प्रशासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न या देशातल्या अनेक तरुणांचं असतं. या पदाला असलेले अधिकार आणि त्याबरोबर येणारी सत्ता याचं आकर्षण यात खूप महत्त्वाचं असतं. सचिव, जिल्हाधिकारी, तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांसारख्या अधिकारपदाच्या विविध जबाबदारऱ्या जशा मिळतात तसं त्या कामाचे स्वरूपही बदलते. देशात प्रशासकीय अधिकारी सेवेत येतात ते यू.पी.एस.सी.मार्फत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मार्फत होणाऱ्या या परीक्षा युवकांचं पूर्ण आयुष्य बदलून टाकतात. ज्याला चांगलं करिअर करायचे आहे आणि देशसेवा तसेच जनसेवा करायची आहे त्यांच्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खासगी सचिव म्हणून काम पाहणारे संकेत भोंडवे यांचं हे आत्मकथनपर पुस्तक ‘यू.पी.एस.सी.’ ची परीक्षा देणाऱ्या मुलांना निव्वळ मार्गदर्शन करणारे नव्हे, तर या परीक्षेत यश कसे मिळवायचे आणि या सेवेत स्थिर कसे व्हायचे, तसेच चांगली कामगिरी कशी करून दाखवायची याबद्दलही महत्त्वाच्या टिप्स देते. २००७ मध्ये या पुस्तकाची पहिली आवृत्ती आली. त्यानंतर गेल्या १३ वर्षांत याच्या पाच आवृत्त्या आल्या. आता या पुस्तकाची सहावी आवृत्ती आली आहे. भोंडवे यांनी आपल्या कार्यकालात तीन राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरचे बारा पुरस्कार मिळविले. आपले प्रशासकीय सेवेचे काम त्यांनी मध्य प्रदेश केडरमधून सुरू केले. त्यानंतर काही काळानंतर ते केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेले. संकेत भोंडवे यांनी घरातून अशा प्रकारच्या सेवांची मोठी पार्श्वभूमी नसताना ही परीक्षा उत्तीर्ण केली. (त्यांचे वडील महापालिका सेवेत अधिकारी होते, पण प्रशासकीय सेवेची परंपरा अशी नव्हती, त्यांनी वडिलांच्या उद्यानसेवेच्या कामागिरीचा अवलंब आपल्या कामातही केला. ) सहजपणे त्यांना हे यश मिळालेले नाही. चार वेळा त्यांनी ही परीक्षा दिली. चौथ्या वेळी त्यांना यश मिळाले. पिंपरी-चिंचवडमध्ये राहणारे संकेत भोंडवे एक ध्येय समोर ठेवून या परीक्षेचा अभ्यास करत होते. हा सगळा अनुभव त्यांनी या पुस्तकात कथन केला आहे.
केवळ परीक्षा कशी द्यायची याबद्दल पुस्तकी माहिती न देता नेमके काय करायला पाहिजे याच्या टिप्स ते देतात. अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना युवा वर्ग इंग्लिश विषयामुळे घाबरतो. "English... अरे बापरे'' या खास प्रकरणामधून भोंडवे या विषयाची तयारी कशी करायची आणि या भाषेवर प्रभुत्व कसे मिळवायचे याचे नेमके तंत्रच विषद करतात. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे या परीक्षेला का बसायचे, हे करिअर कशा प्रकारचे आहे हे पहिल्या दोन प्रकरणांत सांगून पुढच्या ११ प्रकरणांमध्ये या परीक्षेसाठी स्वतःचे व्यक्तिमत्त्व कसे घडवायचे हेच भोंडवे यांनी विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. त्यांची मुलाखत कशी झाली होती ती त्यांनी इथे सविस्तरपणे दिल्यामुळे या मुलाखतींबद्दल युवकांमध्ये जे समज-गैरसमज असतात ते दूर होतील. या परीक्षांसंबंधी अनेक शंका विद्यार्थ्यांच्या मनात असतात. भोंडवे यांनी अशा सर्व शंका गृहीत धरून "नेहमी विचारले जाणारे प्रश्न'' असे प्रकरणच लिहिले आहे. त्यामुळे या परीक्षांबद्दलची नेमकी कल्पना विद्यार्थ्यांना मिळू शकते. आपल्याच घरातील मोठ्या भावाने आपल्याला एखाद्या परीक्षेबद्दलची तयारी करून घ्यावी अशी भावना हे पुस्तक वाचताना अनेकांच्या मनात नक्की निर्माण होईल. तेच या पुस्तकाचे यश आहे.
स्पर्धापरीक्षांचे अवघड आव्हान या पुस्तकामुळे एकदम सोपे होईल, असा निष्कर्ष कोणीही काढू नये; पण ही परीक्षा मी नक्की देईन आणि उत्तीर्ण होईन, असा आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम हे पुस्तक नक्की करेल. या पुस्तकात मुलाखतीबद्दलची माहिती देताना त्यांनी जो महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे, तो म्हणजे उमेदवाराने बायोडाटा भरताना जी माहिती दिलेली असते, ती खूप महत्त्वाची असते. ती माहिती तुम्ही जर नीट दिली नसेल तर मुलाखतीत तुम्हाला समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे ही माहिती काटेकोरपणे भरणे आवश्यक आहे. मुलाखतीची तयारी ही डी.ए.एफ. (Detail Application Form) भरण्यापासून सुरू होते. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर हा अर्ज भरायचा असतो. अशा छोट्या-छोट्या टिप्स भोंडवे देतातच; पण मुलाखतीला जाताना तुमचा वेष कसा असावा याबद्दलही अगदी थोडक्यात मार्गदर्शन करतात. ‘Enter the interview hall as an IAS Officer and leave the hall as an IAS Officer after you finish your interview’ हे वाक्य भोंडवे मुलाखत जिंकण्याचा मूलमंत्र सांगितल्यासारखे सांगतात.
आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे हे लक्षात घेऊन या परीक्षांची तयारी करा याबद्दलचेही त्यांनी केलेले मार्गदर्शन ही परीक्षा देणाऱ्या व या मार्गावरून चालणाऱ्या अनेक मुलांना वस्तुस्थितीचे भान आणेल. संतोष हिंगे आणि डॉ. श्रीनाथ कवडे यांनी या पुस्तकाचं शब्दांकन केलं आहे. सोपी भाषा आणि आशय नेमकेपणाने पोचेल अशी बांधेसूद वाक्यरचना यामुळे या परीक्षांबद्दलची माहिती व्यवस्थितपणे वाचकांपर्यंत पोचते आणि यश कसं मिळवायचं याचं ज्ञान विद्यार्थ्यांना निश्चितपणे होतं हे नक्की.
पुस्तकाचं नाव - IAS ची पाऊलवाट एका दशकाचा प्रवास
प्रकाशक - विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे (फोन ९१६८६८२२००)
वेबसाइट - www.vishwakarmapublications.com
पृष्ठं - २५४
मूल्य - ४०० रुपये
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.