दक्षिण भारतातील केरळ हे राज्य तिथल्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. अथांग पसरलेले अनेक सुंदर किनारे, केरळ राज्याची सांस्कृतिक आणि आर्थिक राजधानी अशी बिरुदावली मिरवणारं सुंदर कोची बंदर, आकाशाला स्पर्श करणाऱ्या सुंदर डोंगरांनी नटलेलं मुन्नार; निर्जन कालवे, तलाव व नद्या यांच्या जाळ्यांनी बनलेल्या केरळच्या बॅकवॉटर्सचा परीसस्पर्श झालेलं अलेप्पी शहर आणि यात असणाऱ्या हाउसबोटींच्या साहाय्यानं चालणारा नौकाविहार... अशा अनेक वैशिष्ट्यांनी नटलेलं केरळ राज्य भारतातील रमणीय ठिकाणांपैकी एक समजलं जातं. नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमन अंदमान निकोबार बेटांनंतर केरळमध्ये होतं आणि मग ते भारतात सर्वदूर पसरतात. हेही केरळ राज्याचं आणखी एक वैशिष्ट्य. ‘ देवांचा प्रदेश’ म्हणूनही ओळख असणाऱ्या या राज्याला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे. अनेक अप्रतिम जंगलांनी नटलेलं केरळ राज्य निसर्ग संवर्धनाच्या बाबत भारतातील एक प्रमुख राज्य आहे. वायनाड, आरलम, चिन्नार, इडुक्की, सायलेंट व्हॅली अशी अनेक जंगलं केरळ राज्याच्या सौंदर्यात अधिक भर टाकतात.
या जंगलांत एका जंगलाचं नाव प्रामुख्यानं घ्यावं लागेल. या भारतात अस्तित्वात असणाऱ्या जुन्या व्याघ्र प्रकल्पांपैकी एक, अशीही या जंगलाची ओळख आहे. वेलची डोंगररांगांमध्ये वसलेलं हे सुंदर जंगल म्हणजे ‘ पेरियार व्याघ्र प्रकल्प’. १९३४ मध्ये इथं असणाऱ्या जैवविविधतेचं महत्त्व लक्षात घेऊन त्रावणकोरच्या महाराजांनी या जंगलाला संरक्षित क्षेत्र म्हणून मान्यता दिली. पुढं भारत स्वतंत्र झाल्यावर १९५० मध्ये या जंगलाला पेरियार वन्यजीव अभयारण्य म्हणून मान्यता मिळाली. १९७३ मध्ये व्याघ्र प्रकल्पांची स्थापना झाल्यावर भारतातील नऊ जंगलांना व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. वाघांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून पेरियार जंगलाचं असलेलं महत्त्व लक्षात घेऊन १९७८ मध्ये भारतातील दहावा व्याघ्र प्रकल्प म्हणून या जंगलाला मान्यता देण्यात आली. १९८२ मध्ये सुमारे ३५० चौरस किलोमीटर भागात पसरलेल्या जंगलाला पेरियार राष्ट्रीय उद्यान म्हणून मान्यता देण्यात आली. जंगलात प्रदेशनिष्ठ पक्षी, प्राणी, वनस्पती यांची संख्याही चांगल्या प्रमाणावर आहे. त्यामुळं व्याघ्र प्रकल्पामुळं मिळालेल्या संरक्षणाचा फायदा वाघांबरोबर जंगलातील इतर जैवविविधतेलाही झाला आहे. जंगलात हत्तींची संख्याही चांगल्या प्रमाणात आहे. याचं कारण म्हणजे, १९९८ मध्ये या जंगलाचा समावेश हत्ती संरक्षण प्रकल्पात करण्यात आला.
