रस्त्याच्या किंवा वस्तीच्या नावाची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आपल्या देशात झाडांवरून खूप नावं दिली जायची. खूप गावं, वस्त्या झाडांवरून ओळखली जायची. स्थानिक झाडं. लगेच लक्षात यायचं की या भागात हे स्थानिक झाड आहे. आपल्याकडे चंपावाडी, बोर आळी, चंदनवाडी, लिंबाची वाडी, चिंचपोकळी, कांदेवाडी, फणसवाडी अशी नावं प्रसिद्ध होती. त्यातली काही अजूनही आहेत; पण दुर्दैवाने शहरात ही नावं नष्ट होताहेत.
अरविंद जगताप
युरोपात खूप ठिकाणी रस्ते ही केवळ अभिमानाची नाही तर जपण्याची गोष्ट असते. आपण रस्त्यांच्या बाबतीत फार संवेदनशील नसतो. पूर्वी रस्त्याला त्यावर चालणाऱ्या उद्योगांची नावं दिली जायची. आता महापुरुष पण लांब राहिले, राजकीय नेत्यांची (Political leaders) नावं देण्याचा सपाटा लावलाय. राजकीय लोकांच्या नावापलीकडेही नावं आहेत याची जाणीव आपल्याला होणं गरजेचं आहे. जिकडे बघावं तिकडे भ्रष्ट राजकीय लोकांचीच नावं असतील तर सुजाण नागरिक कसे घडतील?
गावाकडची पायवाट आता जास्तच सुंदर वाटते. शहरातले खड्डे असलेले सिमेंटचे किंवा डांबरी रस्ते बघून आता पुन्हा गावाकडचेच रस्ते बरे वाटतात. पांदीतली वाट, बैलगाडीच्या चाकांनी घट्ट केलेली वाट. या वाटा माणसांच्या सततच्या प्रवासाने बनलेल्या होत्या. त्यात सरकारी हस्तक्षेप नव्हता. गुत्तेदारी नव्हती. खर्च नव्हता, त्यामुळे संताप नव्हता. रस्त्याचा कर घेतला जात नव्हता, त्यामुळे चिडचिड नव्हती. नंतर रस्ते बनवायला दरवर्षी करोडो रुपये खर्च होऊ लागला आणि ते पैसे अक्षरशः पाण्यात जाऊ लागले. चिखलात मिसळू लागले. शहरात राहणारे लोक गावाच्या आठवणीत भावुक होतात; पण म्हणून शहरातले रस्ते गावातल्या पांदीतल्या रस्त्यासारखे व्हावेत हे गरजेचं नसतं.
शहरातही पूर्वी आजच्यासारखे नावाला आधुनिक रस्ते नव्हते. कॉलनी नव्हत्या. शहरात वस्ती किंवा पाडा म्हणायचे. आजही हमखास सगळ्या शहरात पुरा असतो. मुघल राजवटीचा प्रभाव म्हणून असलेले बायजीपुरा, औरंगपुरा. असाच मोहल्ला होता. अमका मोहल्ला, तमका मोहल्ला. आधी वाडी असायची. हजारो गावं आणि वस्त्या आहेत ज्यांच्या नावात वाडी आहे. खोताची वाडी, चिखलवाडी. मग समुद्र असेल तिथे खाडी किंवा अमुक गाव, तमुक गाव. शहरात पण गाव आहे. गिरगाव, माझगाव. मग गल्ल्या, आळी, लेन, स्ट्रीट, हिल. चौथी गल्ली, सातवी गल्ली असं म्हणायचे लोक. दलाल स्ट्रीट, फॅशन स्ट्रीटसारखे त्या त्या उद्योगांमुळे ओळखले जाणारे स्ट्रीट.
