दिगू टिपणीस आज असता तर महाराष्ट्रात आज सुरू असलेलं सत्ताकारण पाहून त्याला काय वाटलं असतं?
- पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न हा आहे की हा दिगू टिपणीस कोण? सन १९७० च्या दशकात आलेला ‘सामना’ हा आख्खाच्या आख्खा सिनेमा ‘हा मारुती कांबळे कोण?’ या प्रश्नाभोवती भिरभिरत राहतो. त्यानंतर चार वर्षांतच ‘सिंहासन’ हा महाराष्ट्रातल्या सत्तेच्या राजकारणाची लक्तरं चव्हाट्यावर आणणारा चित्रपट प्रदर्शित झाला आणि आज चार दशकं उलटून गेल्यावरही, आणि मुख्य म्हणजे कोणताही पक्ष सत्तेवर असो; त्या पक्षातले अंतर्गत हेवेदावे, सुंदोपसुंदी, तसंच कुरघोडीचं राजकारण यांचं विदारक दर्शन दिगू टिपणीस आपल्याला बातमीदाराच्या भूमिकेतून घडवत राहतो. राज्यात दुष्काळ पडलेला असतो, भीषण पाणीटंचाई असते; पण सत्ताधारी पक्षाचे नेते मात्र केवळ मुख्यमंत्र्याची खुर्ची आपल्यालाच कशी मिळू शकेल, या सत्ताकारणात गुंतलेले असतात. हा राजकीय खेळ बघून शेवटी दिगू टिपणीसच्या मनावर परिणाम होतो आणि तो कोलमडून पडतो.
आजही सगळं तसंच सुरू आहे आणि हे यश अरुण साधू यांच्या दूरदृष्टीचं जसं आहे, तसंच ते ‘सिंहासन’ आणि ‘मुंबई दिनांक’ या साधू यांच्या दोन कादंबऱ्या एकत्र करून विजय तेंडुलकर यांनी बांधलेल्या बंदिस्त पटकथेचंही आहे. दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी ही दिगू टिपणीस नावाच्या बातमीदाराची भूमिका निळू फुले या गुणी कलावंताकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आणि केवळ मराठी चित्रपटसृष्टीलाच नव्हे, तर पत्रकारितेलाही एक मनस्वी आणि सामाजिक बांधिलकी मानणारा अजरामर ‘रिपोर्टर’ लाभला.
‘सिंहासन’ चित्रपट आला त्या सन १९७० च्या अस्वस्थ दशकानंतर आरपार बदलून गेलेलं आजचं भावविश्व बघून दिगू टिपणीसला काय वाटलं असतं? बातमी आपल्या इतकी जवळ येऊन उभी राहणार आहे, असं त्याला कधी वाटलं तरी असेल का? तर बातमी मिळवण्याची सारी गंमतच निघून गेलेल्या आजच्या या युगात हातात बातमी तर येऊ लागलीच; पण तिचा आत्मा मात्र नाहीसा झाला आहे. बातमीच्या खरेपणापेक्षा तिचा खोटेपणाच अधिक महत्त्वाचा ठरू लागला आहे. मनं मुर्दाड होऊन गेली आहेत आणि बातमीही बेगडी ठरू पाहत आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
तर महाराष्ट्रात होऊ घातलेल्या एका अकल्पित सत्तांतराचा सुगावा दिगूला लागतो आणि मग सेल्युलॉईडच्या त्या ३५ मिलीमीटरच्या पडद्यावर एक महानाट्य रंगू लागतं. बातमी तटस्थपणे द्यावी, बातमीत टीका-टिप्पणी नसावी, असं शास्त्र असलेल्या त्या काळात दिगू काहीएक भूमिका घेऊन मग मोठ्या तडफेनं त्या सत्तानाट्याचा एक अविभाज्य भाग बनून जातो. अर्थात, आजही मंत्रालयाची प्रेसरूम असो की महापालिकेची प्रेसरूम, तिथले बातमीदारही अशा सत्ताकारणातच नव्हे, तर अनेकदा अर्थकारणातही सहभागी असतातच. मात्र, दिगू त्यापेक्षा अगदी वेगळ्याच स्तरावरून त्या सत्तांतराच्या नाट्यात सहभागी झाला होता. त्याला काळजी होती ती राज्याच्या रयतेची आणि त्या रयतेपुढं आपला अक्राळविक्राळ जबडा उघडून उभ्या ठाकलेल्या दुष्काळाची, तसंच पाणीटंचाईची. त्यामुळेच साधू यांनी उभ्या केलेल्या त्या व्यक्तिरेखेला एक आगळंच परिमाण लाभलं आणि हा दिगू टिपणीस आज लुप्त झालेल्या पत्रकारितेतल्या मूल्यांच्या पार्श्वभूमीवर बातमीदारीतला एक मैलाचा दगड बनून गेला आहे. काल्पनिक व्यक्तिरेखा वास्तवातल्या खऱ्याखुऱ्या पात्रांना दूर भिरकावून देऊन स्वत:चं एक स्थान निर्माण करण्याची ही घटना तशी दुर्मिळच.
