देशाबाहेर वाटेल ते उद्योग करण्यासाठी कुख्यात असलेली आणि देशातल्या राजकीय व्यवस्थेत ढवळाढवळ करू शकणारी आयएसआय ही पाकिस्तानातली एक अत्यंत सामर्थ्यसंपन्न संघटना आहे. या संघटनेचे माजी प्रमुख आणि इम्रान खान यांचे निकटवर्ती अधिकारी लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांना तिथल्या लष्करानं अटक करून देशात स्पष्ट संदेश दिला आहे.
‘पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांच्या विरोधातल्या कोणत्याही हालचाली सहन केल्या जाणार नाहीत आणि इम्रान खान यांना मदत करणंही मान्य नाही,’ हा तो संदेश. या एका अटकेनं पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसीम मुनीर यांनी आपली पकड मजबूत करणारं ठोस पाऊल टाकलं आहे.