मदतीचं समाधान (महेश झगडे)

Mahesh-Zagade
Mahesh-Zagade
Updated on

‘एखाद्या गरिबाला आर्थिक मदतीची गरज भासली तर माझ्याकडे जरूर मदत मागा,’’ असं मला त्या वकीलमहोदयांनी एका भेटीत आवर्जून सांगितलं होतं. ही बाब माझ्या स्मरणात राहिली होती. मात्र, आजवर तशी गरज कधी भासली नसल्यानं त्यांना मदत मागण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र, या वृद्ध शेतकऱ्यासाठी काही आर्थिक मदत त्यांच्याकडून घ्यावी असं अचानक माझ्या मनात आलं. 

त्या शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न मोडू नये म्हणून मी एका सद्गृहस्थांची मदत घ्यायचं ठरवलं. प्रशासनात वेगवेगळ्या वृत्तीची माणसं नेहमीच भेटत असतात. अतिशय चांगलीही माणसं भेटतात आणि विकृत मनोवृत्तीचीही माणसं संपर्कात येतात. 
खऱ्या अर्थानं सद्गृहस्थ म्हणावेत असे एक पारशी वकील माझ्या परिचयाचे होते. 

माझं मंत्रालयात पोस्टिंग असताना कार्यालयीन कामाच्या निमित्तानं त्यांची-माझी ओळख झाली होती. 

काही वर्षांपूर्वी एका मंत्र्याच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गुन्ह्याच्या प्रकरणासंदर्भात ही भेट झालेली  होती. व्यवसाय आणि आडनाव एकसारखंच असण्याची उदाहरणं अगदीच तुरळक असतात. हे वकीलमहोदय त्यांपैकीच एक होते. यांचं आडनावही वकील आणि व्यवसायही वकिलीचाच. त्यांच्या वयाची ८० वर्षं उलटून गेली होती. ८० उन्हाळे-पावसाळे पाहिल्याचं त्यांच्या चालण्या-बोलण्यातून प्रकर्षानं जाणवत असे. मात्र, या वयातही त्यांच्या बुद्धीचा तल्लखपणा जरासाही कमी झालेला नव्हता हे एक आश्चर्यच. उच्च न्यायालयात गुन्हेगारीच्या केसेस चालवण्यात त्यांचा हातखंडा होता. 

समोरच्या व्यक्तीला नेहमीच लाखोली वाहून ‘अरे-तुरे’ संबोधण्याचा त्यांचा खाक्या होता! ते शब्द प्रचलित अर्थानं अर्वाच्य वाटत असले तरी किंवा शिव्या या सदरात मोडत असले तरी त्यांच्या तोंडून येताना, ते प्रेमाचंच संबोधन आहे, असं वाटायचं. वकीलमहोदयांचा स्वभाव कमालीचा तिरसट. आमच्या वयातलं अंतर आणि भिन्न स्वभावधर्म यांमुळे आमची मैत्री होणं अशक्‍य वाटत होतं, तरी काही भेटींतच जिव्हाळा निर्माण झाला. या वकिलांनी लग्न केलं होतं किंवा नाही हे माहीत नाही; पण त्यांना कुटुंब नव्हतं. सुरुवातीला आमचे इतके खटके उडत असत की त्यांची भेट घेणं टाळण्याकडेच माझा कल असायचा. मात्र, केसच्या निमित्तानं वारंवार भेटावं लागल्यानं, या तिरसट व्यक्तीआड एक अत्यंत सहृदयी माणूस दडलेला आहे हे मला जाणवलं. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एकदा केसचं ब्रीफिंग उशिरापर्यंत चालल्यानं आणि वेळ खूप झाल्यानं, रात्रीचं जेवण एकत्रच घेण्याविषयी त्यांनी सुचवलं. मुंबईतल्या ‘केम्प्स कॉर्नर’वरच्या एका लहानशा रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर माझी या ‘तिरसट’ माणसाशी मैत्री झाली. नंतर उच्च न्यायालयात किंवा फोर्टमधल्या अतिशय जुन्या अशा ‘रिपन क्‍लब’मध्ये किंवा फोर्टमधल्या त्यांच्या छोटेखानी कार्यालयातही भेटी होत गेल्या. हा ‘रिपन क्‍लब’ अतिशय जुना आणि एका जीर्ण इमारतीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या मजल्यावर होता. काळ जणू काही इथं थांबून राहिलेला आहे असं वाटावं असं तिथलं वातावरण असे! जुन्यात जुनं फर्निचर तिथं होतं. विशेषतः तिथल्या आरामखुर्चीचे आर्म रेस्ट लाकडी फळ्या सरकवून केलेले होते. त्यांवर पाय ठेवून आराम करणाऱ्या वृद्ध सदस्यांमध्ये हे वकीलमहोदयही असत. आरामखुर्चीत बसून डोळे झाकून ते केसची माहिती घेत असत. त्यांच्या कार्यालयात पांडे नावाचे साहाय्यक होते. त्यांच्यावर दर मिनिटाला खेकसून, त्यांना शेलक्‍या शिव्या घालून ते जर्जर करत असत. ते पांडेही काही घडलंच नाही अशा पद्धतीनं निर्विकार चेहऱ्यानं कामात व्यग्र राहायचे. त्यांचंही या वकिलांवर मालक म्हणून नव्हे, तर एक व्यक्ती म्हणून प्रेम असावं.

