारमेर जिल्ह्यात येते. केवळ देशभरातूनच नव्हे तर अगदी परदेशातूनही निसर्गप्रेमी मोठ्या प्रमाणावर या जंगलाला भेट देतात. १९८० मध्ये ४ ऑगस्टला या राष्ट्रीय उद्यानाला मान्यता देण्यात आली.
उंचसखल खडकाळ भाग, नजर जाईल तिथपर्यंत पसरलेला वालुकामय प्रदेश, मधूनच उगवलेली खुरटी झुडपं, लांबवर दिसणाऱ्या वाळूच्या उंचसखल छोट्या मोठ्या टेकड्या आणि काही ठिकाणी असलेले पाणवठे यामुळे या राष्ट्रीय उद्यानाला निराळंच रूप मिळालं आहे. हा प्रदेश एका खास पक्ष्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे. तो पक्षी म्हणजे माळढोक. हा पक्षी गिधाडापेक्षा मोठा असतो. त्याची उंची सुमारे १२२ सेंमी. असते. इंग्रजीमध्ये त्याला ग्रेट इंडियन बस्टर्ड असे म्हणतात. त्याचे शरीर आडवे असते. शरीराची एकंदर ढब शहामृगाच्या पिल्लासारखी असते. पाठीचा रंग गहिरा पिवळसर–तांबूस असून त्याच्यावर बारीक आडव्या काळ्या रेषा असतात. खालचा भाग पांढरा असतो तर छातीवर थोडा खाली अर्धगोलाकृती काळा पट्टा असतो. मान पांढरी असते. पाय लांब व मजबूत असतात. पायावर पिसं नसतात. नर आणि मादी दिसायला जरी सारखी असली, तरी मादी नरापेक्षा लहान असते.
देशातल्या काही ठरावीक भागात या पक्ष्यांचे अस्तित्व उरले आहे. त्यापैकीच मरू राष्ट्रीय उद्यान हे एक. किंबहुना मरू राष्ट्रीय उद्यानात या पक्ष्यांची संख्या देशात सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात एकेकाळी माळढोक मोठ्या संख्येने नगर, सोलापूर, चंद्रपूर , यवतमाळ इ. भागांत आढळत असत. सोलापूर जिल्ह्यातील नान्नज अभयारण्याची निर्मिती याच पक्ष्याच्या संरक्षणासाठी करण्यात आली होती. मात्र अवैध शिकार आणि अधिवासात होणारी घट यामुळे यांची या अभयारण्यातील संख्या कमी कमी होत गेली. मधूनमधून शेते असलेल्या गवताळ आणि झुडपे असणाऱ्या मैदानी प्रदेशात राहणारा हा पक्षी आहे. या पक्ष्यांची जोडपी असतात किंवा ३-४ पक्ष्यांचा लहान थवा असतो. स्वभावाने भित्रा असला, तरी हा नेहमी सावध असतो. पुष्कळदा तो उभ्या पिकात लपून बसतो. तो अतिशय जलद धावू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या मजबूत पंखांनी कित्येक किमी लांबवर उडत जाउ शकतो. टोळ, नाकतोडे, भुंगेरे आणि इतर किडे हे याचे मुख्य भक्ष्य होय. पण याशिवाय धान्य, सरडे, पाली आणि गोमादेखील हा खातो. संकटाचे थोडेसे जरी चिन्ह दिसले, तरी हा पक्षी मोठ्याने आवाज काढतो व तो काहीसा डुरकण्यासारखा असतो. उड्डाण करताना हा पक्षी काही काळ जमिनीवरून धाव घेतो आणि मग उड्डाण करतो. आकाशातून जमिनीवर उतरतानाही पुन्हा हीच कृती करतो. विमानाच्या उड्डाणाच्या आणि जमिनीवर येण्याच्या क्रियेशी साधर्म्य असणारी ही कृती आहे.
