'हिरो' पडद्यावरचे अन्‌ वास्तवातले! (अरविंद जगताप)

arvind jagtap
arvind jagtap
Updated on

प्रत्येकाला हिरो व्हावं वाटणं स्वाभाविक आहे; पण या "हिरो' होण्याच्या नादात हजारो लोक "झिरो' होण्याकडं प्रवास करत असतात. तुम्ही इतर कुठल्याही क्षेत्रात अपयशी झालात तरी तो अनुभव कुठं ना कुठं कामी येतो; पण अभिनयातलं अपयश अवघड असतं. तरी या क्षेत्राचं वेड मात्र झपाटून टाकणारं आहे. अमिताभ, शाहरुखच्या घरासमोर शेकडो लोक जमतात त्यांना बघायला मिळावं म्हणून. सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकाला, शास्त्रज्ञाला किंवा चांगला रस्ता किंवा पूल बनवणाऱ्या इंजिनिअरला बघायला अशी गर्दी होत नाही. खरंतर हेसुद्धा हिरो असतात; पण आपल्याला हिरो म्हणजे एकच वाटतो. चित्रपटांत काम करणारा. मग लाखो तरुणांना असाच हिरो व्हावं वाटतं. त्यातून जसे काही अफलातून अभिनेते जन्म घेतात, तशाच फसवणुकीच्या लाखो कथाही जन्म घेतात.

चित्रपटात काम करायचं हे स्वप्न लाखो तरुण-तरुणींचं असतं. डॉक्‍टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय असं सांगत असले, तरी खूप लोक मनातल्या मनात स्वतःला शाहरुख किंवा करीना कपूरच्या जागी बघत असतात. गाणी कानानं ऐकत असतात. मनात मात्र स्वतः पडद्यावर नाचत असतात. यात चूक काहीच नाही. प्रत्येकाला हिरो व्हावं वाटणं स्वाभाविक आहे; पण या "हिरो' होण्याच्या नादात हजारो लोक "झिरो' होण्याकडं प्रवास करत असतात, ही फार भयंकर गोष्ट आहे. तुम्ही इतर कुठल्याही क्षेत्रात अपयशी झालात तरी तो अनुभव कुठं ना कुठं कामी येतो; पण अभिनयातलं अपयश अवघड असतं. तरी या क्षेत्राचं वेड मात्र झपाटून टाकणारं आहे. त्यासाठी काय काय नाही करत लोक? त्याला कारणही तसंच आहे. अमिताभ, शाहरुखच्या घरासमोर शेकडो लोक जमतात त्यांना बघायला मिळावं म्हणून. सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकाला, शास्त्रज्ञाला किंवा चांगला रस्ता किंवा पूल बनवणाऱ्या इंजिनिअरला बघायला अशी गर्दी होत नाही. खरंतर हेसुद्धा हिरो असतात; पण आपल्याला हिरो म्हणजे एकच वाटतो. चित्रपटांत काम करणारा. मग लाखो तरुणांना असाच हिरो व्हावं वाटतं. त्यातून जसे काही अफलातून अभिनेते जन्म घेतात, तशाच फसवणुकीच्या लाखो कथाही जन्म घेतात.

एक निर्माता चित्रपट काढायचा म्हणून वर्षभर ऑडिशन्स घेत होता. शेकडो कलाकारांकडून त्यानं पैसे घेतले. चित्रपटात काम देतो म्हणून. नंतर गायब झाला ते कायमचा. गावोगावचे उत्तम अभिनयगुण असलेले तरुण-तरुणी केवळ योग्य ठिकाणी ओळख नाही म्हणून अशा लोकांच्या नादी लागतात. पैसे आणि वेळ गमवून बसतात. खूपदा निर्माताच फसत असतो. चित्रपटाची काही जाण नसलेले लोक दिग्दर्शक म्हणून मिरवतात. निर्मात्याला ग्लॅमर दाखवून पैसे घालायला लावतात. त्याला बिचाऱ्याला कशाचा काही अंदाज नसतो. असे कित्येक निर्माते दरवर्षी तयार होतात. एका चित्रपटानंतर गायब होतात. मराठी चित्रपटसृष्टीची गंमत अशी आहे, की चित्रपट बनवून द्यायला खूप मराठी माणसं आहेत; पण चित्रपट विकून द्यायला मात्र एखाद्‌दुसराच मराठी माणूस सापडेल. हिंदीसारखे आयटम सॉंग बनवायची निर्मात्यांची खूप इच्छा असते; पण मराठी चित्रपटाचं संगीत अशा प्रकारे विकलं जातं का, या गोष्टीचा शोध त्यांनी घेतला पाहिजे. आपल्या नात्यातल्या मुलाला किंवा मुलीला संधी देण्यासाठी चित्रपट बनवणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही. म्हणजे विचारलं तर साधं नावसुद्धा सांगता न येणाऱ्या पोरांना या लोकांना हिरो बनवायचं असतं. अशा चित्रपटांची संख्यासुद्धा कमी नाही आणि या सगळ्या चित्रपटांमुळं मराठी चित्रपट चालत नाहीत असं चित्र मोठ्या प्रमाणावर तयार होतं.

