थोडं दूरचं पाहावं लागेल..

भारतीय समाज हा तसा भावनाप्रधान आहे. येथे जनतेवर भावनेचं राज्य चालतं. मागील काही दिवसांत समाजाचं वास्तवाशी असलेलं नातं तुटल्याचं चित्र पाहायला मिळतं.
Coronavirus
CoronavirusSakal
Updated on

देश आज मोठ्या विचित्र स्थितीमध्ये सापडलाय. देशातील तरुण सेलिब्रिटी मंडळींना भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही शोकांतिका वाटते तर काही जाणती तज्ज्ञ मंडळी हिंदुत्वाची तुलना दहशतवादाशी करतात. एकीकडे महाराष्ट्रात अमरावतीसारख्या शहरामध्ये दंगल उसळली असताना मणिपूरमध्ये आसाम रायफलचा कमांडिंग अधिकारी, त्याची पत्नी आणि आठ वर्षांचा मुलगा दहशतवाद्यांच्या गोळीबारात मरण पावतो. या सगळ्या घटना देशाच्या एकूणच विकास स्वप्नावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या आहेत. जागतिक महासत्ता होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आपल्या देशाला या गोष्टी खचितच भूषणावह नाहीत. भारतीय अर्थव्यवस्थेत आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणावर संपत्तीची निर्मिती झाली असली तरी तिचं वितरण मात्र असमान आहे. हा आर्थिक प्रवाह समाजाच्या शेवटच्या स्थरापर्यंत पोचलेलाच नाही.

समाजाच्या भौतिक प्रगतीबरोबरच बौद्धिक आणि नैतिक विकास देखील तितकाच महत्त्वाचा आहे. खरंतर सामाजिक जडणघडणीमध्ये या गोष्टींचं महत्त्व नाकारता येत नाही. त्याचबरोबर माणसाचं धार्मिक अधिष्ठान देखील तितकंच महत्त्वपूर्ण असतं.

मानवी जीवनामध्ये जसं धर्माचं वेगळं अस्तित्व आहे तसंच विचार प्रक्रियेला देखील महत्त्व आहे. हीच विचार प्रक्रिया अधिक मजबूत करण्याचं काम समाजातील जाणते लोक करत असतात. तेच समाजाचे मार्गदर्शक असतात.

त्या झाडाला चांगली फळं कशी ?

भारतीय समाज हा तसा भावनाप्रधान आहे. येथे जनतेवर भावनेचं राज्य चालतं. मागील काही दिवसांत समाजाचं वास्तवाशी असलेलं नातं तुटल्याचं चित्र पाहायला मिळतं. विकासाच्या गतीतून मिळालेली फळं आता केवळ काही लोकांच्या हातीच एकवटली आहेत. या पर्वताच्या शिखराकडं पाहिलं तर आपल्याला फार विषम चित्र पाहायला मिळतं. शिक्षणाचं व्यावसायिकरण झाल्यानं सामाजिक दरी अधिक रुंदावली आहे. अनेकांना आजही उपाशीपोटी झोपावं लागतं. केवळ अन्नाच्या अभावामुळं एखाद्याचा आत्मा व्याकूळ होत असेल तर त्यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही. हीच भूक दरवर्षी आपल्याकडं हजारो लोकांचा बळी घेते. देशाच्या सत्ताधाऱ्यांनी हे वास्तव कधीच विसरता कामा नये. नेते काय येतात आणि जातात. प्रगतीच्या मार्गावर चालूनच आपल्याला तोडगा काढता येतो. माणसाचं मार्गक्रमण कधी थांबत नसतं. समाजातील आर्थिक विषमता दूर होत नाही तोपर्यंत या देशातील श्रीमंत व्यक्ती कधीच सुरक्षित असू शकत नाही. ज्या झाडाची मुळंच सडलेली असतील त्याला चांगली फळं कशी लागतील?

खरंतर वर्तमानकाळाचं पालकत्व हे भूतकाळाकडं असतं. आपल्या प्रत्येक प्रगतीचं तो मूल्यमापन करत असतो. टीव्हीवरील नाचणारी, जल्लोष करणारी मंडळी, सत्तेच्या आणि अर्थकारणाच्या वर्तुळात ज्यांचा मुक्तसंचार असतो असे लोक आणि जेतेमंडळी यांनाही भूतकाळाचा प्रभाव टाळता येत नाही. कदाचित त्यामुळंच असेल त्यांना रात्री शांत झोप घेण्यासाठी देखील खूप परिश्रम घ्यावे लागतात. वर्तमानकाळ हा भूतकाळानं निर्माण केलेल्या साम्राज्याचा वतनदार असतो. तसं पाहता हा भूतकाळ सातत्याने वर्तमानावर सत्ता गाजवू पाहत असतो. अंध भक्त, अंधश्रद्धा, क्रौर्य आणि हुकूमशाही आदी माध्यमातून त्याचं राज्य चालतं. भ्रष्टाचार हा त्याचा आधारस्तंभ असतो तर सामान्यांच्या हिताकडं दुर्लक्ष हे ध्वजस्थानी असतं. आपण जेव्हा पुढं जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा भूतकाळाच्या सावल्या आपल्याला भीती घालत असतात. आपल्याच दारामध्ये उभं राहून त्या हसत असतात.