साधू यांनी ‘सिंहासन’ ही कादंबरी लिहिली सन १९७७ मध्ये. तेव्हा देशात आणीबाणी होती आणि लेखनस्वातंत्र्यावर बरेच निर्बंध होते. ही कादंबरी प्रसिद्ध झाली त्याच वर्षी मला पत्रकारितेचा श्रीगणेशा करण्याचा योग आला तो गोदाकाठी पहुडलेल्या नाशिक नावाच्या एका निवांत आणि छोटेखानी गावात. तेव्हाही आपल्याला कधी मंत्रालयाची प्रेसरूम असो की मुंबई महापालिकेची, तिथं जाता येईल आणि तिथं सुरू असलेल्या सत्ताकारणावर आणि मुख्य म्हणजे अर्थकारणावर जवळून दृष्टिक्षेप टाकता येईल, असा साधा विचारही मनात आला नव्हता. मात्र, तसं घडलं खरं. दिगू टिपणीस आपल्याला कधी कोणत्याही प्रेसरूममध्ये जाऊन बसलेला दिसत नाही...आणि आताच्या सारखा हातातला सेलफोन तर सोडाच; घरात लॅंडलाइन फोन असणं हेही अतिशय दुर्लभ असण्याच्या त्या काळात सुरू झालेल्या या पत्रकारितेनं आज अनेक वळणं घेतली आहेत.
हे युग ‘पोस्टट्रूथ’चं युग आहे. ‘पोस्टट्रूथ’ म्हणजे काय? तर जेव्हा एखाद्या विशिष्ट परिस्थितीत लोक वास्तव तसंच सत्य यांवर आधारित युक्तिवादापेक्षा आपल्या भावना तसंच विश्वास यांवर आधारित युक्तिवादावर विश्वास ठेवू लागतात असा काळ. या युगात मग तुम्ही कितीही आणि कशाही वास्तवाचं दर्शन घडवणाऱ्या बातम्या दिल्यात तरी त्यांच्यावर विश्वास तरी कोण ठेवणार? जॉर्ज ऑर्वेल या ख्यातकीर्त कादंबरीकारानं ‘नाइन्टीन एटी फोर’ ही कादंबरी लिहिली सन १९४९ मध्ये, तेव्हा त्याला भविष्यातल्या या ऱ्हासाची चाहूल लागली होती का? या कादंबरीतलं नेहमी उद्धृत केलं जाणारं वाक्य आहे : ‘बिग ब्रदर इज वॉचिंग यू...’ आज एक नव्हे तर दोन ‘बिग ब्रदर’ आपले आचार-विचार, आहार-विहार यांवर नजर ठेवून आहेत. एक आहे अर्थातच ‘गुगल’ आणि दुसरा आहे ‘फेसबुक’! हे दोन सध्या आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेले ‘भाऊ’ आपल्या हालचालींवर, तसंच जीवनशैलीवर कशी नजर ठेवून आहेत त्याचं विदारक दर्शन ‘द ग्रेट हॅक’ या डॉक्युमेंटरीत बघायला मिळतं. ‘नेटफ्लिक्स’मुळे ते कुणालाही घेता येतं. मात्र, त्याच वेळी आजच्या या बेगडी बातम्यांच्या युगातही बातमीची सत्यता पडताळून दाखवणाऱ्या ‘ऑल्ट न्यूज’सारख्या काही वेबसाइट्सही उपलब्ध असणं हा एक मोठाच आशेचा किरण आहे.
मात्र, या कशाचाही नव्हे, तर इंटरनेट वा ‘ट्वेंटी फोर बाय सेव्हन’, ‘ब्रेकिंग न्यूज’च्या नावाखाली आपल्या माथ्यावर बेगडी आणि बेलगाम बातम्या मारणारी चॅनेल्सही नसताना बातमीदारी होती कशी आणि वेगवेगळ्या ‘प्रेसरूम’मधून तिच्याकडे कसं बघितलं जात होतं ते बघणं आज निव्वळ काल्पनिकच वाटू शकेल. मात्र, तेव्हाही बातमीदारी होतच होती आणि ‘गेम ऑफ थ्रोन्स’ हा खेळही अधिक जीवघेण्या पद्धतीनं रंगवला जात होता. तर त्याच बातमीदारीचा प्रवास आणि वास्तवातल्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’मध्ये घडत असणारे किस्से यांची ही मालिका. अर्थात, या मालिकेतून घडणारं वास्तवाचं दर्शन हे भूतकाळाचा आढावा घेत भविष्याचाही वेध घेणारं असलं तर मग त्यात नवल ते काय!
युवाल नोआ हरारी या सुप्रसिद्ध लेखकाच्या ‘ट्वेंटी लेसन्स फॉर ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी’ या पुस्तकाचं पहिलं वाक्य आहे : ‘असंबद्ध तसंच अप्रासंगिक माहितीच्या महापुरात सापडलेल्या आजच्या या जगात स्पष्टता (म्हणजेच ‘क्लॅरिटी’) हेच खरं सामर्थ्य. तर ही ‘क्लॅरिटी’ असण्याच्या त्या काळावर कधी दूरवरून, तर कधी जवळून टाकलेला हा दृष्टिक्षेप.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.