मोघल लेनसारख्या लेन किंवा थेट फोरास रोडसारखे रोड. कुठे लालबहादूर शास्त्री मार्ग किंवा महात्मा गांधी मार्ग, पण या सगळ्यात एक गोंधळ आहेच. ठरावीक महापुरुषांच्या नावाने सगळीकडे एवढे मार्ग आहेत की गोंधळ उडतो. नाव देण्यात आपली कलात्मकता थकलीय आता. कायम राजकीय फायद्याचा विचार करताना दिसतो आपण. कुठल्यातरी भंगार रस्त्याला महापुरुषांचं नाव दिलंच पाहिजे का? विवेकानंद मार्गावर कायम खड्डे असतात हे ऐकायला कसं वाटतं? सरदार पटेल रोडने जायचं नाही, तिथे कायम जाम असतो, असं ऐकायला वाईट वाटतं. खरं तर एखादाच आदर्श मुख्य रस्ता बनवावा आणि त्याला महापुरुषांचं नाव द्यावं. असा रस्ता जो जगभरातल्या लोकांसाठी कौतुकाचा विषय असावा. युरोपात खूप ठिकाणी रस्ते ही केवळ अभिमानाची नाही तर जपण्याची गोष्ट असते. त्यांचा इतिहास लिहिला जातो.
आपण रस्त्यांच्या बाबतीत फार संवेदनशील नसतो. अगदी खड्ड्यांची तक्रारही करत नाही. खरं तर आपल्याकडे रस्त्याच्या नावात केवढी विविधता होती. गमती होत्या. पूर्वी रस्त्याला त्यावर चालणाऱ्या उद्योगांची नावं दिली जायची. आपोआप कुणालाही आपल्या ठरावीक कामासाठी तो रस्ता गाठता यायचा. मासे घ्यायला मच्छी बाजार, बांगड्यांचा बांगडी बाजार, रंगारी मोहल्ला, कासारवाडी, आगरी पाडा, बोहरा बाजार, कुंभारवाडा, कसाई गल्ली अशी थेट नावं. चोर बाजार पण. नंतर नंतर अशी नावं देणं बंद झालं. का छोटी-मोठी उद्योजकता कमी झाली? व्यवसायाची आळी असायची; पण आता गल्लोगल्ली चायनीजच्या गाड्या दिसतात किंवा मोबाईलची दुकानं. नवे ‘मेक इन इंडिया’ व्यवसाय कुठे दिसतात? या गल्ल्या किंवा बाजार हे ‘मेक इन इंडिया’ होतं. ते हळूहळू नष्ट होताहेत याची कुणी दखलही घेत नाही.
रस्त्याच्या किंवा वस्तीच्या नावाची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आपल्या देशात झाडांवरून खूप नावं दिली जायची. खूप गावं, वस्त्या झाडांवरून ओळखली जायची. स्थानिक झाडं. लगेच लक्षात यायचं की या भागात हे स्थानिक झाड आहे. आपल्याकडे चंपावाडी, बोर आळी, चंदनवाडी, लिंबाची वाडी, चिंचपोकळी, कांदेवाडी, फणसवाडी अशी नावं प्रसिद्ध होती. त्यातली काही अजूनही आहेत; पण दुर्दैवाने शहरात ही नावं नष्ट होताहेत. गावांची नावं तशीच आहेत; पण एखादी जांभूळवाडी असेल तर तिथे जांभूळ उरलेलं नाही. झाडं नष्ट झालीत आणि नावं उरलीत फक्त. काय जपायचं हे लक्षातच राहिलं नाही. गावाची ओळख म्हणून फक्त कमानी जपल्यात. लेबरनम नावाचा रोड आहे. या रोडचा गोंधळ काय झाला होता? नाव बदलायला निघाले होते लोक.
कारण काय? तर इंग्रज माणसाचं नाव नको. नंतर एका सुज्ञ माणसाने सांगितलं हे इंग्रज माणसाचं नाव नाही. झाडाचं नाव आहे. मग प्रकरण शांत झालं. दुर्दैवाने एकेकाळी बहाव्यासाठी ओळखला जाणारा रस्ता आज फार कमी झाडं टिकवून आहे. झाडं ही रस्त्यांची ओळख होती. सौंदर्य होतं. मराठवाडा असो किंवा पश्चिम महाराष्ट्र. रस्त्याच्या कडेला वडाच्या झाडांच्या रांगा होत्या. अगदी पायी प्रवास करणाऱ्यालाही सतत सावली होती. वडाच्या वाढलेल्या फांद्या महामार्गावर सावली धरायच्या. एखाद्या कमानीतून प्रवास करतोय असं वाटायचं. चार पदरी हायवे करताना ती सगळी झाडं तोडली गेली. नवीन झाडं लावली, असं सांगण्यात आलं; पण त्याचा मागमूस दिसत नाही. रस्ते मोठे झाले; पण भकास झाले. वेगात जातो आपण ते बरंच आहे. नाही तरी बघण्यासारखं काय उरलंय रस्त्याच्या कडेला? हॉटेल्स? का होर्डिंग्ज?
