मनोरंजनाच्या रूढ चौकटी मोडणारी ‘व्हिडिओ ऑन डिमांड’ सेवा देणारी वेब चॅनेल्स ही सध्याची ‘इन थिंग’ आहे. विशिष्ट शुल्क भरून वेगवेगळ्या प्रकारच्या वेब सिरीज, चित्रपट आणि इतर मनोरंजन थेट तुमच्यापर्यंत आणून पोचवणाऱ्या या व्यवस्थेविषयी माहिती.
गेल्या दोन दशकात आपण टेलिव्हिजनची तांत्रिकदृष्ट्या होणारी क्रांती अनुभवली. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांत खासगी वाहिन्यांचा घराघरांत होणारा वाढता प्रभावही बघितला. केबल-अँटेनापासून ते सेट टॉपबॉक्स हा प्रवासही आपण जवळून बघितला. त्यानंतर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात शिरकाव झाला तो इंटनेटचा! इंटरनेट सहज उपलब्ध होऊ लागल्यानं करमणुकीची साधनंही बदलली. एका टीव्हीसमोर एक कार्यक्रम बघण्यासाठी बसलेलं कुटुंब आता आपापल्या आवडीप्रमाणं मोबाईलवर, लॅपटॉपवर कार्यक्रम बघू लागलं. यातूनच जन्म झाला तो ‘व्हिडिओ ऑन डीमांड’ या संकल्पनेचा!
‘व्हिडिओ ऑन डीमांड’ म्हणजे काय?
‘व्हिडिओ ऑन डीमांड’ म्हणजे प्रसारणाच्या ठरलेल्या वेळेव्यतिरीक्त इतर कोणत्याही वेळेत हवे ते कार्यक्रम आवडीनुसार बघणं. टीव्हीसारखंच इंटरनेटनं एक समांतर जग निर्माण केलं आहे. त्यामुळे टीव्हीवरच्या खासगी वाहिन्यांप्रमाणंच इंटरनेटच्या जगात वेब चॅनेल्स निर्माण झाली. यूट्यूबनं हा पायंडा प्रथम पाडला. यूट्यूबप्रमाणेच यासारख्या अनेक वेब चॅनेल्सची निर्मिती झाली व त्यावरच्या वेब सिरीज जगभरात बघितल्या जाऊ लागल्या.
‘व्हिडिओ ऑन डीमांड’ची वैशिष्ट्यं
वेब चॅनेलचे किंवा ‘व्हिडिओ ऑन डीमांड’चे अनेक फायदे आहेत. आपण कुठंही, कधीही, कितीही वेळा या सुविधेचा लाभ घेऊ शकतो. इंटरनेट, मोबाईल, लॅपटॉप कशावरही वेब चॅनेल बघू शकतो. त्यासाठी विशिष्ट जागेची, वेळेची गरज नाही. यातला काही भाग बघायचा नसल्यास तो फॉरवर्ड करता येतो, तर एखादा सीन रिवाइंड करून पुन्हा बघता येतो. ही खासगी चॅनेल्स बघण्यासाठी विशिष्ट रक्कम (सबस्क्रिप्शन) आपल्याला भरावी लागते. नवीन चित्रपटांपासून ते या खासगी निर्मिती (इन हाऊस प्रॉडक्शन) असलेल्या अनेक वेब सिरीज आपल्याला यावर बघता येतात. अनेक नामवंत दिग्दर्शक, कलाकारही आता वेब सिरीजकडं वळले आहेत. जाणून घेऊ अशाच काही ‘व्हिडिओ ऑन डीमांड’ सेवा देणाऱ्या वेब चॅनेल्सबद्दल.
नेटफ्लिक्स : ‘नेटफ्लिक्स’ मूळच्या अमेरिकी या वेब चॅनेलनं भारतात कमी कालावधीत चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. ‘चित्रपटांचं ग्रंथालय’ या धर्तीवर चालू केलेल्या नेटफ्लिक्सनं कालांतरानं स्वत:च वेब सिरीजची निर्मिती सुरू केली आणि त्या जगभरात गाजल्या. सध्या गाजत असलेली ‘सॅक्रेड गेम्स’ ही वेब सिरीज ‘नेटफ्लिक्स’ निर्मितच आहे. ‘नेटफ्लिक्स’वर तुम्ही एक महिना मोफत सेवा घेऊ शकता, त्यानंतर ही सेवा आवडल्यास तुम्ही पैसे भरून ती घेऊ शकता. त्यांचे बेसिक, स्टॅंडर्ड व प्रीमिअम असे तीन प्रकार आहेत. नेटफ्लिक्स जगभरात विविध भाषांमध्ये सेवा देतं. ते मोबाईल ॲपवरही उपलब्ध आहे.