सुमारे ८८१ चौरस किलोमीटरचा कोअर भाग आणि सुमारे ४४ चौरस किलोमीटरचा बफर भाग मिळून सुमारे ९२५ चौरस किलोमीटर पसरलेल्या या जंगलात आपल्याला मोठ्या प्रमाणावर जैवविविधता पाहायला मिळते. इडुक्की आणि पत्तनमिट्टा जिल्ह्यात हे जंगल पसरलेलं आहे. केरळ राज्यातील दोन महत्त्वाच्या नद्या पेरियार आणि पंपा यांचं पाणी जंगलात पसरलेलं आहे. पेरियार नदीवरून जंगलाला पेरियार अभयारण्य म्हणून नाव मिळालं. १८९५ मध्ये पेरियार नदीवर धरण बांधण्यात आलं. या धरणाचं बॅकवॉटर जंगलात सुमारे २६ चौरस किलोमीटर भागात पसरलेलं आहे. हे बॅकवॉटर जंगलातील वन्यजीवांसाठी महत्त्वाचा पाण्याचा स्रोत आहे. हे बॅकवॉटर आणि त्याच्या आजूबाजूला पसरलेलं सदाहरित, निमसदाहरित जंगल हे दृश्य अत्यंत विलोभनीय असतं. या पाणलोट क्षेत्रातून आपण बोटिंगचाही आनंद घेऊ शकतो. बोटीत बसून आजूबाजूचं जंगल अनुभवायची मजा और असते. फार वन्यजीवनाचं दर्शन आपल्याला बोटीतून जाताना होईल असं नाही; पण नुसतंच जंगल बघण्याचा आनंदही वेगळाच असतो.
पश्चिम घाटातील वेलची डोंगरानं वेढलेल्या या जंगलाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, काही प्रदेशनिष्ठ प्राणी, पक्षी, वनस्पती यांचा आढळ. सिंहपुच्छ माकड, नीलगिरी थार, नीलगिरी वानर असे काही दुर्मीळ जीव आपल्याला पेरियारमध्ये पाहायला मिळतात. केवळ पश्चिम घाटात सापडणाऱ्या काही वनस्पतीही आपल्याला पेरियारच्या जंगलात आढळतात. एकूण सुमारे १९८५ प्रजातींच्या वनस्पती आपल्याला पेरियारमध्ये पाहायला मिळतात, ज्यांपैकी ५१९ प्रजातींच्या वनस्पती प्रदेशनिष्ठ आहेत. नीलगिरी थार ही फक्त नीलगिरी पर्वतरांगांमध्ये सापडणारी, दुर्मीळ होत चाललेली जंगली शेळीची प्रजाती आपल्याला पेरियारमध्ये चांगल्या संख्येनं पाहायला मिळते. तमिळनाडू आणि केरळ राज्यात हा प्राणी जंगलांमध्ये पाहायला मिळतो. तमिळनाडू राज्याचा हा राज्यप्राणी आहे.
स्थानिक भाषेत याला नीलगिरी साकीन किंवा साकीन म्हणून ओळखलं जातं. पश्चिम घाटातील वर्षावन हा या प्राण्याचा अधिवास. पूर्वी मोठ्या संख्येनं आढळणाऱ्या या प्राण्याची संख्या विसाव्या शतकाच्या सुरुवातीला केवळ १०० च्या आसपास राहिली होती. चांगल्या प्रकारचं संरक्षण मिळाल्यामुळं आता सुमारे २००० पर्यंत ही संख्या पोहोचली आहे. केरळ राज्यातील एराविकुलम राष्ट्रीय उद्यानात हा प्राणी सर्वांत जास्त संख्येनं आढळून येतो. अंगापिंडानं सशक्त असलेल्या या प्राण्याच्या अंगावर आखूड केसांची फर असते, मानेभोवती आयाळ असते. नर आणि मादी दोघांनाही शिंगं असतात. नराची शिंगं अधिक वक्राकार असतात. नराचं वजन सुमारे ८० ते १०० किलोपर्यंत असतं, तर खांद्यानजीक उंची सुमारे १०० सेंमी. असते. वयस्कर नराच्या पाठीचा रंग हळूहळू करडा होतो, ज्यावरून नर सहजपणे ओळखता येतात. सुमारे १२०० ते १६०० मीटरच्या उंचीचा पठारी भाग हे यांचं आदर्श निवासस्थान. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे, शोला जंगलांमध्ये यांचा आढळ आहे. त्यामुळं या प्राण्यांचं संवर्धन करायचं असेल, तर अगोदर दोन डोंगरांमध्ये अडकलेला जंगल प्रकार अर्थात शोला वन वाचवणं अधिक गरजेचं आहे.