मुंबईत इंग्रजांनी खूप काम केलं. भारतातून माल न्यायला जे जे करता येईल ते केलं. इंग्रजांनी विकास केला तो त्यांचा स्वार्थ होता म्हणून; पण त्यातली चांगली गोष्ट एवढीच की त्यांनी ज्या गोष्टी उभारल्या त्या उत्तम आणि देखण्या होत्या. त्यांच्या काळातही मोठमोठ्या गोष्टीला त्यांनी त्यांच्या राणीचं नाव दिलं. जसं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आधी व्हिक्टोरिया टर्मिनस होतं; पण इंग्रजांनी रस्ते, शाळा किंवा रेल्वे स्थानकाला दिलेली नावं बघण्यासारखी आहेत. शिकण्यासारखी आहेत. आपण कुणी खूप दीड शहाणा असेल, तर स्वतःला काय लॉर्ड फॉकलंड समजतो का? असं म्हणतो. पण हा म्हणजे कोण? तर गव्हर्नर होता मुंबईत. त्याच्या नावावरून फॉकलंड रोड होता. तसाच पेडर नावाचा गव्हर्नर होता इंग्रज. त्याच्या नावावरून पेडर रोड. कफ परेडही कफ नावाच्या एका चेअरमनच्या नावावरून. तीच गोष्ट एल्फिन्स्टन, फर्ग्युसन आणि क्रॉफर्ड या नावांची. सगळे मोठे इंग्रज अधिकारी. आता तुम्हाला प्रश्न पडेल की यात विशेष काय? विशेष हेच की त्यांनी आपल्या गव्हर्नर, महापालिका अधिकाऱ्यांची नावं दिली रस्त्याला, वस्तीला, वास्तूला.
आपण किती अधिकाऱ्यांची नावं देतो? आणि का देत नाही? समजा ठरवलं अधिकाऱ्याचं नाव द्यायचं तर असे किती चांगले रस्ते बनवलेत? किती दर्जेदार वास्तू बनल्यात? हे सगळे इंग्रज अधिकारी त्यांच्याच नाही तर आपल्या देशासाठीही मोठं काम करून गेलेत. तेवढी संख्या आपल्या अधिकाऱ्यांची का नाही? बरं ही नावं काही त्या अधिकाऱ्यांनी स्वतः दिलेली नाहीत. ग्रँट मेडिकल कॉलेजला कौतुकाने नाव दिलंय त्याचं. एल्फिन्स्टन कॉलेजचंही तेच. सन्मानाने नावं दिली गेलीत. आपल्याकडे जे काही मोजके चांगले अधिकारी आहेत त्यांना आपण सन्मान देत नाही. खूप वर्षे झाली अधिकाऱ्यांच्या नावाने रस्ते, वास्तू ही पद्धत बंद झाली. ही पद्धत सुरू व्हायला तसे अधिकारी निर्माण होणंही गरजेचं आहे.
महापुरुष पण लांब राहिले आता राजकीय नेत्यांची नावं देण्याचा सपाटा लावलाय. राजकीय लोकांच्या नावापलीकडे पण नावं आहेत याची जाणीव आपल्याला होणं गरजेचं आहे. जिकडे बघावं तिकडे भ्रष्ट राजकीय लोकांचीच नावं असतील, तर सुजाण नागरिक कसे घडतील? अजूनही वेळ गेलेली नाही. चांगले अधिकारी घडले पाहिजेत. त्यांनी चांगले रस्ते आणि चांगल्या वास्तू बनवल्या पाहिजेत. अजूनही खूप काम बाकी आहे. अजूनही नाव ठेवायला जागा आहे. चांगल्या अर्थाने...
(लेखक चित्रपट लेखक, गीतकार, दिग्दर्शक आणि ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचे पत्रलेखक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.