संकेतस्थळ : www.netflix.com
मोबाईल ॲप : Netflix
अल्ट बालाजी : ‘अल्ट बालाजी’ हे मूळ भारतीय ‘व्हिडिओ ऑन डीमांड’ देणारं खासगी वेब चॅनेल. बालाजी टेलिफिल्म्स या प्रसिद्ध कंपनीचं हे वेब चॅनेल. भारतीय ढंगाच्या वेब सिरीजमुळे ‘अल्ट बालाजी’ नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. विनोदी ते भयपट अशा सर्व प्रकारच्या सिरीज आपल्याला यावर बघायला मिळतील. हिंदी चित्रपटही यावर उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी काही विशेष सिरीजही यावर बघायला मिळतात. काही मालिकाही ‘अल्ट बालाजी’वर उपलब्ध आहेत.
संकेतस्थळ : altbalaji.com
ॲप : ALTBalaji
ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ : ऑनलाइन खरेदीसीठी प्रसिद्ध असलेल्या ॲमेझॉन या कंपनीची ‘प्राइम व्हिडिओ’ ही व्हिडिओ ऑन डीमांड ही सेवा देणारी कंपनी. यात नवीन चित्रपट, टेलिव्हिजनवरच्या मालिका उपलब्ध आहेत. ‘ॲमेझॉन स्टुडिओज्’ हे त्यांनी स्वत: निर्मिती केलेले कार्यक्रमही यावर बघायला मिळतात. हिंदीसह इतर सात भाषांमध्ये ॲमेझॉन प्राइम आपल्याला सेवा देते. दर महिना किंवा वार्षिक स्वरूपात याचं सबस्क्रिप्शन आकारलं जातं.
संकेतस्थळ : www.primevideo.com
ॲप : Amazon Prime Video
टीव्हीएफ प्ले : तरुणाईमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असं हे वेब चॅनेल. यातल्या काही सिरीज इतक्या लोकप्रिय आहेत, की त्यांचे एकापेक्षा अधिक सीझन गाजले आहेत. ‘टीव्हीएफ ऑरिजिनल्स’ या टॅबखाली त्यांच्या ओरिजिनल सिरीज बघायला मिळतात. ‘टीव्हीएफ प्ले’चं सबस्क्रिप्शन स्वस्त असून, त्यात अत्यंत चांगले आणि तरुणाईला आकर्षित करणारे कार्यक्रम बघायला मिळतात. यावर ‘द पिचर्स’, ‘पर्मनंट रूममेट्स सीझन १, २’, ‘ट्रिपलिंग टियागो’, ‘ये मेरी फॅमिली’ अशा अनेक इंटरेस्टिंग सिरीज बघायला मिळतात.
संकेतस्थळ : tvfplay.com
ॲप : TVFPlay - Play India’s Best Original Videos
हुलू : ‘हुलू’ ही व्हिडिओ ऑन डीमांड सेवा देणारी अमेरिकी कंपनी. अजून भारतात तिचं पदार्पण झालं नसलं, तरी इतर देशांत हुलू अत्यंत लोकप्रिय आहे. वॉल्ट डिस्ने या कंपनीशी हुलूचा टायअप आहे. त्यामुळं उत्तमोत्तम मालिका प्रेक्षकांना हुलूवर बघायला मिळतात- तेही अगदी स्वस्त दरांत. एका महिन्यासाठी मोफत सेवा असलेल्या हुलूला कालांतरानं सबस्क्रिप्शन लागू होतं. यावर लाईव्ह मालिकाही बघू शकतो.
संकेतस्थळ : www.hulu.com
भारत ही तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं मोठी बाजारपेठ आहे. अनेक पाश्चात्य कंपन्या इथं येऊन गुंतवणूक करू लागल्या आहेत. मोठ्या प्रमाणात असलेली तरुणाई आणि वेगवेगळ्या भाषा या वेब चॅनेल्ससाठी ‘टार्गेट ऑडिअन्स’ आहेत. तसंच करमणुकीच्या क्षेत्राला अंत नसल्यानं ‘व्हिडिओ ऑन डीमांड’ ही संकल्पना भारतात जोर धरू लागली आहे. भविष्यात यातही काही तरी अजब बघायला मिळेल अशी आशा!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.