लढाई संपलेली नाही...

देशावरील कोरोनाच्या संसर्गाचं सावट दूर होताच अर्थव्यवस्था सावरायला सुरूवात झाली होती. आर्थिक वाढीचा वेग देखील वाढू लागला होता.
Coronavirus
CoronavirusSakal
Updated on

देशावरील कोरोनाच्या संसर्गाचं सावट दूर होताच अर्थव्यवस्था सावरायला सुरूवात झाली होती. आर्थिक वाढीचा वेग देखील वाढू लागला होता. विमानांनी आंतरराष्ट्रीय उड्डाणांची झेप घेतली. क्रिकेटची मैदानं प्रेक्षकांच्या गर्दीनं ओसंडून वाहू लागली होती मग प्रेक्षकांनीही सिनेमागृहांकडे मोर्चा वळविला. बॉक्स ऑफिसवर देखील अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट त्यांची वाट पाहात होतेच. देशातील लसीकरणाचा वेग वाढल्यानं आता कोरोनाचं संकट टळलं असल्याची सार्वत्रिक भावना निर्माण झाली. सरकारी पातळीवरून देखील ‘ऑल इज वेल’ चे सूर उमटू लागले.

आता कुठं जगाची गाडी रूळावर येऊ लागल्याचं चित्र दिसत असतानाच क्षितिजावर पुन्हा एकदा काळे ढग दाटून आल्यानं सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. चीनच्या वुहान प्रांतामध्ये कोरोनाच्या संसर्गानं डोकं वर काढलं होतं. चीननं तेथील नागरिकांना स्वदेशी बनावटीच्या लसीचे १ कोटी ६० लाख डोस दिले असले तरीसुद्धा संसर्ग मात्र काही केल्या आटोक्यात येताना दिसत नाही. यंदाच्या ऑगस्ट महिन्यामध्ये वुहानचे सगळे मार्गच ओस पडले होते. या सगळ्या बाबींमुळं एक गोष्ट घडली ती म्हणजे हा विषाणू ‘चायना मेड’ असल्याचा दावा करणारी विचारवंत मंडळी अचानक पडद्यावरून गायब झाली. त्यांचं सेलिब्रेटी स्टेट्स काही क्षणांमध्ये अदृश्य झालं.

नोबेल समितीचा शहाणपणा

लोकांचा जीव वाचविणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लशींच्या उत्पादकांना यंदाचा नोबेल सन्मान दिला जावा असा सूर ऐकायला मिळत होता. यात केंद्रस्थानी होत्या त्या म्हणजे ‘एमआरएन’ लशी. अमेरिकेतील ८० दशलक्षांपेक्षाही अधिक लोकांना या लशींचे डोस देण्यात आले असले तरीसुद्धा अजूनही त्यांना कोरोनाचा संसर्ग होतोच आहे. मुळात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट्सला रोखण्यासाठी सध्याच्या लशी या प्रभावी ठरतील की नाही? या एकाच प्रश्नाभोवती ही सगळी चर्चा का घुटमळते आहे. यंदाच्या जून महिन्यामध्ये कोरोनाचा हाच संसर्ग अनेकांच्या मृत्यूचं कारण ठरला. मागील वर्षीपेक्षाही यंदा या संसर्गामुळं मोठी जीवितहानी झाली.या सगळ्याबाबतीत नोबेल सन्मान समितीनं शहापण दाखविताना कोरोनाचा विजयोत्सव काही काळ बाजूला ठेवत वैद्यकशास्त्रातील नोबेल सन्मान रेसिप्टरच्या संशोधनाला देऊ केला. यामुळे अनेक उत्साही संशोधकांच्या आनंदावर विरजण पडलं. कोरोना प्रतिबंधक दोन लशींमधील अंतर नेमकं किती असावं? याबाबत शास्त्रीय पातळीवर देखील मतभेद असल्याचं दिसतं. दोन वेगळ्या लशींचं मिश्रण आणि समान लशींचे दोन डोस देण्याबाबतही बरेचसे वाद समोर आले आहेत. बूस्टर डोसच्या प्रभाव क्षमतेबाबत देखील तज्ज्ञांमध्ये संभ्रमाचे वातावरण दिसून येते.

आणखी किती बूस्टर डोस?

लसीकरणानंतर मानवी शरीरात तयार झालेल्या अॅंटीबॉडीजमुळे पुढील सहा ते आठ महिने संसर्गाला ब्रेक लागला. आता ही प्रतिकार क्षमता आणि ‘बी’ आणि ‘टी’ पेशींमुळं निर्माण झाली का? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या प्रतिकारक्षमतेलाही चकवा देत नव्यानं लोकांना संसर्ग का होतो आहे? हे कळायला देखील मार्ग नाही. बूस्टर डोस घेणे आवश्यकच असेल तर त्याचा प्रभाव कितीकाळ टिकणार आणि नेहमीच अशा प्रकारची लस घेत राहावी लागणार का? याचे उत्तरही अद्याप मिळालेलं नाही. अमेरिकेप्रमाणे अनेक देश हे तिसऱ्या बूस्टर डोसचा आग्रह धरू लागले आहेत. आता ही संख्या चार, पाच, आणि सहा अशी क्रमानं वाढत जाणार का?