भारताला नेमक्या याच मर्यादा ओलांडाव्या लागतील. संकल्पनांचा अधोगामी प्रवाह अशी कोणतीही संकल्पना प्रत्यक्षात नसते. एका दिशेनं वाहणारा नदीचा प्रवाह जसं पुन्हा आपल्या उगमस्थानाकडं जाऊ शकत नाही तसंच आपल्याला देखील या भूतकाळाच्या प्रवाहातून आता बाहेर पडावं लागेल.

इतके प्रयत्न करून देखील भूतकाळ आपली पाठ का सोडत नसेल? सामंतशाही ही नेहमी बहरत जाणारी गोष्ट आहे. अनेक कुटुंबे येतात आणि सत्तेच्या केंद्रस्थानी विराजमान होऊन पायउतार देखील होतात. ज्यांना वेगळं भविष्यच नको असतं त्यांची चाकावरील पकड घट्ट असते, अशी मंडळीच समाजाचं दिशादर्शन करण्याचं प्रयत्न करत असतात. प्रगतीच्या व्याख्या हीच मंडळी निश्चित करत असतात. या गाडीचा वेग कधी वाढवायचा आणि त्याला कधी ब्रेक लावायचा याचा निर्णय देखील त्यांच्याकडून घेतला जातो. हे काही देशाचं भवितव्य असू शकत नाही ते त्याचं स्वतःचं भवितव्य असतं. आतापर्यंत तरी त्यांना त्यांच्या कलाने हा गाडा हाकण्यात यश आलं आहे. हे असं करताना ही मंडळी स्वतःच एका आजाराला बळी पडत आहेत. समाजपुरुषाच्या शरीरातून भूतकाळ काढणारा कोणतीही लस उपलब्ध नाही. उद्या बळावू पाहणाऱ्या या संसर्गाला रोखण्याचा कोणताही मार्ग आपल्याकडं नाही. विश्वाचं कल्याण ही एक दैवी घटना असून यात एक फार मोठी ऊर्जा समाजाला मार्ग दाखविण्याचा काम करत असते. तीच ऊर्जा राज्याला एका तार्किक पातळीपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करत असते. समाजाला जर पुढं न्यायचं असेल तर हा ऊर्जेचा प्रवाह कधीही आटता कामा नये.

कोरोनानं खूप शिकवलं

मानवी जीवितावर पृथ्वी आणि स्वर्गाचं अधिराज्य असतं, वेळोवेळी या शक्तींनी स्वतःचं प्रभुत्व सिद्ध केलं आहे. कोरोना काळामध्ये आपल्याला नेमकं तेच दिसलं. या काळामध्ये सगळ्याच पातळ्यांवर किती मोठा विरोधाभास पाहायला मिळाला? आपण अशा गोष्टींमधून शिकण्याची प्रक्रिया कधीच थांबविता कामा नये. लसीकरणानं कोरोनावर नियंत्रण प्रस्थापित केलं असलं तरीसुद्धा तो खरंच थांबला आहे का? आजही शेकडो असे देश असे आहेत जिथं जनतेला कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस मिळालेला नाही. ज्यांना लस मिळालेली नाही अशी मंडळी तर नव्या व्हेरिएंटला जन्म देत नसतील ना? आता आपल्याला खूप पुढं पाहावं लागेल. आपल्याला आपली संयुक्त कुटुंब पद्धती अधिक बळकट करून स्वतःचाच बळी देणारं हे दुष्टचक्र थांबवायला हवं. तेच तरुणाईला नादावतं आणि त्यांच्या कमाईवर डल्ला मारत असतं. आपल्याला साधं जगावं लागेल. ज्यात जीविताची हमी तर असेलच पण त्याचबरोबर थोडा किफायतशीरपणाही असेल. समाज आणि एकूणच नागरी संरचनेचा आपल्याला फेरआढावा घ्यायला हवा. स्वतःच्या उद्योगासाठी कोणत्याही शक्तीनं आपलं स्वातंत्र्य हिरावून घेता कामा नये म्हणून सावध राहायला हवं. लोकमान्य टिळकांनी जो स्वराज्याचा मूलमंत्र दिला होता ते स्वराज्य आपण खरंच मिळवलं आहे का? एवढ्या मेहनतीनं मिळालेलं स्वराज्य आपण गमावू का? याचे उत्तर कदापी नाही असेच द्यावे लागेल. लोकमान्यांच्या आवाहनाचा मतितार्थ लक्षात घेतला तर त्याचं आवाहन हे सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्यांना होतं हे सहज लक्षात येईल. आता त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केली तर नियती त्यांना कधीच माफ करणार नाही. पृथ्वीवर तर नाहीच पण मृत्यूनंतर देखील त्यांना माफी मिळणं अवघड आहे.

(लेखक ज्येष्ठ वैज्ञानिक असून विविध घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

(अनुवाद : गोपाळ कुलकर्णी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()