नर बहुपत्नीक असतो. प्रियाराधनाच्या काळात माद्यांच्या घोळक्यासमोर तो आपल्या सौंदर्यांचे प्रदर्शन करतो. मान व गळा फुगवतो अंगावरची पिसेही फुगवतो शेपटी वर उचलून पंख लोबंते ठेवून ते एकसारखे थरथरवतो. मानेशी असलेली गुलर थैली प्रेमसंबधांच्या दरम्यान फुगवतो ज्यामुळे एखाद्या डळमळीत पिशवीसारखी ही थैली मानेशी लटकताना दिसते. माळढोक पक्ष्यांच्या विणीचा हंगाम मुख्यतः ऑगस्ट -सप्टेंबर मध्ये असतो. जमिनीवर अंडी घातली जातात . एकच अंडे घालते जाते . ते फिक्या हिरवट तपकिरी रंगाचे असून त्यावर गर्द तपकिरी रंगाचे पुसट डाग असतात. फक्त मादीच अंडे उबविते. हा राजस्थानचा राज्यपक्षी आहे. पूर्वी हा पक्षी भारतीय उपखंडात मोठ्या प्रमाणावर आढळत असे. कालांतराने भारत आणि पाकिस्तान या देशांपुरतेच त्याचे अस्तित्व मर्यादित झाले. आता तर पाकिस्तानातही तो नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याच पक्ष्याची उपजात असलेला मॅक्वीनस् बस्टर्ड हा दुर्मिळ पक्षीही मरू राष्ट्रीय उद्यानात काही कालखंडासाठी स्थलांतर करून येतो.
सस्तन प्राण्यांमध्ये चिंकारा, वाळवंटी मांजर, वाळवंटी खोकड, हेजहॉग असे प्राणी आपल्याला येथे पाहायला मिळतात. ढोंक, ताड यांची झाडं मोठ्या प्रमाणात या उद्यानात आहेत. मरू राष्ट्रीय उद्यानात वनस्पती, पशु-पक्षी यांचे जीवाश्म पाहायला मिळतात. असे म्हणतात की हे १८ कोटी वर्षांपूर्वीचे जीवाश्म आहेत. डायनोसॉरचे ६० लाख वर्षांपूर्वीचे जीवाश्मही येथे पाहायला मिळतात.
वाळवंट म्हणल्यावर इथे आपल्याला काय पाहायला मिळणार असा प्रश्न अनेकांना पडतो. पण एकदा का ओसाड वाळवंटात फुललेलं हे नंदनवन पाहिलं की दरवर्षी आपले पाय या जंगलाकडे हमखास वळतात. पक्षिप्रेमींसाठी पर्वणी असणारं हे जंगल अपूर्वच म्हणावं असं आहे. भारतात अशा जैवविविधतेच्या नमुन्याचं जंगल मिळणं दुर्मीळ. निसर्गाच्या या असाधारण निर्मितीला पाहिलं की आपण त्याच्यापुढे आपोआप नतमस्तक होतो. या अद्भुत राष्ट्रीय उद्यानात आपल्याला वारंवार यावंसं वाटतं. या मरूस्थळाशी आपली नाळ जोडली जाते आणि निसर्गाच्या या आविष्कारात आपण गुंगून जातो.
कसे जाल? :
पुणे/मुंबई-जोधपूर-जैसलमेर-खुरी
भेट देण्यास उत्तम हंगाम
नोव्हेंबर ते मार्च
काय पाहू शकाल?
सस्तन प्राणी :
वाळवंटी खोकड, वाळवंटी मांजर, चिंकारा, लांडगा, हेजहॉग, इ.
पक्षी :
भाट तीतर, राखी तित्तीर, ठीपकेवाला तीतर, ब्लॅक-बेलीड सँडग्राऊज, पांढूरका भवत्या, धाविक, मॉंटेग्यूचा भवत्या, यूरेशिअन चिमणमार ससाणा, लग्गड ससाणा, आखूड बोटांचा सर्पगरुड, साईक्स नाईटजार, चातक, करकरा क्रौंच, सामान्य क्रौंच, माळढोक, मॅक्वीनस् बस्टर्ड, कुदळ्या, युरेशियन करवानक, संघचारी टिटवी, क्रीम कलर्ड कोर्सर, धाविक, मधुबाज, भुरे गिधाड, काळे गिधाड, राजगिधाड, लॉंग लेग्ड बझर्ड इ.
सरपटणारे प्राणी :
स्पाइनी-टेल्ड लिझार्ड, घोरपड, फुरसे, घोणस, मण्यार, इ.
(सदराचे लेखक महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत.)
(शब्दांकन : ओंकार बापट)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.