झिरो (फिगर) - २

झिरो (फिगर) - २
Updated on

लंडन कॉलिंग
म्हणजे माझ्यातच दोष असावा...
माझं शरीर हे ‘एक्‍स्ट्रॉ स्मॉल’ या साइजमध्ये मावत नाहीये, म्हणजे मी नक्कीच काहीतरी चुकीचं करतीय. वजन वाढल्यावर लगेच मित्र, नातेवाईक, त्यांचे मित्र आणि त्या मित्रांचे मित्र वेळ न दवडता माझ्या ध्यानी हे वाढतं वजन अगदी नियमितपणे आणून देतात. त्यांना वाटणारी ‘काळजी’ मला मात्र भयंकर अस्वस्थ करायची आणि अजूनही करतेय. काहीही केलं तरी माझं वजन कमी होत नाहीये म्हणून अनेक रात्री उशी चिंब ओली होईपर्यंत रडलेय मी! सकाळी आरशात बघून स्वतःचा आत्मविश्‍वास गमावून दिवस ताणून नेलाय, कधी खाण्या-पिण्याचे हाल केले, तर कधी दुःखात वाट्टेल ते खाल्लं. 

माझं आयुष्य आणि माझे सुख-दुःख हे सगळं माझ्या वजनावर येऊन थांबलं होतं. मी स्वतःतले गुण बघणं सोडून दिलं होतं. अभिनयाला सुरवात झाली, तसे ते मित्रांचे मित्र आता सोशल मीडियावर भेटू लागले. ‘जाड झालीयेस’ किंवा ‘लुकिंग सो फॅट’सारख्या कॉमेंट्‌स वाचून दिवस-दिवस त्यावर विचार करत बसायचे. ऑडिशन्सला गेलं की कास्टिंग असिस्टंटच्या डोळ्यातच दिसायचं की, हा रोल मला मिळणार नाहीये. माझ्याहून बारीक मुलींना ते रोल माझ्या डोळ्यांसमोर मिळताना मी बघायचे. माझं शरीर हे माझ्या अभिनयापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे, हे मला कळालं होतं. 

मग जिम, ट्रेनर, दिवसातले २ तास व्यायाम, सकाळ-संध्याकाळ प्रोटिन आणि अरबट-चरबट खाणं बंद! मी तीन महिने सलग, नियमितपणे हे पाळलं, जवळ-जवळ १० किलो वजन कमी केलं. मात्र, या तीन महिन्यांच्या काळात माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक जवळच्या व्यक्तीशी मी भांडले. सतत संताप आणि चिडचिड करत दिवस घालवले. कामात दोष काढत राहिले आणि कशावरूनही तक्रार करून स्वतःचा रसभंग करू लागले. 

आता माझं शरीर सगळ्यांच्या नजरेत योग्य होतं, पण माझ्या मनाची स्थिती मात्र स्थिर नव्हती. अर्थात, माझं वजन परत वाढलंच, पण या वेळी मला त्याचं दुःखं होत नाहीये. मी दैनंदिन जीवनात लागते तेवढी शिस्त पाळतेय; पण स्वतःवर अन्याय करत नाही. हो, बऱ्याच मुलींपेक्षा माझं वजन जास्त आहे, पण मला आता त्याचा त्रास होत नाही. माझ्या शरीरावरनं माझी समाजातील पातळी ठरत नाही. माझं मानसिक आरोग्य मला जास्त प्रिय आहे आणि मला नाही व्हायचंय प्रत्येक पोस्टरवरची सारखीच दिसणारी बारीक मुलगी, माझी ओळख माझ्या कर्मानं व्हावी आणि या पुढं माझी काळजी तेवढीच असणार आहे.

आपल्याला कशात सौंदर्य दिसतं आणि आपण ते कशात शोधतो हे माझ्या मते, निरखून बघणं सगळ्यांसाठीच गरजेचं आहे. स्वतःवर आणि स्वतःच्या प्रत्येक गुण आणि अवगुणाला स्वीकारून स्वतःवर प्रेम करणं शिकावं...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.