मी एकदा असाच ‘रिपन क्‍लब’मध्ये केसची चर्चा करत असताना, गुन्हेगारीविश्र्वाच्या केसेस लढताना होणारा मनःस्ताप वकीलमहोदयांनी मला बोलून दाखवला. 
ते म्हणाले : ‘या केसेस लढवताना खूम मनःस्ताप होते. मात्र, एक व्यवसाय म्हणून त्या व्यवसायाशी प्रामाणिक राहायचं या भावनेतूनच मी केसेस लढवतो आणि त्याचं मला समाधान आहे.’’ 
शिवाय ‘गरजूंना सढळ हातानं आर्थिक मदत करूनही समाधान मिळवण्याचा तोकडा प्रयत्नही मी करत असतो,’ असंही त्यांनी मला त्या वेळी सांगितलं होतं.  

‘एखाद्या गरिबाला आर्थिक मदतीची गरज भासली तर माझ्याकडे जरूर मदत  मागा,’’ असंही त्यांनी मला आवर्जून सांगितलं होतं. ही बाब माझ्या स्मरणात राहिली होती. मात्र, आजवर तशी गरज कधी भासली नसल्यानं मदत मागण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र, या वृद्ध शेतकऱ्यासाठी काही आर्थिक मदत या वकीलमोहदयांकडून घ्यावी असं अचानक मनात आलं. मी त्यांना नाशिकहून तसा फोन केला. पाच-सहा प्रयत्नांनंतर त्यांच्याशी संपर्क साधला गेला. 
‘माझी आठवण येत नाही का?’’ असं प्रेमानं दरडावत विचारून त्यांनी माझी अर्वाच्य भाषेत प्रेमळ विचारपूस केली व काय काम आहे ते विचारलं. 
‘काही गुन्हा तर केला नाही ना? अन्यथा माझ्यासारख्या वकिलाची आठवण येण्याचं काही कारण नाही,’’ अशी मिश्किल टिपण्णीही त्यांनी केली. मी त्या वृद्ध शेतकऱ्याच्या आर्थिक अडचणीविषयी त्यांना सांगितलं आणि चाळीस-पन्नास हजार रुपयांची मदत हवी आहे हे त्यांच्या कानावर घातलं.

