कलामांचं प्रेरणादायी बालपण !

देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान झालेले अब्दुल कलाम हे भारतीयांना पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं. त्या सुंदर स्वप्नाच्यामागे कलाम यांचं बालपण व त्यांच्यावर झालेले संस्कार खूप प्रेरणादायी होते, याचा प्रत्यय ‘कलामांच्या बालपणीच्या प्रेरक गोष्टी’ हे पुस्तक वाचताना येतो.
Dr APJ Abdul Kalam
Dr APJ Abdul Kalamsakal
Updated on
Summary

देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान झालेले अब्दुल कलाम हे भारतीयांना पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं. त्या सुंदर स्वप्नाच्यामागे कलाम यांचं बालपण व त्यांच्यावर झालेले संस्कार खूप प्रेरणादायी होते, याचा प्रत्यय ‘कलामांच्या बालपणीच्या प्रेरक गोष्टी’ हे पुस्तक वाचताना येतो.

अवकाश उद्योग व क्षेपणास्त्रांसह संरक्षण क्षेत्रात लष्करीदृष्ट्या बलशाली समजल्या जाणाऱ्या प्रगत देशांच्या बरोबरीने भारताला स्वयंपूर्ण बनवणारे, देशातील सर्वोच्च नागरी सन्मान मिळवून देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान झालेले अब्दुल कलाम हे भारतीयांना पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं. त्या सुंदर स्वप्नाच्यामागे कलाम यांचं बालपण व त्यांच्यावर झालेले संस्कार खूप प्रेरणादायी होते, याचा प्रत्यय ‘कलामांच्या बालपणीच्या प्रेरक गोष्टी’ हे पुस्तक वाचताना येतो. व्यक्तीला मिळणारा मोठेपणा हा बालवयातल्या अनुभवांवर अवलंबून असतो. लहान वयात दिसायला सामान्य असणारे अब्दुल कलाम वडिलांसोबत नमाजला जायचे. नमाज व प्रार्थना एकच आहेत, त्यामुळे माणसा-माणसांतले भेदभाव नाहीसे होऊन सर्वशक्तिमान अशा परमेश्वराशी आपण एकरूप होतो, अशी शिकवण बालक अब्दुलला वडील जैनुलाब्दिन, पुरोहित लक्ष्मणशास्त्री व फादर बोडल यांच्याकडून मिळाली आणि प्रेमळ व संस्कारी बालपणाला सुरुवात झाली.

बालवयात संस्कार करणारे शिक्षक खूप महत्त्वाचे असतात. सर्वांगीण विकासासाठी धडपडणारे मुत्थू अय्यर यांचा अब्दुल कलाम यांच्या जडणघडणीत फार मोठा वाटा होता.

जलालुद्दीनच्या माध्यमातून त्यांना लहान वयातच नवनवीन विज्ञानाचे शोध, देश-विदेशांतील साहित्यिक माहीत होत होते. लहानग्या अब्दुलच्या पंखांस बळ आणि गती देण्याचं काम खऱ्या अर्थाने जलालुद्दीन यांनी केलं. आयुष्यात ध्येयप्राप्तीसाठी स्वप्नं पाहिली पाहिजेत व ती सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ध्येयप्राप्तीसाठी ज्ञानाचा अखंड वाहणारा झरा आपल्या जवळ हवा व तो मिळवण्यासाठी आपण सदैव नवनवीन पुस्तकं वाचली पाहिजेत, हा संस्कार अब्दुल कलाम यांना लहान वयातच मिळाला.

लहान वयात समुद्राच्या वाळूत बसून तासन्‍तास पक्ष्यांचं निरीक्षण करणारे अब्दुल, शिक्षक सुब्रह्मण्यम यांच्याकडून पक्ष्यांच्या अवयवांची माहिती घेत असत. पक्ष्यांचं दूर क्षितिजाकडे झेपावणं, हेच अब्दुल कलामांच्या उंच भरारी घेण्याची दिशा ठरवत होतं. कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशातील धार्मिक सौहार्दावर ठरते. सामाजिक सलोखा हा प्रगतीचा खरा मूलमंत्र आहे. विद्यार्थिजीवनात कलामांना स्वतःच्या स्वयंपाकघरात नेऊन जेवायला वाढणारे शिक्षक सुब्रह्मण्यम सामाजिक वाईट प्रथांना विरोध करून सर्वांनी एकोप्याने राहिलं पाहिजे, ही शिकवण त्यांना देत होते. लहान वयातच अब्दुल कलाम यांनी अनेक देशभक्तिपर पुस्तकं, कथा-कादंबऱ्‍या, विज्ञानविषयक लेख वाचले. ‘तुला मोठं व्हायचं असेल तर आपल्या भोवताली घडणाऱ्‍या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान तुला असलं पाहिजे,’ हे शिक्षकांचं वाक्य सदैव त्यांच्या कानावर पडत असे. ज्ञान मिळवण्याइतकंच श्रम करणंही लाखमोलाचं आहे, ही शिकवण त्यांना बालपणीच मिळाली होती. चिंचोके गोळा करून एक आणा मिळवणारा अब्दुल, रेल्वेतून फेकले जाणारे वर्तमानपत्रांचे गठ्ठे घेऊन घरोघरी वर्तमानपत्र टाकणारा अब्दुल, यातूनच मिळणारी कष्टाची कमाई तर बालवयात खूप प्रेरणादायी ठरली होती. बालवयातील प्रेरणेतूनच देशाच्या सर्वोच्चपदावर पोहोचलेले अब्दुल कलाम अखेरपर्यंत काम करत राहिले. वडिलांकडून मिळालेला प्रामाणिकपणा, शिस्तीचे धडे आणि सर्वांवर प्रेम करण्याची शिकवण आईकडून मिळाली. आकाशात झेप घ्यायला शिकवलं ते जलालुद्दीननी व खरी कमाई शिकवली शमशुद्दीननी.