व्हेरिएंट ऑफ कन्सर्न

या संसर्गावर काम करणारे सर्व साथरोगतज्ज्ञ, विषाणूंचे अभ्यासक एका मतांवर ठाम आहेत ते म्हणजे कोरोना विषाणूचं पूर्णपणे उच्चाटन शक्य नाही. या वर्षाच्या अखेरपर्यंत जगातील अर्ध्यापेक्षा अधिक लोकसंख्या लसीकरण आणि नैसर्गिक मार्गानं प्रतिकार क्षमता मिळवू शकते असं मानलं जात होतं पण डेल्टा व्हेरिएंटनं ‘एमआरएनए’ लसीला आव्हान दिलंय. लसीकरण झालेल्या आणि लस न घेतलेल्यांनाही कोरोनाची लागण होताना दिसते. ‘डेल्टा’च्या वेगानं होणाऱ्या प्रसारातून पुन्हा नव्या व्हेरिएंटचा जन्म झाला. यातून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे आगामी काही वर्षे तरी हा संसर्ग जगाची पाठ सोडणार नाही पण अशा स्थितीतूनही माणसाला पुढे जावंच लागेल. आताही दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा ‘ओमिक्रॉन’ हा नवा व्हेरिएंट आढळून आला असून त्याचे तीसपेक्षाही अधिक म्युटेशन पाहायला मिळाले आहेत. ही संख्या डेल्टाच्या तुलनेत दुप्पट असल्याचं दिसून येतं. यातील एक प्रोटीन जनुक हे दुपटीनं दुसरी जनुकं तयार करत असल्याचं आढळून आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं यालाच ‘व्हेरिएंट ऑफ कन्सर्न’ ठरवलंय.

मूळ कोरोना विषाणूची अनेक उत्परिवर्तने (म्युटेशन्स) पाहायला मिळालीत. यामध्ये ‘आर-२०३ के’ आणि ‘जी-२०४ के’ यांचा समावेश होतो, यामुळे कोरोनाच्या विषाणूचा अधिक वेगानं प्रसार होतो. ‘एच-६५५ वाय’, ‘एन-६७९ के’ आणि ‘पी-६८१ एच’ या म्युटेशनमुळं विषाणूला सहज पेशीत प्रवेश करता येतो. यावेळी ‘एनएसपी-६’ प्रोटीन मात्र लगेच गायब होते. या सगळ्या बाबींचा विचार केला तर कोरोना हा लशींचे कवचही भेदू शकतो हे स्पष्टपणे दिसून येतं. केवळ कोरोनाच्या प्रोटीनला डोळ्यासमोर ठेवून जगभरातील सर्वच देशांनी लसीकरण केले असेल तर शंकेला वाव राहतोच. या विषाणूच्या जनुकावर लक्ष ठेवून त्याचा प्रतिकार करता येईल का? कारण या विषाणूच्या म्युटेशनचा वेगच एवढा प्रचंड आहे की त्यामुळंच तो लशींनाही भारी पडताना दिसतो. हा विषाणू उद्या दुसऱ्या जनुकात प्रवेश करून त्याला आपली शिकार बनवू शकतो. यामुळं सगळ्यात मोठा धोका कोणता असेल तर तो कोरोना लशी या निष्प्रभ ठरण्याचा. केवळ विषाणूला डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेली ‘कोव्हॅक्सिन’सारखी लस या संसर्गाला रोखण्याच्या शर्यतीमध्ये आघाडी घेऊ शकते का? मोठ्या उपजत चलाखीनं सातत्यानं रुप बदलणाऱ्या या विषाणूला केवळ मानवी शरीरातील प्रतिकार शक्ती हेच प्रभावशाली उत्तर असू शकते का? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरावर या विषाणूसोबत सुरू झालेल्या आपल्या लढाईचं भवितव्य अवलंबून असेल. खरोखरच हा विषाणू संपणार आहे की वारंवार त्यांच्या अशाच लाटा तयार होण्याचा धोका संभवतो याचे उत्तर मात्र येणारा काळच देऊ शकेल. आपल्याला मात्र सर्वच आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल.

(सदराचे लेखक ज्येष्ठ वैज्ञानिक असून विविध घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

(अनुवाद : गोपाळ कुलकर्णी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()