त्यावर पुन्हा शेलक्‍या पारशी हिंदीत लाखोली वाहिली गेली आणि ‘पन्नास हजार रुपयांमध्ये माझ्या वडिलांनी लग्न केलं होतं का,’ असं त्यांनी मला खेकसून विचारलं. 
चाळीस-पन्नास हजारांचीच गरज असल्याचं मी त्यांना सांगितलं. संवादात काही वेळ स्तब्धता आली आणि जरा वेळानं फक्त ‘साईबाबा’ हा एकच शब्द कानावर पडला. 
‘काय झालं?’’ असं मी विचारलं तर ‘‘त्या वृद्ध शेतकऱ्याला मदत करणं म्हणजे साईची सेवा करण्याचीच संधी माझ्याकडं चालून आली आहे,’’ असं काहीतरी वकीलमहोदय पुटपुटले. मीही हीच पडत्या फळाची आज्ञा आहे असं समजलो आणि ‘त्या शेतकऱ्याला पैसे घ्यायला मुंबईला पाठवू का’ असं विचारून घेतलं. पुन्हा स्तब्धता! 
थोड्या वेळानं पुन्हा पलीकडून आवाज आला...‘मी साईभक्त आहे आणि बरेच दिवस शिर्डीला दर्शनासाठी जाणं झालेलं नाही. मी स्वतःच नाशिकमार्गे शिर्डीला येईन व त्या वेळी पैसे स्वतः आणून देईन,’ असं ते म्हणाले. येण्याची तारीख त्यांनी मला सांगितली. 
वकीलमहोदय पुढं म्हणाले : ‘त्या दिवशी सकाळी नऊ वाजता मी तुमच्याकडे ब्रेकफास्टला येईन. त्या वेळी त्या शेतकऱ्याला तुम्ही बोलावून घ्या.’
मला आनंद झाला. त्या शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न आता होऊ शकणार होतं.

तो वृद्ध शेतकरी चार-पाच दिवसांनी मला पुन्हा भेटायला आला. पैशाची तजवीज झाली असल्याचं मी त्याला सांगताच त्यांचे डोळे चकाकले. ‘ठरलेल्या दिवशी सकाळी आठ वाजताच सर्किट हाऊसवर येऊन थांबा,’ असं मी त्याला सांगितलं. सर्किट हाऊस यासाठी की हे वकीलमहोदय मुंबईहून येणार असल्यानं त्यांना पोहोचायला किती वाजतील ते सांगता येत नव्हतं आणि त्यामुळे त्या शेतकऱ्याला माझ्या निवासस्थानी अनिश्र्चित काळासाठी थांबवणं प्रस्तुत नव्हतं. शिवाय, त्या शेतकऱ्याला पैशाची मदत केली जात आहे याची कुणकुण निवासस्थानी असलेल्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना लागून त्याची बातमीही होऊ शकली असती. अशा मदतीची वाच्यता कुठंही होणार नाही, तसंच ज्यांना मदत केली जात आहे त्यांना संकोचल्यासारखं होऊ नये याची दक्षता मी पूर्ण करिअरमध्ये काटेकोरपणे घेत आलो होतो.  

ठरलेल्या दिवशी वकीलमहोदय आले. ब्रेकफास्टची व्यवस्था लॉनवर करण्यात आली होती. मी माझं लंच (जे साडेनऊच्या दरम्यान असायचं) शक्‍यतो लॉनवरच घेत असे. डायनिंग हॉलऐवजी मोकळ्या लॉनवर जेवण करणं हा वेगळा अनुभव होता आणि तो माझ्या आनंदाचा भाग होता. वकीलमहोदयांची आणि माझी भेट खूप दिवसांनी होत होती. पत्नीला आणि मुलींना बोलावून मी त्यांची वकीलमहोदयांशी ओळख करून दिली. वकीलमहोदय अतिशय खूश होते आणि त्या आनंदाच्या भरातही त्यांनी शेलक्‍या शब्दांत माझं कौतुक आणि चेष्टामस्करी माझ्या पत्नीसमोर केलीच. अशा आगळ्यावेगळ्या व्यक्तींवर, त्यांच्या जीवनावर वेगळा लेख होऊ शकतो अशा प्रकारची ती व्यक्तिरेखा होती. आता असे लोक दुर्मिळ झाले आहेत. वकीलमहोदयांना पुढं शिर्डीला जायचं असल्यानं त्यांना घाई होतीच. त्यातच ते ‘माझ्या साईची’ म्हणजेच त्या वृद्ध शेतकऱ्याची भेट होणार म्हणून वारंवार आनंद व्यक्त करत होते. तिकडं सर्किट हाऊसवर तो शेतकरी येऊन थांबल्याची मी खात्री करून घेतली. ‘हे जे वकीलमहोदय तुम्हाला आर्थिक मदत करत आहेत ते देवमाणूस आहेत,’ याची कल्पना मी  त्या शेतकऱ्याला अगोदरच देऊन ठेवली होती. एरवी ‘देव आणि भक्त’ ही संकल्पना प्रचलित आहे. मात्र, इथं या दोन्ही व्यक्ती एकमेकांना देव मानत होत्या आणि दोघंही एकमेकांचे भक्त म्हणवून घेण्यात आनंद अनुभवत होते. हा प्रकार मी पहिल्यांदाच पाहत होतो. 

