अयोध्यालढ्याचा समग्र वेध

अयोध्येमध्ये राममंदिर उभारायचे की नाही या प्रश्‍नाचा निकाल आता लागलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर २०१९ मध्ये दिलेल्या निवाड्यानुसार आता एका ट्रस्टमार्फत तेथे रामाचे मंदिर उभारले जाईल.
Book Ayodhya
Book AyodhyaSakal
Updated on

अयोध्येमध्ये राममंदिर उभारायचे की नाही या प्रश्‍नाचा निकाल आता लागलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर २०१९ मध्ये दिलेल्या निवाड्यानुसार आता एका ट्रस्टमार्फत तेथे रामाचे मंदिर उभारले जाईल. मात्र अयोध्येमध्ये राममंदिर उभारण्यासाठी जो प्रचंड लढा झाला त्याचा समग्र वेध घेण्याचा प्रयत्न माधव भांडारी यांनी केला आहे.

६ डिसेंबर १९९२ या दिवशी देशाच्या इतिहासात जी घटना घडली, त्याचे परिणाम पुढे अनेक वर्षे भारतीय जनमानसात उमटत राहिले. त्या घटनेने देशाच्या राजकारणात बरेच बदल घडले. समाजजीवन ढवळून निघाले. १९९२ ते २०२१ या ३० वर्षांच्या कालखंडात बरेच काही घडले. रामजन्मभूमीचा लढा हा जवळपास ४९० वर्षांचा आहे, असे सांगितले जाते. स्वातंत्र्यानंतर या प्रकरणाला चालना मिळाली; पण विश्‍व हिंदू परिषदेने याप्रकरणी आंदोलनाचा निर्णय घेतल्यानंतर या प्रकरणाची चर्चा वेगाने सुरू झाली. मोगल बादशहा बाबर याने मंदिर पाडून मशीद बांधली, असा अनेक जणांचा दावा होता. त्याला विरोध करणारे अनेक नेते व इतिहासतज्ज्ञ होते. न्यायालयीन पातळीवरदेखील या विषयावर बरीच चर्चा झाली. विविध प्रकारचे पुरावे सादर केले गेले, तसेच युक्तिवादही झाले. माधव भांडारी यांनी २७ प्रकरणांमधून या संपूर्ण लढ्याचा वेध घेतला आहे.

माधव भांडारी यांनी या प्रकरणी अनेक भाषांतील मजकुराचा व दस्तऐवजांचा हवाला देत येथे राममंदिरच कसे होते असा युक्तिवाद केला आहे. चार परिशिष्टांमधून त्यांनी या घटनेची राजकीय, सामाजिक पार्श्‍वभूमी सांगितली आहे. त्याचबरोबर या संदर्भात न्यायालयीन कामकाज कसे झाले याची माहिती दिली. अयोध्येबद्दलचे वेगवेगळे संदर्भ, वेगवेगळ्या बाजू समोर आणून काय-काय घडले असेल हे मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

अयोध्याप्रकरणी आता कुठल्याही समाजबांधवाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे न करता या घटनेची जास्तीत जास्त माहिती व त्याचा इतिहास माहीत व्हावा या उद्देशाने त्यांनी येथे बरीच माहिती दिली आहे. भांडारी ज्या पक्षाचे नेते आहेत, त्या पक्षाच्या बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला नसला तरी त्या पक्षाचा प्रभाव त्यांच्या लेखनावर पडल्याचे जाणवते, मात्र केवळ प्रचारकी थाटात त्यांनी येथे कुठलीही माहिती दिलेली नाही. या प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडले मग ते न्यायालयीन पातळी असो, सामाजिक चळवळी असोत, तसेच राजकीय हालचाली असोत, याचा वेध त्यांनी नेमकेपणाने घेतलेला आहे. युरोपियन प्रवासी व लेखकांची पुस्तके व त्यातील संदर्भ देऊन आपला मुद्दा त्यांनी पटवून दिला आहे. अयोध्येशी महाराष्ट्राचाही कसा संबंध होता याबद्दल त्यांनी वेगळे प्रकरणच लिहिले आहे. १ फेब्रुवारी १९८६ ते ९ नोव्हेंबर २०१९ ही ३० वर्षे या प्रकरणाशी अत्यंत महत्त्वाची अशी आहेत. या कालखंडाचा त्यांनी तपशीलवार आढावा घेतलेला आहे. अयोध्येसंदर्भात गेल्या ५० वर्षांत काय घडले हे समजून घ्यायचे असेल तर या पुस्तकातील माहिती उपयोगी पडेल. भांडारी यांनी पुस्तकात जे मुद्दे मांडले आहेत, ते मांडताना त्याचे संदर्भ दिले आहेत. प्रत्येक पानाच्या खाली त्याची टीप दिली आहे. त्यामुळे पुस्तकाचे संदर्भमूल्य वाढले आहे. अयोध्येत आता राममंदिर उभारले जाईल; पण या संदर्भात देशात अनेक वर्षांत काय घडले ते एकत्रितरीत्या वाचण्याची मोठी सोय या पुस्तकामुळं झाली आहे, यात शंका नाही.

पुस्तकाचं नाव : अयोध्या

लेखक : माधव भांडारी

प्रकाशक : परममित्र पब्लिकेशन, ठाणे (०२२-२५४४७९४८)

पृष्ठं : ४१४,

मूल्य : ६५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.