एका शहरात एक दिग्दर्शक ऑडिशन घ्यायला गेले. मुलं-मुली जमली होती. त्यातल्या एका मुलीचे नीट मेकअप करून फोटो काढायचं दिग्दर्शकानं ठरवलं. शहरातल्या एका ब्युटीपार्लरमध्ये तिला घेऊन गेले. महागडा फेसपॅक आणि काय काय सुरू झालं. मुलीनं गळ्यातली सोन्याची चेन आणि पर्स दिग्दर्शकाकडं ठेवायला दिली. अर्धा तास नट्टापट्टा चालू होता. नंतर मुलगी बाहेर आली, तर दिग्दर्शक केव्हाच पळून गेला होता. चेन गेली, पर्ससुद्धा गेली. वर पार्लरचे पैसे तिलाच भरावे लागले. बरं एवढं होऊन दिग्दर्शकाचा साधा नंबरसुद्धा नव्हता कुणाकडं. अशा पद्धतीच्या घटना सर्रास चालू असतात. चित्रपट महामंडळ विनापरवानगी ऑडिशन घेऊ देत नाही; पण छोट्या शहरांत या गोष्टी लोकांना माहीत नसतात. कुठल्याही ऑडिशनला आई-वडील आपल्या मुलांना घेऊन पोचलेले दिसतात. चित्रपटात काम देतो म्हणून अनेक संस्था चालू आहेत. ज्यात होणारी फसवणूक भयंकर आहे. संपूर्ण देशातून हजारो मुलं चित्रपटात काम करायचं म्हणून घरून पळून येतात. घरीच चोऱ्या करून येतात. मुंबईत संघर्ष करताकरता चुकीच्या मार्गाला लागतात.

मुंबईत काही काही बिअर बार असे आहेत जिथं प्रत्येक टेबलवर रोज नवीन चित्रपट बनतो! मुंबईत नवीन आलेल्या माणसाला भूलथापा देऊन पार्टीचा खर्च उचलायला लावला जातो. दुसऱ्या दिवशी नवीन गिऱ्हाईक. "चला हवा येऊ द्या'सारख्या कार्यक्रमात चित्रपटाचं प्रमोशन करायला कुणाला एक रुपया द्यावा लागत नाही; पण या नावावरसुद्धा पैसे उकळण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. चित्रपटात काम करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. आपल्या स्वप्नासाठी खूप लोक कितीही पैसे खर्च करायला तयार होतात; पण मुळात चित्रपटात काम द्यायला एखादा पैसे मागत असेल, तर तो चित्रपट काढायला कुठून पैसे खर्च करणार? चांगला चित्रपट करणारा माणूस चुकूनही अभिनेत्यांना पैसे मागत नाही. हे क्षेत्र मृगजळासारखं होतं; पण आता इतकी चॅनेल्स आहेत, की काम मिळवणं खूप अवघड गोष्ट नाही. आपल्या शहरात किंवा गावात चांगली नाटकं किंवा एकांकिका करत राहिलात तरी तुमच्याकडं नक्की लक्ष जाईल. सोशल मीडिया आज बसल्याजागी तुम्हाला जगभर पोचवू शकतो. साउथमधल्या स्वतःच्या शेतात वेगवेगळ्या पाककृती बनवणाऱ्या बाईला जगभर कोट्यवधी लोक बघतात. इंदुरीकर महाराजांचं कीर्तन लाखो लोक ऐकतात. "गावाकडच्या गोष्टी'सारखी वेबसिरीज स्वतःच्या गावात राहून बनवणारे तरुण महाराष्ट्रात लोकप्रिय होतात. हे सगळं शक्‍य होतं स्वतःच्या कर्तृत्वावर आणि कष्टावर विश्वास असल्यानं. पैसे देऊन हे शक्‍य नाही.

आज मुंबईत असे हजारो तरुण आहेत जे चित्रपटात नाव कमवायला आले होते. यश मिळालं नाही. आता गावी कुठल्या तोंडानं परत जायचं म्हणून मुंबईत राहतात. पडेल ते काम करतात. शिवम हा असाच एक. वडील नाटकात काम करायचे. अपघातात वारले. आता आई एकटी असते. धुणी-भांडी करते. शिवम मुंबईत जाऊन हिरो होईल हे स्वप्न आई पाहतेय त्याला दहा वर्षं झाली. शिवम पहिली काही वर्षं निर्मात्यांच्या दारोदार हिंडला. छोटे मोठे चार-पाच रोल मिळाले. त्यापेक्षा फार काही घडलं नाही. एका दिग्दर्शकाकडं त्याच्या घरचं काम करू लागला. घरगडी बनून. केवळ एक चांगला रोल मिळेल या आशेनं. दिग्दर्शक त्याला प्रत्येक चित्रपटाच्या वेळी स्वप्न दाखवायचा. शिवम रात्रीबेरात्री दिग्दर्शक सांगेल ती कामं करायचा. अर्ध्या वेळा पार्टीसाठी दारू आणून दे. चखना आणून दे. रात्री उशिरा जेवण आणून दे. ग्लास उचलून ठेव. हळूहळू येणाऱ्या मित्रांना रात्री गाडी चालवता येणार नाही म्हणून घरी सोडून ये. या कामामुळं शिवम गाडी शिकला. आता शिवम त्याच दिग्दर्शकाकडं ड्रायव्हर आहे. शूटिंगच्या सेटवर वेगवेगळ्या कलाकारांसोबत फोटो काढतो. आईला पाठवतो. आई मोबाईलमध्ये का होईना पोरगा "हिरो'सोबत दिसतो म्हणून समाधानी आहे. एक दिवस तिला आपल्या मुलाला थिएटरमध्ये जाऊन पडद्यावर पाहायचंय. त्या आशेवर ती आजही धुणी-भांडी करतेय. प्रत्येक भांडं घासून चकचकीत करताना तिला आपला नाही आपल्या "हिरो' झालेल्या मुलाचा चेहरा दिसत असतो.