जिल्हाधिकारी निवासस्थान ते सर्किट हाऊस हे हाकेच्या अंतरावर असल्यानं आम्ही तिथं पाच मिनिटांत पोहोचलो. जिल्हाधिकारी आले म्हणून तिथला मीटिंग हॉल उघडण्यात आला. वृद्ध शेतकरी, वकीलमहोदय आणि मी असे तिघंच तिथं होतो. खरं म्हणजे तसे पाचजण! कारण, दोन देव आणि दोन भक्त आणि माझ्यासारखा एक प्रेक्षक! वकिलांनी त्यांच्या बॅगेतून कागदाचं पुडकं काढून शेतकऱ्याच्या हातात ठेवलं आणि त्यात किती रक्कम आहे ते सांगितलं.  ती रक्कम शेतकऱ्याच्या गरजेपेक्षा चौपट होती. शेतकऱ्यानं तेवढी रक्कम घ्यायचं नाकारलं आणि ‘गरजेपुरतेच पैसे द्यावेत,’ अशी विनंती केली. ते करताना त्या वृद्ध शेतकऱ्याचे डोळे डबडबले. वकिलांनी त्या वृद्धाचा हात प्रेमानं, आपुलकीनं दाबला आणि सगळी रक्कम घेण्याविषयी प्रेमाची दटावणी केली. शेतकरी वकीलमहोदयांच्या पायावर डोकं ठेवण्याचा प्रयत्न करत होता; पण वकीलमहोदयांनी त्याला जवळ ओढून घेतलं. अतिशय गंभीर गुन्हे केलेल्या क्रूर गुन्हेगारांच्या केसेस लढवून, ते गुन्हेगार कसे निर्दोष आहेत, हे न्यायालयात सांगणाऱ्या वकीलमहोदयांचे डोळेही या प्रसंगी भरून आले होते. मी आयुष्यात ज्या सुंदर क्षणांचा साक्षीदार आहे किंवा जे सुंदर क्षण अनुभवले आहेत त्यांपैकीच हा एक क्षण होता. हॉलमध्ये आता नीरव शांतता होती. कुणीही काहीही बोलत नव्हतं. शेवटी मीच, वकीलमहोदयांना उशीर होत आहे, असं सांगून त्यांना गाडीत बसवून दिलं. रक्कम जपून नेण्याविषयी आणि शक्य झाल्यास लग्नात अनावश्यक खर्च न करता मुलीच्या संसारासाठी ती ठेवावी किंवा तिच्याकडे सुपूर्द करावी अशी सूचना मी त्या शेतकऱ्याला केली. वृद्ध शेतकरी निःशब्द झाला. आम्ही आपापल्या मार्गानं निघून गेलो. 

या वृद्ध शेतकऱ्याची तात्कालिक विवंचना संपली असली तरी मी नंतर उद्योजक, प्रशासन आणि धनदांडगे यांच्या कचाट्यात सापडलेल्या त्या शेतकऱ्यासह इतर शेतकऱ्यांच्या जमिनी कायदेशीररीत्या त्यांना पुन्हा मिळवून देण्यासाठीचं कार्य सुरू केलं. 

कुंभमेळा संपल्यानंतर मी हा प्रश्न तडीस लावण्यासाठी हाती घेतला. मी हे काम सुरू करताच ‘नाशिकमध्ये मोठा जमीनघोटाळा जिल्हाधिकारी उघड करत आहेत’ अशा आशयाच्या बातम्याही सुरू झाल्या. मात्र, त्यांचं मूळ या शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नात होतं याची कल्पना बहुतेकांना नव्हती. हा जो जमीनघोटाळा होता तो, लोकशाही म्हणजे काय आणि ती कशी चालते, याचं एक ठळक उदाहरण ठरला!
(हे साप्ताहिक सदर आता समाप्त होत आहे.)

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.