अब्दुल कलाम रामनाथपुरमला निघताना आईला खूप वाईट वाटलं; पण त्यांच्या अब्बांनी तिला समजावलं, समुद्रपक्षी कोणत्याही आधाराशिवाय आकाशात झेपावतात, त्यांच्यासारखं धाडस अब्दुलने करावं. जलालुद्दीननी समजावलं पक्ष्यांची पिल्लं पंखांत बळ येईपर्यंत घरट्यात थांबतात. त्यांच्या पंखांत बळ आलं की, त्यांना मुक्त होऊ द्यावं. निसर्गात जन्माला येणारा प्रत्येक जीव स्वतंत्र विचारधारा घेऊन जन्माला येतो. त्याची स्वतःची जीवन जगण्याची कला असते. त्याच्या मार्गात कोणीही अडथळे आणू नयेत. रामेश्वरम सोडल्यानंतर अब्दुल रामनाथपुरमच्या श्वार्त्झ शाळेत गेले. घरच्यांची खूप आठवण यायची, त्यांचे डोळे पाण्याने भरायचे; पण आकाशात उंच उडणारा पक्षी बघून सारं काही विसरायचे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. ‘आपणाला अविरतपणे पुढे जायला हवं. आशावादी विचार माणसाला सर्वोच्च स्थानी पोहोचवतात,’ हे जलालुद्दीनचं वाक्य आठवलं की, अब्दुल नव्या उमेदीने अभ्यास करायचे. खूप खूप वाचन करायचे. ‘द लॉ ऑफ सक्सेस’ हे त्यांचं आवडीचं पुस्तक. पुस्तकांनी त्यांचं आयुष्य घडवलं होतं. एमआयटी मद्रासमध्ये शिकण्यासाठी बहीण जोहराने स्वतःचे दागिने गहाण ठेवले. बहिणीच्या समर्पणाची जाणीव ठेवून मेहनत करून त्यांनी शिष्यवृत्ती मिळवली.

‘जर तुम्ही तुमच्या कामाप्रति आणि महत्त्वाकांक्षेसाठी वचनबद्ध असाल, तर कोणतंही ध्येय अशक्य नसतं,’ असं म्हणणारे अब्दुल पाकिर जैनुलाब्दिन अब्दुल कलाम पुढे मुलांचे लाडके राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम झाले. भारतामध्ये लोकांचा इतका स्नेह व आदर मिळवणाऱ्‍या त्यांच्यासारख्या अगदी मोजक्याच व्यक्ती असतील. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या प्रेरक व्यक्तिमत्त्वाला वाहिलेली आदरांजली आहे. यात त्यांच्या बालपणीचे व तरुणपणीचे फारसे परिचित नसलेले अनेक रंजक तसेच प्रेरणादायी प्रसंग वाचायला मिळतील, ज्यांतून त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली.

थोडक्यात, एकूण ४४ प्रकरणांमध्ये लिहिलेलं हे पुस्तक बालसंस्कारांचा अमूल्य ठेवा आहे. प्रत्येक प्रकरणाला हवाहवासा वाटणारा प्रसंग, ओघवती भाषा या पुस्तकाला वाचनीय बनवते. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी दिलेले विचारप्रवर्तक सुविचार खूप मोलाचे आहेत. या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, अब्दुल कलाम यांच्या जीवनातील प्रसंग चित्ररूपाने रेखाटलेले आहेत. पुस्तक वाचताना ते प्रसंग आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात. संवादातील सहजता व भाव यामुळेच हे शक्य झालेलं आहे. प्रतिमा साकेत भांड यांनी खूप ओघवता आणि मुलांना कळेल अशा सोप्या भाषेत अनुवाद केलाय. मुखपृष्ठावरील उंच उडणारे पक्षी छोट्या अब्दुल कलामांची प्रेरणा व उत्साह दर्शवतात.

पुस्तकाचं नाव : डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

लेखक : सृजनपाल सिंह

अनुवाद : प्रतिमा भांड

प्रकाशक : साकेत प्रकाशन, औरगाबाद (०२४०-२३३२६९२, ०२०-२४४३६६९२)

पृष्ठं : ११२ मूल्य : १५० रुपये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()