शिवमच्या आईसारखे कितीतरी आई-वडील वाट पाहून असतात. मागं राजपाल यादवनं एका कार्यक्रमात किस्सा सांगितला होता. खूप वर्षं मुंबईत स्ट्रगल केलेला एक मुलगा आपल्या गावी जातो. घरी वडील त्याच्यावर खूप नाराज असतात. वडील डिस्कव्हरीसारखी वाहिनी बघत असतात. त्यात घोडे, हत्ती दाखवत असतात. वडील मुलाला म्हणतात ः ""आता घोडे आणि हत्तीपण आले टीव्हीवर. तू कधी दिसणार?'' स्ट्रगल करणाऱ्या मुलाकडं याचं उत्तर नसतं. खरंतर या गोष्टीचं उत्तर कुणाकडंच नसतं; पण या क्षेत्रात आपण यशस्वीच झालं पाहिजे याचं ओझं बाळगून हजारो तरुण-तरुणी आपल्या अवतीभवती फिरताना दिसत असतात. यातले बरेच स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतात ही एक चांगली गोष्ट आहे; पण यातले खूप जण नैराश्‍याच्या गर्तेत जातात. हे अपेक्षेचं ओझं त्यांना सहन होण्याच्या पलीकडं असतं.
अगदी गाण्याच्या, नृत्याच्या कार्यक्रमांतही आई-वडील जे ओझं आपल्या मुलावर टाकत असतात, ते बघून भीती वाटू लागते. आपल्याकडं लहान मुलांवर खूप चित्रपट येतात. खूप रिऍलिटी शो असतात; पण या मुलांची मनःस्थिती काय असते हे जवळून बघायला पाहिजे. त्यांच्यातलं निरागसपण, बालपण हरवत जातं. आपण कुणीतरी विशेष आहोत ही जाणीव मोठ्या माणसांनासुद्धा सहजासहजी झेपत नाही. ग्लॅमर न पेलवलेले कित्येक मोठे स्टार आपण बघतो. ही तर लहान मुलं आहेत. ते या सगळ्या गोष्टीला कसं तोंड देत असतील? अशा क्षेत्रात खूप वेळा आपण आपला खरा चेहरा हरवून बसतो. आपण आपल्याला नक्की ओळखलेलं असेल तर ठीक आहे. नाहीतर स्वतःबद्दल भलतेच गैरसमज बाळगत माणसं जगत राहतात आयुष्यभर. मेकअप धुतला जातो रोज; पण मुखवटा गळून पडत नाही.... आणि या मुखवट्याचा आदर्श घेऊन आणखी लाखो भावी मुखवटे तयार होत राहतात. रजनीकांतसारखा एखादा अभिनेता आहे तसा जगू शकतो. आपल्याच आरत्या ओवाळून घेण्याच्या या शर्यतीत होर्डिंगना अभिषेक होऊनही रजनीकांत जमिनीवर असतो. खरं खरं जगण्यात यश आलं, की कुठल्याच अपयशानं माणूस खचत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, की हिरो व्हायला आपण पडद्यावरच दिसायला पाहिजे असं नाही हे चित्र निर्माण व्हायला हवं. शेकडो ए. पी. जे. अब्दुल कलाम निर्माण व्हायला हवेत- जेणेकरून तरुणांना वाटेल, की फक्त "अँग्री यंग मॅन' नाही- "मिसाईल मॅन'सुद्धा "हिरो' होऊ शकतो. फक्त पडद्यावरच्याच नाही खऱ्या आयुष्यातल्या हिरोलाही आपण ग्लॅमर मिळवून दिलं पाहिजे. पडद्यावर यायला सलमान, शाहरुख कशाला व्हायला पाहिजे? महेंद्रसिंह धोनी, मेरी कोम, मिल्खासिंग यांच्यासारख्या छोट्या गावांतल्या हिरोंची गोष्टसुद्धा पडद्यावर येतेच. त्यासाठी स्वतःच नाचलं पाहिजे असं नाही. आपलं चांगलं काम लोकांपर्यंत पोचलं पाहिजे एवढंच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.