पर्वतरांगांनी वेढलेल्या पेरियार धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेलं हे पेरियार जंगल अप्रतिम जैवविविधतेचा खजिनाच आहे. निसर्गाचा हा सुंदर आविष्कार पाहणं म्हणजे निसर्गप्रेमींसाठी पर्वणीच. निसर्गाचे नानाविध रंग आपल्याला या जंगलात पाहायला मिळतात. दरवर्षी तुफान पडणारा पाऊस, उंचच उंच डोंगर, कड्यावर कोसळणारं पाणी, घनदाट अरण्य, डोळ्यांचं पारणं फेडणारं पेरियार नदीचं रूप आणि यात ठायी ठायी भरून असलेली जैवविविधता यामुळं आपण पेरियार जंगलाच्या प्रेमात पडतो. वाघांची चांगली संख्या असणाऱ्या या जंगलाला वाघांबरोबर हत्ती, नीलगिरी थार, नीलगिरी वानर या प्राण्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीनंही अनन्यसाधारण महत्त्व आहे. इथं आलो की निसर्गाचं दान ओंजळभरून घ्यावं. हे निसर्गाचं दान म्हणजे श्रीकृष्णाच्या अक्षय थाळीसारखं आहे, ते कधीच कमी होणारं नाही. निसर्गाचा हा दानपसा आपल्याला अधिक समृद्ध करून टाकेल यात कोणतीही शंका नाही.
कसं जाल? : पुणे/मुंबई-कोची-पेरियार
भेट देण्यास उत्तम हंगाम : ऑक्टोबर ते मार्च
काय पाहू शकाल?
सस्तन प्राणी : वाघ, बिबट्या, गवे, सांबर, भेकर, रानडुक्कर, नीलगिरी वानर, सिंहपुच्छ माकड, नीलगिरी थार, मुंगुस, अस्वल, रानकुत्रे, पिसोरी, रानमांजर, हत्ती, त्रावणकोर उडती खार, नीलगिरी मार्टिन, इ.
पक्षी : रुफस बेलीड ईगल, निळ्या पंखांचा पोपट, सुभग, नीलगिरी रानपारवा, रुफस बॅबलर, राज धनेश, नीलगिरी फ्लायकॅचर, बेडूकतोंड्या, ब्लॅक बझा, छोटा कोळीखाऊ, पांढऱ्या पोटाचा नर्तक, नीलगिरी तिरचिमणी, पाचू कवडा, निळ्या चष्म्याचा मुंगश्या, कारुण्य कोकिळा, बदामी वंचक, मधुबाज, कृष्णगरुड, युरेशियन चिमणमार ससाणा इ.
सरपटणारे प्राणी : मण्यार, नाग, घोणस, धामण, अजगर, फ्लाइंग लिझर्ड/ड्रेको, घोरपड इ.
फुलपाखरं : कॉमन रोझ, क्रीम्सन रोझ, कॉमन जे, लाइम बटरफ्लाय, मलाबार रेवन, कॉमन मॉर्मान, रेड हेलन, ब्लू मॉर्मान, सदर्न बर्डविंग, कॉमन वाँडरर, मॉटल्ड इमिग्रंट, कॉमन ग्रास येलो, स्पॉटेड ग्रास येलो, स्पॉटलेस ग्रास येलो, वन स्पॉट ग्रास येलो, नीलगिरी क्लाऊडेड येलो, कॉमन जेझेबल, इ.
(सदराचे लेखक ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत. )
(शब्दांकन : ओंकार बापट)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.